.
Uncategorized

सुसमिरचे नाणे


केतकरांचे आज काहीतरी बिघडले आहे हे सकाळपासूनच हेडक्लार्क असलेल्या साळवींना जाणवत होते. रोज अकराच्या ठोक्याला मान खाली घालून आपले काम सुरू करणार्‍या या माणसाचे आज कामात लक्षच नव्हते. मधूनच ते खिडकीतून बाहेर तंद्री लागल्यासारखे बाहेर बघत होते तर मधूनच खिशात हात घालून कशाची तरी सारखी चाचपणी करताना दिसत होते. बरे! त्यांना काही म्हणायला जाणेही ही ठीक दिसले नसते कारण साळवींच्या अख्या डिपार्टमेंटमध्ये केतकरांसारखा सरळ आणि कामात कधीही चुकारपणा न करणारा कनिष्ठ लिपिक दुसरा कोणी नव्हता. साळवींची खरी भीती ही होती की केतकरांचे आज कामात लक्ष नाहीये ही बाब जर जॉन्सन साहेबाच्या लक्षात आली असती तर केतकर आणि स्वत: ते यांची काही खैर नव्हती. अख्या जी.पी.ओ मधे पोस्ट मास्टर जनरल या हुद्द्यावर असलेला जॉन्सन साहेब एक नंबरचा खडूस म्हणून प्रसिद्ध होता आणि तो आज आपल्या डिपार्टमेंट मधे येणार नाही एवढीच आशा साळवींना होती. लंच टाइम झाल्यावर, आज केतकर उठून त्यांच्या नेहमीच्या बोरीबंदर स्टेशन जवळच्या बोरकरांच्या खानावळीत सुद्धा न जाता आपल्या जागेवरच बसून आहेत हे पाहिल्यावर मात्र साळवींना राहवेना, ते स्वत: उठून केतकरांच्या खुर्चीपाशी गेले व शेजारच्या टेबलाजवळची रिकामी खुर्ची ओढून त्यावर बसले व केतकरांशी हलक्या आवाजात बोलू लागले. प्रथम केतकर काही बोलेनात पण शेवटी त्यांनी आपल्या खिशातून एक पोस्टकार्ड काढले व साळवींच्या हातात दिले.

त्या पोस्ट कार्डावर असलेला मजकूर, इतक्या गिचमिड आणि पुसट अक्षरात होता की प्रथम तर साळवींना वाचताच येईना! शेवटी रटफ करीत साळवींनी तो वाचला. त्या मजकूराचा मतितार्थ एवढाच होता की कोणा गेनू लव्हाळे नावाच्या माणसाने केतकरांना एकदम अर्जंट कामासाठी गावी येण्याचा सांगावा घातलेला होता. या मजकूरात केतकरांचे एवढे बिघड्ण्यासारखे काय होते? हे साळवींना कळेना. शेवटी बरेच प्रश्न विचारल्यावर केतकरांकडून काय ती माहिती साळवींना मिळाली. उरण तालुक्यातल्या आटपाडे गावात असलेली केतकरांची बरीच वडिलोपार्जित शेतजमीन या गेनू लव्हाळेला कुळाने दिलेली होती व वर्षातून एकदा खंड घालायला हा गेनू त्यांच्या घरी येत असे व तेंव्हा थोडाफार भात आणि फणस वगैरे आणून टाकत असे या शिवाय केतकरांचा त्याच्याशी कधी काही संबंधही नव्हता किंवा अगदी लहान असताना ते वडिलांबरोबर एक दोनदा गावी गेले होते ते सोडले तर ते आपल्या गावीही नंतर परत कधी गेले नव्हते. आता याच गेनूने कसल्या अर्जंट कामासाठी आपल्याला आटपाड्याला बोलावले आहे हे केतकरांना कळत नव्हते व हेच त्यांच्या काळजीचे खरे कारण होते. साळवींनी मग लगेच केतकरांची समजूत घातली आणि पुढच्या आठवड्यात दोन दिवसाची सुट्टी घेऊन गावी जाऊन येण्यास सांगितले. केतकरांनी एवढ्या वर्षांच्या सर्व्हिसमधे सुट्टी अशी कधी घेतलीच नसल्याने त्यांना सुट्टी घेणे हे सुद्धा खरे तर अवघड वाटत होते.

