.
अनुभव Experiences

गुंडागर्दी


परवा रात्री टीव्हीवर बातम्या बघत होतो. या बातम्यांत एक व्हिडिओ क्लिप वारंवार दाखवली जात होती. ती बघताना प्रथम माझा डोळ्यावर विश्वासच बसेना. सुप्रीम कोर्टात प्रॅक्टिस करणारे व अण्णा हजारे यांचे एक सहकारी मानले जाणारे श्री. प्रशांत भूषण यांना व्हिडिओ कॅमेरासमोर तीन गुंड मारहाण करताना त्या क्लिपमधे दिसत होते. बातमी ऐकल्यावर लक्षात आले की त्या वेळेस एका टीव्ही चॅनेलसाठी श्री. प्रशांत भूषण यांची मुलाखत घेतली जात होती व त्यामुळे टीव्ही कॅमेरेही चालू होते. अशा वेळी हे गुंड श्री. प्रशांत भूषण यांच्या खोलीत शिरले व त्यांनी त्यांना जमीनीवर पाडून यथेच्छ मारहाण केली व हे सर्व टीव्ही कॅमेर्‍यावर चित्रित होते आहे याबद्दल त्यांना यत्किंचितही पर्वा आहे असे दिसले नाही.
भारताच्या राजधानीत, सुप्रीम कोर्टाच्या एका वकीलावर असा हल्ला करायला कोणी धजावते आहे यातच देशातली एकूण परिस्थिती किती खराब होत चालली आहे याची कोणाही सुबुद्ध नागरिकाला सहज कल्पना येईल. बरं ही काही एखादी तुरळक घटना आहे असेही म्हणता येणार नाही. पोलिसांनी नंतर या तिन्ही गुंडाना अटक केली व त्यांना काल कोर्टासमोर हजर केले. त्यांच्यावरील सुनावणीच्या वेळी देखील बाहेर जमा झालेल्या दोन गटांनी एकमेकाला मारहाण करण्याचे प्रकार केले.
हा सगळा प्रकार श्री.प्रशांत भूषण यांनी कश्मिर बाबत केलेल्या एका वादग्रस्त विधानामुळे घडून आला. श्री. प्रशांत भूषण यांचे विचार देशातील बहुसंख्य नागरिकांना न पटणारे आहेत. मलाही ते पटले नाहीत. परंतु एखाद्या व्यक्तीला स्वत:चे मत ठरवण्याचा पूर्ण अधिकार भारतीय राज्यघटनेने दिला आहे व म्हणूनच श्री. प्रशांत भूषण यांचे मत मला अजिबात पटत नसले तरी ते त्यांचे वैयक्तिक मत असल्याने मी त्याचा आदर करतो आहे.
गेल्या काही वर्षात एक गट स्थापन करून आपल्या गटाची विचारधारा किंवा बरोबर अथवा चुकीची ध्येय धोरणे त्या गटातील लोकांनी धाकदपटशा करून इतर व्यक्तींवर लादण्याचा प्रयत्न करण्याची एक पद्धतच पडत चालली आहे. एकट्या रिक्षावाल्याला गाठून मारहाण कर काचा फोड, दुकानदारांना दम दे असले प्रकार केले जात आहेत. इतर व्यक्ती संघटित नसल्याने ऐकून घेतात व त्यामुळे या गटांचे चांगलेच फावते आहे. हे गट असे का वागतात व त्यांना कोणाचीच भिती का वाटत नाही? याच्या मागचे कारण पोलिस दलाबाबत लोकांना पूर्वी वाटत असलेली जरब किंवा आदर हा वाटतच नाही हेच आहे. पुण्यासारख्या शहरात वाहतूक नियंत्रण करणार्‍या पोलिसाला न जुमानणे आणि प्रसंगी त्याच्याशीच दोन हात करणे हे प्रकार अगदी कॉमन झाले आहेत. या सगळ्या प्रवृत्तींना नवीन पिढीत कोणत्या ना कोणत्या कारणाने आलेला एक प्रकारचा मग्रूरपणा व मला कोण हात लावतो ते बघतो? ही वृत्ती बरीचशी कारणीभूत आहे.
पुण्यामध्ये चौचाकी चालवताना नेहमीच असा अनुभव येतो की चुकीच्या बाजूने व कसेही अनेक दुचाकी स्वार पुढे जाण्याचा प्रयत्न करतात किंवा तुमच्या समोरही उभे राहून ठाकतात. अशा मंडळींची नुसती चूक दाखवण्याचा जरी प्रयत्न केला तरी “ए म्हातार्‍या! तुला काय करायचे आहे? तू गुमान जा पुढे!” वगैरे सारखी मुक्ताफळे ऐकून घ्यावी लागल्यामुळे माझ्यासारखी अनेक मंडळी रस्त्यावर गाडी बंद करून शांतपणे इतर वाहने पुढे जाण्याची वाट बघत राहतात. कालच मी गाडी चालवत असताना एका अरूंद व जेमतेम दोन गाड्या जाऊ शकतील अशा गल्लीत डाव्या बाजूला एक पार्क करून ठेवलेली दुचाकी व उजव्या बाजूला दुचाकी उभी करून शांतपणे मोबाईलवर बोलत राहणारा दुसरा दुचाकीस्वार यांच्या समोर आलो. त्याचवेळी समोरून आणखी एक चौचाकी आली. मी व समोरच्या चौचाकीचा चालक हे दोघेही काहीही न बोलता समोरासमोर बाराच वेळ शांत उभे राहिलो. हळूहळू मागे चाळीस ते पन्नास दुचाक्या येऊन उभ्या राहिल्या. त्यांनी भोंगे वाजवणे ओरडाआरड वगैरे प्रकार केल्यावर माझ्या समोर उभे असलेले व मोबाईल वर बोलणारे दुचाकीस्वार हलले व मला रस्ता मोकळा मिळाला.
माझ्यासारखे लोक अशा वेळी शांतपणे फक्त उभे राहतात याचे कारण मला या मंडळींचा राग येत नाही असे नाही. परंतु या मंडळींच्या गुंडागर्दीला तोंड देण्याची क्षमता माझ्यात नसल्याने मला शांतच बसावे लागते. जरब बसवणारी शिक्षा हा एकच उपाय या अशा प्रकारच्या मनोवृत्तीला आळा घालण्यासाठी उपयुक्त आहे. रस्त्यावर बेजबाबदारीने वाहने चालवल्यास वाहन चालवण्याचा परवाना 1 वर्षासाठी व परत असे केल्यास कायम स्वरूपाने रद्द केला पाहिजे. अशा स्वरूपाचे नियम सिंगापूर सारख्या ठिकाणी आहेत व त्यामुळे तेथील रस्त्यावर असलेली शिस्त वाखाणण्यासारखी असते.
रस्त्यावरील बेशिस्त वाहतूक ही तर एक नगण्य समजण्यासारखी समस्या आहे असे म्हणण्याची वेळ आता आली आहे. समाजातील एकूणच गुंडागर्दीचे प्रकार बघता, शासन व पोलिस यांनी लवकरात लवकर प्रभावी कारवाई करण्याची गरज आहे असे वाटते. नाहीतर थोड्याच दिवसात लहान मुले व म्हातारी माणसे यांना रस्त्यावरून वाहन चालवणे किंवा चालणे सुद्धा कठीण होणार आहे. इतकेच नाही तर स्वत:चे विचार निर्भीडपणे मांडणे  सुद्धा अशक्य ठरणार आहे.
14 ऑक्टोबर 2011

About chandrashekhara

I am a retired electronics engineer. I am interested in writing, reading books. Other hobbies include Paper models, wooden fret work and social networking.

चर्चा

अद्याप प्रतिक्रिया नाहीत.

यावर आपले मत नोंदवा

जुने लेख शोधा

Enter your email address to subscribe to this blog and receive notifications of new posts by email.

Join 396 other subscribers
MyFreeCopyright.com Registered & Protected

माझे नवीन इ-पुस्तक

एका साम्राज्याच्या शोधात