.
ताज्या घडामोडी Current Affairs

नॅशनल स्पॉट एक्स्चेंज(N.S.E)


खरे सांगायचे तर, मला शेतीउद्योगांच्या समस्यांबद्दल ओ किंवा ठो कळत नाही. माझा आयुष्यभराचा व्यवसाय, कारखान्यामधे, निरनिराळ्या  औद्योगिक उत्पादनांचे आराखडे व प्रत्यक्ष उत्पादन करण्याचा होता व त्या बाबतीत मला थोडे फार तरी कळत असावे, असे मला वाटते. शेतकर्‍यांच्या समस्या, व त्यातून मार्ग काढण्याचे सर्व मार्ग बंद झाल्यावर त्या शेतकर्‍यांनी घेतलेले आत्महत्येचे निर्णय, या बद्दल जेंव्हा जेंव्हा मी काही बातम्या वाचतो, तेंव्हा या शेतकर्‍यांच्या समस्या, मी माझ्या परिचित असलेल्या औद्योगिक उत्पादनांच्या प्रक्रियेच्या चौकटीत बसवून बघतो व ते  साहजिकच आहे.

05097b52-aea9-11de-96d7-00144feabdc0

माझ्या कारखान्यामधल्या उत्पादनाच्या प्रक्रियेच्या अनुभवानुसार, जर मला कोणी शेती मालाचे उत्पादन करायला सांगितले, तर मी जास्त विचार न करता लगेच नकार देईन, यात शंकाच नाही. इतका बेभरंवशाचा धंदा मी आयुष्यांत कधी बघितलेला नाही. कोणते शेती उत्पादन करायचे? त्याला मागणी असेल का? त्याला लागणारे बी-बियाणे, खते, जंतुनाशके वेळेवर उपलब्ध होतील का? पिकासाठी पुरेसे पाणी उपलब्ध असेल का? शेतमजूरी किती द्यावी लागेल? तयार झालेले उत्पादन विकले जाईल का? गेल्यास त्याला योग्य भाव मिळेल का? आणि या सगळ्या खटाटोपासाठी लागणारे भांडवल कोण देईल? आणि काय व्याजदराने देईल? यातल्या कोणत्याही प्रश्नाला सरळ उत्तर मिळवणे अतिशय कठिणच आहे. इतक्या अडचणीतून उत्पादन करायचे म्हणजे तुमची देवावर तरी संपूर्ण श्रद्धा पाहिजे किंवा जुगारी. आपल्या शेतकर्‍यांबद्दल म्हणूनच मला कौतुक आणि आदर वाटतो तो उगीच नाही.

माझ्या दृष्टीने या शेती उत्पादकांसमोर सर्वात मोठी कोणती अडचण असेल तर तयार शेतमालाच्या विक्रीची. समजा मी एक विशिष्ट पीक घेतले. ते ज्या वेळेस तयार होते, त्या वेळेस, अर्थातच माझ्या सारख्या असंख्य इतर शेतकर्‍यांचेही तेच पीक तयार असते. म्हणजे बाजारात पुरवठा जास्त व मागणी कमी ही स्थिती निर्माण होणार. अर्थातच किंमती पडणार. शेतीमाल नाशवंत असल्याने आणि मला पैशाची निकड असल्याने मी मिळेल त्या बाजारभावाला माझे पीक विकून टाकणार. या प्रक्रियेत माझा उत्पादनखर्च जरी निभावला तरी खूप झाले. बरं! तयार पीक, कोल्ड स्टोअरेजमधे ठेवायचे ठरवले तर त्यांचे चार्जेस द्यावे लागतात आणि पैसेही अडकून पडतात, शेवटी गिर्‍हाईक मिळेपर्यंत.

या अडचणीवर मात करण्यासाठी, कोणताही उपाय आतापर्यंत छोट्या शेतकर्‍यांसमोर नव्हता. पण भारतात दोन तीन वर्षांपूर्वी सुरू झालेल्या कमॉडिटी एक्स्चेंजेसनी आता यावर एक चांगला उपाय शोधून काढला आहे. भारतात, शेअर किंवा स्टॉक एक्स्चेंजच्या धर्तीवर, सोनेचांदी, क्रूड ऑइल पासून धान्यापर्यंतच्या सर्व वस्तूंचा व्यापार करण्यासाठी दोन कमॉडिटी एक्स्चेंज कार्यरत आहेत. ही एक्स्चेंजेस मुख्यत्वे वायदेबाजार म्हणून काम करतात. यात वस्तूंची प्रत्यक्ष विक्री खरेदी होत नाही. मल्टीकमॉडिटी एक्स्चेंज (MCX) हे या पैकीच एक. या एक्स्चेंजने आता, प्रत्यक्ष वस्तूंची उलाढाल केली जाईल असे व्यवहार करण्यासाठी, नॅशनल स्पॉट एक्स्चेंज(NSE) म्हणून संस्थेची स्थापना केली आहे. या एक्स्चेंजमधे कोणत्याही गोष्टीची विक्री करण्यासाठी, ती गोष्ट विक्रीदाराच्या स्वत:च्या ताब्यात असणे आवश्यक आहे. ( मला 100 क्विंटल मक्याचा सौदा करायचा असला तर तेवढी मक्याची पोती माझ्या ताब्यात असावयास पाहिजेत.) हे व्यवहार सुलभ रित्या व्हावेत म्हणून एन.एस.ई. ने आता भारतात निरनिराळ्या ठिकाणी 60 तरी गोदामे चालू केली आहेत.

एन.एस.ई च्या या गोदामांमुळे शेतकर्‍यांची एक मोठी अडचण सुटू लागली आहे असे दिसते. चांगल्या दर्जाचा शेतीमाल, एन.एस.ई.चा कोणीही सभासद शेतकरी, आता या गोदामांवर घेऊन जाऊ शकतो. तिथले अधिकारी तो तपासून गोदामात साठवून घेतात व तशी पावती शेतकर्‍याला देतात. या पावतीच्या आधारावर शेतकर्‍याला बॅन्केकडून लगेच उसनी रक्कम मिळते. एन.एस.ई.च्या गोदामात असलेल्या धान्याचा हा स्टॉक हा शेतकरी त्याला हव्या असलेल्या किंमतीला बाजारात विक्रीसाठी ठेवू शकतो. खरेदीदार मिळाला की विक्रीची प्रक्रिया पूर्ण होते. एन.एस.ई., बॅन्केचे उसने पैसे परत करतात व बाकीचे शेतकर्‍याला देतात. खरेदीदार खरेदी केलेला माल, गोदामातून घेऊन जाऊ शकतो.

शेतकर्‍यांना दिलासा देणार्‍या या प्रणालीत अजुनही काही तृटी आहेत असे दिसते. एन.एस.ई फक्त निर्यात गुणवत्तेचा माल गोदामात घेतात. त्यामुळे माल खालच्या प्रतीचा असला तर त्याला ही प्रणाली उपयोगी नाही. तसेच एवढ्या मोठ्या देशाला 60 गोदामे पुरेशीही नाहीत. परंतु या दोन्ही अडचणींवर मात करता येण्यासारखी आहे.

एन.एस.ई.ची सुविधा व त्याच्या आधारावर मिळणारे बॅन्केचे कर्ज हे अनेक शेतकर्‍यांसाठी संजीवनीसारखे ठरते आहे.

15 ऑक्टोबर 2009

About chandrashekhara

I am a retired electronics engineer. I am interested in writing, reading books. Other hobbies include Paper models, wooden fret work and social networking.

चर्चा

1 thoughts on “नॅशनल स्पॉट एक्स्चेंज(N.S.E)

  1. शेतकय्रांच्या आत्महत्त्या आपण हाती घेतलेल्या शेतीप्रयोगात अपयश आले याकारणाने झाल्या आहेत.

    Posted by मनोहर | ऑक्टोबर 17, 2009, 1:31 सकाळी

यावर आपले मत नोंदवा

जुने लेख शोधा

Enter your email address to subscribe to this blog and receive notifications of new posts by email.

Join 396 other subscribers
MyFreeCopyright.com Registered & Protected

माझे नवीन इ-पुस्तक

एका साम्राज्याच्या शोधात