.
Uncategorized

तोरणा किल्ला


Photo ny Amogh Sarpotdar – originally posted to Flickr as Sharp, CC BY-SA 2.0, https://commons.wikimedia.org/w/index.php?curid=6244338

(ईस्ट इंडिया कंपनीच्या सेवेत असलेले एक ब्रिटिश अधिकारी सर जेम्स डग्लस (1826-1904)  यांनी मुंबई,  जवळपासची स्थळे आणि तत्कालीन परिस्थिती याबाबत अनेक लेख लिहिले होते. या लेखांचे संकलन करून त्यांनी  आपली पुस्तकेही नंतर प्रसिद्ध केली होती. या लेखांमधील त्यांचा तोरणा किल्ल्याबद्दलचा लेख मला मोठा रोचक वाटला. वाचकांना या लेखाचा हा अनुवाद आवडेल अशी अपेक्षा आहे.)

तोरण्याचा डोंगर पुण्यापासून साधारणपणे साठ किलोमीटर अंतरावर आहे. वाचनालयाच्या दारातून बघितल्यास,  सिंहगडाचा डोंगर जिथे संपतो त्याच्या उजव्या हाताला, हा डोंगर स्पष्टपणे दिसतो. तोरण्याच्या डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या ‘पेठ’ या गावापर्यंत, घोड्यावरून आणि थोडेफार पायी चालत. एका दिवसात सहजपणे पोहोचता येते. दुसर्‍या दिवशी सकाळी तोरण्याचा डोंगर चढता येतो आणि त्या नंतर तेथून फक्त सडेचार-पाच किलोमीटर अंतरावर असलेला राजगड हा किल्ला सुद्धा त्याच दिवशी बघता येतो. परंतु जाण्या-येण्याचे खडबडीत आणि ओबडधोबड रस्ते लक्षात न घेतल्याने आमचा सगळा हिशोबच चुकला हा भाग वेगळा!. खडकवासल्याच्या रस्त्यापासून सिंहगडाचा फाटा जिथे फुटतो तिथे असलेल्या ‘गोर्‍हे’ गांवात आम्ही आमची बग्गी सोडून दिली. आमचा आधीचा बेत असा होता की या पुढचा म्हणजे ‘गोर्‍हे’ गांवापसून ते तोरण्याच्या डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या गावापर्यंतचा प्रवास, तट्टांवरून (ponies) करायचा. पण जायच्या रस्त्याकडे एक नजर टाकल्याबरोबरच आमच्या हे लक्षात आले की ज्यावर नक्की अवलंबून राहता येईल असे प्रवासाचे साधन म्हणजे आमचे दोन पाय हेच फक्त आहे. आमचा आधीचा बेत काहीही असो, पुढचा सगळा प्रवास पायी करावा लागल्याने, सिंहगडावरून स्पष्टपणे दिसू शकणार्‍या  आणि बोरघाट उतारावर असलेल्या  उंच-सखल डोंगराळ भागाशी आम्ही जेमतेम पोहोचलो होतो- नव्हतो तोपर्यंत रात्र सुद्धा झाली. तोरणा आणि राजगड यांना जोडणारी डोंगर-रांग आणि आम्ही उभे असलेले स्थान यांमध्ये आता फक्त मधून वाहणार्‍या कानद नदीचे खोरे तेवढे होते. खरे तर बरोबर घेतलेले सर्व सामान एक दिवस आधीच आम्ही हमालांच्या बरोबरच पाठवून दिले होते. परंतु या डोंगराळ भागात त्यांची आणि आमची चुकामुक भरीत भर म्हणून झाली. नाईलाजास्तव, रात्र आहोत तिथेच काढायची आणि सकाळी झुंजुमुंजु झाले की पुढे निघयचे असे आम्ही ठरवले. परंतु आमच्याबरोबर असलेल्या काही निशाचर मंडळींना आमची कल्पना पसंत पडली नाही व त्यांनी हातातील मशाली जोरजोरात हलवणे व तोंडाने “रामा-ओ-रामा” अशा आरोळ्या देणे चालू ठेवले. दख्खनच्या डोंगराळ प्रदेशात ही आरोळी बरीच लोकप्रिय आहे. या आरोळ्यांचे प्रतिध्वनी आणि हलणार्‍या मशालींचा उजेड यामुळे अर्धवट झोपेत असलेल्या काही धनगरांचे लक्ष आमच्याकडे गेले व ते आमच्या मदतीस धावून आले. तेलात बुडवलेल्या आपल्या चुडी त्यांनी पेटवल्या व  आमच्या डोक्याच्या वर धरल्या. त्या चुडींच्या भगभगीत प्रकाशात मग आमची मार्गक्रमणा पुढे चालू राहिली. त्य धनगरांच्या नेतृत्वाखाली, सहज गडगडतील असे दगड धोंडे, मोठमोठे पाषाण, यांच्या मधून वाट काढत, आमचा ट्रेक एका कडेकपारीवरून दुसर्‍या कडेकपारीकडे आणि अखेरीस एका पूर्णपणे कोरड्या पडलेल्या ओढ्याच्या पात्रामधून चालू राहिला. सुमारे साडेसहा किलोमीटर अंतर कापल्यावर अखेरीस आम्ही आमच्या पोचण्याच्या ठिकाणापर्यंत येऊन पोचलो. माझी खात्री आहे की ‘जॉन बुनयन’ (1628-1688) या प्रसिद्ध लेखकाच्या “पिलग्रिम्स प्रोग्रेस्” या कादंबरीचा नायक जर या ठिकाणी उतरला असता तर त्याला त्याचे नवीन ‘जेरुसलेम’ कधीच दिसू शकले नसते.

गावामधील रामाच्या देवळात मग आम्ही पथार्‍या पसरल्या आणि दोन-तीन तासांची झोप कशीबशी काढून आम्ही पहाटे तीन वाजता उठलो व आवरून रस्ता पकडला. चंद्रप्रकाशात न्हाऊन निघालेली ती पहाट मोठी आल्हादकारक आणि नयनमनोहर भासत होती. कानद नदीच्या काठाने ‘पेठ’ गावापर्यंतचे साधारण साडेसहा किलोमीटर अंतर आम्ही कापले असावे.  या संपूर्ण प्रवासात घुबडांच्या चित्काराशिवाय दुसरा कोणताही आवाज आमच्या कानावर पडला नाही. रस्त्याच्या कडेने दुतर्फा असलेल्या हिरव्यागार शाळूच्या पिकांत दाणे बहुधा भरत असावे, कारण प्रत्येक शेतात पानांची छप्परे असलेली मचाणे दिसत होती. त्यावर बसलेल्या आणि अर्धवट झोपेत असलेल्या राखणदारांना या अवेळी जाणार्‍या आम्हाला बघून बहुधा आश्चर्याचा धक्का बसत असावा कारण आम्ही या वेळी तेथे काय करतो आहेत? या बाबतचे  प्रश्नचिन्ह त्यांच्या गोंधळलेल्या चेहर्‍यांवर स्पष्टपणे  दिसत होते. मान वर करून बघितले की पहाटेच्या झुंजुमुंजू प्रकाशात तोरणा किल्ल्याची तटबंदी आमच्याकडे रागावून बघते आहे की काय? अस भास आम्हाला सतत होत होता. गावामधे पोचल्यावर आम्हाला गडावर सुरक्षित रित्या घेऊन जाईल अशा एखाद्या  वाटाड्याचा शोध घेण्यास आम्ही सुरूवात केली व सुदैवाने आम्हाला हवा तसा वाटाड्या सहज मिळालाही. पुढचे तीन तास गडाची खडी चढण आम्ही चालत, कधी दोन पायावर तर कधी हातांची मदत घेऊन चार पायावर, पार पाडली. त्यानंतर शेवटचे जवळजवळ तीनशे फूट, कातळात काटकोनामधे मोठ्या उंचीच्या कापलेल्या पायर्‍या चढण्यात आम्ही यशस्वी झालो. या सर्व पायर्‍या एका मोठ्या कालखंडामधील त्यांचा  वापर, पंचमहाभूतांचे सतत प्रहार,  यामुळे अतिशय झिजलेल्या होत्या व काही ठिकाणी तर त्यांना मोठी मोठी छिद्रे सुद्धा पडलेली होती. अखेरीस 1880 सालच्या नववर्षदिनाच्या सकाळच्या  सात वाजता, तेथपर्यंतचा सर्व प्रवास पायी केल्याने अक्षरशः अर्धमेल्या अवस्थेतील आम्ही,  तोरणा किल्ल्याच्या प्रवेशद्वाराजवळ पोचण्यात यशस्वी झालो. एक विलक्षण गोष्ट म्हणजे किल्ल्याचे हे प्रवेशद्वार आम्ही त्याच्यापासून काही मीटर अंतरावर पोचेपर्यंत आम्हाला दिसलेच नव्हते. याचे कारण म्हणजे कातळात असलेल्या पायर्‍या  इतक्या खड्या कोनात खोदलेल्या आहेत की समोरचे काही दृष्टीक्षेपात येतच नाही.  या पायर्‍या चढत असताना एकदा  तर वरून गडगडत आलेला एक दगड आमचा कपाळमोक्षच करणार होता.

आम्ही प्रवेशद्वारापाशी पोचलो खरे! पण आमच्या अपेक्षेप्रमाणे प्रवेशद्वार उघडे नव्हते तर ते अगदी अडसर लावून बंद केलेले होते. परंतु आम्ही एवढे दमलो होतो की बंद दार बघून अपेक्षाभंग न होता आम्हाला एक प्रकारचा दिलासाच मिळाला. आम्ही शांतपणे द्वारासमोरच्या मोकळ्या जागेत पहुडलो आणि ज्या कोणी ते दार बंद केले होते त्याचे आभार मानत, आम्हाला अगदी आवश्यक असलेली विश्रांती घेणे सुरू केले. जरा वेळाने, जीवात जरा जीव आल्यावर, आम्ही जिथे टेकलो होतो त्या जागे भोवतालचे निरिक्षण करण्यास सुरूवात केली. किल्ल्याचे प्रवेशद्वार हे दोन पाने असलेले आणि लाकडी बनावटीचे होते व त्याला मोठमोठे खिळे उलटे लावलेले होते.  वरच्या बाजूस कमानीची रचना असलेल्या पाषाणाच्या चिर्‍यांच्या एका भरभक्कम भिंतीमध्ये हे प्रवेशद्वार अतिशय भक्कमपणे बसवलेले होते. दगडी भिंतींचा भक्कमपणा हे या गडाच्या संरक्षणाचे एक हत्यारच होते असे म्हणता येईल. प्रवेशद्वाराच्या भिंतीचे बांधकाम दोन कातळ कड्यांमधील एका विलक्षण स्वरूपाच्या  खोबणीमध्ये केलेले आहे.  एकतर कधीतरी प्राचीन काळी तोरणा डोंगराच्या कळसावरील पाषाण दुभंगून  फाटल्याने किंवा पाऊस आणि वारा यांच्या सततच्या मार्‍यामुळे ही खोबण निर्माण झालेली असली पाहिजे.

बराच वेळ वाट बघितल्यावर अखेरीस आम्हाला गडाच्या मुख्य दरवाजातून प्रवेश मिळाला. पण यासाठी आम्ही कोणतीही हातघाईची लढाई लढलो नाही, शिड्या वापरून तटावर चढलो नाही किंवा कुणाची शरणागतीही आम्हाला प्राप्त झाली नाही. दाराच्या दोन भागांमधील फटीत, आमच्या जवळ असलेल्या घडीच्या चाकूने,  लाकडाचा भाग  खरवडून चंद्रकोरीच्या आकाराचे दोन खड्डे आम्ही तयार केले व त्यातून हात आत घालून आतील लोखंडी अडसर वर करण्यात आम्ही यश मिळवले व गडावर प्रवेश मिळवला. 1680 मध्ये मराठ्यांच्या ताब्यात असलेल्या या सर्वात सुरक्षित अशा किल्ल्याचे प्रवेशद्वार 1880 मध्ये एका घडीच्या चाकूच्या सहाय्याने उघडले जावे हा एक दैवदुर्विलासच म्हटला पाहिजे. अर्थात इतर कोणापेक्षा आम्हालाच या गुन्ह्यासाठी जबाबदार मानले पाहिजे. (तोरणा किल्ला हा भोर संस्थानाचे राजे पंत यांच्या मुलुखात येत असल्याने नंतर या कृत्याबद्दल ते व इंग्रज सरकार यांच्यात बराच पत्रव्यवहार  झाला व अखेरीस इंग्रज सरकारने त्यांना थोडीफार भरपाई देऊन हा विवाद मिटवला.)

अशा रितीने गडाच्या (वरच्या बाजूस असलेल्या बालेकिल्याच्या भोवती असलेल्या) तटबंदीमधील दुसर्‍या द्वारापर्यंत पोचण्यात आम्ही यशस्वी झालो. साधारणपणे मुख्य तटबंदीला शत्रूने वेढा घातल्यावर वेढ्यात अडकलेले लोक या बालेकिल्ल्यात आधार घेत असत. या दाराशी पोहोचल्यावर आम्ही बर्‍याच आरोळ्या ठोकल्या सुदैवाने येथे कोणीतरी आमच्या हाका ऐकल्या आणि तरतरीत दिसणार्‍या एका मुलाने अडसर वर करून आम्हाला आत घेतले व डोंगराच्या अगदी शिखरावर असलेल्या एका झोपडीवजा घरात नेले. त्या मुलाचे वडील अंगणात असलेल्या तुळशी-वृंदावनाजवळ डोळे मिटून प्रार्थना करत असताना दिसले. आम्हाला बघताक्षणी त्यांनी  अंगावरचे कांबळे बाजूला ठेवले व त्वरित ते  आमच्याकडे आले. आमच्याकडे बघितल्यावर त्यांच्या चेहर्‍यावर उमटलेले आश्चर्य आणि राग स्पष्टपणे दिसत होता. हे दोन युरोपियन बदमाश (आणि त्यातील एक जण हातात लांब नळीची बंदूक घेतलेला) हे आपल्या घरापर्यंत पोचलेच कसे? हे त्यांना कळतच नव्हते आणि तो भाव त्यांच्या चेहर्‍यावर उमटलेला दिसत होता. परंतु आम्ही घेतलेल्या मृदु आणि सामोपचाराच्या पवित्र्यामुळे ते शांत झाले. त्यांनी अंगावर कपडे चढवले आणि आम्हाला एक सलाम ठोकला. या गृहस्थाचे बरेच वय झालेले असावे कारण अनेक पावसाळे काढल्याच्या खुणा त्यांच्या अंगावर ठळकपणे दिसत होत्या. तरीसुद्धा त्यांच्या चेहर्‍यावर एक प्रकारचा तजेला होता. त्याच्या बोलण्याप्रमाणे मुंबईचे गव्हर्नर येथे आले होते व ते जिथे बसले होते ती जागा सुद्धा त्याने आम्हाला दाखवली.  भोरचे संस्थानिक पंत हे देखील तोरण्याला आले होते. मात्र ते गडाच्या पायथ्याशी आल्यावर त्यांनी वर बघून  एकंदरीत काय प्रकार आहे हे बघून फक्त मान डोलावली होती व ते परत गेले होते.

आम्ही चहूबाजूच्या परिसरावर नजर टाकली. आम्हाला कोणताही प्राणी किंवा पक्षी ( रानटी किंवा पाळीव अगदी चिमणी-कावळा सुद्धा) कोठेही दिसला नाही. एक सतत अंग चाटणारे मरतुकडे मांजर तेवढे दिसले. गडावरील सर्व प्राणीजगत नष्ट होण्याच्या मार्गावर असल्याने ते तसे झाले असले पाहिजे असा अंदाज आम्ही बांधला. तोरणा गडावर शिवाजी महाराजांशी संबंध जोडता येईल अशा  कोणत्याही जागा किंवा खुणासुद्धा नाहीत. शिवाजी महाराज एकोणिसाव्या वर्षी किंवा  अगदी तरूण वयात या गडावर आले होते व तेंव्हा त्यांना येथे सोन्याच्या कांड्या, सुवर्ण मुद्रा आणि चांदीची ओबडधोबड नाणी यांच्या स्वरूपातला मोठा खजिना मिळाला होता. खजिना सापडण्यासाठी तोरणा गडाइतकी असंभवनीय जागा दुसरी कोणतीही नसेल. परंतु तरीही तो शिवाजी महाराजांना सापडला होता हे मात्र  सत्य आहे.  अगदी तरूण वयात शिजावी महाराज या गडावर आले होते हे चांगलेच झाले होते असे म्हणायचे कारण हा गड चढताना आमची झालेली दमछाक बघता नंतरच्या काळात त्यांना होणारा गुढगे दुखीचा त्रास लक्षात घेतला तर हा गड त्यांना डोलीतूनच चढावा लागला असता हे उघड आहे. दुर्दैवाने मी त्यांच्या नंतर दोन शतकांनी येथे आलो आहे नाहीतर मी शिवाजी महाराजांचे वर्णन, एखादा दुसरा शब्द बदलून, कुठल्यातरी स्कॉटिश पोवाड्यानेच केले असते. परंतु या कल्पनेच्या जगात फार काळ न थांबता परत मला गंभीर चेहरा करून इतिहासाच्या पानांकडे बघणे क्रमप्राप्त आहे.

तोरणा ही जागा अशी आहे की यात घेतलेली रुची ही बाकी सर्व गोष्टींना केंव्हाच मागे टाकते.  तोरणा ही शिवाजी महाराजांची पहिली विजयी मोहीम होती. तोरणा हा एक केन्द्रबिंदू होता, ज्या भोवती बाकी सर्व गड एकत्र  झाले होते. तोरणा म्हणजे मराठी साम्राज्याचा पाळणा होता की ज्याच्या हालण्याने दिलीच्या मुगल बादशहाचे सिंहासन सुद्धा डळमळले होते. तोरणाने अनेक रक्तरंजित झुंजी बघितल्या आहेत. इ.स. 1704 मध्ये नंग्या तलवारी हातात घेऊन मुगलांनी, या गडाच्या तटाला शिड्या लावून, याच्यावर हल्ला करून तो जिंकला होता. असे म्हणतात की शिवाजी महाराजांनी या गडाची दुरुस्ती करून तो भरभक्कम केला होता. परंतु आता अनेक ठिकाणचे दगड आणि चुना यामध्ये मोठमोठ्या भेगा पडलेल्या दिसतात. परंतु शिवाजी महाराजांच्या काळची त्रस्त परिस्थिती बघता त्यांनी करून घेतलेले काम ठीक असणार असे म्हणता येते. त्या वेळच्या परिस्थितीचा विचार केला तर स्कॉट या कवीने, नेहमियाह (राजाचा मदिरेचा पेला भरून देणारा सेवक) याने केलेल्या जेरुसलेमच्या भिंतींच्या पुनर्बांधणीच्या कार्याचे वर्णन मला नेहमी आठवते. स्कॉट आपल्या कवितेत म्हणतो की “एका हातात तलवार व दुसर्‍या हातात थापी घेऊन“ हे काम त्याने केले. शिवाजी महाराजांची परिस्थिती काहीशी अशीच होती. कदाचित यामुळेच तोरण्याची  तुलना त्याच्या आधी बांधलेल्या काही भव्य किल्ल्यांशी करता येत नाही. परंतु तोरणा काय? किंवा इतर किल्ले काय? दख्खनमधील सर्वच किल्ल्यांची अवस्था आता चुनखडीत बांधलेल्या भिंतींचे उध्वस्त अवशेष, इकडे-तिकडे पसरलेले पाषाण, अर्धवट पाण्याने भरलेली टाकी, शेवाळे चढलेल्या भिंती, इतस्तत: पडलेले लाकडी वासे अशा निर्जन आणि उदासीन स्वरूपाला आली आहे हे मात्र खरे!

गडाच्या एका बाजूला जीभेसारखी लांब असलेली आणि दोन्ही बाजूंना तटबंदी केलेली ‘डोंगरमाळ’ (सध्या याला बहुधा झुंझारमाची या नावाने ओळखले जाते.)  मोठी चित्तवेधक आणि उल्लेखनीय दिसते. फक्त काही फूट रूंद असलेली व काही ठिकाणी तटबंदी असलेली ही माळ एखाद्या अरूंद नौकेसारखी तटावरून दिसते. परंतु अशी माळ फक्त तोरण्यावरच बघायला मिळते असे समजण्याचे काहीच कारण नाही. माझ्याजवळ असलेल्या बॅरॉमीटर वरून आम्ही समुद्रसपाटीपासून 4350 फूट उंचीवर आहोत हे मला दिसते आहे. या उंचीमुळे साहजिकच आजूबाजूला दिसणारे दृष्य उत्कृष्ट आणि रमणीय दिसते आहे. सिंहगडाला सिंहाचे गुहा असे म्हटले तर तोरण्याला गरूडाचे घरटे म्हणणे योग्य ठरेल. आमच्या या घरट्यामधून सूर्यास्ताच्यावेळी,  पुण्यातील सेंट मेरीचे चर्च, माउन्ट माल्कम वरील बिशपचा बंगला आणि जॉन सॅन्ड्सने पुरंदर किल्ल्यावर बांधलेली स्थानबद्धांसाठीची इमारत आणि काळ्या पाण्याचा (जन्मठेप)  तुरुंग हे स्पष्ट दिसू शकत आहेत. ज्यांनी ते यापूर्वी कधीच बघितले नाहीत अशांसाठी, येथून दिसणारी महाबळेश्वरची पर्वतराजी आणि शिवाजी महारांजांचा राज्याभिषेक आणि निर्वाण यांना साक्षीदार असलेला रायगडाचा महाविशाल ठोकळा हे दोन्ही अपूर्व आणि रोचक वाटत असल्यास त्यात नवल असे काहीच नाही.

पर्वतराजी सहज चढून जाऊ शकणार्‍या येथील स्थानिकांना आमचे गुरूच मानले पाहिजे. त्यांच्या अंगात असलेल्या दमाबद्दल आम्हाला त्यांचा हेवा वाटतो हे नक्की. दमल्यावर श्वास घेण्यासाठी धापा टाकणे हे जणू त्यांना माहीतच नाहीये. आम्ही ज्या प्रवेशद्वारातून आत आलो होतो तिथे परतल्यावर नुकताच गड चढून वर आलेला एक पोलिस आम्हाला दिसला. गड चढल्यामुळे दमल्याचे कोणतेही लक्षण  त्याच्या बोलण्यात किंवा वागण्यात आम्हाला दिसले नाही.  त्याने नम्रपणे आम्हाला त्याची मदत देऊ केली. त्याने प्रवेशद्वार थोडे उघडे ठेवले व आतल्या एका चौथर्‍यावरून खाली डोकावून समोर काय दिसते आहे ते मी  बघितले. खाली जे  काय दिसत होते त्याच्या सुंदरतेची कल्पना येण्यासाठी त्यावर एकच दृष्टीक्षेप होता . तो टाकल्यावर जीवाचा उडलेला थरकाप मी अनुभवला व पोलिसाला घाईघाईने प्रवेशद्वार बंद करण्यास मी सांगितले. समोरच्या दृष्याला, जगाचा तळमजला, एशिया-मायनरचा नकाशा, अशा कोणत्याही नावाने संबोधले असते तरी चालले असते. कोणी तरी असे म्हटले आहे की ज्याला एका बाजूला असलेला उंच कडा आणि दुसर्‍या बाजूला असलेली खोल दरी यांची काहीच भिती वाटत नाही त्यांच्यासाठी तोरणा निर्धोक आहे. हे वाक्य उच्चारत मी मनाची समजूत काढली व गड उतरण्याच्या तयारीला लागलो. बेदुइन लोक खुर्च्या वापरत नाहीत. त्यांच्यात असे मानतात की नाहीतरी एवीतेवी आपला अंत या जमिनीतच आहे तेंव्हा जमिनीवर मधून मधून बसण्यास हरकत नाही म्हणजे जमिनीची आपल्याला ओळख राहील. गड उतरताना नाहीतरी आमची जाण्याची दिशा जमिनीकडचीच होती त्यामुळे मी स्वतःला एका काहीही हालचाल न करणार्‍या थंड मातीच्या गोळ्याचे स्वरूप दिले व जमिनीवरून सरपटत सरपटत गड उतरू लागलो. उतरताना काही काही जागा भलत्याच धोकादायक होत्या पण प्रत्यक्ष गव्हर्नर साहेबांनी कोणतीही तक्रार न करता गड उतरला होता त्यामुळे तक्रार करण्याची  आमची काय प्राज्ञा होती? खाली उतरताना संभाव्य धोके म्हणजे अडखळणे, घसरणे, आधार नसलेल्या ठिकाणी पाय ठेवणे, गडगडत खाली जाउ शकत असणार्‍या दगडांवर पाय ठेवणे, काहीच आधार नसलेल्या गवताची पाती पकडणे, पुढे झोक जाणे, जमिनीवर पडलेली पाने किंवा गवत आधारासाठी पकडणे किंवा गडगडत खाली जाणे. अर्थात या शेवटच्या धोक्याची अखेर एकाच गोष्टीत होऊ शकते. खाली उतरताना तुम्हाला उतार, आंधळी वळणे, घसरण यापैकी काहीही समोर येऊ शकते. असे म्हणतात की सर्व रस्ते रोमला जातात. तसेच काहीसे इथेही आहे मात्र काही रस्त्यांना गुरुत्वाकर्षण  जरा जास्तच आहे. तेंव्हा मी ताठ उभे राहून सर्वांना एकच सांगू इच्छितो की ज्यांना पाय आहेत अशा सर्वांनी त्यांचा वापर करून, स्वतःचे मन आणि शरीर ताब्यात ठेवून, हात आणि पाय योग्य जागी ठेवून, योग्य प्रकारचे दगड व झुडपे यांना पकडून धरून, आणि मुख्य म्हणजे व्हिस्की न पिता गड उतरला तर ते दुपारच्या जेवणाला गडाच्या पायथ्याशी पोचू शकतात.

3 ऑगस्ट 2018

 

 

 

 

 

 

Advertisements

About chandrashekhara

I am a retired electronics engineer. I am interested in writing, reading books. Other hobbies include Paper models, wooden fret work and social networking.

चर्चा

One thought on “तोरणा किल्ला

  1. why after 7 feb 2016?
    so late ?

    Posted by panjabrao bhagat | ऑगस्ट 6, 2018, 11:09 सकाळी

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s

वाचकांचा प्रतिसाद

 पुणे 1790-95 — अक्ष… च्यावर  पुणे 1790-95
aroundindiaghansham च्यावर  पुणे 1790-95
chandrashekhara च्यावर  पुणे 1790-95
मिलींद कोलटकर च्यावर  पुणे 1790-95

जुने लेख शोधा

Enter your email address to subscribe to this blog and receive notifications of new posts by email.

Join 392 other followers

MyFreeCopyright.com Registered & Protected

माझे नवीन इ-पुस्तक

एका साम्राज्याच्या शोधात

Advertisements
%d bloggers like this: