.
अनुभव Experiences

पुण्यातला हिवाळा


 

ऑक्टोबर मधल्या गरमीचे कंटाळवाणे दिवस सरता सरत नसताना अचानकपणेच यावर्षी हिवाळा पुण्यात येऊन दाखल झाला. भारतीय द्वीपकल्प किंवा निदान या द्वीपकल्पातील मध्यवर्ती भागात असलेल्या दख्खनच्या पठारी प्रदेशाला, खरे तर उष्ण कटिबंधीय प्रदेश म्हणणेच योग्य ठरावे, कारण वर्षातील बहुतेक महिने या प्रदेशात गरम हवाच सातत्याने असते. परंतु विषुववृत्ताच्या बर्‍याच उत्तरेला किंवा दक्षिणेला असलेल्या भूप्रदेशांवर जसे उन्हाळाहिवाळा हे दोनच ऋतू येतात तसे दख्खनच्या पठारावर न येता प्रत्यक्षात 3 ऋतू येतात. हा तिसरा अगांतुक ऋतू, उन्हाळा पराकोटीला पोचलेला असताना सुरू होणार्‍या नैऋत्य मॉन्सून वार्‍यांबरोबरच अचानकपणेच येतो. या वार्‍याबरोबर भारतीय द्वीपकल्पावरचे हवामान एकदम बदलते. उन्हाळ्याच्या झळांचे एकदम शीतल आणि सुखद अशा वार्‍यामध्ये रूपांतर होते व हवामान एकदमच सुखदायक बनते. जादूच्या कांडी सारखे हवामान बदलणार्‍या या ऋतूला अर्थातच आपण वर्षा ऋतू या नावाने ओळखतो.

साधारण ऑक्टोबर महिन्याच्या सुरवातीला पाऊस ओसरण्यास सुरुवात होते व भारतीय द्वीपकल्प उन्हाळ्याच्या तडाख्याखाली काही दिवसांसाठी का होईना पण परत एकदा सापडते. परंतु ओसरणार्‍या नैऋत्य मौसमी वार्‍यांची जागा आता ईशान्य मौसमी वारे घेतात आणि परत एकदा भारतीय द्वीपकल्पाच्या प्रामुख्याने दक्षिण भागावर पावसाळी ढग दाटू लागतात. हे वारे कर्नाटकातील बेंगळूरू शहरापासून दक्षिणेकडे तामिळ्नाडू आणि पार केरळापर्यंत परत एकदा वर्षा ऋतू आणतात.

ईशान्य मौसमी वार्‍यांच्या प्रभावाखाली येणार्‍या या पट्ट्याच्या बरेच उत्तरेला पुणे शहर स्थित असल्याने हे पावसाळी ढग पुण्यापर्यंत पोचण्यात यशस्वी होत नाहीत आणि याच सुमारास उत्तरेकडून वाहणारे वारे मात्र हिमालयातील थंड हवा पुण्यापर्यंत पोचवतात व परिणामी पुण्याला या दिवसात छान कोरडी हवा व थंडीची चाहूल देणारे तपमान हे नेहमीच अनुभवण्यास मिळते. पण याच काळात बंगालच्या उपसागरात चक्री वादळे निर्माण होण्यास सुरूवात होते आणि या चक्री वादळांपैकी बहुतेक भारताच्या पूर्व किनार्‍यावर एका पाठोपाठ येऊन धडकत राहतात. एकदा का ही चक्री वादळे भारताच्या पूर्व किनार्‍यावर पोहोचली की त्यांचे कमी दाबाच्या पट्ट्यामध्ये रूपांतर होण्यास वेळ लागत नाही आणि या कमी दाबाच्या पट्ट्यांमुळे त्या भागातील आकाशात परत एकदा कृष्ण मेघ येऊन दाखल होतात. हे कृष्ण मेघ पुण्यावर काही दिवसातच पोहोचतात व पुण्याला वादळी पावसाचे हवामान परत एकदा जाणवू लागते. हा कमी दाबाचा पट्टा हिमालयाकडून येणार्‍या थंड वार्‍यांना पळवूनच लावतो आणि पुण्यातील हवा परत एकदा पावसाळ्याच्या सुरवातीच्या दिवसात असते तशीच बनते. उकाडा आणि चिकचिकाट यांनी लोक त्रस्त होतात. हे असे थोडे दिवस चालते पण मग मेघ लुप्त होतात आणि परत एकदा उत्तरेचे थंड वारे मस्तपैकी गारवा घेऊन पुण्यात अवतीर्ण होतात.

या वर्षी सुद्धा साधारणपणे याच धर्तीवर हवामान बदलत गेले. नोव्हेंबर महिन्याच्या सुरुवातीस छान गारवा सुरू झाला होता आणि रात्रीचे किमान तपमान 11 अंशांपर्यंत खाली उतरले होते. पण या नंतर फायलिन हे चक्री वादळ प्रथम आले व त्याच्या मागोमाग हेलन आणि लेहर ही चक्री वादळे आली. या प्रत्येक चक्री वादळाने बरोबर पावसाळी मेघ आणले आणि पुण्यातील हवामान परत एकदा उकाडा, मेघगर्जनेसह पाऊस आणि चिकचिकाट यांच्या चक्रातून गेले. आता जरा कोठे या पावसाळी हवेपासून पुणेकरांची सुटका झाल्यासारखी दिसते आहे. हवा परत एकदा थंड झाली आहे व रात्रीचे किमान तपमान दशकाच्याही खाली उतरले आहे. सकाळी आता चांगलेच थंड होते आहे व दुपारचे 3 वाजत नाहीत तोच संध्याकाळच्या लांब सावल्या पडू लागल्या आहेत व येणारे दिवस आता लहान असणार आहेत याची जाणीव करून देऊ लागल्या आहेत.

भारतीय द्वीपकल्पावरचा हिवाळा हा उत्तरेकडच्या भागावर येणार्‍या या ऋतू पेक्षा बराच निराळा असतो. द्वीपकल्पावरच्या भागातील बहुतांशी झाडे 12 महिने हिरवीगार रहातात व पानगळ अशी नसते. त्यामुळे उत्तरेकडे येणारा फॉल हा ऋतू येथे येतच नाही. उत्तरेकडे एकदा फॉल सुरू झाला की वृक्षांची सर्व पाने गळून जातात आणि पुढचे 3 किंवा 4 महिने सर्वच वातावरण मंद, कुंद, नैराश्य पूर्ण आणि असाहाय्य असल्यासारखे भासू लागते. द्वीकल्पावरील भागात मात्र झाडांवर हिरवीगार पाने दिसतात व छान आणि प्रखर नसणारे ऊन पडते. यामुळे हा ऋतू येथे लोकांच्या विशेष आवडीचा असतो यात नवल असे ते काहीच नाही.

काही दशकांपूर्वी पुणे हे 2 लाख वस्ती असलेले छोटेखानी शहर होते. शहरात कॉन्क्रीटची जंगले, फ्लायओव्हर नव्हते. अगदी चौकाचौकात आढळणारे वाहतूक नियंत्रक दिवेही तेंव्हा नव्हते. त्या काळच्या पुण्याच्या हिवाळ्यात परत एकदा येथे डोकावण्याचा मोह मला आवरत नाहीये. त्या काळातला हिवाळा म्हणजे सकाळी हुडहुडी भरवणारी थंडी आणि धुकेछान उबदार दुपारीआणि लांब लांब रात्री असे थोडक्यात सांगता येईल. सकाळी उठल्यावर समोर येणारा वाफाळलेला चहा आणि रात्री माझ्या आईचे गरमागरम जेवण हे लगेच माझ्या नजरेसमोर येते. त्या काळात पुण्यात एवढी झाडे झुडपे होती की आजूबाजूला जरा शोधले की भरपूर काटक्या मिळत. या काटक्या वापरून सकाळ संध्याकाळ रस्त्याच्या कडेला पेटवलेल्या शेकोट्या व त्यांच्या शेजारी शेकत बसलेली मंडळी नेहमी दिसत असत.

आजकालचे पुणे शहर खूपच बदललेले आहे. आताचे पुणे म्हणजे एक महानगर झाले आहे आणि जुन्या पुण्याच्या आठवणी क्वचितच कुठेतरी रेंगाळताना दिसतात. असे जरी असले तरी प्रत्येक हिवाळ्यात माझे मन परत एकदा माझ्या लहानपणच्या पुण्याच्या हिवाळ्यात गेल्याशिवाय राहूच शकत नाही आणि गेले ते दिवस! असे मनाला वाटल्याशिवायही रहात नाही. पण यालाच तर जीवन ऐसे नाव! म्हणायचे, नाही का?

19 डिसेंबर 2013

Advertisements

About chandrashekhara

I am a retired electronics engineer. I am interested in writing, reading books. Other hobbies include Paper models, wooden fret work and social networking.

चर्चा

अद्याप प्रतिक्रिया नाहीत.

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदला )

Connecting to %s

जुने लेख शोधा

Enter your email address to subscribe to this blog and receive notifications of new posts by email.

Join 387 other followers

MyFreeCopyright.com Registered & Protected

माझे नवीन इ-पुस्तक

एका साम्राज्याच्या शोधात

Advertisements
%d bloggers like this: