.
Uncategorized

आता परमेश्वराचे काय करायचे? – 3


(स्टीव्हन वाइनबर्ग  याच्या What about God? या लेखाचा स्वैर अनुवाद)

मागील भागावरून (2) पुढे

असे आढळून येते की विश्वातील काही मूलभूत स्थिरांकांची मूल्ये, आश्चर्यकारक रित्या, या विश्वात बुद्धीप्रामाण्य सजीवतेचे आगमन होण्यासाठी सोईचे पडेल अशी असतात. काही शास्त्रज्ञ या निरिक्षणाला प्रमाणापेक्षा जास्त महत्व देताना दिसतात परंतु या निरिक्षणाला महत्व द्यायचे की नाही याबाबत आताच काही सांगणे मला तरी शक्य दिसत नाही. परंतु हे निरिक्षण महत्वाचे आहे असे जरी मानले तरी दैवी सामर्थ्याचा या मागे हात आहे असे काही सिद्ध होत नाही. विश्वउत्पत्तिशास्त्राच्या विविध सिद्धान्तात आपण ज्यांना प्रकृतिचे स्थिरांक (उदाहरणार्थ मूलकणांचा भार) म्हणतो त्यांची मूल्ये विश्वातीलएका जागेवरून दुसरीकडे गेल्यास किंवा एका कालापासून दुसर्‍या कालाकडे गेल्यास बदलतात. स्थिरांकांची मूल्ये बदलणे हे सत्य आहे असे मानल्यास आपण फक्त असे अनुमान काढू शकतो की जे शास्त्रज्ञ प्रकृतिच्या नियमांचे अध्ययन करत आहेत ते विश्वाच्या अशा भागात रहात आहेत जेथे मूलभूत स्थिरांकांची मूल्ये, सजीवतेचे आगमन होण्यासाठी सोईचे पडेल अशी आहेत. दैवी सामर्थ्याचा याच्याशी सुतराम संबंध नाही.

थोडे पुढे जाऊन मी असे म्हणेन की आपण जसजशी भौतिकीमधील जास्त  जास्त मूलभूत तत्वे शोधण्यात यशस्वी होऊ तसतसे आपल्या हे लक्षात येईल की या तत्वांचा आपल्या जीवनाशी लावता येणारा संबंध कमी कमी होतो आहे. हे समजण्यासाठी मी एक उदाहरण देतो. 1920च्या दशकात असे समजले जात होते की आपले जग ज्या अणूंनी बनलेले आहे त्या अणूचे घटक असलेले इलेक्ट्रॉन आणि प्रोटॉन हेच फक्त मूलकण आहेत. यानंतर न्यूट्रॉन सारख्या नव्या कणांचा जेंव्हा शोध लागला तेंव्हा साहजिकच असे गृहित धरले गेले की हे कण इलेक्ट्रॉन आणि प्रोटॉन यांपासूनच बनलेले असावेत. परंतु आज आपल्यासमोर उभे असणारे चित्र अतिशय निराळे आहे. आता आपल्याला हीच खात्री देता येत नाही की आपण जेंव्हा एखाद्या कणाला मूलकण म्हणतो तेंव्हा त्याचा नक्की अर्थ काय होतो? एवढा धडा मात्र आपण नक्की शिकलो आहोत की आपल्या आजूबाजूला दिसणार्‍या वस्तू ज्या कणांपासून बनलेल्या आहेत ते कण किती मूलभूत आहेत याला फारसे काही महत्व देण्याची गरज किंवा आवश्यकता दिसत नाही.

एखादा लोखंडाचा तुकडा चुंबकाच्या जवळ आणला की तो त्या चुंबकाकडे ओढला जातो हे आपणा सर्वांना माहीत आहे. चुंबकाच्या भोवती असलेल्या घनफळाच्या एका विशिष्ट मर्यादेपर्यंत हा लोखंडाचा तुकडा चुंबकाकडे ओढला जातो. त्या मर्यादेपेक्षा तो लांब ठेवला असला तर तो ओढला जात नाही. एकक चुंबकाच्या भोवती असलेल्या या विशिष्ट मर्यादेपर्यंतच्या घनफळाला चुंबकाचे क्षेत्र म्हणता येते. आधुनिक पुंज किंवा क्वान्टम सिद्धान्तानुसार आपले विश्व अशा अनेक क्षेत्रांनी व्यापलेले आहे. या क्षेत्रांवर जेंव्हा कोणतेही बल कार्य करू लागते किंवा इतर कोणत्या क्षेत्रांबरोबर या क्षेत्राची अन्योन्यक्रिया होते तेंव्हा त्या क्षेत्रात चलबिचल निर्माण होते. आपण ज्यांना मूल कण म्हणतो ते प्रत्यक्षात त्या कणाच्या क्षेत्रात निर्माण झालेली फक्त चलबिचल असल्याने थोड्याचे वेळात तिचे प्रमाण कमी-कमी होऊन ती नष्ट होते. या प्रक्रियेलाच त्या मूल कणाची नष्टता असे म्हणता येते. आपण आतापर्यंत विश्वात असलेल्या ज्या ज्या मूल कणांचा (किंवा क्षेंत्राचा) शोध लावलेला आहे ते सर्व कण इतक्या जलद गतीने नष्ट पावताना दिसतात की आपल्या आजूबाजूला असलेल्या जगात किंवा मानवी सजीवतेत यापैकी कोणत्याही कणांचे अस्तित्व असूच शकत नाही.  उदाहरण द्यायचे झाले तर इलेक्ट्रॉन्स हे आपल्या रोजच्या आयुष्याचा महत्वाचा भाग आहेत. परंतु मुऑन्स आणि टाउऑन्स या दोन मूल कणांचा आपल्या आयुष्याशी कोणताही संबंध जोडता येत नाही. परंतु ज्या पद्धतीने हे दोन मूल कण आपल्या सिद्धान्तांच्यात वारंवार येतात त्याच्यावरून इलेक्ट्रॉन्स हे मुऑन्स आणि टाउऑन्स यांच्यापेक्षा जास्त मूलभूत आहेत असे काही म्हणता येत नाही. याच मुद्द्याची व्यापकता आणखी वाढवून मी असे म्हणेन की  एखाद्या कणाचे आपल्या जीवनासाठी असलेले महत्व आणि त्य कणाचे प्रकृतिच्या नियमांमधील स्थान यांच्यामधे कोणताही परस्पर संबंध असल्याचे दिसून येत नाही.

हे ही खरेच म्हणावे लागेल की नवीन नवीन शास्त्रीय शोधांमुळे आपल्याला परमेश्वराच्या अधिक अधिक जवळ जाता येईल किंवा त्याच्याबद्दल आपल्याला त्याचे जास्त ज्ञान प्राप्त होईल अशी अपेक्षा कोणताही धार्मिक विचारसरणी असणारा माणूस ठेवत नाही. जॉन पोल्किन्गहॉर्न (इंग्लन्डमधील सैद्धान्तिक भौतिकी शास्त्रज्ञ, थिऑलॉजिस्ट, अ‍ॅनग्लिकन धर्मगुरू आणि लेखक) याने मोठ्या प्रभावी रितीने एका नव्या वेदान्ताची (थिऑलॉजी) आता गरज असल्याचे प्रतिपादन केले आहे. त्याच्या मताने  या वेदान्तात भौतिकी किंवा जीव शास्त्रे ही सुद्धा मानवी धर्मोपदेशाचा एक  भाग असतील आणि ज्या प्रमाणे शास्त्रे प्रयोग आणि निरिक्षण यांवर आधारित असतात त्याचप्रमाणे हा वेदान्त साक्षात्कारासारख्या धार्मिक अनुभवावर आधारित असेल. मात्रज्या लोकांना असे वाटते की त्यांना साक्षात्कारासारखा धार्मिक अनुभव प्राप्त आला आहे त्यांना त्या अनुभवाची गुणवत्ता काय होती हे स्वतःचे स्वतः ठरवावे लागेल.   पोल्किन्गहॉर्नच्या नव्या वेदान्ताच्या अपेक्षेत फारसे काही चूक आहे असे वाटत नाही परंतु अडचण एवढीच आहे की जगातील बहुतेक सर्व धर्मांचे अनुयायी अगदी बहुमताने, त्यांच्या स्वतःच्या धार्मिक अनुभवावर अवलंबून न राहता दुसर्‍या कोणत्या तरी व्यक्तीच्या साक्षात्कारासारख्या धार्मिक अनुभवावर विश्वास ठेवत असतात. प्रथम दर्शनी हा प्रकार एखाद्या सैद्धान्तिक भौतिकी शास्त्रज्ञाने  दुसर्‍या कोणाच्या तरी प्रयोगावर विश्वास ठेवून आपली अनुमाने काढावी तसा वाटेल परंतु या दोन्हीत एक मूलभूत फरक आहे. एखाद्या भौतिकी वस्तुस्थितीमागे हजारो भौतिकी शास्त्रज्ञांच्या वैयक्तिक विचारांच्या एकत्रिकरणाची प्रक्रिया पूर्ण होऊन त्या वस्तुस्थितीचे समाधानी आकलन (बर्‍याच वेळा ते अपूर्ण असते.) झालेले असते. या उलट धार्मिक साक्षात्कारावरून केलेले परमेश्वराचे चित्रण किंवा वर्णन हे मूलभूत रित्या विभिन्न दिशांकडे आपल्याला नेत राहते. हजारो वर्षांच्या वेदान्त मीमांसेनंतर सुद्धा  साक्षात्कारांसारख्या धार्मिक अनुभवांपासून काय धडे घ्यावयाचे याच्याबद्दलची एकवाक्यता झालेली अनुभवाला येत नाही.

धार्मिक अनुभव आणि शास्त्रीय प्रयोग यांत आणखी एक भिन्नता आहे. धार्मिक अनुभवांपासून मिळालेले धडे बर्‍याच लोकांसाठी त्यांच्या अंतर्मनाला खूप समाधान देणारे असतात. या उलट शास्त्रीय अन्वेषणातून बर्‍याचदा जग हे व्यक्तिनिरपेक्ष, निराकार किंवा अमूर्त आणि वैचारिक असल्याची भावना निर्माण होते.  धार्मिक अनुभव बर्‍याचदा जीवनाला एक नवा अर्थ प्राप्त करून देऊ शकतो.  शास्त्रीय अन्वेषणामधून हे कधीही शक्य नसते. धार्मिक अनुभव, पाप, पुण्य आणि मोक्षप्राप्ती यांच्या एका कालचक्रात आपल्याला नेऊन बसवतो आणि मरणानंतर पुढे काय? या अनुत्तरित प्रश्नाचे उत्तर कधीतरी मिळण्याची आशा आपल्या मनात निर्माण करतो. या कारणांस्तव मला असे नेहमी वाटते की एखाद्या व्यक्तीला आलेला धार्मिक अनुभव हा त्या व्यक्तिच्या मनोकामनांचा वज्रलेप परिधान करूनच येत असतो.

साधारण दीड शतकापूर्वी मॅथ्यू अरनॉल्ड (1822-88, एक इंग्लिश कवी व टीकाकार, याने शाळांचा निरिक्षक म्हणून काम केले होते) याने लोकांच्या कमी होत जाणार्‍या धर्मावरील श्रद्धेला सागराच्या ओहोटीची उपमा दिली होती आणि त्या ओहोटीच्या  वेळी ऐकू येणार्‍या समुद्राच्या गाजेला, ‘दुःख ध्वनीचे स्वर’ असे नाव दिले होते. अशा श्रद्धाळू मंडळींना सृष्टीच्या नियमांमध्ये, परमेश्वराने बनवलेला व ज्यात मानवाला काही विशेष भूमिका रंगवायची आहे, असा एखादा आराखडा सापडला असता तर विलक्षण हुरूप आला असता. परंतु असे काहीही घडणार नाही असा दाट संशय असल्याने मला खरेतर दुःख होते आहे. माझ्या बरोबर कार्य करणार्‍या माझ्या सहकार्‍यांपैकी काही जण असे सांगतात की श्रद्धाळू मंडळींना विश्वात रुची घेणार्‍या परमेश्वरावर विश्वास टाकण्याने जे मानसिक समाधान प्राप्त होते तसेच काहीसे समाधान त्यांना सृष्टीच्या स्वरूपाबद्दल चिंतन करून मिळते. मला मात्र असे कोणतेही समाधान मिळत नाही आणि अशा चिंतनामुळे ते सृष्टीच्या नियमांचा आणि कोणत्यातरी दूरस्थ आणि विश्वात रुची नसलेल्या परमेश्वराचा (आइनस्टाईनने लावला आहे तसा) बादरायणी संबंध जोडण्याच्या दृष्टीने ते उपयुक्त ठरेल असेही मला वाटत नाही. असा संबंध लावण्यासाठी म्हणून परमेश्वराबद्दलची आपली कल्पना आपण जितकी बदलू किंवा सुधारत जाऊ तितकाच संबंध जोडण्याचा हा प्रयत्न, आपल्याला निरर्थक आणि हेतुविरहीत वाटू लागेल.

आज हयात असलेल्या शास्त्रज्ञांमध्ये, या विषयामध्ये मला असलेली रुची अगदी असाधारण अशी म्हणावी लागेल. सहभोजन किंवा चहापान यांसाठी जेंव्हा आम्ही शास्त्रज्ञ एकत्र जमतो तेंव्हा धर्म आणि त्यावरील श्रद्धा हा विषय चर्चेमध्ये अतिशय विरळाच येतो. आणि तो आलाच तर आजमितीचे बहुतेक शास्त्रज्ञ, धार्मिक श्रद्धा हा विषय आजच्या घडीला कोणी गांभिर्याने घेणे कसे शक्य आहे? असे विचारून आपले आश्चर्य जास्तीतजास्त व्यक्त करताना दिसतात. बहुतेक शास्त्रज्ञ, त्यांचे आईवडील ज्या धर्माबरोबर संलग्न होते त्याच्याशी असलेली व लग्नासारखे समारंभ आणि आपल्या वंश-जातिची ओळख यासाठी पुरेशी पडेल एवढीच,  आपली संलग्नता कायम ठेवताना दिसतात. या माझ्या सहकारी शास्त्रज्ञांपैकी  बहुतेक जणांना, ते ज्या धर्माचे आहेत त्या धर्माच्या शिकवणीचे किंवा तत्वांचे काहीच ज्ञान बहुधा नाही. मला सर्वसाधारण सापेक्षतावादावर संशोधन करणारे दोन रोमन कॅथोलिक शास्त्रज्ञ माहीत आहेत तसेच यहुदी धर्माचे पालन करणारे दोन सैद्धान्तिक भौतिकी शास्त्रज्ञही माहीत आहेत. माझ्या ओळखीचा एक प्रायोगिक भौतिकी शास्त्रज्ञ पुनर्जन्मावर विश्वास ठेवणारा ख्रिस्ती आहे तर दुसरा सैद्धान्तिक भौतिकी शास्त्रज्ञ इस्लाम पंथीय आहे तर तिसर्‍या गणितीय भौतिकी शास्त्रज्ञाने चर्च ऑफ इंग्लंड्कडून दीक्षा घेतलेली आहे. माझी खात्री आहे की या शिवाय माझे इतर सहकारी इतर धर्मपंथीही असणार आहेत पण ते अनुसरत असलेल्या धर्माबद्दल एकतर मला माहिती नाही किंवा ते स्वत:ची मते स्वत:पाशी ठेवत असले पाहिजेत. या सर्वांबद्दलच्या माझ्या अनुभवावरून मी हे सांगू शकतो की आजमितीचे बहुतेक शास्त्रज्ञ हे धर्मामधे फारशी रुची दर्शवणारे नसले तरी त्यांना निधर्मी नक्कीच म्हणता येणार नाही.

मूलतत्ववादी किंवा कट्टर धार्मिक यांच्यापेक्षा उदारमतवादी मला नेहमीच जास्त गोंधळलेले वाटतात. एखादा शास्त्रज्ञ जेंव्हा एखाद्या कट्टर धार्मिक व्यक्तीला हे सांगतो की तो कोणत्याही गोष्टीवर विश्वास ठेवण्यास तयार होतो ती बाब सत्य असल्याबद्दल त्याची खात्री पटलेली असते म्हणून, ती गोष्ट समजल्यावर त्याला बरे किंवा छान वाटल्यामुळे नाही, तेंव्हा त्या कट्टर धार्मिक व्यक्तीला हे पटते. या उलट उदारमतवादी असे समजतात की भिन्न भिन्न लोक एकमेकाशी संबंध नसलेल्या भिन्न भिन्न गोष्टींवर, त्या गोष्टी त्यांचे कार्य सिद्धीस नेत असल्याने, विश्वास ठेवू शकतात. उदाहरण द्यायचे झाल्यास काही लोक पुनर्जन्मावर विश्वास ठेवतात तर काही स्वर्ग-नरक या कल्पना मान्य करतात. काही लोकांना असे वाटते की आत्मा हा व्यक्तीच्या मरणाबरोबरच मरण पावतो. उदारमतवाद्यांच्या दृष्टीने या सर्वांना त्यांच्या त्यांच्या विश्वासामुळे स्वास्थ्य किंवा दिलासा मिळाल्यामुळे त्यांच्यापैकी कोणीच चूक नसून सर्व बरोबरच आहेत. या परिस्थितीचे समर्पक वर्णन करणारे सुसान सोन्टाग (1933-2004, अमेरिकन लेखिका, चित्रपट्निर्माती, शिक्षक आणि राजकीय आंदोलनकारी) या लेखिकेचे हे शब्द मला विशेष रुचतात. ती म्हणते “आपल्या सर्वांना कुठलाही आशय नसलेल्या एका दयेच्या सागराने घेरलेले आहे”. बर्ट्रान्ड रसेल (1872-1970, नोबेल पारितोषिक पुरस्कृत ब्रिटिश तत्वज्ञानी, इतिहासकार, लेखक, गणितज्ञ, समाज सुधारक, राजकीय आंदोलनकारी आणि तर्कशास्त्री) याच्या एका अनुभवाबद्दलची त्याने सांगितलेली एक गोष्ट मला या संदर्भात स्मरते. 1918 सालात, रसेलने युद्धाला केलेल्या विरोधामुळे त्याला तुरुंगात डांबण्यात आलेले होते. तुरुंगाच्या नियमांप्रमाणे जेलरने रसेलला त्याचा धर्म कोणता? म्हणून विचारणा केली. रसेलने त्याला उत्तर दिले होते की तो अज्ञेयवादी (परमेश्वराच्या  अस्तित्वावर विश्वास नसणारा) आहे. जेलर थोडावेळ विचारात पडला. पण थोड्याच वेळात त्याच्या चेहर्‍यावर समजल्याची भावना दिसू लागली. तो रसेलला एवढेच म्हणाला. “मला वाटते की तुमचे उत्तर ठीकच आहे. आपण प्रत्येक जण आपापल्या देवावर विश्वास ठेवतो नाही कां?”

क्रमशः

22 मार्च 2018

 

Advertisements

About chandrashekhara

I am a retired electronics engineer. I am interested in writing, reading books. Other hobbies include Paper models, wooden fret work and social networking.

चर्चा

अद्याप प्रतिक्रिया नाहीत.

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s

वाचकांचा प्रतिसाद

 पुणे 1790-95 — अक्ष… च्यावर  पुणे 1790-95
aroundindiaghansham च्यावर  पुणे 1790-95
chandrashekhara च्यावर  पुणे 1790-95
मिलींद कोलटकर च्यावर  पुणे 1790-95

जुने लेख शोधा

Enter your email address to subscribe to this blog and receive notifications of new posts by email.

Join 392 other followers

MyFreeCopyright.com Registered & Protected

माझे नवीन इ-पुस्तक

एका साम्राज्याच्या शोधात

Advertisements
%d bloggers like this: