.
Fiction कथा

टाईम मशीन


पुण्यामधल्या सदर्न कमांड एच.क्यूला, एक दीड वर्षापूर्वी झालेल्या आपल्या पोस्टिंगवर, अ‍ॅलेक्स ( कर्नल अ‍ॅलेक्स किंग VSM) मोठा खुष होता याला दोन कारणे होती. एक कारण अर्थातच त्याच्या करियर संबंधाने होते. कर्नल या अधिकारी पदावर असलेल्या अ‍ॅलेक्सला निवृत्त होण्यासाठी अजून निदान पाच ते सहा वर्षे तरी बाकी होती व त्या आधी पुढचे प्रमोशन मिळण्याच्या दृष्टीने, एच. क्यूचे पोस्टिंग उपयुक्त ठरणार होते. परंतु अ‍ॅलेक्सला या कारणापेक्षा, अगदी निराळ्या स्वरूपाचे असलेले व गेली पाच सहा वर्षे तो जोपासत असलेल्या त्याच्या एका छंदाला मोठे पूरक ठरत असलेले दुसरे कारण, जास्त महत्त्वाचे व जिव्हाळ्याचे वाटत होते हे नक्की.

पाच सहा वर्षांपूर्वी उत्तर भारतातील रुरकी येथे अ‍ॅलेक्सचे पोस्टिंग झालेले असताना त्यावेळी त्याचा वरिष्ठ अधिकारी असलेल्या कर्नल भरुचाने त्याला या छंदाकडे प्रथम ओढले होते. शॉर्ट वेव्ह किंवा लघु लहरींचे रेडियो आणि प्रक्षेपक यांची स्वत:च जुळणी किंवा जोडणी करून त्यांच्या सहाय्याने जगभरातील इतर अशा छांदिष्ट मंडळींशी संपर्क साधायचा व त्यांच्याशी गप्पा मारायच्या, असे काहीसे या छंदाचे स्वरूप होते. हॅम या नावाने जगभर ओळखल्या जाणार्‍या या छांदिष्ट मंडळींना, या छंदासाठी लागणारे साहित्य मिळवण्याचा मुख्य मार्ग म्हणजे ज्या देशात ही मंडळी रहात असतील त्या देशातील सैनिक दलांनी कंडम किंवा त्याज्य करून लिलाव केलेली जुनी इलेक्ट्रॉनिक उपकरणे विकणारी भंगाराची दुकाने हाच असे. असा भंगारातील माल स्वस्तात खरेदी करायचा, आपल्या शॅकमधे जमा करायचा आणि या भंगारातून मिळालेले पार्ट्स वापरून आपले प्रक्षेपक संच किंवा गिअर यांची जुळणी कशी करता येईल हे बघायचे, हा उद्योग ही हॅम मंडळी सतत करत असत व अ‍ॅलेक्स सुद्धा याला अपवाद नव्हता.

अ‍ॅलेक्सला रहाण्यासाठी सैन्यदलाने दिलेला बंगला मोठा सोईचा होता. एच.क्यू. पासून हा बंगला फारसा लांब नसल्याने, त्याच्या दर्जाला शोभणारी सैन्याची गाडी त्याला ने आण करण्यासाठी उपलब्द्ध होऊ शकत असूनही तो कामाला बहुतेक वेळा सायकलनेच जात असे. त्याची पत्नी नॅन्सी हिला सुद्धा बंगला पसंत होता. तिला घरासाठी लागणार्‍या बहुतेक गोष्टी आसपासच उपलब्द्ध होत असल्याने फारशी यातायात करावी लागत नव्हती. लेडिज क्लब जवळच होता. मागच्याच वर्षी किंग दांपत्याचा एकुलता एक मुलगा मायकेल, हा इंग्लंडला स्थायिक होण्यासाठी गेला होता व त्यामुळे नॅन्सीला मधून मधून एवढा मोठा बंगला पण एक लॅब्रडॉर कुत्रा, एक मांजर आणि दोन माणसे या शिवाय घरात कोणीच नाही, याची खंत वाटल्यावाचून रहात नसे.

अ‍ॅलेक्सच्या घरातून निघून थोडे पुढे गेले की एक मोठा रस्ता लागत असे. या रस्त्याने सरळ पुढे जाऊन ऑफिसर्स क्लब, पूना क्लब हे सगळे ओलांडले की कॅन्टोंटमेंट्ची हद्द संपून, ससून हॉस्पिटल पासून शहराची हद्द सुरू होत असे. याच रस्त्याने पुढे गेले की नदीकाठी एक मोठी रिकामी बखळ दिसे. इतर दिवशी मोकळी दिसणारी ही जागा रविवार आणि बुधवार हे दोन दिवस गर्दीने नुसती फुलुन जात असे. हे दोन दिवस, येथे जुना बाजार या नावाने ओळखला जाणारा एक मोठा बाजार भरत असे. या ठिकाणी कपडे, बूट, गृहोपयोगी वस्तू, ट्रंका, बगैरे गोष्टी तर मिळत असतच पण या शिवाय हत्यारे आणि इलेक्ट्रॉनिक भंगार विकणारी बरीच दुकाने येथे असत. पुण्याजवळ आर्मी आणि विमानदल याचे मोठे तळ असल्याने तेथून कंडम केला गेलेला माल या ठिकाणी मोठ्या प्रमाणात उपलब्द्ध होत असे. दुसरे महायुद्ध संपल्यानंतर पुण्यातील या तळांवर अमेरिकन इलेक्ट्रॉनिक संच, प्रक्षेपक, रेडियो वगैरे सारखी उपकरणे ब्रिटिश आणि अमेरिकन सैन्यदले येथेच सोडून गेली होती. अशा उपकरणांचे भाग या जुन्या बाजारात खूप मोठ्या स्वरूपात उपलब्द्ध होत असत. हा जुना बाजार हेच अ‍ॅलेक्सच्या खुश असण्याचे दुसरे कारण होते. दर रविवारी न चुकता अ‍ॅलेक्स या जुन्या बाजारात चक्कर टाकत असे व त्याला उपयुक्त असे नवे काही बाजारात आले आहे का हे नेहमी बघत असे.

मायकेलचे इंग्लंडला जाणे, अ‍ॅलेक्स आणि नॅन्सी या दोघांनाही फारसे रुचले नव्हते. भारत स्वतंत्र झाल्याने आता खूप संधी निर्माण होणार आहेत असे अ‍ॅलेक्सला वाटत असे. त्याचप्रमाणे गोर्‍या लोकांच्या देशात आपण ब्राऊन रंगाचे असल्याने आपल्याला कमी दर्जाचीच वागणूक मिळणार अशी त्याची प्रामाणिक समजूत होती. मायकेलचे मत मात्र निराळे होते. आपली आणि गोर्‍या लोकांची संस्कृती, धर्म आणि एकंदर कल्पना यात साम्य असल्याने आपल्याला तेथे सामावून सहज जाता येईल असे त्याचे मत होते. अ‍ॅंग्लो इंडियन समाजातील अ‍ॅलेक्सच्या पिढीला ब्रिटिश अंमलात सैन्यदल, रेल्वे, पोस्ट या सारख्या खात्यात प्राधान्य मिळत असे आता स्वतंत्र भारतात ते मिळणार नाही त्यामुळे अ‍ॅंग्लो इंडियन समाजातील नव्या पिढीने इंग्लंडला स्थायिक होणेच जास्त फायदेशीर ठरेल असे त्याचे मत होते. या सगळ्या वादाला तसे म्हटले तर मायकेल इंग्लंडला गेल्याने आता काही फारसा अर्थ उरला नव्हता. अ‍ॅलेक्स रिटायर झाल्यावर आपण पण इंग्लंडला जावे असा विचार नॅन्सीच्या मनात अलीकडे डोकावत असे आणि तिने अ‍ॅलेक्सला तो एक दोनदा बोलूनही दाखवलेला होता.

या सगळ्या पुढच्या गोष्टी होत्या. सध्या मात्र आठवड्यातून एक दोन वेळा तरी न चुकता, अ‍ॅलेक्सच्या गिअर वरून मायकेलशी संभाषण करणे नॅन्सीला शक्य होत होते व त्यामुळे त्याच्या या जगावेगळ्या छंदाला तिचा पूर्ण पाठिंबाच होता. घरातील एका खोलीत, म्हणजे अ‍ॅलेक्सच्या शॅक मधे, साठलेल्या प्रचंड अडगळीकडे यामुळेच ती नेहमी दुर्लक्ष करत असे.

अशाच एका रविवारी, जुन्या बाजारात फिरत असताना, अ‍ॅलेक्सला एक निराळेच इलेक्ट्रॉनिक उपकरण एका भंगार विकणार्‍या दुकानात दिसले. दुसर्‍या महायुद्धाच्या अखेरच्या काळात विकसित झालेल्या पॉइंट टू पॉइंट रडार प्रणालीतील तो एक महत्त्वाचा भाग आहे हे त्याने लगेच ओळखले. मायक्रोवेव्ह जनरेटर या नावाने हे मोड्यूल ओळखले जात होते. या मोड्यूलमधे मायक्रोवेव्ह लहरी निर्माण करण्याचे प्रत्यक्ष कार्य क्लायस्ट्रॉन या नावाने ओळखला जाणारा एक भाग करत असे. क्लायस्ट्रॉन काढून घेऊन नंतर मग हे मॉड्यूल कंडम करणे अपेक्षित असले तरी समोर असलेल्या या मोड्यूलमधे अजून क्लायस्ट्रॉन तसाच बसवलेला आहे हे लक्षात आल्याबरोबर अ‍ॅलेक्सने दुकानदाराबरोबर सौदा पटवला व मायक्रोवेव्ह जनरेटर घेऊन तो घरी आला व शॅक मधील अडगळीत आणखी एका संचाची भर पडली.

थोड्या दिवसानंतर विचार करत असताना अ‍ॅलेक्सच्या मनात असे आले की हा मायक्रोवेव्ह जनरेटर जर आपल्याला आपल्या प्रक्षेपकाला जोडता आला तर शॉर्ट वेव्ह व्यतिरिक्त मायक्रोवेव्ह बॅन्डवरही आपल्याला प्रक्षेपण करणे साध्य होईल. अ‍ॅलेक्सचा एक मित्र, स्क्वॉड्रन ऑफिसर केळकर पुण्याच्या एअर फोर्स बेसवर सध्या होता. त्याला गाठून अ‍ॅलेक्सने या मायक्रोवेव्ह जनरेटर भाग असलेल्या रडार प्रणालीचे मॅन्युअल मिळवले व हा जनरेटर चालू करण्यासाठी आवश्यक असा पॉवर सप्लाय तयार करण्याचे कार्य हातात घेतले. वेळ होईल तसतसे हे काम करत असल्याने दोन तीन महिन्यानंतर हा पॉवर सप्लाय तयार झाला तसेच जनरेटर प्रक्षेपकाला जोडण्यासाठी आवश्यक असा इंटरफेसही त्याने तयार केला व आपल्या शॅकमधील टेबलावर ही सर्व जुळणी मांडून ठेवली.

जगातील यच्चावत हॅम संप्रदायाच्या प्रथेप्रमाणे अ‍ॅलेक्सच्या शॅकमधील टेबलही अर्थातच अनेक प्रकारच्या गिअरने भरगच्च भरलेले असायचे. त्यातच थोडी जागा करून त्यने ही जुळणी ठेवली. टेबलाच्या बाजूला असलेल्या लोखंडी शेल्फच्या फारच जवळ हा मायक्रोवेव्ह जनरेटर येतो आहे हे लक्षात आल्यावर अ‍ॅलेक्सने टेबलावर बाजूलाच असलेला ए.आर.ए जी.बी या हॅम मंडळींचे बायबल समजणार्‍या जाणार्‍या मासिकाचा अगदी जीर्णशीर्ण असा एक अंक उचलला आणि जनरेटर त्या बाजूला सरकवला. जनरेटर आणि लोखंडी शेल्फ याच्या मध्ये आता रिकाम्या झालेल्या फूट दीड फूट लांबीच्या जागेत तो जीर्णशीर्ण अंक अ‍ॅलेक्सने ठेवून दिला.

ही सगळी तयारी झाल्यावर देवाचे नाव घेत अ‍ॅलेक्सने पॉवर सप्लाय चालू केला. प्रक्षेपकावरचे दिवे ठीक लागले आहेत आणि त्यावर बसवलेले दोन मीटर व्यवस्थित आकडे दाखवत आहेत हे बघून त्याने पॉवर बंद केली. ती बंद करत असतानाच त्याचे लक्ष जनरेटर आणि लोखंडी शेल्फ यामधील मोकळ्या जागेकडे गेले व त्याला आश्चर्याचा एक प्रचंड मोठा धक्का बसला.. त्या जागेत त्याने आधी ठेवलेला ए.आर.ए जी.बी मासिकाचा जीर्णशीर्ण अंक आता अगदी नवीन म्हणजे आताच छापखान्यातून यावा तसा दिसू लागला होता. त्याने तो उचलून घेतला. त्या अंकाला अजूनही नुकत्याच छापलेला एखाद्या अंकाला यावा तसा शाईचा वास सुद्धा येत होता.

तेवढ्यात नॅन्सी शॅकमध्ये आली व त्याच्या हातातील अंक पाहून हे मासिक कधीपासून सबस्क्राईब करायला सुरूवात केलीस असे त्याला विचारत तिने हातातील चहाचा कप त्याच्या हातात दिला. अ‍ॅलेक्स अजून धक्क्यातून सावरलाच नव्हता. काहीच न बोलता त्याने चहाचा कप घेतला व चहा पिऊन रिकामा कप त्याने जनरेटर आणि शेल्फ यामधील मोकळ्या जागेत अनवधानाने ठेवून दिला व परत एकदा पॉवर सप्लाय चालू केला. पॉवर सप्लाय बंद केल्याबरोबर त्याला चहाचा कप दिसला. तो चहाने भरलेला दिसतो आहे हे बघितल्यावर त्याला आपल्याला भ्रम वगैरे झालेला नाही ना असे वाटून त्याने आपले बोट चहात बुडवून बघितले व त्या कपात उकळता चहाच आहे याची खात्री करून घेतली. चहा प्यायला असल्याचे त्याला चांगले आठवत होते. मग या कपमधे हा चहा कोठून आला? या प्रश्नाने आता त्याचे डोके चांगलेच गरगरायला लागले होते.

पुढचा तासभर अ‍ॅलेक्सने त्याच्या शॅकमधे असलेली मोडकी फांउटन पेने, फाटक्या वह्या, वायरींचे तुकडे हे त्या मधल्या जागेत ठेवून अनेक ट्रायल्स घेतल्या. दोनच दिवसांपूर्वी नॅन्सीने कॅन्टीन स्टोअर्स मधून हंटले- पामर कंपनीच्या, इंग्लंडमधे बनवलेल्या बिस्किटांचा एक डबा आणला होता. तो देतानाच तिथला जेसीओ तिला म्हणाला होता की “मॅडम हा शेवटचाच डबा आहे. यापुढे ही बिस्किटे मिळणार नाहीत. आर्मीने आता लोकल प्रॉडक्ट्सच कॅन्टीन स्टोअर्समधे विकायचे ठरवले आहे.”. त्या बिस्किटांचा रिकामा डबा अ‍ॅलेक्सने मोकळ्या जागेत ठेवून प्रक्षेपक चालू केला व एक मिनिटाने बंद केला. बिस्किटाच्या रिकाम्या डब्याचे रुपांतर आता भरलेल्या व सील केलेल्या बिस्किटांच्या डब्यात झाले होते. प्रत्येक ट्रायलच्या वेळेस, त्याचा प्रक्षेपक, तेथे ठेवलेल्या वस्तूला तिच्या भूतकाळातील स्वरूपाला नेऊन ठेवतो आहे हे बघितल्यावर, “कसे काय आणि कोण जाणे?,” आपण एक टाइम मशीन बनवले आहे हे त्याच्या लक्षात आले. मग शेवटी त्याने नॅन्सीला हाक मारली.

पुढचा आठवडा दोन आठवडे किंग दांपत्य त्यांच्या घरातील जुन्या सामानाला त्याचे पूर्व स्वरूप प्राप्त करण्याच्या कामात गढून गेले. नॅन्सीची टवके उडालेली इंग्लिश चायना क्रोकरी, कट ग्लासेस, तिचे जुने ड्रेसेस, पडदे, घड्याळे सर्व काही नवीन झाले. अ‍ॅलेक्सच्या वडीलांकडे एक जुने ओमेगा सीमास्टर घड्याळ होते. ते त्यांनी अ‍ॅलेक्सला तो दिले होते. ते आता मोडल्याने कचर्‍यातच पडले होते. ते सुद्धा चकचकीत नवे झाले.

असेच थोडे दिवस गेले. एक दिवस नॅन्सी जरा गंभीर वाटल्याने अ‍ॅलेक्सने तुला बरे वाटत नाही का डियर? म्हणून विचारल्यावर नॅन्सीने त्याच्याजवळ मन मोकळे केले. गेले काही दिवस त्यांनी नवीन करून घेतलेल्या वस्तू तिच्या बरोबरच्या मैत्रिणींच्या डोळ्यात आता खुपायला लागल्या होत्या. मिसेस किंग यांच्याकडे नवीन इंग्लिश क्रोकरी, कट ग्लासेस, कॅन्टीनमध्ये आता न मिळणारी हंटले-पामरची बिस्किटे आणि मुख्य म्हणजे नवीन नवीन ड्रेसेस, एकदम कोठून येऊ लागले आहेत याबाबत कुजबूज चालू झाल्याचे तिच्या लक्षात आले होते. मिस्टर किंग यांना उत्पन्नाचा काहीतरी नवीन मार्ग मिळाला आहे की काय? असेही काही लेडीजना वाटत होते. यावरून अ‍ॅलेक्सला दोन दिवसापूर्वी त्याच्या बॉसने एवढे महागाचे इंपोर्टेड घड्याळ त्याने कोठून आणले? असे सहजगत्या विचारल्याचे आणि यासाठी पैसे अ‍ॅलेक्सने पैसे कोठून आणले असावेत? हा त्याच्या चेहर्‍यावर उमटलेला प्रश्न हे दोन्ही आठवले आणि हे आपले टाइम मशीन आपल्याला गोत्यात आणू शकते ही जाणीव त्याला झाली. आता कोणतीही वस्तू नवीन करायची नाही असा निर्णय किंग दांपत्याने त्या दिवशीच घेऊन टाकला.

वस्तू नवीन करण्याचे बंद केलेले असले तरी टाइम मशीनवर काहीतरी प्रयोग करणे अ‍ॅलेक्सने चालूच ठेवले. पण नंतर घडलेल्या एका घटनेने मात्र तो खडबडून जागा झाला आणि आपण एका भरलेल्या बंदुकीशी खेळतो आहोत ही जाणीव त्याला झाली. ही घटना घडली तेंव्हा त्याने चहाचा रिकामा कप मोकळ्या जागेत ठेवून टाइम मशीन चालू केले होते. त्याचा कुत्रा जिमी तेवढ्यात भुंकायला लागल्याने तो दाराशी गेला होता. कामाला आलेल्या बाईला दार उघडून देऊन अ‍ॅलेक्स परत शॅकमधे आला होता तेंव्हा आपले टाइम मशीन अजून चालूच असल्याचे त्याच्या लक्षात आले होते. त्याने घाईघाईने पॉवर बंद केली आणि चहाचे आता काय झाले असेल म्हणून बघितले पण चहाची कपबशी आता मोकळ्या जागेत नव्हतीच. तिथे पडला होता पिवळट रंगाच्या मातीचा एक छोटासा ढिगारा. अ‍ॅलेक्सच्या टाइम मशीनने कपबशीचे रूपांतर भूतकाळातील मूळ स्वरूपात म्हणजे चिनी मातीत करून ठेवून दिले होते. टाइम मशीन जास्त वेळ चालू ठवले तर ती वस्तू नष्ट पावून तिचे रुपांतर माती किंवा कोणतेतरी खनिज यामध्ये होणार हे अ‍ॅलेक्सला स्पष्ट दिसत होते.

या घटनेनंतर चार दिवसांनी अ‍ॅलेक्सने टाइम मशीन परत चालू केले. खाली मान घालून काहीतरी तपासत असताना ल्युसी, त्याची मांजरी, त्या मधल्या जागेत कधी जाऊन बसली ते त्याला कळलेच नाही. त्याने मान वर करून बघितल्यावर मधल्या जागेत एक मांजराचे पिल्लू बसल्याचे त्याला दिसले. आपले मशीन निर्जीवच नाही तर सजीवांना सुद्धा भूतकालात नेते आहे हे बघून त्याच्या आश्चर्याला काही सीमाच उरली नाही व या गडबडीतच नॅन्सीला बोलवायला तो उठला. तो परत शॅकमधे येईपर्यंत फार उशीर झाला होता. आधी पिल्लू बनलेली ल्युसी मांजर आता या जगातूनच नाहीशी झाली होती; तिच्या जन्म होण्याच्या आधीच्या काळात ती गेली होती, परत कधीच न येण्यासाठी!

आपणच आपल्या लाडक्या मांजराला या जगातून नाहीसे केले आहे हे लक्षात आल्याने, डोके दोन्ही हातात घट्ट धरून अ‍ॅलेक्स स्वत:च्या खुर्चीत बसला. तो अत्यंत हताश वाटत होता. तेवढ्यात नॅन्सी शॅकमधे आली. काय घडले असावे हे तिच्या लगेच लक्षात आले. डोके सुन्न झालेल्या अ‍ॅलेक्सच्या पाठीवर हात ठेवून ती म्हणाली की ल्युसीला तू काही मारलेले नाहीस, जी जन्मलेलीच नाही तिला मृत्यू कसा येईल? अ‍ॅलेक्सच्या डोक्यात आता प्रचंड गोंधळ माजला होता. ल्युसी अस्तित्वात आता तर नाही पण ती मेलेली नाही कारण ती जन्मलेलीच नाही. मग काल आपल्या मांडीवर बसून जी गुरगुरत होती, ती कोण होती? का तो फक्त आभास होता? जन्म, मृत्यू, खरेच असतात का तेही आभासच? आपण, नॅन्सी, मायकेल हे तरी खरे आहोत का आभासच?

अ‍ॅलेक्स शेवटी उठला व त्याने आपल्या टाईम मशीनचे तिन्ही भाग, मायक्रोवेव्ह जनरेटर, पॉवर सप्लाय आणि इंटरफेस, आधी होते तसे परत एकदा एकमेकापासून सुटे केले व सुटे केलेले हे सगळे भाग त्याने समोरच्या जंकच्या ढिगार्‍यात टाकून दिले. मशीन गेले असले तरी आपल्या डोक्यातले प्रश्न अनुत्तरितच राहिले आहेत आणि आपण आहोत तोपर्यंत ते तसेच राहणार आहेत हे अ‍ॅलेक्सला जाणवत राहिले.

28 डिसेंबर 2015

(डिसक्लेमर- या कथेतील सर्व पात्रे आणि प्रसंग काल्पनिक आहेत. क्लायस्ट्रॉन वापरून टाइम मशीन बनवता येत नाही  कोणी बनवलेलेही नाही. )

 

Advertisements

About chandrashekhara

I am a retired electronics engineer. I am interested in writing, reading books. Other hobbies include Paper models, wooden fret work and social networking.

चर्चा

2 thoughts on “टाईम मशीन

  1. खुप सुंदर कथा..अशीच एक इंग्रजी कांदबरी वाचनात आली..ती पण खुप सुंदर आहे..नाव आता विसरलो..

    Posted by किशोर आडभाई | जानेवारी 5, 2016, 3:59 pm
  2. भन्नाट कल्पना, सुंदर कथा. पण शेवट काहीतरी वेगळा करायला हवा होता. anyway nice story. keep writing.

    Posted by KUMAR | जानेवारी 17, 2016, 7:02 pm

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s

जुने लेख शोधा

Enter your email address to subscribe to this blog and receive notifications of new posts by email.

Join 386 other followers

MyFreeCopyright.com Registered & Protected

माझे नवीन इ-पुस्तक

एका साम्राज्याच्या शोधात

Advertisements
%d bloggers like this: