.
कथा

गुप्त धन


करंबेळकर सावकारांच्या वाड्यावर गुप्त धनाचा हंडा सापडल्याची आवई गावात सहा सात आठवड्यांपूर्वी उठल्यापासून आत्माराम वाड्याकडे अगदी बारीक लक्ष ठेवून होता. वाड्यात कोण येते जाते, वाड्यातले कोणी बाहेर जाते का? गेल्यास, कोठे व कोणाकडे जाते याची इत्यंभूत माहिती त्याला मिळत होती. त्याची पत्नी दमयंती, वाड्याच्या उरल्या सुरल्या दोन मालकिणींपैकी एक म्हणजे सरस्वतीकाकूंची खास मैत्रिण असल्याने अगदी आतल्या गोटातील बातम्या सुद्धा त्याला मिळत होत्या.

चाळीस, पन्नास वर्षांपूर्वी करंबेळ्कर सावकार हे गावामधले एक बडे प्रस्थ होते. पंचवीस तीस गडी- माणसांचा राबता असलेला त्यांचा भव्य चौसोपी वाडा, पंचक्रोशीमधील त्यांच्या मालकीच्या पाचशे हजार एकरांच्या जमिनी, वाड्यावरचा गणपती उत्सव, गावाबाहेरल्या शंकराच्या मंदिराचा त्यांनी केलेला जीर्णोद्धार  या सगळ्या गोष्टी तर गावातल्या पारावरच्या चर्चेत नेहमीच येत असत, पण घोड्यावर बसून ये जा करणारे उंचेपुरे, रुबाबदार, करंबेळकर सावकार रस्त्यात नुसते दिसले तरी गावकरांच्या माना आदराने खाली वाकल्याशिवाय रहात नसत.  पंचवीस वर्षांपूर्वी घोड्यावरून पडण्याचे निमित्त होऊन करंबेळकर सावकार गेले आणि वाड्याच्या श्रीमंतीला जी उतरती कळा लागली ती लागलीच! सावकारांच्या पाठोपाठ त्यांच्या पत्नी निर्वतल्या. पुढच्या पंधरा वर्षात सावकारांचा मधला मुलगा आणि त्याची पत्नी हे देखील निजधामास गेले. आई-बाप गमावलेल्या त्यांच्या मुलीला, यमीला, कल्याण गावातले सासर मात्र चांगले मिळाले. एकुलती एक असल्याने तिचे लग्नही तिच्या काका-काकूंनी मोठ्या थाटमाटाने लावून दिले आणि गाव जेवण घातले. मात्र वाड्यावर भोजनाला जाण्याचा हा प्रसंग,  गावकर्‍यांसाठी शेवटचाच ठरला, कारण पुढच्या काही वर्षातच सावकारांचे उरलेले दोन्ही कर्ते मुलगे साथीच्या तापाला बळी पडून इहलोक सोडून गेले. वाड्यावर उरल्या त्या सावकारांच्या फक्त दोन सुना; थोरली भागिरथी आणि धाकटी सरस्वती. सरस्वतीला मूलबाळ कधी झालेच नाही आणि भागिरथीची दोन्ही मुले लहानपणीच दगावली होती. दुर्दैवाचा फेरा म्हणतात तो हाच का? असा प्रश्न त्या दोघींना प्रथम प्रथम पडला खरा! पण नंतर याही आयुष्याची त्यांना सवय झाली.

भागिरथी काकूंना बगुकाकू हे नाव कोणी ठेवले हे सांगणे कठिणच होते, पण सर्वजण त्यांना बगुकाकू म्हणूनच ओळखत. सरस्वती त्यांच्या तोंडासमोर जरी त्यांना “बाई” म्हणत असली तरी इतरांपाशी त्यांचा उल्लेख ती बगुकाकू म्हणूनच करत असे. बगुकाकूंचे आताशा वय झाल्यासारखे दिसत असले तरी तब्येतीने  मात्र त्या ठणठणीत होत्या. दोन वर्षांपूर्वी मोतीबिंदूंची शस्त्रक्रिया त्यांनी करून घेतल्यापासून जाड भिंगांचा चष्मा त्यांना जो चिकटला होता तो आता जन्माचाच सोबती झाला होता. तोंडातील बहुतेक दातांनी रजा घेतल्याने, गाल आत जाऊन तोंडाचे बोळके झाले होते. कल्याणला पुतणीकडे, म्हणजे यमूकडे जाऊन दातांची कवळी त्यांनी करून घेतली होती खरी, पण बहुतेक वेळा पदार्थ, दाताशिवाय किंवा खलबत्यात कुटून घेऊन त्या तशाच चघळून चघळून खात असत.
वाड्यावरचे जुने सर्व वैभव आता केंव्हाच परागंदा झाले होते. एक जुना गडी परसू तेवढा इमान इतबारे, अधून मधून वाड्यावर जात असे व काही काम असले तर करत असे. त्याला पगाराचे पैसे उचलून देणे बगुकाकूंना शक्यच नव्हते. त्यामुळे भात, नारळ असल्या स्वरूपातच त्याला पगार मिळत असे. तोही तक्रार न करता मिळेल ते घेत असे. बगुकाकू आणि सरस्वती यांचा संसार चालत असे तो खंडाने आलेल्या भातावरच. तरी मीठ मिरची साठी पै पैसा लागत असेच. तो त्या कोठून आणतात हा खरे म्हणजे एक प्रश्नच होता. काही गावकरी, बगुकाकू गावातल्या लखूशेट वाण्याला गुपचुप भात विकून त्याच्या कडून रोखीने पैसे घेतात असे म्हणत, परंतु ते खरे होते की घरातील उरलेले किडुकमिडुक विकून त्यावर त्या गुजराण करतात हे सांगणे, कोणालाच, अगदी सरस्वतीलाही शक्य नव्हते. कारण बगुकाकू कोणाशीच काही बोलत नसत. एवढे मात्र खरे की घरात स्वैपाक करताना, मीठ मिरची घरात नाही असे तिला कधीच आढळून आले नव्हते. वाड्याकडे गावकर्‍यांचे लक्ष जावे असे काही आता तेथे नव्हतेच.

चारसहा आठवड्यांपूर्वी ती गुप्त धनाची आवई उठली आणि सगळे बदलूनच गेले. प्रत्येक जण वाड्याकडे आता एका नव्याच संशयाच्या किंवा कुतुहूलाच्या नजरेने बघू लागला. यात आत्माराम सर्वात पुढे असला तर आश्चर्य नव्हतेच म्हणा, ते साहजिकच  होते.  सध्या तरी आत्माराम म्हणजे गावातील एक मोठे प्रस्थ बनले होते. गणपती उत्सवाच्या वर्गणीच्या यादीत सर्वात मोठा आकडा त्याचा असे.  स्वत:च्या हिंमतीवर त्याने गेल्या दहा पंधरा वर्षात बर्‍यापैकी पैसा उभा केला होता. मुळातच धंद्याची आवड असल्याने नारळ. आंबा यांच्या व्यापारात त्याने चांगलेच पैसे मिळवले होते. आता जमिनी खरेदी करून तो मोठा तालेवार झाला होता. धंद्याची किंवा धनप्राप्तीची कोठेही संधी प्राप्त होते आहे का? याकडे त्याचे बारकाईने लक्ष असे व वेळ आली तर अशासाठी गुंतवणूक करण्यास तो मागे पुढे पहात नसे.

 

त्यामुळेच एक दिवस जेंव्हा त्याला दमयंती सहज म्हणाली की वाड्यावरच्या सरस्वतीच्या अंगावर आज नवीन कोरे करकरीत लुगडे दिसत होते तेंव्हा त्याचे कान टवकारले नसते तर नवलच घडले असते. बगुकाकूंच्या संसारात, नवे कोरे लुगडे, स्वत:साठी किंवा जावेसाठी त्यांनी घेणे ही एक अशक्य कोटीतीलच बाब होती व याची जाणीव आत्मारामला चांगलीच असल्याने ही बातमी त्याला फार मोठी महत्त्वाची वाटली होती. त्याने मग दमयंतीला बरेच प्रश्न खोदून खोदून विचारले. त्यातून जी माहिती बाहेर आली त्याने त्याची अस्वस्थता फारच वाढली. दमयंतीच्या सांगण्याप्रमाणे, मागच्या आठवड्यात बगुकाकू अचानक कल्याणला गेल्या होत्या. त्या परत आल्या त्या चार नवी कोरी करकरीत लुगडी आणि स्वैपाकाची दोन चार नवी भांडी घेऊनच. एवढा खर्च त्यांनी कसा व कोठून केला असेल या बद्दल सरस्वतीला काहीच सांगता येत नव्हते कारण, निदान तिच्या म्हणण्याप्रमाणे तरी, तिला काही माहीतच नव्हते.

असेच दोन दिवस गेले आणि आत्मारामच्या कानावर बातमी आली की बगुकाकूंनी वाड्याच्या ईशान्य कोपर्‍यातील एका पडक्या खोलीला मोठे कुलुप लावून टाकले आहे. हे कळल्यावर तो खूपच बैचैन झाला.  बगुकाकूंनी कुलुप का व कशासाठी लावले आहे हे त्याला विचारणेही शक्य नव्हते आणि बगुकाकू इतक्या आतल्या गांठीच्या होत्या की त्यांनी त्याला केंव्हाच उडवून लावले असते. त्या नंतर बगुकाकूंनी नारळ उतरवण्यासाठी आलेल्या गड्याला नेहमीचा एक आणा आणि एक नारळ या ऐवजी दोन आणे आणि दोन नारळ दिल्याचे त्याला समजले. या आठवड्यात तर कहरच झाला. आत्माराम दुपारी पारावर बसलेला असताना कल्याणकडच्या रस्त्याने एक बैलगाडी येताना त्याने बघितली. ती गावात पारापाशी येऊन थांबली व त्यातून बगुकाकू खाली उतरल्या. तेवढ्यात परसू गडी कोठूनसा धावत आला आणि गाडीत ठेवलेल्या दोन मोठ्या लोखंडी ट्रंका त्याने उतरून घेतल्या. ट्रंकांना दिलेला निळा रंग आणि त्यावर लाल पांढर्‍या रंगात रंगवलेली वेलबुट्टी खूपच छान दिसत असली तरी आत्मारामच्या मनाला मात्र ती  काट्यासारखी टोचली. या म्हातारीने या दोन मोठ्या ट्रंका कशाला आणल्या असतील? त्याच्या मनाला साहजिकच प्रश्न पडला. न राहवल्याने तो अखेरीस पुढे झाला व “ काकू या ट्रंका कशाला आणल्या? म्हणून त्याने विचारून टाकले!  “अरे कल्याणला गेले होते. येताना ट्रंका दिसल्या म्हणून आणल्या हो! कुलुपे फुकट दिली हो मेल्याने!” त्यांच्या चेहर्‍यावरचा आनंद स्पष्ट दिसत होता.

नंतरच्या दिवसात आत्मारामच्या कानावर पडले की शेजारच्या वळ्सुंद गावातला चिंगूशेट आणि ठिकशे गावातला अंडी आणि कोंबड्यांचा व्यापारी नवाज महंमद, वाड्यावर येऊन गेले म्हणून. वाड्यावर नक्कीच काहीतरी चालू आहे आणि ही म्हातारी आपण काही केले नाही तर आपल्या ताकास तूर लावून देणार नाही हे त्याच्या पक्के ध्यानात आले. त्वरित काहीतरी करणे आवश्यक होते.दुसर्‍या दिवशी सकाळीच आत्माराम वाड्यावर गेला. बगुकाकू ओसरीवर उन्हात बसली होती. सरस्वती आत बहुधा स्वैपाक वगैरे करत होती. आत्माराम उभा होता तेथून ईशान्येकडची कुलुप लावलेली खोली स्पष्ट दिसत होती. “काय काकी बरी आहेस ना?” आत्मारामने विचारले. “पाय दुखताहेत रे फार. त्या नवाजने एक मलम दिले आहे आणून, त्याने जरा उतारा पडल्यासारखे वाटते आहे.” बगुकाकू म्हणल्या. आत्मारामच्या कपाळावर एक आठी उमटली पण ती न दाखवता तो एवढेच म्हणाला “ अग! नवीन कुळीथ आले आहेत. दमयंतीला म्हणालो दे थोडे पीठ करून! काकूला पिठी फार आवडते.” एवढे म्हणून त्याने हातातली पुरुचंडी बगुकाकूंकडे दिली. “आज कुळथाची पिठी कर, एवढे आत्मारामने पीठ आणले आहे. त्यांस बरे वाटेल हो!” असे म्हणत बगुकाकूंनी लगेच सरस्वतीला हाक घातली.“काकू हे मागच्या खोलीला एवढे कुलुप कशाला लावले आहेस?” आत्मारामने मुळावरच घाव घातला. “ अरे! ही सरस्वती आहे मुलुखाची वेंधळी! मलाही आताशा नीट दिसत नाही रे! गुरे ढोरे जनावरे खोलीत जाऊन बसतात म्हणून लावून टाकला टाळा!” काकू म्हणाल्या. आयुष्यभर कधी गुरे ढोरे त्या खोलीत गेली नाहीत, आता बरी जाऊ लागली! आत्माराम पुटपुटला. बगुकाकूंना खरे म्हणजे ते ऐकू गेले होते पण आपल्याला काहीच ऐकू आले नाही असे दाखवत त्या गप्पच बसून राहिल्या. आत्माराम जाण्याचे निमित्त करून उठला पण तेवढ्यात त्याला कोपर्‍यात ठेवलेली फळांची करंडी दिसली. “काकू एवढी फळे कोणी दिली? त्याने विचारले. “अरे तो चिंगू शेट आला होता ना फळे घेऊन! जुनी ओळख ठेवून अगत्याने आला बिचारा!” काकू म्हणाल्या. हे दोघेही तुला फसवण्यासाठी येत आहेत असे ओरडून काकूला सांगावे असे आत्मारामला वाटत राहिले.

उठल्यासारखे करून आत्माराम सहज बोलतो आहे असे दाखवत म्हणाला. “ काकू तुला आता झेपत नाही तर वाडा काढून का नाही टाकत? मी सुद्धा घेइन1! पाच सहस्त्र रुपयाला घेण्याची माझी तयारी आहे.” आत्मारामने आपले पत्ते टेबलावर ओपन केले. बगुकाकू काहीच बोलल्या नाहीत. त्या हातातले दोन बदाम आत्मारामला देत म्हणल्या, “ घे! चिंगुशेटने दिले आहेत. म्हातारपणी शक्तीसाठी बरे असतात असे म्हणत होता.” बगुकाकूला फितवणे आपल्याला पाहिजे तेवढे सोपे जाणर नाही हे आत्मारामच्या चांगलेच ध्यानात आले. “उद्या येइन परत! विचार करून ठेव.” एवढेच सांगून तो तेथून निघाला.

दिवसभर आत्माराम विचार करत राहिला. नवाज आणि चिंगूशेट आपल्याला चांगलीच स्पर्धा देणार हे त्याच्या लक्षात आले होते. काही करून वाडा घ्यायलाच पाहिजे असे त्याने मनात ठरवले. दुसर्‍या दिवशी तो परत वाड्यावर गेला. “काकू तुझ्यासाठी लाल वाल आणले आहेत.” असे म्हणत त्याने वालांची पिशवी काकूंच्या हातात ठेवली. “अरे कशाला एवढे करतो आहेस?” काकू म्हणल्या. मग आत्मारामने मुद्यालाच हात घातला. पाच सहस्त्र, सात सहस्त्र, दहा सहस्त्र अगदी पंधरा सहस्त्र नगद देण्यास तयार असूनही काकू काही फितेनाच. शेवटी पुढच्या आठवड्यात येतो असे सांगून आत्माराम तेथून निघाला. लगेचच चिंगूशेट आणि नवाज यांनी वाड्यावर फेरी मारण्याची बातमी त्याच्याकडे आलीच.

पुढचे दोन तीन दिवस त्याने पैशाची जुळवाजुळव करण्यात घालवले  आणि पुढच्या आठवड्यात वाड्यावर जाऊन त्याने पंचवीस सहस्त्र रुपये देऊन वाडा घेण्याची तयारी दाखवली. त्याच्या नजरेसमोर एकच गोष्ट होती ती म्हणजे कोणत्याही परिस्थितीत चिंगू शेट आणि नवाज यांच्या हातात तो गुप्त धनाचा हंडा जाऊ द्यायचा नाही. आश्चर्याची गोष्ट म्हणजे या वेळेस गप्प न राहता काकू म्हणाल्या. “बर! कर काय ते तुझ्या मनासारखे! पण एक अट आहे.” काय? आत्माराम जवळजवळ ओरडलाच. “ अरे काही विशेष नाही, दोन खणांची जागा बघून दे मला गावात!” काकू म्हणाल्या.

आत्मारामने मग विद्युतवेगाने हालचाली केल्या. आयता हातात आलेला मासा आता तो चिंगूशेट किंवा नवाज यांच्या हातात द्यायला तयार नव्हता. त्याच्या डोळ्यासमोर तरंगत होता आता फक्त तो गुप्त धनाचा हंडा! त्याने तलाठ्याला बोलावून कागदपत्र करून घेतले. मधल्या आळीतल्या कुलथेकरांच्या वाड्यात दोन खणांची जागा बघितली. त्यांना 3 महिन्याच्या भाड्याची रक्कम  इसारा म्हणून दिली.  आणि दोन दिवसात कागद्पत्र करूया म्हणून बगुकाकूंना सांगून आला. ज्योतिषाला सांगून जरा बरा मुहूर्त त्याने काढून घेतला व त्या वेळेस पंच मंडळींना घेऊन तो वाड्यावर गेला. बगुकाकू व्यवहाराला पक्क्या दिसत होत्या कारण त्यांच्याजवळ यमीचे व तिच्या मुलांची हरकत नसल्याची पत्रे तयार होतीच. बगुकाकू व सरस्वती यांचे कागदपत्रांवर आंगठे उठवून घेतल्यावर पंचासमोर आत्मारामने पंचवीस सहस्त्रांची रक्कम बगुकाकूंच्या हातात दिली आणि त्यांना नमस्कार केला. बगुकाकूंनीही त्याला तोंड भरून आशिर्वाद दिले.

“उद्या परसू आला की सामान हलवते.” काकू म्हणाल्या. “नको काकू! आजच करूया. चांगला दिवस आहे” आत्मारामला धीर धरवत नव्हता. बगुकाकूंनीही मग आढेवेढे घेतले नाहीत. आत्मारामने त्यांचे सर्व किडूकमिडुक सामान त्या दोन निळ्या ट्रंकांच्यात स्वत: भरले. काकू भारावून गेल्या होत्या पण आत्मारामचा खरा उद्देश काकू त्या ट्रंकांत दुसरा काही ऐवज भरत नाहीत ना हे बघण्याचा होता हे लक्षात आल्याने त्यांनी चेहर्‍यावर काहीच दर्शवले नाही. संध्याकाळ पर्यंत काकूंचे बिर्‍हाड कुलथेकरांच्या वाड्यात हलले सुद्धा!. रात्री दमयंती स्वत: नव्या घरी जेवणाचा डबा घेऊन आली.

उद्या  ईशान्येकडची खोली उघडली की गुप्त धनाचा हंडा आपल्या हातात पडणार या कल्पनेने रात्रभर आत्मारामला झोप आली नाही. सकाळी काकूंकडे जाऊन त्याने त्या खोलीच्या टाळ्याची किल्ले मागितली. “ अरे तुला मी सांगायचे विसरलेच! ती किल्ली कोठेतरी गळपटली आहे.” बगुकाकू म्हणाल्या.  मग आत्माराम तसाच तालुक्याला गेला. येताना किल्लीवाल्याला घेऊन आला. येताना त्याच्या मनात विचार आला की कदाचित हंडा त्या खोलीत नसला तर? तेथे कदाचित एखादे भुयार वगैरे असेल! या विचाराने मग त्याने चार मजूर कामावर घेतले व तो वाड्यावर पोचला. नवीन किल्लीने ईशान्येकडच्या खोलीचे दार उघडून घेतल्यावर आपला अंदाज खरा ठरला आहे हे त्याच्या लक्षात आले. खोलीत तर काहीच नव्हते.

पुढच्या दिवसांपासून आत्मारामने वाडा पाडण्याचे काम हातात घेतले. मजूरांना हंडा सापडला तर कदाचित ते तो लंपास करतील या भितीने आत्माराम 24 तास वाड्यावर राहू लागला. जसजशी एकएक भिंत पडत गेली तसतसा तो जास्त जास्त चिड चिड करू लागला. सगळ्या भिंती पाडून झाल्या, अगदी जोत्याचे दगड सुद्धा हलवून झाले पण गुप्त धनाचा हंडा काही मिळाला नाही. मग शेवटी जिथे जिथे सपाट म्हणून जमीन होती तेथे आत्मारामने खड्डे घेण्यास सुरूवात केली. वाड्याच्या संपूर्ण जागेवर  पाच ते सहा फूट खोलीचा खड्डा निर्माण खाल्यावर मात्र आत्माराम थांबला. गुप्त धनाच्या आशेने आपण वाहवत गेलो आणि मूर्खपणाने वाजवी किंमतीच्या अनेक पट किंमत काकूंना देऊन बसलो आहोत हे त्याच्या लक्षात आले. पायावर धोंडा स्वत:च्याच हाताने पाडून घेतल्याने स्वत:वर चरफडण्याशिवाय आता दुसरा काहीच पर्याय त्याच्यासमोर नव्हता.

बगुकाकू पैसे मिळाल्यापासून दोन दिवसातच  कल्याणला गेल्या व गहाण टाकलेले आपले दोन दागिन्यांचे डाग त्यांनी प्रथम सोडवून घेतले. या गहाण दागिन्यांनी आपले काम चोख केले होते आणि अपेक्षेपेक्षा कितीतरी जास्त नगद रक्कम त्यांना मिळून गेली होती. यमीच्या नवर्‍याच्या सल्ल्याने पैसे कोठे गुंतवायचे वगैरे ठरवून त्यांनी ते केले व नंतरच गावी परत आल्या.

रात्रीचे जेवण झाल्यावर चिग़ूशेटने दिलेल्यापैकी दोन बदाम आणि काजू एका खलबत्यात घालून त्यांनी त्यांची पूड केली व तोंडात टाकली. तोंड चालू असतानाच त्यांना एकदम आठवण झाली व त्या सरस्वतीला म्हणाल्या. “ सरस्वते! काय म्हणते आहे तुझी दमयंती?” सरस्वतीला बहुधा हा प्रश्न अपेक्षित असावा कारण तिने लगेच उत्तर दिले. “ बाई! काय सांगू! गेल्या चार दिवसांपासून तिने माझ्याशी बोलणेच टाकले आहे.” बगुकाकूंच्या चेहर्‍यावर काहीतरी मिस्किल भाव उमटला आहे असे सरस्वतीला क्षणभर वाटले पण पुढच्याच क्षणाला त्यांचा चेहरा नेहमीसारखा झाला. सरस्वतीला काहीच कळले नाही. ती निर्विकारपणे बगुकाकूंकडे बघतच राहिली, वेंधळ्यासारखी!

‌(डिस्क्लेमर- ही कथा, यातील पात्रे आणि प्रसंग हे सर्व कल्पित आहेत.)

23 जानेवारी 2016

 

Advertisements

About chandrashekhara

I am a retired electronics engineer. I am interested in writing, reading books. Other hobbies include Paper models, wooden fret work and social networking.

चर्चा

One thought on “गुप्त धन

  1. बगुकाकुचे डोके एकदम सुपर 🙂

    Posted by Vijay Vasve | फेब्रुवारी 8, 2016, 11:12 सकाळी

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s

जुने लेख शोधा

Enter your email address to subscribe to this blog and receive notifications of new posts by email.

Join 387 other followers

MyFreeCopyright.com Registered & Protected

माझे नवीन इ-पुस्तक

एका साम्राज्याच्या शोधात

Advertisements
%d bloggers like this: