.
Fiction कथा

भीती


संध्याकाळच्या सातचा ठोका घड्याळाने दिल्याबरोबर राघवेंद्रचारी रोजच्या सवयीने उठले आणि घराबाहेर पडून त्यांनी अंगणाच्या लोखंडी फाटकाला कुलुप लावून टाकले. पंचवीस वर्षांपूर्वी या घरात रहायला आल्यापासून त्यांनी हा दंडकच घालून घेतलेला होता. आता इतकी वर्षे लोटली तरी त्यांच्या या सवयीमधे कधीच खंड पडला नव्हता. मधल्या काळात, मुले मोठी झाल्यावर वडीलांचे हे वर्तन त्यांना न रुचणे स्वाभाविक होते. मग जानकीअम्मांनी म्हणजेच मुलांच्या आईने एक मधला पर्याय काढला व फाटकाच्या कुलुपाच्या चार किल्ल्या बनवून आणल्या व आपल्या तिन्ही मुलांना दिल्या. मग मुले सात नंतर बाहेर जाता-येताना कुलुप काढून जात व आल्यानंतर परत लावत. मुले जावोत वा येवोत, राघवेंद्रचारींच्या सातला कुलुप लावण्याच्या सवयीत ना कधी खंड पडला, ना कधी त्यांनी त्या बाबत आळस केला. तसे बघायला गेले तर आपले सर्व आयुष्यच त्यांनी असेच शिस्तबद्ध व स्वत: आखून घेतलेल्या चार नियमांच्या चौकटीत घालवले होते. बेबंद किंवा उच्छृंकलपणे वागणे त्यांना कधी ना जमले नव्हते ना रुचले नव्हते.

राघवेंद्रचारी वळले व घरात जाण्यासाठी निघाले. मल्लेश्वरम मधला हा तीन हजार स्क्वेअर फुटाचा प्लॉट, घर बांधण्यासाठी म्हणून, नोकरी करत असतानाच त्यांनी विकत घेतला होता व त्यावरचे हे बैठे कौलारू घर, ते नोकरीसाठी मैसूरला सरकारी क्वार्टर्समधे रहात असतानाच बांधून घेतले होते. पुढच्या बाजूस प्रशस्त अंगण, त्या मागे वर्‍हांडा व त्याच्या मागे चार खोल्यांचे घर अशी घराची रचना होती. वर्‍हांड्याला शंकरपाळ्यांचे डिझाईन असलेल्या आणि हिरवा रंग लावलेल्या मोठा लाकडी जाळ्या बसवलेल्या होत्या. घराभोवती जाळीचे कुंपण बसवून त्यामागे कोयनेलची झुडपे लावलेली होती. अंगणातून आत येण्यासाठी लोखंडी पट्ट्यांमधून बनवलेले मोठे फाटक होते. मागे परसदारी जानकीअम्मांनी छोटीशी फुलबाग फुलवली होती. त्यांनी फुलांचे मनस्वी वेड्च होते ना म्हणाना! जानकीअम्मांच्या केसांवर अबोली किंवा मोगर्‍याच्या ताज्या फुलांची वेणी नाही असा दिवस कधी उजाडलेलाच नव्हता. जानकीअम्मांच्या आठवणीने राघवेंद्रचारींच्या डोळ्यात टचकन पाणी आले. गेली बिचारी! ते सहजतेने स्वत:शीच पुटपुटले. मावळत्या सूर्याची उतरती किरणे समोर घरावर पडली होती. व्हरांड्याच्या दाराशेजारी जानकीअम्मांनी मोठ्या हौसेने लावून घेतलेल्या पाटीवरची “टी. राघवेंद्राचारी, एम. सी. एस ( ग्रेड टू) रिटायर्ड” असा मजकूर असलेली अक्षरे मात्र आता रंग उडून गेल्याने अस्पष्ट दिसत होती. त्याच वेळेस जानकीला आपण मैसूर सिव्हिल सर्व्हिसमधे होतो हे जगजाहीर कशाला करायचे? असे सांगून पाटीवर फक्त आपले नाव लिहून घेऊ या! असे म्हणल्याची आठवण राघवेंद्राचारींना झाली पण जानकीअम्मांनी त्यांचे काही एक ऐकले नव्हते व ही पाटी करून घेतली होती.

घरात शिरल्यावर राघवेंद्रचारींना क्षणभर वैफल्याची भावना चाटून गेली. एवढे मोठे घर, पण राहतो त्यात आपण एकटेच! या कल्पनेनेच ते कावरेबावरे झाले पण या परिस्थितीला इलाज नाही हे लक्षात आल्यावर त्यांनी स्वत:ला लगेचच सांभाळले. राघवेंद्रांच्या तिन्ही मुलांपैकी कोणीच या घरात त्यांच्याजवळ रहात नव्हते ही वस्तुस्थिती होती. मोठा जयंत, बंगलुरूच्या सरकारी कॉलेजातून इंजिनीयर झाल्यावर जो अमेरिकेला गेला होता तो तिकडचाच झाला होता. मुंबईला स्थायिक झालेली मधली मालती, पवईजवळ असलेल्या तिच्या फ्लॅटमधे रहात होती आणि धाकटा श्रीनिवास, बेंगलुरु मधेच रहात असला तरी त्याच्या बायकोला; कावेरीला; असल्या जुनाट घरात आणि ते सुद्धा सासर्‍यासमवेत राहणे पसंत नसल्याने त्याने इंदिरानगर मधे एक फ्लॅट घेतला होता. अप्पांना काय हवे नको यासाठी तो मधून मधून फेरी मारत असे. कावेरी मात्र या घरात गेल्या कित्येक वर्षात आलेलीच नव्हती.

मल्लेश्वरमच्या एटथ मेन रोडने वर येऊन सेव्हनटीन्थ क्रॉस रोडला वळले की त्या रस्त्याला लागून असलेल्या अनेक गल्ल्यांपैकी एका गल्लीत राघवेंद्रचारींचे घर होते. घराच्या पश्चिमेला अगदी थोड्या अंतरावरून टुमकूर वरून येणारी रेल्वे लाइन गेलेली होती. साहजिकच राघवेंद्रांचा प्रत्येक दिवस हा निरनिराळ्या एक्सप्रेस किंवा मेल गाड्यांच्या टाइम टेबल नुसार उजाडत व मावळत असे असे म्हणणे फारसे चुकले नसते. पूना मेल पहाटे आली की ते उठत असत व तीच गाडी रात्री अकराला पुण्याकडे गेली की अंथरुणावर पडत असत. घरात आल्यावर राघवेंद्रचारींनी दिवे लावले व स्वैपाकाच्या बाईने करून ठेवलेला भात व सांबार त्यांनी कुकरमधे घालून गॅसवर ठेवला व ते सध्या वाचत असलेले पुस्तक परत हातात घेतले.

रात्री अकरा वाजता पूना मेल गेली की झोपण्यापूर्वी समोरच्या वर्‍हांड्यात जाऊन समोर एक नजर टाकायची व नंतर आतला दरवाजा लावून घेऊन बिछान्यावर पडायचे हा त्यांचा रोजचा क्रम असे. आजही त्यांनी ते केले. नेहमीप्रमाणेच बेंगलुरु म्युन्सिपालिटीने लावलेल्या कमी पॉवरच्या दिव्यामधे अस्पष्टपणे दिसणारी समोरची शांत गल्ली व त्या गल्लीच्या दोन्ही बाजूंना असलेली गुलमोहोराची झाडे व त्यांच्या पडलेल्या लांब लांब सावल्या या शिवाय समोर काहीच दिसत नव्हते. निर्विकारपणे राघवेंद्रचारी परत वळले व दरवाजा लावून बिछान्यावर पडले.

आज काय झाले होते कोणास ठाऊक? पण राघवेंद्रचारींना रोजच्यासारखी झोप काही आज येत नव्हती. बराच वेळ बिछान्यावर तळमळत पडल्यावर ते उठले व त्यांनी घड्याळाकडे एक नजर टाकली रात्रीचा पाउण वाजला होता. ते एक भांडेभर पाणी प्यायले व काय मनात आले कोणास ठाऊक? पण आतला दरवाजा उघडून ते वर्‍हांड्यात आले. त्यांनी समोर नजर टाकली आणि समोरचे दृष्य पाहून ते जागच्या जागीच थिजल्यासारखे झाले. समोरच्या लोखंडी फाटकाच्या आतल्या बाजूस डाव्या हाताला कोणीतरी बसले होते व त्याची लांब सावली अंगणात पसरली होती. मधेच वार्‍याची एक झुळूक आली व समोर काहीतरी हालचाल झाल्यासारखे राघवेंद्राचारींना भासले आणि ते आणखीनच गारठले. आपला घसा कोरडा पडला आहे हे राघवेंद्रचारींना जाणवत होते. काहीतरी केले पाहिजे म्हणून त्यांनी आत वळण्याचा प्रयत्न केला पण त्यांचे पाय जमिनीला चिकटल्यासारखे झाले होते. निशब्दपणे आणि हताशपणे ते समोर अंगणात बघतच राहिले. असा किती वेळ गेला होणास ठाऊक? पण आपण भीतीने कापत आहोत याची जाणीव राघवेंद्राचारींना झाली व मनोनिग्रह करून ते आत वळले. घराचा आतला दरवाजा त्यांनी घट्ट लावून घेतला व व्यंकटेशा! व्यकंटेशा! असे स्मरण करत ते पायाची जुडी करून अंथरूणावर बसून राहिले.

रात्री त्यांना कधीतरी झोप लागली असावी कारण उन्हे वर आल्यावर त्यांना जाग आली. धडधडत्या अंतकरणानेच समोरचा दरवाजा त्यांनी उघडला व समोर अंगणात नजर टाकली. त्यांचा आपल्या डोळ्यावर विश्वासच बसेना. समोर तर काहीच नव्हते. सोनेरी सूर्यप्रकाशात न्हालेले समोरचे अंगण, त्यामागचा रस्ता, बाजूची गुलमोहोराची फुललेली झाडे, त्यांच्या तळाजवळची लाल माती आणि मागचे निळे भोर आकाश हे सगळे नेहमीप्रमाणेच दिसत होते. आपल्याला रात्री काहीतरी भास झाला असावा या भावनेने राघवेंद्राचारी स्वत:शीच हसले. अंगणात जाऊन त्यांनी फाटक उघडले व ते दिनक्रमाला लागले.  रात्री झोपेपर्यंत आदल्या रात्रीचे सगळे ते विसरले असले तरी झोपण्याआधी एकदा व्हरांड्यात जाऊन समोर सगळे ठीकठाक दिसते आहे हे बघून शांत मनाने ते बिछान्यावर पडले व क्षणार्धात गाढ झोपी गेले. रात्री साडेतीनच्या सुमारास त्यांना जाग आली. एक भांडेभर पाणी प्यायल्यावर व्हरांड्यात चक्कर मारण्याचा विचार डोक्यात आल्याने त्यांनी आतला दरवाजा उघडला आणि ते वर्‍हांड्यात आले. समोर बघता क्षणी भीतीची एक जबरदस्त लाट त्यांच्या रोमारोमातून पसरत गेली. कालचे ते कोणीतरी परत अंगणात येऊन बसले होते. थरथर कापत राघवेंद्रचारी कसेबसे घरात आले. आतला दरवाजा लावून ते बसून राहिले. सकाळ उजाडल्यावर बाहेर येऊन बघितल्यावर परत समोर काहीच नाहीये हे लक्षात आल्याने त्यांची बैचैनी आता मात्र प्रचंड वाढली.

रात्रीच्या प्रकाराची इतकी दहशत आता त्यांच्या मनात बसली होती की हा काय प्रकार आहे? हे समजावून घेण्याचा कोणताही प्रयत्न करण्याच्या पलीकडे राघवेंद्रचारी गेले होते. नाईलाजाने त्यांनी शेवटी श्रीनिवासला फोन लावला. काय झाले आहे हे कळल्यावर प्रथम श्रीनिवासने ते सगळे हसण्यावारी नेले पण अप्पांचा आवाज काहीतरी निराळाच येतो आहे हे लक्षात आल्यावर, “अप्पा, मी संध्याकाळी येऊन जातो.” असे सांगून त्याने फोन ठेवला. संध्याकाळी ओफिस सुटल्यावर श्रीनिवास मल्लेश्वरमला आला. तो व स्वत: राघवेंद्रचारी यांनी अंगण, त्या भोवतीचे कुंपण, लोखंडी फाटक यांची बारकाईने तपासणी केली पण कोणी आत आल्याच्या कोठेच काही खुणा नव्हत्या.

दुसर्‍या दिवशी दुपारी श्रीनिवासला अप्पांचा परत फोन आला. त्यांचा आवाज ऐकूनच हे प्रकरण संपलेले नाही हे स्पष्ट दिसत होते. आपण आजारी असल्यासारखे बिछान्यावर पडून आहोत हे राघवेंद्रचारी त्याला फोनवर म्हणाल्यानंतर मात्र आता काहीतरी हालचाल केलीच पाहिजे हे त्याच्या लक्षात आले व रात्री मी झोपायला घरी येतो असे सांगून त्याने फोन ठेवून दिला. घरात श्रीनिवास असल्याने राघवेंद्राचारी त्या रात्री चांगल्या मनस्थितीत झोपले हे जरी खरे असले तरी रात्री अंगणात तोच प्रकार परत एकदा घडला . श्रीनिवासला लगेचच त्यांनी उठवले त्यानेही अंगणात कोणीतरी आहे हे बघितले. बाहेर जाऊन हा काय प्रकार आहे हे बघावे असे मनात येऊन दार उघडण्यासाठी तो वळला सुद्धा! पण समोर पांढरेफटक पडलेल्या व थरथरा कापणार्‍या आपल्या अप्पांना बघून त्यांच्याकडे प्रथम लक्ष दिले पाहिजे आहे हे त्याच्या आले. त्यांना बिछान्यावर झोपवून धीर देत तो शेजारी बसून राहिला. या सगळ्यात पहाट झाली.

उद्या रात्री या प्रकरणाचा मी सोक्षमोक्ष लावतो असे सांगून श्रीनिवास निघाला खरा पण वडिलांची भीती कशी घालवायची हे त्यालाही नीटसे समजत नव्हते. संध्याकाळी जरा लवकरच तो मल्लेश्वरमला आला तो बरोबर एक लांब वायर आणि विजेचा बल्ब आणि त्याचा होल्डर घेऊनच. त्याने फाटकाजवळ तो होल्डर एका झाडाला बांधला व त्यात बल्ब बसवून वायर घरातल्या सॉकेटला आणून जोडली व बटन दाबले की फाटकाजवळचा भाग प्रकाशमान होईल अशी व्यवस्था केली व घड्याळात रात्री अडीचचा गजर लावून तो झोपी गेला. राघवेंद्रचारींची झोप तर गेले चार दिवस हा प्रकार सुरू झाल्यापासून उडल्यारखीच झाली होती. रात्री वर्‍हांड्यात जाण्याच्या नुसत्या कल्पनेने सुद्धा त्यांना घाम फुटत होता.

रात्री अडीचला श्रीनिवास उठला व वर्‍हांड्यात आला. त्याच्या मागोमाग भीतीने ग्रासलेले राघवेंद्रचारीही आले. समोर काहीतरी खचित दिसत होते. वार्‍याची झुळुक आली ही त्याची हालचालही होत होती. श्रीनिवासने काल बसवलेल्या फाटकाजवळच्या दिव्याचे बटन ऑन केल्याबरोबर समोर अंगणात लख्ख प्रकाश पडला. समोर, आपल्या वडिलांचा गेले चार दिवस अक्षरश: छळ करणारे जे काय होते त्याला उजेडात बघितल्यावर मात्र श्रीनिवासच्या चेहर्‍यावर हास्य पसरले. ते समोरचे काहीतरी म्हणजे मोठे बंद असलेली एक खाकी पिशवी होती. वार्‍याच्या झुळुकीबरोबर बंद हलले की हालचार झाल्यासारखे घरातून भासत होते.

मग श्रीनिवास अंगणात गेला व ती पिशवी त्याने घरात उचलून आणली. त्या पिशवीत होती इयत्ता नववीची पाठ्यपुस्तके आणि वह्या! राघवेंद्रचारी स्वत:च्या मूर्खपणाबद्दल स्वत:लाच दोष देत हतबुद्ध होऊन समोरच्या पिशवीकडे बघत राहिले होते. एक कोडे सुटले होते पण एक रहस्य उलगडणे अजून बाकी होतेच! ही पिशवी कोणाची होती आणि ती इथे का ठेवली जात होती? हे समजणे आवश्यकच होते.

सकाळी नऊच्या समोरास घराची बेल वाजली. श्रीनिवास कामाला निघून गेला होता. राघवेंद्रचारींनी दार उघडले. समोर उभा होता पार्थसारथी; त्यांच्याकडे सकाळी पेपर टाकणारा मुलगा. राघवेंद्रचारींना समजेना की हा मुलगा महिन्याच्या मधेच बिल न्यायला कसा काय आला बुवा? बिल खरे तर त्याने चार तारखेसच नेले होते. पण पार्थसारथीचे दुसरेच काहीतरी काम होते. “ दोडप्पा! माझी शाळेची पिशवी तुम्ही उचलून ठेवली आहेत का?” तो आजूबाजूला बघत म्हणाला. राघवेंद्रचारींचा राग प्रचंड उफाळून आला. म्हणजे या गाढवामुळे आपल्याला एवढा मनस्ताप सहन करावा लागला तर!. पण ते पुढे काही बोलण्याच्या आतच पार्थसारथीने कोपर्‍यात ठेवलेले आपले दप्तर बघितले व त्याचा चेहरा खुलला. पिशवी त्याने उचलून घेतली व तो एवढेच म्हणला की “दोडप्पा! मी नाइट स्कूलला जातो ना! रात्री परत येताना मी थोडा वेळ दिव्याखाली उजळणी करतो व नंतर पिशवी तुमच्या फाटकाजवळ ठेवत असतो आणि सकाळी पेपर टाकायला आलो की ती घेऊन जात असतो. तुमच्या फाटकाला कुलुप असते त्यामुळे माझी पिशवी सेफ राहते. बरे झाले तुम्ही आज उचलून ठेवलीत ते, मला आज पेपर टाकायला जमलेच नाही. सॉरी!”

पार्थसारथीने ती पिशवी सायकलला अडकवली व सहजपणे सायकलला टांग मारून तो निघूनही गेला. राघवेंद्चारींच्या आता ध्यानात आले की आज सकाळी पेपर आलेलाच नाही. पण ते काही बोलण्याच्या परिस्थितीतच नव्हते. हतबुद्ध होऊन ते समोर बघतच राहिले. वेड्यासारखे!

 

( डिस्क्लेमर- ही कथा, त्यातील पात्रे व प्रसंग हे सर्व काल्पनिक आहेत.)

11 जानेवारी 2016

Advertisements

About chandrashekhara

I am a retired electronics engineer. I am interested in writing, reading books. Other hobbies include Paper models, wooden fret work and social networking.

चर्चा

3 thoughts on “भीती

  1. simple and interesting story. I request you to please write some science story.

    Posted by chaitanya kulkarni | जानेवारी 17, 2016, 2:59 pm
  2. खुपच छान लिहिले आहे.

    Posted by KUMAR | जानेवारी 17, 2016, 6:44 pm
  3. छान…हा.हा..

    Posted by किशोर आडभाई | जानेवारी 18, 2016, 9:14 सकाळी

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s

जुने लेख शोधा

Enter your email address to subscribe to this blog and receive notifications of new posts by email.

Join 387 other followers

MyFreeCopyright.com Registered & Protected

माझे नवीन इ-पुस्तक

एका साम्राज्याच्या शोधात

Advertisements
%d bloggers like this: