.
Uncategorized

वाटणी


“आत्ते! मी आलुया नव्हे! पानी लावाया येताव ना! “ भागू गड्याची हाक कानावर आली तशा वेणूआत्या भानावर आल्यासारख्या झाल्या. सूर्य इतका वर आला आहे आणि आपण अजून येथेच काय बसून राहिलो आहे असे त्यांना क्षणभर वाटून गेले पण दुसर्‍याच क्षणाला या सगळ्या गोष्टींचा उपयोग तरी आता काय आहे? या भावनेने, गेल्या पंधरवड्यापासून मनात साचत आलेल्या रुखरुखीने परत जोर धरला व त्या माजघराच्या उंबर्‍यावर तशाच बसून राहिल्या. कपाळावरचे कुंकू पुसले गेल्यानंतर या घरात त्या आल्या होत्या त्याला आता पाच तपाहून जास्त काळ लोटून गेला होता. पण एवढ्या या वर्षात वेणूआत्या दिवसा उजेडी बसून राहिल्या आहेत असे दृष्य या घराने कधी पाहिलेच नव्हते. प्रथम आईला मदत म्हणून व नंतर नर्मदा वहिनीला आपला भार वाटू नये म्हणून आणि आता केवळ सवय म्हणून, घरातली सर्व कष्टाची कामे करण्याचा त्यांनी जो विडा उचलला होता त्यात आजतागत कधीच खंड पडला नव्हता. प्रथम प्रथम तर रोज सकाळी रहाटावर बसून रहाटगाडगे फिरवायचे व परसातल्या नारळीपोफळी, भाज्यांचे वाफे आणि प्रत्येक अन प्रत्येक फुलझाडाला पाणी व्यवस्थित पोचले आहे हे बघून मगच रहाटावरून खाली उतरायचे असा नियमच त्यांनी स्वत:ला लावून घेतला होता. पण आता शरीर पूर्वीसारखे काम देत नाही हे लक्षात आल्यावर रहाट चालवण्याचे काम भागू गडी करत असला तरी पाण्याचा पाट कधी व कोठे सोडायचा? कधी अडवायचा हे काम मात्र अजूनही त्याच करत होत्या, त्या साठी पन्नास वेळा कंबरेतून खाली वाकत होत्या.

पंधरा दिवसांपूर्वी तालुक्याच्या कोर्टावरून वामन, त्यांचा सर्वात धाकटा भाचा, परत आल्याबरोबरचा त्याचा चिमणीएवढा चेहरा बघून वेणू आत्यांच्या काळजात धस्स झाले होते आणि मग त्याने आणलेल्या बातमीने तर वेणूआत्यांच्या पायाखालची जमीनच सरकली होती. त्या धीराच्या म्हणूनच केवळ कशाबशा तग धरून उभ्या होत्या. मागच्या आठवड्यात मुलांपुढे तमाशा नको म्हणून वामन, बायको आणि मुलांना तिच्या माहेरी पोचवून आला व त्यामुळे सध्या त्या आणि वामन एवढे दोघेच घरात असल्याने स्वैपाकपाण्याचे फारसे काही कामही एकतर घरात नव्हते आणि ठेवणीतले कोणते काम काढण्याची उमखाही त्यांना वाटत नव्हती. वेणूआत्यांची आई त्यांना नेहमी सांगत असे की “ वेणू! बाईग! कोणाच्या रूपाने घरात कली शिरेल हे ते सांगता येत नाही कधी.” त्याचेच प्रत्यंतर त्यांना आता येत होते. त्यांचा सर्वात मोठा भाचा माधव असे काही करेल आणि सगळे चांगले चाललेले असताना दुधात मिठाचा खडा टाकावा तशी सर्वांची आयुष्ये नासवून टाकेल हे त्यांच्या ध्यानीमनी सुद्धा कधी आले नसते. पण दुर्दैवाने तशीच सत्य परिस्थिती होती.

पहिल्यांदा चंद्रमोळी असलेले हे घर आणि घरालगत असलेली पाच एकराची शेती हे सर्व वेणूआत्यांच्या आजोबांनी स्वकष्टाने मिळवलेले वैभव होते. त्यांच्या वडीलांना त्यात भर घालता आली नसली तरी आहे ते त्यांनी टिकवले होते. वेणू आत्यांच्या आईला त्या वेळच्या रुढीप्रमाणे आठ दहा तरी मुले झाली असावीत पण त्यातली जगली मात्र दोनच होती. वेणू आणि अप्पा!. वेणूचे आयुष्य, वैधव्य आल्याने करपूनच गेले होते पण अप्पा मात्र मोठा कर्तबगार निघाला होता. वकिलीचे शिक्षण त्याने मुंबईला जाऊन घेतले होते व मग तालुक्याच्या कोर्टात एक प्रथितयश वकील म्हणून त्याने मोठा जम बसवला होता. पक्षकारांची त्याच्याकडे रीघ असायची. त्याने हे चंद्रमोळी घर पाडून त्या जागी जांभा दगडातले दुमजली घर बांधले होते. समोर अंगण, त्या मागे मोठा वर्‍हांडा व त्याच्या मागे माजघर होते. माजघराच्या उजवीकडे स्वैपाकघर, कोठी आणि डावीकडे बाळंतिणीची खोली होती. माजघर आणि व्हरांडा मिळून वरचा मजला होता. तेथे अप्पाची कचेरी आणि आणखी दोन खण होते. मागे मोठे परस आणि त्यामागे शेतजमीन असा सर्व खटला होता. विहिरीवर रहाटगाडगे बसवण्याची कल्पना अप्पाचीच होती. सायकलचे पेडल मारावे तसे पेडल मारत हे रहाट्गाडगे फिरवता येत होते. लहानगा माधव अंगणात तुफान धावत सुटे, कोणाला अड्वता येत नसे म्हणूम अंगणात गुराढोरांनी येऊ नये म्हणून लावलेला लाकडी खांबाचा अडसर काढून टाकून तेथे लोखंडी फाटक बसवण्याची कल्पना सुद्धा अप्पाचीच होती. अप्पाच्या काळात शेतावर सुद्धा पाच दहा गडी काम करत असत. घरी कामाला दोन चार माणसे होती पण अप्पाला गडीमाणसांनी केलेला स्वैपाक कधी आवडला नाही. त्यामुळे प्रथम नर्मदा वहिनी आणि वेणू आत्या व नंतर तिसर्‍या बाळंतपणात नर्मदा वहिनी अचानक गेल्यावर. अप्पाने दुसरे लग्न करून आणलेल्या प्रियंवदा वहिनी आणि वेणूआत्या ह्याच नेहमी स्वैपाक करत आणि पंगती वाढत.

प्रियंवदा वहिनींना सहा मुले झाली त्यातले वरचे दोघे शिकल्यानंतर पुण्यामुंबईला निघून गेले. बहिणी लग्न झाल्यावर आपापल्या सासरी गेल्या. तिसर्‍या नंबरचा पुरुषोत्तम मात्र मोठा कर्तबगार निघाला. तो मोठा सरकारी अधिकारी झाला. अप्पा किंवा आई यांच्या विरोधाला न जुमानता त्याने एका पंजाबी मुलीशी लग्न केले व आता तो दिल्लीला असतो म्हणे! सर्वात धाकटा वामन, शिक्षणात काय किंवा व्यवहारात काय, जरा यथा तथाच निघाल्याने, तोच काय तो येथे गावी टिकला.

अप्पाने दुसरे लग्न केल्यावर कोणालाही, अगदी प्रियंवंदालाही न जुमानता, आपल्याला पहिल्या लग्नापासून झालेल्या मुलांना म्हणजे माधव आणि चिमी यांना, चक्क त्यांच्या आजोळी धाडून दिले. त्यांची शिक्षणे, चिमीचे लग्न या सगळ्यासाठी अप्पाने खर्चाला कधीच मागे पुढे पाहिले नाही. माधव आपल्या वडिलांसारखाच कर्तबगार निघाला. बडा वकील होऊन जिल्ह्याच्या गावी वकिली करू लागला. अप्पाने त्याला तेथे मोठे घर घेऊन दिले. त्याचे काही कमी केले नाही. पण एवढे मात्र खरे की अप्पाने माधवला आपल्या वडिलोपार्जित घरी कधी येऊ दिले नाही किंवा सावत्र भावंडांशी त्याचे सख्य होऊ दिले नाही. पण मौजेची गोष्ट म्हणजे अप्पाची मुले जसजशी घर सोडून बाहेर पडली तसे त्यांचे अप्पाच्या अपरोक्ष आपल्या सावत्र भाऊ-बहिणीशी सख्य वाढत गेले. पत्र-व्यवहार करू लागली. कधी जिल्ह्याला गेली तर बिनधास्त माधवकडे उतरू लागली.

 

चार वर्षांपूर्वी प्रियंवंदा वहिनी गेली आणि दोन वर्षांपूर्वी अप्पा! एवढ्या मोठ्या घरात आता उरले वामन, त्याची बायको, दोन मुले आणि वेणूआत्या. ही मुले मात्र अगदी गोड आहेत म्हणा‍! मोठा तर अगदी लहानपणच्या माधव सारखा दिसतो! हा विचार मनात आल्यावर वेणू आत्या स्वत:वरच रागावल्या. परत माधव! अप्पाच्या श्राद्धाला मात्र झाडून सर्वजण जमले अगदी पुरुषोत्तमच्या पंजाबी बायको आणि मुलांसकट. अर्थात माधव आणि चिमी नव्हते म्हणा! चार दिवस घर नुसते दणाणत राहिले. जातांना सर्वांनी मिळून एक बक्षीसपत्र केले व वडिलोपार्जित घर आणि शेती यावरचा आपला हक्क सोडून देऊन सर्व वामनच्या नावावर करून टाकले. या बक्षीसपत्रात एकच अट नमूद केलेली होती. ती म्हणजे वामनने वेणूआत्याचा तिच्या हयातीत संपूर्ण सांभाळ करायचा होता. या उपर प्रत्येकाने जाताना मुलांसाठी म्हणून सांगत दोन पाच हजार रुपये वामनच्या हातात ठेवले ते वेगळेच. पुरुषोत्तमने तर कमालच केली होती. दहा हजार रुपये खुशाल वामनच्या हातात ठेवून तो निघाला होता. वासंती, म्हणजे वामनची बायको! तिने प्रत्येकाच्या हातात शेतावरचे तांदूळ, आटवलेला आंब्याचा रस, आंबा आणि फणस पोळी यांची पिशवीच खाऊ म्हणून ठेवली होती. अप्पा आणि आई यांची आठवण जागवत सगळे सुखासमाधानाने आपल्या आपल्या घरी गेले होते.

या बक्षीसपत्राची हकिगत कोणाकडून तरी माधवच्या कानावर पडली आणि त्याच्या मनात कली शिरला. त्याने कसलाही विचार न करता हे बक्षीसपत्र विचारात घेऊन आपल्याला आपल्या वडिलोपार्जित इस्टेटीमधील निम्मा हिस्सा मिळावा म्हणून तालुक्याच्या कोर्टात दावा दाखल केला. वामनने वकील वगैरे दिला खरा, पण माधवपुढे त्याचा निभाव लागणे शक्यच नव्हते. पंधरा दिवसापूर्वी दाव्याचा निकाल लागला होता व कोर्टाने राहते घर, अंगण आणि परस हे माधवला व बाकी भावंडांनी बक्षीसपत्र आधीच केलेले असल्याने शेतजमीन वामनला अशी वाटणी केली. आपण वरच्या कोर्टात जाउया असे वकील म्हणत असले तरी खर्चाचा आकडा ऐकल्यावर वामनपुढे तो पर्याय उरलाच नाही. कोर्टातच माधवने वामनला मी आठपंधरा दिवसात वेळ मिळाला की घरी येऊन जाईन असे सांगून टाकले.

हे रामायण घडले आणि वेणूआत्या अक्षरश: सैरभैर झाल्या. आता या वयात घर सोडून दुसरीकडे जाण्याची कल्पना सुद्धा त्यांना सहन झाली नसती पण आता तर हे प्रत्यक्षात करायचे होते. गावात कोठे दोन खणांची जागा मिळते का? या प्रयत्नातच वामन होता व आज सकाळीच उठून त्या कामासाठी बाहेर गेला होता. वेणू आत्या मात्र सुन्नपणे माजघरात बसून होत्या.अंगणाचे फाटक वाजण्याचा आवाज ऐकल्यावर, वामन आला असेल! त्याच्यासाठी भात टाकला पाहिजे असा विचार करत वेणू आत्या उठल्या आणि वर्‍हांड्यात आल्या. पण समोरची व्यक्ती वामन नव्हतीच. समोर माधव उभा होता. वेणू आत्यांच्या मनातली चीड कपाळात गेली व तिथली शीर ताडताड उडू लागली. स्वत:ला सांभाळत “कोण माधव का? ये!” एवढेच त्या म्हणल्या व माजघरात शिरल्या. माधव इकडे तिकडे बारकाईने बघत होता. “स्वत:चे घर झाले आहे ना, म्हणून बघतो आहे मेला!” वेणूआत्यांच्या मनात विचार आला. त्यांच्या मनातल्या वादळाची बहुधा माधवला कल्पनाच नव्हती किंवा तो सोइस्करपणे त्याकडे दुर्लक्ष करत होता. माधवने पायातल्या वहाणा अंगणात काढून ठेवल्या व हुश्य! हुश्य! करत तो घरात शिरला. समोरच्या झोपाळ्यावर त्याने ठाण मांडले. अंगातला कोट त्याने झोपाळ्याच्या दांडीला अडकवला, जवळची कागदपत्रांची बॅग खाली ठेवली व डोक्यावरची काळी टोपी हातात घेऊन त्याने तो वारा घेऊ लागला. कोटाच्या खिशातला रुमाल काढून त्याने टाळूवरचा घाम पुसला व झोका घेऊ लागला. “ “शिंचे काय उकडते आहे नाही?” माधव म्हणला पण वेणू आत्यांचे तिकडे लक्षच नव्हते.

“काय आत्ते! बरी आहेस ना?” माधव म्हणला. वेणू आत्यांना मनातून काही करायचे नसूनही एखाद्या यंत्राप्रमाणे त्यांनी पाण्याचा तांब्या माधव समोर ठेवला व बरी आहे असे उत्तर दिले. पाण्याचे घोट घेत घेत माधव घराचे निरिक्षण करू लागला. माधवकडे बघता बघता वेणू आत्यांना आठवण झाली की लहान असताना त्याला सकाळी गुरुगुट्या भात भरवायचे काम त्यांच्याकडे होते. लहानगा माधव अंगणात धावत सुटायचा आणि वाटी-चमचा घेऊन वेणू आत्या त्याच्यामागे! जावळ खूप असल्याने त्याचे केस भुरभुर उडायचे. “आता त्याच माधवला टक्कल पड्ते आहे की काय?” त्यांच्या मनात आले. “आत्या सकाळपासून खायला काही वेळच झाला नाही. आहे का काही घरात?” माधवने विचारले. “इथे घराचा ताबा घ्यायला आला आहे आणि माझ्याकडे खायला मागतो आहे मेला!” वेणू आत्यांच्या मनात आले, पण त्या उठल्या. सकाळीच त्यांनी चिंचेचा कोळ काढून कोळाचे पोहे वामनसाठी केले होते त्यातले थोडे उरले होते. ते एका वाटीत घालून त्यांनी माधवला दिले. माधव भुरके मारत पोहे खाउ लागला आणि अचानक आठवण झाल्यासारखे त्याने “वामन दिसत नाहिये? कोठे गेला आता?” अशी विचारणा केली.

“खालच्या आळीत गेला आहे, येईलच एवढ्यात!” वेणू आत्या म्हणाल्या. मनगटावरच्या घड्याळात बघत माधव म्हणाला,”म्हणजे थोडा उशीर होणार आता. ठीक आहे. मग मी येथेच जेवीन! माझ्यासाठी भात टाक. आंब्याचे लोणचे आहे ना?” हसावे की रडावे तेच वेणू आत्यांना कळेना. त्या उठल्या आणि स्वैपाकघरात गेल्या. माधवशी बोलण्याची सुद्धा त्यांची इच्छा नव्हती. माधव बाहेर शांतपणे झोके घेत राहिला.असाच थोडा वेळ गेला आणि परत अंगणातील फाटक वाजले. आता मात्र वामनच आला होता. तो आल्याबरोबर त्याने माधवला आलेले बघितले आणि त्याचा नेहमीचा रडका दिसणारा चेहरा आणखीनच केविलवाणा दिसू लागला. त्याच्या मनातले विचार सुद्धा माधवच्या गावी बहुधा नव्हते. “बस ना!” त्याने वामनला समोर खुर्चीवर बसायला सांगितले आणि आपल्या कागदपत्रांच्या बॅगेतून एक मोठा पांढरा लखोटा बाहेर काढला आणि वामनच्या हातात दिला. एव्हांना वेणू आत्या माजघरात आल्या होत्या व वामनकडे बारकाईने बघत होत्या. वामनने आतील कागद बाहेर काढले. वरचा कागद सरकारी स्टॅंप पेपर होता हे स्पष्टपणे वेणूआत्यांनाही दिसत होते.

बापुडवाणा झालेला वामन ते कागद वाचत गेला. वेणू आत्या त्याच्याकडे बघत राहिल्या. त्याच्या दीनवाण्या चेहर्‍यावर प्रथम आश्चर्य व नंतर आनंद त्यांना दिसू लागला आणि त्यांना काही कळेनासेच झाले. वाचून झाल्यावर वामनने कागद खाली ठेवले व तो चक्क रडू लागला. दोन मिनिटे गेल्यावर त्याने स्वत:ला सांभाळले. “ दादा! हे काय आहे सगळे? प्रथम दावा, मग निकाल आणि आता हे?”

माधव त्याच्याकडेच बघत होता. तो म्हणाला “ वेडा आहेस का तू? अरे तुझ्या डोक्यावरचे छप्पर काढून घेऊन तुला, वहिनीला आणि वेणूआत्याला मी बेघर करीन असे वाटले तरी कसे तुला? माझे तुझ्याशी भांडण नव्हतेच. माझे भांडण होते अप्पांशी! माझा या घरावरचा हक्क त्यांनी डावलला होता या साठी! म्हणून तर मी कोर्टात गेलो आणि माझा हक्क प्रस्थापित करून घेतला. अरे! अप्पांनी मला जिल्ह्याच्या गावी एवढे मोठे घर घेण्यासाठी मदत केली होती ती मी विसरेन का? माझे सर्व चांगले चाललेले आहे. मला इथले काही सुद्धा नको आहे म्हणून तर कोर्टाने वाटणी करून माझ्या वाट्याला आलेल्या घराचे, तुझ्यासाठी केलेले हे बक्षिसपत्र मी आणले आहे. सुखाने आणि निर्धोकपणे संसार कर”

वामनला काय वाटले कोणास ठाऊक पण तो उठला आणि आपल्या भावाच्या पाया पडला. त्याच्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा लागल्या होत्या आणि वेणूआत्यांच्या अंगात त्यांच्या वयाला न शोभणारा असा एक उत्साह सळसळू पाहत होता. डोळ्यांत उभ्या असलेल्या अश्रूंमध्ये त्यांना आता फक्त एकच चित्र दिसत होते. डोक्यावरचे जावळ भुरुभुरु उडत असलेला आणि अंगणात पळणारा माधव आणि त्याच्यामागे वाटीचमचा हातात घेऊन लागलेल्या वेणूआत्या.

 

24 डिसेंबर 2015

(डिस्क्लेमर- ही कथा, त्यातील पात्रे, जागा व प्रसंग हे सर्व काल्पनिक आहेत.)

 

 

Advertisements

About chandrashekhara

I am a retired electronics engineer. I am interested in writing, reading books. Other hobbies include Paper models, wooden fret work and social networking.

चर्चा

4 thoughts on “वाटणी

 1. तुमच्या सर्व कथा छान जमल्या आहेत.

  Posted by arunaerande | डिसेंबर 30, 2015, 1:39 pm
 2. Very nice plot and style .
  Characters , mainly two are wonderfully created. Thanks for sharing it
  JKBhagwat

  Sent from my iPad

  >

  Posted by Jaywant Bhagwat | डिसेंबर 30, 2015, 2:37 pm
 3. खर तर शब्द नाही भावना व्यक्त करायला पण एकच अप्रतिम कथा। .

  Posted by kishor | जानेवारी 12, 2016, 10:55 सकाळी
 4. अप्रतिम.. खूपच सुंदर!!

  Posted by माझे स्पंदन | सप्टेंबर 4, 2016, 11:04 सकाळी

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s

जुने लेख शोधा

Enter your email address to subscribe to this blog and receive notifications of new posts by email.

Join 386 other followers

MyFreeCopyright.com Registered & Protected

माझे नवीन इ-पुस्तक

एका साम्राज्याच्या शोधात

Advertisements
%d bloggers like this: