.
कथा

कैफियतनामा


(पुणे शहरात अलीकडे री-डेव्हलपमेंटच्या नावाखाली जुने वाडे इमारती वगैरे पाडून तेथे नवीन इमारती उभारल्या जाण्याचे कार्य जोरात चालू आहे. अशाच एका पाडल्या जाणार्‍या वाड्यातील जुन्या सामानात एक कागदपत्रांचा रुमाल सापडला. या कागदपत्रांत असलेला हा एक कैफियतनामा.)

——–

मेहेरबान कोतवाल साहेब

पुणे शहर

कैफियत बेइसम नारायण बापूजी पिंगळे राहणार तांबट गल्लीबाजूस, कसबा, पुणे. सुरूसन सतराशे एकुणसाठ इसवी लिहून दिला कैफियतनामा ऐसाजें:-

कैलासवासी छत्रपती शिवाजी महाराज यांनी सोन्याचा नांगर फिरवून स्थापन केलेले पुणे शहर,   येथील हवापाणी, अनेक सरदार व वतनदार मंडळींनी बांधलेल्या वाड्यांमध्ये स्वस्त भाड्याने राहण्यास मिळणारे खण, बाजारपेठा, घोडेस्वार, खटारे यांची सततची वर्दळ असूनही आमच्यासारख्या रयतेला जाणे येणे सुलभपणे करता येइल असे रस्ते, यासाठी प्रसिद्ध आहे. कोतवाल साहेबांचे अमिन, दिवाण वगैरे अधिकारी, बाजारपेठांमध्ये विकला जाणारा माल योग्य त्या प्रतीचा व वजनाचा असेल याची खातरजमा करीत असल्याने रयतेला तकलिफ़ होत नाही.

कोतवाल साहेबांच्या हुकुमाप्रमाणे शहरात रात्री अकरा वाजता व सकाळी चार वाजता तोफा उडवल्या जातात. यामधील काळात रयतेला रस्त्यावर येण्यास मनाई केलेली आहे. या काळात रामोशी नजर ठेवून पहार्‍यांवर असल्याचे कारण, रात्री कोतवालसाहेबांच्या या नियमानुसार रस्त्यावर कोणासही येणे शक्य होत नसल्याने गुंडागर्दी, चोरचिलट यापासून रयतेचे चांगले संरक्षण होते आहे. सांगणे इतकेच की कोतवाल साहेबांच्या कृपेने रयतेला कोणतीच फिक्र किंवा दिक्कत उरलेली नाही.

हे जरी सच असले तरी अलीकडे उद्भवलेल्या काही परेशानींशी हररोज सामना करण्याची वेळ अलीकडेच प्रजेला येऊ लागली आहे. या तकलिफी, कोतवाल साहेबांना विदित होणे महत्त्वाचे आहे म्हणून हा कैफियतनामा खाली देत आहे.

शहरात दारूगोळा, तोफा बनवण्याचे नवे कारखाने चालू झाले आहेत. तसेच विणकरांचे मागही येथे बरेच आहेत. या धंद्यामुळे शहरात लोकांची व मालाची सतत ने आण चालू असते. परंतु मुख्य म्हणजे सतत चालू असणार्‍या मुलुखगिरिच्या दरबारी मोहिमांमुळे, जवळपास सर्व सरदारांकडे सैन्य भरतीचे काम मोठ्या प्रमाणावर होते आहे. सहज नोकरी मिळत असल्याने आपला घोडा व शस्त्र घेऊन उत्तरेकडून येणार्‍या मुघल, पठाण, तुर्की, नजीब, पुरभय्ये तसेच राजपूत सैनिकांची सध्या पुण्यात रीघ लागलेली दिसते आहे. यांच्याबरोबरच पेंढारी व बाजारबुणगे यांचीही संख्या पुण्यात बेसुमार वाढलेली आहे. हे सर्व लोक, शहरातच मोकळी जागा मिळेल तेथे मुक्काम थाटत असतात व तेथेच आपली चूल मांडताना दिसतात. या  अनपढ सैनिकांचा बरताव बेमुर्वत असून आचार- विचार सुद्धा बडे बस्ताख आहेत. या सैनिकांच्या या बेशुमार गर्दीमुळे आणि त्यांच्या अनेक गलिच्छ सवयींमुळे रस्त्यावरून जाणे येणे सुद्धा रयतेला बेभंरवश्याचे होऊ लागले आहे.

रस्त्यावरून जाणारे मेणे, खटारे, घोडेस्वार शिबंदी, या शिवाय हे उत्तरेकडून आलेले बदतमीज सैनिक सुद्धा रस्त्यावर आपले घोडे भरधाव फेकत असल्याने रयतेला जीव मुठीत धरूनच चालावे लागते आहे. घोड्यांच्या धावण्याने रस्त्यावर उडणारी धूळ ही फिक्र करण्याची बाब होत चालली आहे. हे घोडे धावत असताना आपली शेपटी सारखी हलवत राहतात व त्यामुळे शेपटीतील केस कापसांच्या धाग्यांसारखे हवेत उडत राहतात. हवेतील धूळ व घोड्याचे केस यामुळे रस्त्यांवरून चालताना सांस घेणेही मुष्किल होऊ लागले आहे. ही तकलिफ बुधवार, शनिवार आणि रास्ता पेठांतून जाणार्‍या रस्त्यावर कोतवाल साहेबांनी किंवा त्यांच्या दफ्तरदार, पोतनीस किंवा फडणीस या सारख्या अधिकार्‍यांनी सैर केल्यास समजमधे येईल.

सतत होणार्‍या या घोडेबाजीने रस्त्यावर लीदीचे ढीग ठिकठिकाणी साठून राहिलेले नजरेस येतात. रस्त्याने जाणार्‍या रयतेचा पाय कधी या घाणीत पडेल हे सांगता येत नाही. पुणे शहरात पूर्वी रोज सकाळी पखालीने रस्त्यावर पाणी मारण्याची प्रथा होती. आजकल हे दिसत नाही व त्यामुळे रस्तेही साफसुथरे होत नाहीत. या घाणीची गंदगी पूर्‍या पुणे शहरात भरून राहिलेली असते. आषाढ श्रावणात बारिश होऊ लागली की लीदीचे थरच रस्त्यावर पसरतात. रस्त्यावरील घाणीची ही तकलिफ एवढी बेसुमार वाढते की कधी कोणत्या खड्यात पाय जाईल व पाय घाणीने बरबटेल हे सांगणे मोठे नामुमकिन आहे.. रस्त्यावरून चालताना येणार्‍या गंदगीने रयतेला नाक मुठीत धरूनच चालावे लागते आहे.

सरदार, वतनदार मंडळींच्या वाड्यांना कात्रज तलावावरून भुयारांमार्फत पाणी पुरवठा केला जात असला तरी रयतेला फडके हौदासारखे हौद किंवा मुठा नदी यांवरच पाण्यासाठी अवलंबून रहावे लागते. रस्त्यावरील धूळ, घोड्याचे केस आणि आसमंतात पसरलेले लीदीचे थर यामुळे पाणी खराब होते आहे. हे पाणी पिण्याने आणि खराब हवेमुळे बिमारांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे व हकीम किंवा वैद्य यांजकडून दवादारू आणण्यासाठी रयतेला भीड करावी लागत आहे. सरदार तसेच वतनदार मंडळींच्या वाड्यांना मोठे कोट असल्याने आणि पाणी वाड्यापर्यंत पोचत असल्याने त्यांना ही तकलिफ होत नाही. तकलिफ देणार्‍या या बाबींपासून, रयतेला सकून मिळावा यासाठी खालील उपायांवर कोतवाल साहेबांनी अंमल केल्यास रयतेच्या दिलांत खुषी भरेल असे या बंद्याला वाटते व म्हणून ही अर्जी आपल्यासमोर दाखिल करण्याचे त्याने धारिष्ट दाखवले आहे.

1.शहरात नव्याने येणार्‍या उत्तरेकडील सैनिकांसाठी संगमापलीकडच्या मोकळ्या जागेत शामियाने उभारून तेथे त्यांची मुक्कामाची सहुलत करावी. तेथेच त्यांना दाणापाणी मिळण्याचा अंमल केल्यास या सैनिकांना शहरात येण्याची गरज उरणार नाही व जागा मिळेल तेथे पथारी टाकण्याची त्यांच्यावर वेळ येणार नाही.

2.शहरातील घोड्यांची संख्या कमी करण्यासाठी जुफ्त किंवा सम दिन म्हणजे चतुर्थी, अष्टमी वगैरे तिथींस कृष्णवर्णीय किंवा त्याच्या जवळपास येणार्‍या वर्णांच्या घोड्यांना शहरात फिरण्याची परवानगी असावी तर विषम म्हणजे पंचमी, सप्तमी वगैरे तिथींस शुभ्रवर्णीय घोड्यांस रस्त्यावर येण्यास मुभा असावी. सरदार, अंमलदार व दरबारी घोडेस्वारांना या नियमातून माफी असावी. त्याचप्रमाणे मिश्र रंगाचे घोडे असल्यास ते शुभ्र वर्णाचे आहेत की कृष्ण वर्णाचे हे ठरविण्यास एक अंमलदार नेमण्यात यावा. रजामंद नियम स्वाराने तोडल्यास त्याचा घोडा प्रथम सरकारी पागेत एक सप्ताह ठेवून दाण्यागोट्याचा खर्च गुन्हेगार स्वाराकडून वसूली करावा. यापुढे पुन्हा गुन्हा घडलास घोड्यावर जप्ती आणली जावी.

3.पूर्वीच्या वहिवाटीप्रमाणेच प्रथम रस्ते स्वच्छ झाडून मग पखालीने त्यांच्यावर पाणी मारल्यास रस्ते साफसुथरे होतील, गंदगीचा खातमा झाल्याने रयतेस सकून मिळेल.

बहुत काय लिहिणे हि विनंति. येणेप्रमाणे कैफियतीची कलमे लिहून पाठवली आहेत त्याजवरून कोतवाल साहेबांच्या दिलांत येईल. पूर्वीच्या वहिवाटींत व आताच्या वहिवाटींत कंपेश तफावत काय आहे ते सदरीं लिहिल्यावरून दिलांत आणून रयतेचा सर्व प्रकारे बंदोबस्त करून देणार, कोतवाल साहेब खुदावंत आहेत.

तारीख सहा माहे मार्गशीर्ष सन सतराशे  एकुणसाठ.

सही

नारायण बापूजी पिंगळे

(डिसक्लेमर- ही कथा यातील पात्रे व प्रसंग हे सर्व काल्पनिक आहेत.प्रचलित घटनांशी या कैफियतनाम्याचा दूरान्वयानेही संबंध नाही.)

16 जानेवारी 2016

 

Advertisements

About chandrashekhara

I am a retired electronics engineer. I am interested in writing, reading books. Other hobbies include Paper models, wooden fret work and social networking.

चर्चा

4 thoughts on “कैफियतनामा

 1. khupch sunder….aajchi parsthiti tyaveles sudha hoti…

  Posted by kishor | जानेवारी 27, 2016, 9:44 सकाळी
 2. Excellent satirical piece sir.
  Can I share it on what’s app group?
  JKBhagwat

  Sent from my iPad

  >

  Posted by Jaywant Bhagwat | जानेवारी 27, 2016, 10:50 सकाळी
 3. काका
  फार छान पोस्ट आहे ! त्यातील सर्व शब्दन् शब्द नीट बघीतले तर त्यावेळी सर्वसामान्यांच्या बोली भाषेत उर्दु शब्दांचा खुप भरणा आहे.
  आताची मराठी खुपच निराळी आहे व शुध्द देखिल्
  असो .
  त्या बिचार्‍या पिंगळे काकांची कैफीयतीची दखल घेउन त्यांचा त्रास् निश्चित दूर् झाला असेल् अशी अपेक्षा करूया .
  संदीप

  Posted by sandeep deokar | ऑगस्ट 28, 2016, 2:07 pm

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s

जुने लेख शोधा

Enter your email address to subscribe to this blog and receive notifications of new posts by email.

Join 387 other followers

MyFreeCopyright.com Registered & Protected

माझे नवीन इ-पुस्तक

एका साम्राज्याच्या शोधात

Advertisements
%d bloggers like this: