आज सकाळी एक प्रदर्शन बघण्याचा योग आला. ‘देणे समाजाचे’ या संस्थेने हे प्रदर्शन आयोजित केले होते. हे प्रदर्शन हा काही नवीन उपक्रम नाही असे समजले व ही संस्था हे प्रदर्शन दर वर्षी, गेल्या काही वर्षांपासून भरवत आहे. परंतु माझ्यासाठी तरी या प्रदर्शनाच्या संकल्पनेपासून सर्व काही नवीनच होते व म्हणूनच मला ते भावले. सर्वसाधारणपणे प्रदर्शन म्हटले की त्याचा सुद्धा एक साचा असतो. व सर्व प्रदर्शने त्या साचातून किंवा मुशीतून बाहेर काढल्यासारखी नेहमी वाटतात.
प्रदर्शनाचा एक प्रकार म्हणजे औद्योगिक प्रदर्शनांचा. ही प्रदर्शने साधारणपणे एखाद्या मोठ्या सभा परिसंवादाच्या बरोबर भरवण्याची प्रथा आहे. नवी दिल्ली मधील प्रगति मैदानावर अशा प्रकारची प्रदर्शने नेहमी आयोजित केली जातात. या प्रकारच्या प्रदर्शनात निरनिराळ्या कंपन्या आपले नवीन तंत्रज्ञान किंवा उत्पादने बघण्यासाठी ठेवत असतात. प्रदर्शनांचा दुसरा एक छोटेखानी प्रकार म्हणजे हस्तकौशल्याने बनवलेल्या वस्तूंची प्रदर्शन. यात अगदी लोणची, मसाले पापड यापासून ते भरतकामाने, विणकामाने निर्माण केलेल्या अभ्रे, टेबल क्लॉथ या सारख्या गृहोपयोगी वस्तू प्रदर्शित केलेल्या असतात. अदिवासी लोकांनी बनवलेल्या वस्तूंचे प्रदर्शन हे या प्रकारातला एक खास प्रकार. प्रदर्शनांचा तिसरा प्रकार म्हणजे पुस्तकांची प्रदर्शने.
‘देणे समाजाचे” संस्थेने आयोजित केलेले आजचे प्रदर्शन या कोणत्याच प्रकारात मोडत नव्हते व म्हणूनच मला ते भावले. मुळात याला प्रदर्शन का म्हणायचे हाच प्रश्न मला पडला आहे. हे प्रदर्शन म्हणजे कोणत्यातरी वस्तूंचे प्रदर्शन नव्हतेच! समाजापयोगी कार्य करणार्या अनेक छोट्या छोट्या संस्थांचा परिचय समाजाला व्हावा म्हणून निर्माण केलेला हा एक प्लॅटफॉर्म होता. दिव्यांग, अनाथ, स्लो लर्नर, वंचित गरीब विद्यार्थी या सगळ्यासाठी कार्य करणार्या संस्थाचा सर्वसाधारण जनसमुदायांना परिचय व्हावा म्हणून केलेला हा एक स्तुत्य उपक्रम आहे. या प्रदर्शनात असलेल्या 40-50 बूथ मध्ये वस्तू तर कोणत्याच नव्हत्या. होते ते फक्त भित्तीफलक व छायाचित्रे. यापैकी प्रत्येक बूथ हा सामाजिक कार्य करणार्या कोठल्यातरी संस्थेने घेतलेला होता. व त्या बूथ मधे लावलेले फलक व छायाचित्रे त्यांच्या कार्याची माहिती पहाणार्यांना करून देत होते.
सगळ्यात आश्चर्याची गोष्ट म्हणजे या संस्था महाराष्ट्रातील मुंबई, पुणे, नाशिक, औरंगाबाद, नागपूर सारख्या मोठ्या शहरांच्यातून फक्त आलेल्या नसून छोट्या गावांतून आलेल्या होत्या. उदाहरणे द्यायची तर सावखेडा (जिल्हा जळगाव) येथील ‘ श्रवण विकास मंदीर’, आळणी (जिल्हा उस्मानाबाद) यथील, स्व-आधार मतिमंद मुलींचा प्रकल्प, सांगोला (जिल्हा सोलापूर) येथील माना बालक उत्कर्ष प्रतिष्ठान, येळंब ( जिल्हा बीड) येथील सेवाश्रम, तडवळे (जिल्हा उस्मानाबाद) येथील जीवन विकास बालगृह यासारख्या संस्थाचे देता येईल.
मला सर्वात भावलेली गोष्ट म्हणजे प्रत्येक बूथवर असलेले उत्साही कार्यकर्ते. ज्या उत्साहाने व तडफेने ते आपल्या आपल्या संस्थाबद्दल बोलत होते त्यावरून त्यांना आपल्या संस्थांबद्दल असलेली आत्मियता आणि प्रेम हे वाक्या-वाक्यागणिक जाणवत होते.
प्रदर्शन बघितल्यावर मी ‘देणे समाजाचे’ या संंस्थेच्या एका आयोजकांशी बोललो. या संस्था करत असलेल्या कार्याला प्रसिद्धी या प्रदर्शनाद्वारे मिळतेच आहे. परंतु या संस्थांची निवड ‘देणे समाजाचे’ काय आधाराने करतात हे कळत नव्हते. या आयोजकांच्या निवेदनाप्रमाणे ‘देणे समाजाचे’ या प्रत्येक संस्थेला किमान 3 वेळेला तरी भेट देऊन सर्व खात्री करून घेतात व मगच त्यांना हा प्लॅटफॉर्म उपलब्द्ध होतो.
देणे समाजाचे या संस्थेच्या संचालिका श्रीमती वीणाताई गोखले व त्यांचे सर्व स्वयंसेवक दल यांचे जेवढे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे.
7 ऑक्टोबर 2018
चर्चा
अद्याप प्रतिक्रिया नाहीत.