.
History इतिहास

एक पुरातन व्यापार केंद्र; तगर -भाग 1


दोन वर्षांपूर्वी, महाराष्ट्राच्या कानाकोपर्‍यात असलेल्या आणि सह्याद्री पर्वतराजीच्या कुशीत दडलेल्या बौद्ध लेण्यांना भेटी देण्याचा बेत मी यशस्वी रितीने पार पाडला होता. सह्याद्री आणि सातमाला पर्वतांच्या दर्‍यांमध्ये असलेली ही लेणी म्हणजे एकेकाळचे बौद्ध मठ होते. या पैकी बहुतेक मठांमध्ये मोठ्या संख्येने बौद्ध भिख्खूंचे वास्तव्य एके काळी होते. या बौद्ध लेण्यांचे त्यांच्या भौगोलिक स्थानाप्रमाणे दोन गट करता येतात. यापैकी पहिला म्हणजे दक्षिणेकडे असलेल्या कार्ले, भाजे, शेलारवाडी, जुन्नर, कोंडाणे या लेण्यांचा एक गट होतो. दुसर्‍या किंवा उत्तरेकडच्या लेण्यांच्या गटात नाशिक, पितळखोरे आणि जगप्रसिद्ध अजंठा लेण्यांचा समावेश करता येतो.
त्या कालातील बौद्ध धर्माच्या नियमांप्रमाणे, बौद्ध भिख्खूंनी कोणत्याही प्रकारची म्हणजे स्थावर किंवा जंगम मालमत्ता प्राप्त करण्या आणि बाळगण्यास संपूर्णपणे बंदी होती. त्याचप्रमाणे उदरनिर्वाहासाठी अत्यावश्यक असलेले अन्न आणि शरीरावर धारण करण्याची वस्त्रे ही सुद्धा समाजाकडून दान म्हणून मिळालेली असली पाहिजेत असेही कडक बंधन या बौद्ध भिख्खूंवर असे. हे नियम बघितल्यास, मनात साहजिकच असा प्रश्न उभा राहिल्याशिवाय रहात नाही की इ.स. पहिल्या शतकाच्या आसपास सह्याद्री पर्वताच्या कडेकपार्‍यांत व अत्यंत दुर्गम ठिकाणी स्थापना झालेल्या या बौद्ध मठात मोठ्या संख्येने वास्तव्यास असणारे हे बौद्ध भिख्खू, आपला उदरनिर्वाह कसा काय चालवत असतील? मागच्या शतकातील एक विद्वान व्यासंगी, कै. दामोदर धर्मानंद कोसंबी यांनी 1955 मध्ये प्रसिद्ध केलेल्या ‘जर्नल ऑफ द बॉम्बे ब्रॅन्च ऑफ रॉयल एशियाटिक सोसायटी’ च्या अंकात या प्रश्नाचे एक सोपे उत्तर देण्याचा प्रयत्न केला होता. प्रो.कोसंबी यांच्या मताप्रमाणे हे सर्व मठ त्या काली जे महत्त्वाचे व्यापार मार्ग होते त्यांच्या जवळच स्थापन केले गेले होते. त्याचप्रमाणे ज्या मठात मोठ्या संख्येने भिख्खू वास्तव्यास होते असे मठ जेथे असे दोन किंवा त्याहून जास्त व्यापारी मार्ग एकत्र येत होते अशा ठिकाणांजवळच फक्त स्थापन केले गेले होते. या रस्त्याने ये जा करणार्‍या व्यापारी मंडळींनी केलेल्या दानधर्मातून या बौद्ध मठांची गुजराण सहजपणे होत होती. प्रो. कोसंबी यांच्या मताने हे मठ या व्यापाऱ्यांना, सुरक्षा, व्यापारासाठी भांडवल पुरवठा, या सारख्या अनेक सेवा उपलब्ध करून देत असत व त्या बदल्यात त्यांना या व्यापार्‍यांकडून देणग्या सहजपणे मिळू शकत. अर्थात हा खुलासा ग्राह्य मानला तर असे प्रश्न उपस्थित होतात की एवढ्या मोठ्या संख्येने स्थापन झालेल्या या बौद्ध मठांना एवढा सशक्त आर्थिक आधार देऊ शकत असणारा हा व्यापार कोणामध्ये आणि काय प्रकारचा होता? या प्रश्नाचे उत्तर इतिहासाची थोडीफार जाण आणि आवड असणार्‍या बहुतेक वाचकांना ज्ञात असेलच. हा व्यापार अर्थातच सातवाहन साम्राज्य आणि रोमन साम्राज्य यांमध्ये चालत होता.
