.
कथा

इंदूरी साडीचे प्रकरण


बळंवत काहीशा अस्वस्थ मनाने समोरच्या कागदाकडे बघत होता. खरे तर एव्हांना राहिलेल्या दोन-पाच नोंदी पूर्ण करून, मागच्या महिन्यात साजर्‍या झालेल्या गणेशोत्सवात, श्रींच्या मूर्तीसमोर आपली कला प्रस्त्तुत करणार्‍या कलाकारांना दिलेली बिदागी आणि कपडेलत्ते यासाठी एकूण किती रक्कम खर्ची पडली याचा आकडा व कागदपत्रांचा रुमाल मुजुमदारांकडे त्याने त्वरेने देणे अत्यावश्यक होते. त्याने दिलेल्या या आकड्याशिवाय, गणेशोत्सवाचा ताळेबंद अर्थातच पूर्ण होऊ शकत नव्हता. दोन वेळेला समोरच्या कागदावर नोंद करण्यासाठी बोरू उचलून त्याने शाईच्या दौतीत बुडवून घेतलाही होता पण काही विचार करत तो तसाच परत ठेवला होता. श्रावण महिन्यातील शुद्ध एकादशी उलटली तरी महिन्यापूर्वी होऊन गेलेल्या उत्सवाचा जमाखर्च, अजूनही पूर्ण झाला नसल्याबद्दलची आपली नाराजी फडणिसांनी मुजुमदारांकडे दोन दिवसांपूर्वीच व्यक्त केली असल्याची बातमी त्याच्या कानावर आली होती. ताळेबंद पूर्ण करणे गरजेचे होते कारण कोणत्याही क्षणी खुद्द पंतसचीव चौकशी करण्याची शक्यता होती.

दर वर्षी भाद्रपद शुद्ध प्रतिपदेपासून ते दशमीपर्यंतचे दहा दिवस, वाड्यावर गणपती रंगमहालात गणेशोत्सव साजरा होत असे. या निमित्ताने, गणपती रंग-महाल अतिशय सुंदर रित्या सजवला जात असे आणि सर्व कार्यक्रम येथेच होत असत. भिंतींच्यावर लावलेली नयन मनोहर तैल-चित्रे आणि आरसे, छतावर टांगलेली स्फटिकांच्या लोलकांची झुंबरे आणि हंड्या यांत या सगळ्या सजावटीची अनेक प्रतिबिंबे दिसत आणि संपूर्ण महाल प्रकाशमय होऊन जात असे. मध्यभागी ठेवलेली पेशव्यांची मसनद त्यावरील सोन्याच्या जरीकामामुळे झगमगत असे. मसनदीच्या दोन्ही बाजूंना वरिष्ठ अधिकारी, सरदार, शिलेदार, दरबारी आपले सर्वोत्तम रत्नजडित कपडे परिधान करून त्यांच्या हुद्द्यांप्रमाणे बसत असत. भालदार, चोपदार यांनी ललकारी दिल्यावर पेशवे अतिशय रुबाबदारपणे महालात प्रवेश करत असत व आपल्या पदाला साजेश्या पद्धतीने, आसनास्थित होत असत. सर्व दरबार हा निरनिराळे रंग आणि जमलेल्या लोकांची वैशिष्ट्यपूर्ण वैविध्ये, यामुळे मोठा खुलून दिसत असे. सर्वांच्या करमणुकीसाठी आयोजित केलेले, नर्तन, गाणी व संगीत, कथा-कीर्तन आणि इतर कार्यक्रम या नंतर सुरू होत असत.

दरबार या उत्सवासाठी खर्च करण्यास मागे पुढे बघत नसे. बळवंताला मागच्या वर्षीचा हिशोब चांगलाच स्मरत होता. त्या वर्षी एकशे ऐंशी कीर्तनकारांनी कथा सांगितल्या होत्या व त्यांना कपड्यालत्त्याशिवाय दोन सहस्त्र आणि एकशे पंचावन्न रुपये बिदागी दिली होती. एकोणचाळीस गायकांना तीनशे एकोणतीस रुपये बिदागी मिळाली होती. त्रेचाळीस नर्तकींच्या पथकांना एक सहस्त्र आणि सव्वीस रुपये बिदागी मिळाली होती. त्रेचाळीस पखवाजांना एकशे एकवीस रुपये तर पंचवीस वाजंत्रीवाल्यांना दोनशेचाळीस रुपये देण्यात आले होते.

या वर्षीचा गणेशोत्सव, बळवंताला जास्त आत्मियतेचा वाटत होता, याला एक कारण होते. वाड्यावर निरनिराळी कामे आणि शिबंदी म्हणून तीन सहस्त्रांपेक्षा जास्त कर्मचारी तैनात केलेले नेहमीच असत. गणेशोत्सवाचा देखावा आणि निवडक कार्यक्रम पहाता यावेत यापैकी या पैकी काही जणांची निवड दरबार दर वर्षी करत असे. या वर्षी बळ्वंताचे भाग्य थोर म्हणून त्याची निवड झाली होती. गणेशमूर्तीची सजावट आणि झगमगाट त्याने डोळे भरून पाहिला होता आणि मूर्तीसमोर झालेल्या कार्यक्रमांपैकी, ताहिरा बाईचे गाणे ऐकण्याचे भाग्य त्याला लाभले होते. कसब्यामधल्या त्याच्या इतर शेजारपाजार्‍यांना तर हा विषय चर्चेला दोन पाच दिवस पुरला होता.

इतर सर्व खर्चांच्या बाबींप्रमाणेच, गणेशोत्सवामधे झालेल्या खर्चाच्या नोंदी सुद्धा पेशवे दरबार अत्यंत काटेकोरप्रमाणे ठेवत असे. खुद्द सरकार सुद्धा हा खर्च नजरेखालून घालतात असे इतर कारकून बोलत असल्याचे बळवंताने ऐकले होते. या खर्चाच्या नोंदी करण्याचे काम, मागच्या तीन चार वर्षांप्रमाणेच, या वर्षीही बळवंत आणि इतर तीन अशा चार कारकुनांकडे मुजुमदारांनी दिले होते. खर्चापैकी कलाकारांना दिलेल्या बिदागी आणि कपडेलत्ते यावर झालेल्या खर्चाच्या नोंदी करण्याचे काम बळ्वंताकडे आले होते. खरे तर हे सर्व काम त्याने कालच संपवत आणले होते. काही दोन चारच नोंदी करणे आणि खर्चाच्या रक्कमांची बेरीज करून तो आकडा काढणे एवढेच काम बाकी होते. कालच हे काम झाले असते पण बळवंताच्या कुटुंबाने गेला महिनाभर त्याच्यामागे चोळ्या शिवण्यासाठी म्हणून दोन खण आणून देण्यासाठी जो तगादा लावला होता त्याने काल सकाळी फारच उग्र स्वरूप धारण केल्याने शेवटी नाईलाजाने बळवंताला काल अर्ध्या प्रहराची रजा घेऊन कुटुंबासाठी दोन खण खरेदी करण्यासाठी चोळखण आळीत जाणे भाग पडले होते. सूरजमलच्या दुकानावर दोन खण विकत घेण्यासाठी म्हणून बळवंत संध्याकाळी गेला होता आणि तिथेच तो प्रसंग घडला होता.

कुटुंबाला हव्या असलेल्या रंगाच्या दोन खणांचा सौदा बळवंताने साडेसात आण्याला पटवला होता व कंबरेला खोचलेला बटवा काढून त्यातून ही रक्कम काढून देत असतानाच, दुकानाचा मालक एका दुसर्‍या कोणा व्यक्तीशी बोलत जिना उतरत खाली येताना त्याने बघितला. त्या दोघांमध्ये आधी काय संभाषण झाले होते ते जरी बळवंताला माहिती नव्हते तरी त्याच्या बोलण्यावरून ती व्यक्ती कोणत्या तरी सरदाराकडे मुनीम किंव तत्सम काम करणारी होती हे बळवंताने त्वरित ताडले. ती व्यक्ती सुरजमलला सांगत होती; “ बाईसाहेबांना ती डाळिंबी रंगाची इंदूरी साडी एकदम पसंत आहे पण तुम्ही सांगता ती साडेतीन रुपये ही किंमत फारच होते आहे.” यावर सुरजमलाने काय उत्तर दिले याचे जरी बळवंताला आकलन झाले नसले तरी इंदूरी साड्यांची किंमत साडेतीन रुपयांच्या आसपास असते ही माहिती त्याच्या डोक्यात पक्की जाऊन बसली होती.

त्यानंतर घरी आल्यावर कुटुंब जरी आनंदले असले तरी बळवंत गप्पच होता. हे इंदूरी साडीचे प्रकरण आपल्याला वाटले होते त्यापेक्षा बरेच गंभीर दिसते आहे या कल्पनेने तो सचिंत झाला होता. आज फडावर त्यामुळेच जरा तो लवकरच आला होता व हातातले कागदपत्र त्याने काळजीपूर्वक परत एकदा वाचले होते. पण कोठेच काही चूक दिसत नव्हती. दरबारातील इतर खर्चाच्या बाबींप्रमाणेच गणेशोत्सवासाठी खर्च झालेल्या प्रत्येक रकमेच्या पावतीवर गणेशोत्सवासाठी खास नेमणूक केलेल्या कारभार्‍याचा शिक्का व ही रक्कम खरोखरच खर्च झाल्याची नोंद असणे हे नियमाप्रमाणे आवश्यक होते. या नियमानुसारच गणेश मूर्तीसमोर गायन करणार्‍या ताहिरा बाईला साडीचोळी देण्यासाठी म्हणून एका इंदूरी साडीची खरेदी सूरजमलच्या दुकानातूनच झाली होती व ती साडीचोळी व बिदागी ताहिरा बाईला दिल्याची नोंद असलेली पावती बळवंताच्या हातात होती. कारभार्‍याचा शिक्का व रक्कम खर्च झाल्याची नोंद सुद्धा व्यवस्थित होती. बळवंताला फक्त एकच गोष्ट खटकत होती. साडीची किंमत पावतीमध्ये साडेतेरा रुपये दिसत होती. काल सूरजमलच्या दुकानात कानावर पडलेले संभाषण त्याला आठवत होते व त्यामुळेच जमाखर्चात ही रक्कम टाकायची का नाही असा विकल्प त्याच्या मनात येत होता.

शेवटी काय तो सोक्षमोक्ष लावून टाकू या भावनेने बळवंत उठला त्याने डोक्यावर पगडी घातली, खांद्यावरचे उपरणे ठाकठीक केले व पलीकडच्या खणात बसलेल्या मुजुमदारांसमोर तो हात बांधून व खाली मान घालून स्वस्थ उभा राहिला. जरा वेळाने मुजुमदारांना बळवंत समोर उभा असल्याचे लक्षात आले. त्यांनी हातातील बोरू खाली ठेवला आणि ते बळवंताला म्हणाले. “ बळवंत कृष्णाजी! आज सकाळी दर्शन दिलेत? कालची अर्ध्या प्रहराची रजा पुरली नाही वाटते?” एवढे बोलून ते हसले व आपण बळवंताला बोलावणेच धाडणार होतो त्याची आठवण त्यांना झाली. “अहो गणेशोत्सवाच्या खर्चाच्या हिशेबाचे काय झाले?” त्यांचे वाक्य पूर्ण होण्याच्या आतच बळवंताने त्यांना आपल्याला त्यासंबंधातच थोडे बोलावयाचे असल्याचे सांगितल्याने; “मग बोला की!” मुजुमदार म्हणाले. “ पंत जरा खाजगी आहे.” बळवंत म्हणाला. त्याचा चेहरा पाहून मुजुमदार उठले व त्याला घेऊन आतल्या एका खणात गेले. तेथे बळवंताने त्यांना आपल्या कानावर पडलेली इंदूरी साडीची किंमत आणि पावतीवर दर्शवलेली किंमत याबद्दल सविस्तर सांगितले. “तुम्हाला पावती कोणी आणून दिली” त्यांनी विचारणा केली. बाकी सर्व कागदपत्रांप्रमाणेच; “गणेशोत्सवासाठी खास नेमलेल्या कारभार्‍यांचा माणूस, सूर्याजी पांगारे याने.” बळवंत म्हणाला.

हे सगळे ऐकल्यावर मात्र मुजुमदारांचा चेहरा जरा गंभीर झाला व कपाळावर एक हलकीशी आठी उमटलेली बळवंताला दिसली. विचार करून ते म्हणाले की “बळवंत कृष्णाजी! तुमच्याकडे आलेले कागद्पत्र नियमानुसार असले तर त्या खर्चाची जमाखर्चात नोंद करा. व कागदांचा रुमाल शक्य तितक्या त्वरित माझ्याकडे पाठवा.” पडत्या फळाची आज्ञा शिरोधार्य मानून बळ्वंत त्वरेने तेथून निघाला. मुजुमदार मात्र विचार करत राहिले. पुरंदर तालुक्यामधील एका छोट्या खेडेगावातील हा मुलगा बळवंत, अतिशय चाणाक्ष बुद्धीचा, तरतरीत आणि मोत्याच्या दाण्यासारखे अक्षर काढणारा म्हणून तेथील पाटलाने त्याला सरदारांकडे पाठवले. सरदारांनी चाचणी घेऊन त्याला पुण्याला पाठवण्याची शिफारस केली. वाड्यातल्या फडावर त्याला सहा रुपये महिना या पगारावर कारकून म्हणून घेतले गेले. दोन चारच महिन्यात त्याच्या कुशाग्र बुद्धीची कल्पना आल्याने त्याला हिशोब लिहिण्याच्या कामावर घ्यावे अशी शिफारस झाल्याने त्यांनी त्याला आपल्या विभागात ठेवून घेतले होते व त्याचा पगार वाढवून आठ रुपये केला होता. नंतरच्या काळात त्याने लिहिलेले हिशोब अचूक आणि परत तपासले नाहीत तरी चालण्यासारखे असतात हे मुजुमदारांच्या पक्के लक्षात आले होते. पण आज त्याने शोधून काढलेले प्रकरण मात्र जरा गंभीरच वाटत होते. एक प्रहरातच बळ्वंत सर्व कागदपत्रांचा रुमाल मुजुमदारांकडे घेऊन आला. त्याला मुजुमदार एवढेच म्हणाले की तुम्ही त्या इंदूरी साडीचा विचार डोक्यातून काढून टाका. तुमच्या पगारात काही इंदूरी साडी बसणार नाही. बळवंताचे मन आता खूपच शांत झाले असल्याने मुजुमदार आणि तो हे दोघेही यावर हसले.

बळवंताचे आयुष्य पूर्वीप्रमाणेच परत चालू झाले. साडेसात आण्याचे खण तिकडून आणल्याने त्याचे कुटुंबही समाधानी दिसत होते. एका पंधरवड्यानंतर रोजच्या प्रमाणे सकाळी तो वाड्याच्या खिडकी-दरवाजातून आत येऊन फडाकडे निघालेला असताना त्याच्या शेजारीच बसणारा अंतो महादेव त्याला भेटला. त्याला काहीतरी सांगायचे आहे हे त्याच्या चेहर्‍यावरून स्पष्ट दिसत होते. तो म्हणाला. “ बळवंता तुला कळले का? काल कोतवालीच्या दोन शिपायांनी आमच्या पलीकडे राहणार्‍या सूर्याजी पांगार्‍याला काढण्या लावून कोतवालीत नेलेले मी प्रत्यक्ष डोळ्याने बघितले.” बळवंताला काय झाले असावे याची कल्पना आली पण तो काहीच बोलला नाही.

पुढे काही दिवसांनी फडावर बातमी आली. सूर्याजी पांगार्‍याला शिक्षा झाली म्हणून! कोतवालीत त्याला बांधून फटके दिल्यावर तो पोपटासारखा बोलू लागला होता म्हणे! गणेशोत्सवाच्या खरेदीत मोठी अफरातफर झाली आहे म्हणे! हळूहळू सर्व माहिती बाहेर आली. खरेदी, बिदागी या प्रत्येक गोष्टीत खोट्या पावत्या बनवल्या गेल्या होत्या. गणेशोत्सवासाठी खास नेमलेले कारभारी आणि त्यांचा सेवकवर्ग सर्वांनी मिळून हा उद्योग केला होता. हिशेबतपासनिसांनी हा सर्व घोटाळा शोधून काढला होता. या घोटाळ्यात भाग घेणार्‍या प्रत्येकाला अफरातफर केलेली रक्कम व त्याच्या दहापट दंड एवढी रक्कम सरकारजमा करण्याची आणि प्रत्येकी दहा फटक्यांची शिक्षा झाली होती. गणेशोत्सवाच्या कारभार्‍यांना मात्र त्यांचे वय लक्षात घेऊन घरी बसवण्यात आले होते व फक्त वीस सहस्त्र रुपयाचा दंड करण्यात आला होता. सूरजमल आणि इतर व्यापारी यांनाही मोठ्या रकमा दंड म्हणून सरकारजमा करण्यास सांगितल्या गेल्या होत्या. ते न केल्यास कारभार्‍यांच्या व व्यापार्‍यांच्या मालमत्तेवर टांच आणून दंडाची रक्कम वसूल करण्याचेही दरबारी फर्मान निघाले होते. इतर सर्व कारकून या घडलेल्या प्रकारावर चर्चा करत असताना बळवंत मात्र शांतच होता. त्याच्या चेहर्‍यावर एक अस्फुट असे स्मित मात्र दिसत होते हे नक्की.

आणखी एका महिन्याभरात बळवंत कृष्णाजी या हिशेब लिहिणार्‍या कारकूनाची एकदम बदली झाली. त्याला हिशेब तपासनीसांच्या कचेरीत घेण्यात आले व त्याच्या पगारातही अचानक दोन रुपयाची घसघशीत वाढ करून तो महिना रुपये दहा एवढा करण्यात आला. हे सगळे का व कसे झाले? हे कोणालाच कधी कळले नाही. स्वत: बळ्वंत सुद्धा याबद्दल कधीच कोणाशी काही बोलला नाही.

(डिस्क्लेमर- ही कथा, यातील पात्रे व प्रसंग हे सर्व पूर्णपणे काल्पनिक आहेत. पेशव्यांचा गणेशोत्सव, त्याचा काल व त्यावरील खर्च या गोष्टी मात्र सत्यावर आधारित आहेत. ताहिरा हे गायिका आणि तिला दिलेली साडी हेही काल्पनिकच आहेत.)

2 जानेवारी 2016

 

 

Advertisements

About chandrashekhara

I am a retired electronics engineer. I am interested in writing, reading books. Other hobbies include Paper models, wooden fret work and social networking.

चर्चा

2 thoughts on “इंदूरी साडीचे प्रकरण

 1. really nice story….sant eknath maharajanchi aathawan ali katha vachatana…

  Posted by kishor | जानेवारी 12, 2016, 10:37 सकाळी
 2. Chandrashekhar Jee ,thank you for sharing this interesting story with me
  Regards.
  JKBHAGWAT

  Sent from my iPad

  >

  Posted by Jaywant Bhagwat | जानेवारी 12, 2016, 1:33 pm

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदला )

Connecting to %s

जुने लेख शोधा

Enter your email address to subscribe to this blog and receive notifications of new posts by email.

Join 387 other followers

MyFreeCopyright.com Registered & Protected

माझे नवीन इ-पुस्तक

एका साम्राज्याच्या शोधात

Advertisements
%d bloggers like this: