.
History इतिहास

सोमनाथ मंदिराचे द्वार


काही दिवसांपूर्वी एका ब्रिटिश लेखकाने लिहिलेले त्याच्या अफगाणिस्तानमधल्या प्रवासाचे वर्णन वाचत होतो. या प्रवासात त्या लेखकाने, अफगाणिस्तानमधल्या गझनी या शहराला भेट दिली होती व तिथले एकमेव प्रवासी आकर्षण म्हणजे सुलतान महंमद याची कबर बघितली होती. अकराव्या शतकात, कच्छमधल्या सोमनाथ मंदिरावर धाड घालून तिथले शिवलिंग भंग करून ते मंदिर ज्याने भ्रष्ट केले होते त्याच सुलतान महंमदची ही कबर आहे. या ऐतिहासिक दुव्यामुळे या कबरीबद्दलचे पुस्तकातले वर्णन मी जरा जास्तच रुची घेऊन वाचले. चेंगिझखानने गझनी वर केलेल्या हल्ल्यात, ही कबर नष्ट होऊ नये म्हणून ती मातीच्या ढिगार्‍यांत म्हणे पुरून ठेवली होती. तैमुरलंगच्या नातवाने या कबरीचे परत नूतनीकरण केले होते. या कबरीचे वर्णन वाचताना एक नवीनच माहिती मला समजली. या कबरीच्या इमारतीला जी चंदनाची दारे बसवलेली होती ती म्हणे सुलतान महंमदाने सोमनाथहून पळवून आणली होती. .. 1842मधे ब्रिटिश सैन्य व अफगाणिस्तान यांच्यात पहिले युद्ध झाले. या युद्धानंतर ही दारे ब्रिटिश सैन्याने परत हिंदुस्थानात नेली होती.

ही माहिती वाचल्यावर मी जालावर बरीच शोधाशोध केली. सापडलेल्या संदर्भांवरून काही रोचक माहिती लक्षात आली. या सोमनाथ मंदिराच्या दारांच्या दंतकथेचे मूळ होते महंमद कसिम हिंदुशाह किंवा फिरिश्ता या इराणी इतिहासकाराने इ..1600 च्या आसपास लिहिलेल्या एका ग्रंथात. तारिकफिरिश्ता या नावाच्या या ग्रंथात, गझनीचे सुलतान या नावाचे एक प्रकरण आहे फिरिश्ताने या ग्रंथात प्रथम सोमनाथ मंदिराची दारे गझनीच्या महंमदाने काढून नेली होती अशी माहिती दिली. फिरिश्ताचे हे वर्णन सत्यच असणार असे गृहित धरून डॉव या इंग्रज लेखकाने History of Hindostan’ या 1767-72 मधे प्रसिद्ध झालेल्या आपल्या पुस्तकात ही माहिती दिली व ती पुढे गिबसन, मिल आणि इतर एकोणिसाव्या शतकातल्या इतर इतिहासकारांनी आपापल्या पुस्तकात घातली.

..1842 मधे ईस्ट इंडिया कंपनीने अर्ल ऑफ एलेनबरो याची भारताचा गव्हर्नर जनरल म्हणून नेमणूक केली. त्या वेळी ब्रिटिश सैन्याला काबूलमधे जबरदस्त पराभव स्वीकारावा लागला होता. एलेनबरो भारतात आल्यावर त्याने युद्ध चालू ठेवण्याचे आदेश ब्रिटिश सेनापतींना दिले. ब्रिटिश सैन्य अतिशय शोर्याने लढले व शेवटी काबूल व गझनीचा चा पाडाव झाला. एलेनबरोला, गझनीमधे असलेल्या सोमनाथ मंदिराच्या दारांच्याबद्दल माहिती कोणी दिली हे समजत नाही परंतु काबूलमधे असलेल्या जनरल नॉट्स याला त्याने परत येताना गझनीवरून येण्याचे हुकूम दिले व येताना सुलतान महंमदाच्या कबरीचे दरवाजे काढून आणण्यास सांगितले. गझनीमधल्या मुल्ला व मौलवींनी ही दारे काढून न नेण्याबद्दल जनरल नॉट्सच्या बर्‍याच विनवण्या केल्या परंतु त्याचा काही उपयोग न होता ब्रिटिश सैन्य हे दरवाजे घेऊन हिंदुस्थानात परतले.

एलेनबरोने यानंतर एक जाहीरनामा काढला. यात ब्रिटिश राजवटीने हिंदुंच्या मनाला सतत खुपणार्‍या 800 वर्षे जुन्या अपमानाचे कसे उट्टे काढले आहे याची टिमकी वाजवली होती. परंतु हिंदुस्थानातील संस्थानिक व हिंदु जनता यांनी हे दरवाजे परत हिंदुस्थानात आणल्याबद्दल फारशी काहीच अनुकुल प्रतिक्रिया दाखवली नाही व एलेनबरोचा हिंदु व मुसलमान जनतेत आणखी तेढ निर्माण करण्याचा व ब्रिटिश राज्यकर्तेच कसे भारताचे खरे तारणकर्ते आहेत हे दाखवून देण्याचा सर्वच बेत पूर्णपणे फसला.

हिंदुस्थानातील तज्ञांनी हे दरवाजे तपासले. एकतर हे दरवाजे चंदनी नसून देवदार लाकडापासून बनवलेले होते. व त्यावरील नक्षीकामाचे डिझाईन हिंदुस्थानातील नव्हतेच. हे दरवाजे हिंदुस्थानात बनलेले नाहीत असा निर्वाळा या तज्ञांनी दिल्यावर हे दरवाजे आग्र्याच्या पुराणवस्तु खात्याकडे देण्यात आले व ते तिथेच पडून असावेत.

1951 साली पेशावर मधल्या काही मुसलमानांनी भारताने हे दरवाजे परत अफगाणिस्तानला द्यावे म्हणून एक सह्यांची मोहीम चालू केली. पण भारत सरकारने ही सगळी कथा काल्पनिक असून आपल्याकडे कोणतेही दरवाजे नसल्याचे जाहीर करून टाकले व या प्रकरणावर पडदा पाडला.

ब्रिटिश राज्यकर्त्यांच्या Divide and Rule धोरणाचे हे एक उदाहरण मोठे रोचक आहे यात शंकाच नाही.

15 जानेवारी 2010

About chandrashekhara

I am a retired electronics engineer. I am interested in writing, reading books. Other hobbies include Paper models, wooden fret work and social networking.

चर्चा

8 thoughts on “सोमनाथ मंदिराचे द्वार

  1. फारच रंजक !

    जयंत कुलकर्णी

    Posted by jayantckulkarni | जानेवारी 15, 2010, 9:33 pm
  2. Lekh faar chaan aahe. Hi mahiti adhi navhti.

    Posted by Nilesh Joglekar | जानेवारी 16, 2010, 4:14 pm
  3. अतिशय रोचक शोध!

    Posted by आल्हाद alias Alhad | जानेवारी 16, 2010, 10:51 pm
  4. अतिशय चांगली माहिती दिली आहे, धन्यवाद, महेश

    Posted by Mahesh | जानेवारी 27, 2010, 8:01 pm
  5. mai ek shiv bhakt hun. muje achha laga

    Posted by navneet dhonde | सप्टेंबर 12, 2010, 12:10 pm
  6. Hi, I am dhananjay , Ajun kahi navin mahiti milali tar te load kara

    Posted by dhananjay | नोव्हेंबर 12, 2011, 6:42 pm
    • धनंजय-
      प्रतिसादाबद्दल धन्यवाद. या विषयासंबंधी आपल्याला काही माहिती असली तर ई-मेलने माझ्याकडे पाठवा. ‘माझे पान’ या पृष्ठावर त्याला प्रसिद्धी देता येईल.

      Posted by chandrashekhara | नोव्हेंबर 13, 2011, 7:55 सकाळी

Trackbacks/Pingbacks

  1. पिंगबॅक Tweets that mention सोमनाथ मंदिराचे द्वार « अक्षरधूळ(Akshardhool) -- Topsy.com - जानेवारी 16, 2010

Leave a reply to dhananjay उत्तर रद्द करा.

जुने लेख शोधा

Enter your email address to subscribe to this blog and receive notifications of new posts by email.

Join 396 other subscribers
MyFreeCopyright.com Registered & Protected

माझे नवीन इ-पुस्तक

एका साम्राज्याच्या शोधात