.
अनुभव Experiences

मिड लाईफ क्रायसिस


चार महिन्याच्या कालावधीनंतर पुण्याला परत आल्यावर काही धक्कादायक बातम्या कानावर पडल्या. मी काही या बातम्या खर्‍या की खोट्या याची शहानिशा करण्याच्या भानगडीत पडलो नाही. एकतर या असल्या बातम्या बहुदा खर्‍याच असतात व दुसरे म्हणजे या बाबतीत चौकशा सुरू करून दुसर्‍यांच्या भानगडीत नाक खुपसू पाहणारा असे बिरूद मला माझ्यावर अजिबात लावून घेण्याची इच्छा नाही. पण या दोन बातम्या प्रत्येक सर्व साधारण माणसाच्या आयुष्यात येणार्‍या एका संक्रमणाशी निगडित असल्याने त्याचा उल्लेख मी येथे करतो आहे इतकेच. यापैकी पहिली बातमी आहे एका पंचेचाळीस पन्नास वर्षाच्या व्यक्तीबद्दल. या व्यक्तीचा संसार आतापर्यंत सुखी म्हणतात तसाच होता. दोन मुले, सुविद्य पत्नी, स्वत: उच्च सुशिक्षित व स्वत:चा यशस्वी व्यवसाय असे या व्यक्तीचे प्रोफाइल आहे. मुलेही आता लहान नाहीत. त्यांचे शिक्षण उत्तम रित्या चालू आहे. अशा या व्यक्तीने आपल्या पत्नीशी घटस्फोट घेतला आहे किंवा घेण्याच्या मार्गावर आहे अशा बातमीवर कोणाचा तरी विश्वास बसेल का? माझाही प्रथम ऐकले तेंव्हा बसला नाही.

दुसरी व्यक्ती अशीच पन्नासच्या आसपास वय असलेली आहे. पत्नी अतिशय हुशार व उच्चपदस्थ नोकरी करणारी आहे. या गृहस्थांनी पत्नीजवळ घटस्फोटाची मागणी केली. तिने ती नाकारल्यामुळे या गृहस्थांनी चक्क एका दुसर्‍या स्त्रीला घरात राजरोसपणे आणले आहे. तिच्याबरोबर ते कार्यक्रमांना जातात. गुप्तता किंवा चोरटेपणा अजिबात नाही. परिचितांना हा प्रकार एकूण माहीत असल्याने या गृहस्थांना या बाबत प्रश्न वगैरे विचारण्याच्या कोणीच भानगडीत पडत नाही.

अर्थात ही वरील दोन्ही उदाहरणे परिचितांपैकी आहेत म्हणून त्यांचा उल्लेख केला. नाहीतर या गोष्टी आज घडत आहेत व पूर्वी घडत नव्हत्या असे काही नाही. 10 वर्षांपूर्वीचा एक प्रसंग आठवतो. माझ्या एका शालेय वर्गमित्राच्या मुलीच्या लग्नानिमित्त आम्ही मित्र एकत्र जमलो होतो. यापैकी एका मित्राच्या बरोबर एक अपरिचित स्त्री मी बघितली. मी तिला ओळखत नसल्याने दुसर्‍या एका मित्राने या मिसेस अमुक अमुक म्हणून ओळख करून दिली. मला क्षण दोन क्षण काय बोलावे तेच कळेना. ज्या मित्राच्या या मिसेस म्हणून मला सांगण्यात आले होते. त्याच्या बायकोला अनेक वर्षांपासून मी चांगलाच ओळखत होतो. आणि सुमारे महिन्यापूर्वी ती मला कुठल्यातरी दुकानात भेटलीही होती. ते दोघे जरा दूर गेल्यावर माझ्या या मित्राने आपल्या पहिल्या बायकोशी घटस्फोट घेऊन या नवीन महिलेशी विवाह केला होता असे मला इतर मित्रांकडून कळले होते. त्या वेळेस माझ्या मित्राचे वय पन्नाशीच्या आसपास असेल.

मिड लाइफ क्रायसिस म्हणजे काय हे मी आतापर्यंत फक्त वाचलेले होते आणि परदेशी फॅड म्हणून मी त्याची हेटाळणी सुद्धा केली होती. परंतु आता प्रत्यक्ष अशी उदाहरणे समोर आल्यावर हे परदेशी फॅड नसून प्रत्येक माणसाच्या मनाशी संबंधित अशी ही घटना आहे हे लक्षात येते.