ज्येष्ठ प्लायनी (Gaius Plinius Secundus) ही इ.स. 23 ते 79 या कालखंडात होऊन गेलेली एक सुप्रसिद्ध रोमन व्यक्ती! तत्त्वज्ञानी, लेखक आणि सुरवातीच्या कालातील रोमन पायदल-नौदलाचा कमांडर, अशा अनेकविध अंगांनी प्रसिद्धी मिळालेला प्लायनी, निसर्गनिष्ठ जीवनशैलीचा मोठा भोक्ता होता. रोमन साम्राज्याच्या अत्यंत विषम स्वरूपाच्या व्यापारउदीमाबद्दल तो काय लिहितो ते पाहूया.
“आपण आणि विशेषेकरून आपल्या समाजातील स्त्रिया हे सर्व उपभोगत असलेल्या चैनीच्या आणि उपभोगांच्या वस्तूंची आपल्याला ही मोठी किंमत द्यावी लागते आहे. आताच्या हिशोबाप्रमाणे 10 कोटी सेस्टर्स (sesterces) भारत, चीन आणि अरबस्तान हे प्रतिवर्षी आपल्याकडून मिळवतात. रोम आणि भारत यांमधील व्यापाराचा निम्मा हिस्सा असणार्‍या चैनीच्या आणि उपभोगांच्या वस्तू आणणारी 40 जहाजे, दर वर्षी भारतातून रोमकडे रवाना केला जातात. भारतातून आयात केल्या जाणार्‍या वस्तुंमध्ये, मसाले, मोती, मलमल, हस्तिदंत यांचा समावेश असतो. रोमहून निर्यात केल्या जाणार्‍या गोष्टी अतिशय मर्यादित प्रकारच्या असतात व त्यात मदिरा, वाद्ये, गाणारे तरूण आणि नर्तकी यांचाच फक्त समावेश असतो. हा व्यापार इतका विषम आहे की रोमला दरवर्षी सोन्याच्या स्वरूपात भारताला मोठी रक्कम अदा करावी लागते.”
‘पेरिप्लस ऑफ द एरिथ्रियन सी’ हा इसवी सनाच्या पहिल्या ते तिसर्‍या शतकांमध्ये लिहिला गेलेला एक ग्रंथ आहे व तो मार्को पोलोच्या प्रवासवर्णनाइतकाच महत्त्वपूर्ण मानला जातो. या ग्रंथात रक्त समुद्राच्या किनार्‍यावर असलेल्या “बेरेनिस” सारख्या इजिप्शियन किंवा रोमन बंदरातून नांगर उचलणार्‍या दर्यावर्दी जहाजांनी समुद्रातून मार्ग कसा काढायचा? आणि त्यांना ईशान्य आफ्रिका किंवा भारतीय उपखंडात व्यापाराच्या कोणत्या संधी उपलब्ध होऊ शकतात ?याबद्दल माहिती दिलेली आहे. व्यापाराच्या स्वरूपाबद्दल पेरिप्लस हा ग्रंथ म्हणतो:
 या बंदरात आयात केलेल्या गोष्टीत मदिरा (इटली मध्ये बनवलेल्या दारूला प्राधान्य दिले जाते.) याशिवाय सिरियन किनार्‍यावरच्या लाओडिकन किंवा अरबस्थानात बनवलेल्या मदिरा,तांबे, कथील, शिसे, कोरल व टोपाझ, तलम आणि जाड वगैरेसारखे सर्व प्रकारचे कापड, bright-colored girdles a cubit wide; storax, sweet clover, flint glass, realgar,अ‍ॅन्टिमनी, ज्यांची देशातील चलनाबरोबर देवघेव केल्यास फायदा होऊ शकतो अशी सर्व प्रकारची सोने व रुपे यांची नाणी , चेहरा आणि अंग यावर सौंदर्य प्रसाधनासाठी चोपडण्याची पण फार महाग नसलेली मलमे असतात. राजे महाराजे यांच्या साठी आयात केलेल्या वस्तूत अतिशय महाग असलेली रुप्याची भांडी, तरूण गायक, जनानखान्यासाठी सुंदर तरूणी, उच्च प्रतीची मदिरा, अतिशय तलम असलेली वस्त्रे-प्रावरणे आणि अत्यंत महाग मलमे असतात. येथून निर्यात केलेल्या वस्तूत spikenard, costus, bdellium, हस्तीदंत, , agate and carnelian, lycium, सर्व प्रकारची सुती वस्त्रे, रेशमी कापड, जाडेभरडे कापड, सूत, मिरची या सारख्या (इतर बाजारपेठांतून आयात केलेल्या) वस्तूंचा समावेश असतो.”
भारताच्या पश्चिम किनार्‍यावरच्या ज्या बंदरांजवळ रोमन जहाजे नांगर टाकत असत त्या बंदरांचाही उल्लेख पेरिप्लस मधे आहे. या बंदरांमध्ये सर्वात उत्तरेकडे असलेले नर्मदा नदीच्या मुखाजवळचे बंदर, भडोच (Barygaza) हे होते. या बंदराच्या दक्षिणेस असलेल्या भूभागाचा उल्लेख पेरिप्लस मधे दक्षिणदेश (Dachinabades) असा केलेला आढळतो. पेरिप्लस मधे उल्लेख असलेली दक्षिणदेशातील प्रमुख बंदरे, सोपारा (Suppara) कल्याण (Celliana) आणि चौल (Semylla) ही आहेत. परंतु ज्या बाजारपेठांकडून निर्यात करण्याचा माल या बंदरांकडे पाठवला जात असे त्या बाजारपेठा कोठे होत्या? मात्र पेरिप्लस मधे फक्त दोन महत्त्वाच्या बाजारपेठांचा उल्लेख आढळतो.
 दक्षिणदेशातील बाजारपेठांपैकी दोन गावे सर्वात महत्त्वाची आहेत. यापैकी पैठण (Paethana)हे गाव भडोच पासून पूर्वेकडे 20 दिवस प्रवासाच्या अंतरावर आहे. त्याच दिशेने आणखी 10दिवस प्रवास केल्यावर एक अतिशय मोठी बाजारपेठ असलेले तगर हे गाव आहे. या दोन्ही बाजारपेठांवरून निर्यातीसाठीचा माल, (‌बैल)गाड्यांमार्फत किंवा रस्ते नसलेल्या मोठ्या प्रदेशातून भडोचला आणला जातो. पैठणहून मोठ्या प्रमाणात carnelian आणले जातात तर तगरहून आणलेल्या मालात, मलमल, जाडेभरडे कापड आणि समुद्र किनार्‍याजवळच्या भूभागातून आणलेला, (ज्यात अनेक प्रकारच्या व्यापारी मालाचा समावेश असतो,) याचा समावेश होतो.(भडोचपासून) तमिळ लोकांच्या प्रदेशाच्या अगदी शेवटच्या भागापर्यंत प्रवास करायचा असला तर ते अंतर 7000 स्टेडिया( 700 मैल) तरी आहे, परंतू समुद्र किनार्‍याजवळचा भाग मात्र आणखी दूर आहे.”
मात्र भारताच्या भूमीवर हा व्यापारी माल कोणत्या मार्गांनी ( Land routes) नेला जात असे याचा उल्लेख पेरिप्लस मध्ये नाही. परंतु कै. दामोदर कोसंबी यांच्या विचारांप्रमाणे, जर त्या कालात पर्वतराजींमध्ये स्थापन झालेले बौद्ध मठ या व्यापारी मार्गांजवळच स्थापले गेले होते हे मान्य केले तर आपण निदान दोन व्यापारी मार्गांची तरी कल्पना करू शकतो. हे दोन्ही मार्ग अर्थातच पैठण किंवा तगर पासून निघत असणार. यापैकी दक्षिणेकडचा मार्ग जुन्नर शहरापर्यंत येऊन सह्याद्री पर्वतराजीमधील दुर्गम अशा घाट रस्त्यांनी कल्याण किंवा चौल या सारख्या बंदरांकडे जात असला पाहिजे तर उत्तरेकडचा व्यापारी मार्ग पैठणहून अजंठा- कन्नड घाटातील पितळखोरे- मार्गे भडोचकडे जात असला पाहिजे. पेरिप्लस मधील उल्लेखावरून हे ही स्पष्ट होते की तगर ही बाजारपेठ, भारताच्या पूर्व किनार्‍यावरील प्रदेशात उत्पादित मालासाठी अत्यंत महत्त्वाची होती.
गॅझेटियर ऑफ बॉम्बे प्रेसिडेन्सी या ग्रंथाच्या खंड 16 पृष्ठ 181 वर सर जेम्स कॅम्पबेल यांनी हे भूमीवरील व्यापारी मार्ग कसे जात असावेत यासंबंधीचे आपले खालील विचार प्रगट केलेले आहेत:
“पेरिप्लस मधे असलेला (किनारपट्टीच्या भागातून तगर येथे आणलेला व्यापारी माल(बैल)गाड्यांनी भडोच येथे पाठवला जातो) हा उल्लेख हे स्पष्टपणे दर्शवतो की तगर आणि बंगालच्या उपसागरा- -लगतची भारताची किनारपट्टी यामध्ये व्यापारी संबंध होते आणि तगर हे पूर्व किनार्‍यावरून भडोचकडे नेल्या जाणार्‍या व्यापारी मालाची ने-आण करण्याच्या मार्गावरचे महत्त्वाचे केंद्र होते. तगर मधून होणार्‍या व्यापारामुळे मछलीपट्टण, मालखेत, कल्याण, बिदर,गोलकोंडा आणि हैदराबाद या सारख्या ठिकाणचा व्यापारउदीम वाढला असल्याने ही ठिकाणे संपन्न बनली होती.”
‘जर्नल ऑफ द रॉयल एशियाटिक सोसायटी’ या वार्षिकाच्या 1901 च्या अंकात ( पृष्ठे 517-552) लिहिलेल्या एका लेखात जे.एफ.फ्लीट यांनी हे व्यापारी मार्ग कोणते असावेत याबद्दलचे आपले विचार प्रथम मांडले होते. त्यांच्या विचारांप्रमाणे पहिला व्यापारी मार्ग मछलीपट्टण (16d 11′ N., 81d 8′ E.),) तर दुसरा विनूकोंडा (16d 3′ N., 79d 44′ E) या ठिकाणांहून सुरू होत असे व हैदराबादच्या दक्षिणेला सुमारे 25 किमी अंतरावर हे दोन्ही मार्ग एकत्र होत असत.तेथून हा उत्तरेकडचा मार्ग तगर-पैठण-दौलताबाद मार्गे अजंठा टेकड्यांजवळील मरकिंद येथपर्यंत जात असे. यापुढचे 100 मैल हा मार्ग सातमाला व सह्याद्री पर्वतराजींतील दुर्गम प्रदेशामधून भडोचकडे जात असल्याने व्यापारी काफिल्यांना अनेक संकटांचा सामना करावा लागत असे. मात्र सातवाहन साम्राज्याच्या व्यापाराच्या राजमार्गाचे स्वाभाविक अखेरचे स्थानकल्याण बंदर हेच होते.
जर कल्याण बंदर हे स्वाभाविक अखेरचे स्थान असले तर व्यापारी काफिले 100 किमी लांब पडणार्‍या उत्तर मार्गाने का जात होते? या प्रश्नाचे उत्तर त्या कालातील राजकीय परिस्थितीमध्ये मिळते. दख्खन मधील राजकीय परिस्थिती त्या काली मोठी अस्थिर बनली होती. शक क्षत्रप नहापन याच्या सैन्याने सातवाहन राज्याचा मोठा मुलुख तेंव्हा जिंकून घेतला होता व त्यामुळे पश्चिम किनारपट्टीवर व कल्याण सारख्या बंदरांवर त्यांचे वर्चस्व प्रस्थापित झाले होते. पेरिप्लस मध्ये या गोष्टीचाही उल्लेख आहे. जे.एफ. फ्लीट या बाबत लिहितात की गुजराथ मधे आपले बस्तान बसवलेल्या शकांनी कल्याण बंदराकडे जाणार्‍या व्यापारी काफिल्यांना अडचणी निर्माण केल्याने, ग्रीक व्यापार्‍यांना अत्यंत कष्टप्रद अशा भूप्रदेशातून व पर्वतांमधून भडोचकडे जाणारा (अजंठा-पितळखोरे) मार्ग वापरावा लागत होता.
या सर्व विवेचनावरून रोम आणि सातवाहन साम्राज्य यामध्ये चालत असलेल्या व्यापाराबद्दल बरीच कल्पना वाचकांना आली असेलच. पेरिप्लस मध्ये वर्णन केलेल्या सर्व ठिकाणांचा, एक अपवाद वगळता, अचूक ठावठिकाणा अणि सद्यःस्थितीतील त्यांचे स्वरूप हे आपल्याला सहजपणे सांगणे शक्य होते. मात्र याला असलेला एकुलता एक अपवाद म्हणजे त्या कालीअत्यंत संपन्न असलेले तगर या व्यापारी केंद्राचा आहे असे म्हणता येते.
( पुढे चालू)
15 मार्च 2015

About chandrashekhara

I am a retired electronics engineer. I am interested in writing, reading books. Other hobbies include Paper models, wooden fret work and social networking.

चर्चा

3 thoughts on “एक पुरातन व्यापार केंद्र; तगर -भाग 1

  1. Nice sir. Send again some other history.

    Posted by Geeta Madhav Mane Mane | मार्च 19, 2015, 6:31 सकाळी
  2. Hello sir, I am working on Periplous,
    If possible share your contact number. I have translated this bòok in marathi. But, still have some doubt. Need to discuss with someone.

    Posted by Gargee | फेब्रुवारी 14, 2023, 3:39 pm

यावर आपले मत नोंदवा

जुने लेख शोधा

Enter your email address to subscribe to this blog and receive notifications of new posts by email.

Join 396 other subscribers
MyFreeCopyright.com Registered & Protected

माझे नवीन इ-पुस्तक

एका साम्राज्याच्या शोधात