कार्ल यंग या मानसशास्त्रज्ञाने या मानवी मनस्थितीचे प्रथम अचूक वर्णन केले. तो म्हणतो की ही मनस्थिती म्हणजे चाळिशी किंवा पन्नाशी या वयोगटातल्या प्रत्येक माणसाच्या आयुष्यात येणारी, मग ती व्यक्ती स्त्री असो किंवा पुरुष, अशी एक घटना आहे. प्रत्येक माणसाला या वयात कधी ना कधी एक भावनिक स्थित्यंतर जाणवू लागते. बहुतेक जण या मनस्थितीत, आपल्या आतापर्यंतच्या आयुष्याचा आढावा घेत असताना दिसतात आणि आवश्यक ते बदल आपल्या दिनक्रमात करून आपल्या आयुष्यात कोणतीही प्रचंड उलथापालथ होऊ न देता या परिस्थितीवर मात करू शकतात. काही व्यक्ती मात्र या मनस्थितीवर मात करू शकत नाहीत अशा व्यक्तींच्या बाबतीत आपल्या आयुष्याबद्दल एक सर्व साधारण नाराजी येणे, आजूबाजूच्या व्यक्तींचा चक्क कंटाळा येणे (यात पती किंवा पत्नी असू शकतात.) ,काहीतरी धाडस करावे असे वाटू लागणे व आतापर्यंत आयुष्यात घेतलेले निर्णय चुकीचे आहेत असे वाटू लागणे अशी परिस्थिती उगवू शकते.

या शिवाय आपल्या वैवाहिक जोडीदाराचा राग येणे व आपण या व्यक्तीमुळे बंधनात पडलो आहोत असे वाटणे. आपल्या जोडीदारावर आपण कधी प्रेम केलेच नाही असे वाटू लागणे व एखाद्या नवीन व्यक्तीशी खाजगी संबंध जोडावे अशी तीव्र इच्छा होणे ही लक्षणे दिसू लागतात.

अशा परिस्थितीत असलेल्या व्यक्तीचा जोडीदार जर समंजस असला तर स्वत:च्या मनाला थोडी मुरड घालून तो आपल्यामधे आवश्यक ते बदल करतो व दोघांचे आतापर्यंतचे एकत्र घालवलेले आयुष्य एखादी होडी फुटावी तसे वाहवत जाणार नाही याची काळजी घेतो व त्यांचे सहजीवन काही बदलांसह चालू राहते.

मात्र जोडीदार किंवा सहचर स्वत:चे करियर किंवा दिनक्रम या बाबत काहीच बदल करावयाला तयार नसला तर परिस्थिती कठिण होते व शेवटी वर निर्दिष्ट केलेल्या उदाहरणांप्रमाणे गत झाल्यावाचून रहात नाही.

आपला जोडीदार या मिड लाइफ क्राइसिस मधून चालला आहे हे डोळसपणे ओळखून आपल्या जोडीदाराची मनस्थिती जाणून आपल्यामधे बदल घडवून आणणे हे आजच्या युगात किती महत्वाचे आहे हे बघण्यासारखे आहे. असे केले नाही तर पाश्चिमात्य देशांप्रमाणेच दुभंगलेली कुटुंबे आपल्याकडे पण सर्वत्र दिसू लागतील यात शंका वाटत नाही.

3 जानेवारी 2010

 

About chandrashekhara

I am a retired electronics engineer. I am interested in writing, reading books. Other hobbies include Paper models, wooden fret work and social networking.

चर्चा

3 thoughts on “मिड लाईफ क्रायसिस

  1. i am destrubed what ido?

    Posted by smita | एप्रिल 30, 2011, 11:27 pm

Trackbacks/Pingbacks

  1. पिंगबॅक Tweets that mention मिड लाईफ क्रायसिस « अक्षरधूळ -- Topsy.com - जानेवारी 3, 2011

यावर आपले मत नोंदवा

जुने लेख शोधा

Enter your email address to subscribe to this blog and receive notifications of new posts by email.

Join 396 other subscribers
MyFreeCopyright.com Registered & Protected

माझे नवीन इ-पुस्तक

एका साम्राज्याच्या शोधात