ठाकूरद्वारच्या बिडकर चाळीत दोन खोल्यांच्या जागेत राहणारे केतकर तसे सडेफटिंगच होते. आई-वडील गेल्यापासून ते एकटेच रहात होते. लग्नाचा वगैरे विचार त्यांनी कधी केलाच नव्हता. रोज उठायचे व पोस्टातल्या आपल्या जॉबवर जी.पी.ओ. मधे वेळेवर हजर व्हायचे. दुपारचे जेवण बोरकरांच्या खानावळीत तर संध्याकाळ्चे जेवण गिरगावातल्या वीरकरांच्या खानावळीत होत होते. भटाचा चहा ऑफिसमध्ये टेबलापाशी येत असे. नाही म्हणायला रविवारी किंवा सुट्टीच्या दिवशी पलीकडच्या चाळीत राहणार्‍या सोनटक्क्यांबरोबर चौपाटीच्या वाळूत गप्पा मारत संध्याकाळ घालवायची व खानावळीला रवीवारी खाडा असल्याने एखाद्या भैय्याकडची भेळ खायची एवढाच काय तो चेंज त्यांच्या आयुष्यात होता. गेनू लव्हाळे वर्षातून एकदा भात किंवा कोकणचा मेवा आणून देत असे तो ते चाळीत वाटून टाकत त्यामुळे चाळीतील स्त्री वर्गात ते एक निरुपद्रवी आणि सालस व्यक्ती म्हणून ओळखले जात होते. या अशा आयुष्यात गेनूच्या पोस्ट कार्डमुळे एक वादळ निर्माण होणे तसे स्वाभाविकच होते.

 

साळवींच्या बोलण्यांने केतकरांना जरा धीर आला व पुढच्याच आठवड्यात एक दोन कपडे पिशवीत टाकून ते भाऊच्या धक्क्यावर पोचले. रत्नगिरीला जाणार्‍या स्टीमबोटचे डेक क्लासचे तिकिट त्यांनी काढले व बोटीवर आपली पथारी पसरून ते स्वस्थ बसून राहिले. बोट वेळेवर सुटली आणि उरण तसे जवळच असल्याने रात्रीच्या सुमारास उरणजवळ बोटीने नांगर टाकल्यावर पडावावर चढून ते उरण जेट्टीवर केंव्हाच पोचले. बैलगाडी करून आटपाडीला जेंव्हा ते पोचले तेंव्हा मध्यरात्र उलटून गेली होती. आता या वेळी कोणाला त्रास द्यायचा? या विचाराने गावाबाहेरच्या मारुतीच्या देवळात त्यांनी आपली पथारी टाकली व ते गाढ झोपी गेले.

सकाळी फटफटीत उजाडल्यावर लहानपणच्या थोड्याफार आठवणी व चार जणांपाशी चौकशी, यांच्या जोरावर त्यांनी गेनूची झोपडी तर शोधून काढली. गेनू झोपडीत नव्हता पण त्याच्या बायकोने पोराबरोबर त्याला सांगावा घातला व केतकरांसमोर गुळाचा खडा आणि पाण्याचे भांडे ठेवले. अर्ध्या पाउण तासात गेनू आला आणि आल्या आल्या त्याने केतकरांचे पायच धरले आणि आपल्याला माफ करण्याची तो विनंती करू लागला. केतकरांना काय चालले आहे हे काही कळेनाच! त्यांना खूपच ओशाळल्यासारखे झाले हे मात्र खरे. त्यांनी गेनूला काय झाले आहे हे तर सांग असे चार पाच वेळा म्हणल्यानंतर त्याला जरा धीर आला व सर्व हकिगत त्यांने केतकरांच्या कानावर घातली.

केतकरांच्या शेतजमिनीच्या एका कोपर्‍यात आंब्याचे एक जुने झाड शंभर वर्षे तरी उभे असावे. या झाडाच्या बुंध्यापाशी बर्‍याच वर्षापूर्वी कोणीतरी एका दगडाला शेंदूर फासून त्याला देव बनवले होते. जाणारे येणारे तेथे एखादे फूल आणि पै दोन पै टाकत व ते गेनूला मिळत असत. या दगडाजवळच्या दहा एक फुटाच्या परिघातली जमीन कधीच नांगरली जात नसे. महिना दोन महिन्यापूर्वी गेनूच्या मनात काय आले कोणास ठाऊक त्याने या जमिनीपैकी पाच एक फुटाचा पट्टा तेवढेच जास्त भात लावता येईल या कल्पनेने नांगरायला सुरूवात केली होती. दोन तीन फुट झाडाजवळ गेल्ल्यानंतर त्याचा नांगर कशाला तरी अडकल्यासारखा झाला म्हणून त्याने तेथे जरा खणून बघितल्यावर त्याला एक चिखलात रुतलेली धातूची पेटी तेथे मिळाली होती. रात्र पडल्यावर बायकोच्या मदतीने त्याने ही पेटी घरात आणली होती व कंदिलाच्या मिणमिणत्या उजेडात ती साफ करून उघडण्याचा गुन्हा केला होता. त्या पेटीत त्याच्या अपेक्षेप्रमाणे सोने वगैरे काही मिळालेच नव्हते फक्त ढब्बू पैसे किंवा भोकाचे पैसे, पै या सारखा थोडफार खुर्दा फक्त होता.

ग़ेनूच्या मताने, खरा लफडा त्याने ती पेटी उघडल्यावरच झाला होता. त्याच रात्री त्याच्या मुलगा अचानक तापाने फणफणला होता व त्याला इस्पितळात न्यावे लागले होते. दोन दिवसांनी त्याच्या म्हशीला पान लागून ती मेली होती आणि भरीत भर म्हणून त्याचे गावकीमध्ये भाऊबंदांबरोबर अगदी हमरीतुमरी पर्यंत येऊन भांडण झाले होते. मालकांची पेटी परस्पर उघडून आतील ऐवज लंपास करावा असे पाप आपल्या मनात आल्याने हे सगळे झाले असणार अशी त्याची धारणा झाल्याने, मालकांनी येऊन आपला ऐवज आपल्या ताब्यात लगेच घ्यावा म्हणून त्याने ते पोस्ट कार्ड पाठवले होते. गेनूची कथा ऐकल्यावर केतकर त्याच्याकडे बघतच राहिले. त्यांचा देवधर्म, अंधश्रद्धा, शकून- अपशकून यावर प्रथमपासून कधीच विश्वास नसल्याने गेनूला या सगळ्या गोष्टी योगायोगाने झाल्या आहेत व त्यांचा एकमेकाशी काही संबंध नाही हे त्याला कसे समजजावे हा प्रश्न त्याना पडला. खंड देण्यात गेनू करत असलेल्या लपवाछ्पवीचा पूर्वानुभव मनात असल्याने केतकर काहीच बोलले नाहीत. पण त्याच वेळी गेनू इतका सरळ किंवा सोवळा नसून किरकोळ फसवाफसवी करण्याचे फारसे सोयरसुतक त्याला नसल्यामुळे, पेटीत फारसा ऐवजच नसल्याने त्याने प्रामाणिकपणाचे हे नाटक केले असावे असेही त्यांच्या मनात आले. गेनूच्या बायकोने मग एका गाठोड्यात बांधून ठेवलेली ती पेटी केतकरांच्या समोर आणून ठेवली.

केतकरांना पहिला धक्का ती पेटी पाहिल्याबरोबरच बसला. साधारण चार इंच रुंदी, सहा इंच लांबी आणि चार ते पाच इंच उंच अशा आकाराची ती पेटी काशाच्या धातूमधे ओतकाम करून बनवलेली होती. गेनूच्या बायकोने घासून पुसून ती साफ केलेली असल्याने त्यावर असलेले कोरीव फुलापानांचे नक्षीकाम आणि तळाजवळ कोरलेला, चारी बाजूंना जोडणारा सलग पुष्पहार व तो उचलून धरणारी छोटी छोटी बाळे हे सर्व बारकावे स्पष्ट दिसत होते त्याचप्रमाणे पेटीच्या झाकणावर, मोडीमध्ये “ पांडुरंग बाळकृष्ण केतकर” अशी अक्षरे स्पष्टपणे कोरलेली त्यांना दिसत होती. केतकरांनी ती पेटी उचलून फिरवून बघितली. ही पेटी आपल्या कोणा पूर्वजाने तेथे झाडाखाली पुरून ठेवली असावी असा विचार मनात आल्याने ती पेटी उघडून आत काय आहे ते बघावे असे केतकरांच्या मनात आले पण गेनू त्याला अजिबातच तयार नव्हता. शेवटी केतकरांनी ती पेटी पिशवीत ठेवली, गेनूने आवर्जून त्यांना दिलेल्या आमसुले, कुळीथ वगैरे कोकणी मेव्याच्या पुड्या त्यावर ठेवला व त्याला दोन फणस आणून द्यायला सांगून केतकर गावात राहणार्‍या अण्णा खोतांच्या घरी जायला निघाले.पिशवी हातात घेतल्यावर पेटी बरीच जड लागते आहे हे मात्र केतकरांच्या लक्षात आल्यावाचून राहिले नाही.

आटपाडी मधले अण्णा खोत ही एकच व्यक्ती केतकरांच्या परिचयाची होती. मुंबईला आले की ते आवर्जून केतकरांना भेटत व नोकरी सोडून गावी येऊन राहण्याबद्दल आग्रह धरत. गमतीची गोष्ट म्हणजे अण्णांना केतकरांना गावात पाहून अजिबातच आश्चर्य वाटले नाही. त्यांना गेनूच्या परिस्थितीची बहुधा माहिती असावी आणि गेनूने पैशाच्या मदतीसाठी केतकरांना बोलावले असणार असे त्यांना बहुधा वाटत असावे. गेनू कसा लबाड आहे याचे पालूपद ते केतकरांकडे नेहमी लावत. आज मात्र ते काहीच बोलले नाहीत. अण्णांकडेच केतकरांनी चार घास खाल्ले. गेनूने तेवढ्यात त्यांना दोन फणस आणून दिले ते त्यांनी पिशवीत घातले व गेनूनेच आणलेल्या बैलगाडीतून ते उरणकडे रवाना झाले. मध्यरात्री नंतर कधीतरी आलेल्या बोटीतून परतीचा प्रवास करून सकाळी ते मुंबईला दाखल झाले.

नेहमीप्रमाणे अकरा वाजता ऑफिसात पोचल्यावर साळवींची प्रश्नार्थक मुद्रा त्यांना दिसली पण सात बाराच्या उतार्‍याचे काम होते असे मोघम उत्तर देऊन ते आपल्या कामाला लागले. साळवींनीही मग त्यांना फारसे काही विचारले नाही. रात्री घरी पोचून चाळीमधली सगळी दारे बंद झाल्यावर केतकरांनी ती पेटी पिशवीतून बाहेर काढली. कंदिलाच्या प्रकाशात पेटीवरचे नक्षीकाम मोठे खुलून दिसते आहे असे त्यांच्या मनात आले. पेटीचे झाकण उघडल्यावर मात्र त्यांची एकूण निराशाच झाली. गेनू म्हणल्याप्रमाणे पेटीत तांब्याचे ढब्बू पैसे, भोकाचे पैसे आणि काही पया एवढाच ऐवज होता. पेटीकडे बघत असताना केतकरांच्या हे लक्षात आले की बाहेरून पेटी चार ते पाच उंच दिसत असली तरी आतल्या बाजूस मात्र पेटीचा तळ अगदीच उथळ आहे. पेटीला आत काहीतरी गुप्त कप्पा असावा असे वाटल्याने त्यांनी पेटी रिकामी केली. तळावरून बोटे फिरवीत असताना तेथे एक खटका आणि तो उघडण्यासाठी एक कळ आहे हे लक्षात आल्याने त्यांनी कळ दाबली व पेटीचा तळच त्यांना सहजपणे उचलून घेता आला. पेटीच्या खालच्या बाजूला आणखी बरीच नाणी आणि एक छोटा रेशमी बटवा होता. केतकरांनी नाणी हातात घेऊन बघितली. जवळ जवळ सर्व नाण्यांवर इंग्रजी भाषेत एका बाजूला व्हिक्टोरिया एम्प्रेस व मधे राणीची छबी उमटवलेली होती तर दुसर्‍या बाजूच्या कडेला इस्ट इंडिया कंपनी व तळाच्या बाजूस अठराशे चाळीस हे साल, त्याच्या आत वेलीचे नक्षीकाम व त्याच्या आत, वन रुपी ही अक्षरे, उमटवलेली त्यांना दिसली. राणीचा छाप असलेले असे नव्याण्णो रुपये त्या पेटीत होते. त्या शिवाय त्या पेटीत असलेल्या रेशमी बटव्यात आणखी तीन नाणी होती. त्यात दोन राणीचे रुपये आणि एक विचित्र दिसणारे नाणे होते. त्या नाण्यावर एका बाजूस पारशी लोकांसारखे धारदार नाक असलेल्या एका व्यक्तीचे चित्र होते तर दुसर्‍या बाजूस कोणत्यातरी अनाकलनीय भाषेत काहीतरी मजकूर लिहिलेला होता.

केतकरांनी मग ती पेटी आपल्या पत्र्याच्या ट्रंकेत सुरक्षित ठेवून दिली व त्या नाण्यांचा विचार करतच ते अंथरूणावर पडले. सोनटक्के ज्या पेढीवर काम करत असत त्या पेढीच्या पारशी मालकांकडे अशी जुनी नाणी पाहिली असल्याचे त्यांना सोनटक्के कधीतरी बोलले होते ती आठवण त्यांना झाली. त्या रवीवारी संध्याकाळी केतकरांनी चोपाटीवर बसलेले असताना सोनटक्क्यांकडे आपल्या पेटीचा विषय काढला व कोटाच्या आतल्या खिशातून रेशमी बटवा काढून त्यातली तीन नाणी सोनटक्क्यांना दाखवली व आता काय करायचे याबाबत त्यांचा सल्ला विचारला. सोनटक्क्यांनी लगेचच आपल्या पेढीच्या मालकांना भेटायला या असा सल्ला त्यांना दिला. मग दुसर्‍या दिवशी केतकर ऑफिस सुटल्यावर ट्रॅमने घरी न जाता फोर्ट मधल्या सोनटक्क्यांच्या ऑफिसमधे गेले.

सोनटक्क्यांचा पारशी साहेब मोठा दिलखुलास वाटत होता. सोनटक्क्यांनी त्याला बहुधा केतकरांचे काय काम आहे याची कल्पना दिलेली असावी. त्याच्या ऑफिसात एका मोठ्या टेबलामागे तो बसला होता अंगात पारशी सदरा व कंबरेला कश्ती बांधलेली असा त्याचा अवतार होता. भिंतीवर मागे झरतृष्ट आणखी कोणी संत यांचे फोटो लट्कवलेले होते. सोनटक्क्यांना पाहून तो मोठ्याने हसला व काय xx तात्या लोग तुमी इकडे कुठे? असे विचारत त्याने सोनटक्क्यांना काय आणले आहे अशी विचारणा त्याने केली. केतकरांनी मग आपल्या खिशातून रेशमी बटवा काढला व त्यातले राणीचे एक नाणे त्या पारशाच्या हातात ठेवले.

ते नाणे हातात घेऊन प्रथम त्याने एक दोन वेळा निरखून बघितले पण त्या नाण्याचे विशेष काही त्याला वाटले नसावे हे स्पष्टपणे केतकरांना दिसत होते. मग त्याने दोन तीन वेळा ते नाणे फिरवून बघितले आणि त्याचे डोळे एकदम चमकले. त्याच्या चेहर्‍यावर अविश्वासाचा भाव केतकरांना दिसला. टेबलाच्या ड्रॉवर मधून त्याने एक बहिर्गोल भिंग काढून नाण्याचे बराच काळ निरिक्षण केले व शेवटी कपाटातून एक जाडजूड पुस्तक काढून तो वाचतच राहिला. दहा पंधरा मिनिटांनी त्याने आपली मान वर उचलली आणि एक सुस्कारा सोडून हे नाणे त्यांना कोठे मिळाले अशी विचारणा केली. केतकरांनी हे नाणे आपल्या घरातच आपल्याला सापडले असे सांगितल्यावर तो एकदम खुर्चीवरून उठला आणि केतकरांचा हात हातात घेऊन लकिएस्ट मॅन वगैरे काहीतरी बडबडला.

त्या पारशी साहेबाच्या म्हणण्याप्रमाणे हा रुपया जरी मुंबईच्या टाकसाळीत पाडलेल्या नाण्यांपैकीच असला तरी मोठा दुर्मिळ होता. ही नाणी जेंव्हा पाडली होती तेंव्हा एका लॉटमधे प्रेस मशीन मधे काहीतरी घोटाळा झाल्याने हजार दोन हजार नाण्यांवर, नाण्याच्या मागच्या बाजूचे डिझाइन हे राणीच्या छबीच्या उलटे पंच झाले होते. टाकसाळीने ही नाणी रद्दबातल ठरवली असली तरी तेंव्हा झालेल्या सरकारी चौकशीमध्ये असे आढळले होते की एकूण आठ नाणी गहाळ झाली आहेत. मग कंपनी सरकारने बॉम्बे टाइम्स मधे जाहिरात देऊन लोकांना ही नाणी परत करण्याचे आव्हान केले होते व एक घसघशीत बक्षीस देऊ केले होते. त्यानंतर सहा नाणी परत मिळाली होती पण दोन नाणी कधीच परत मिळाली नव्हती. त्या दोनपैकी हे एक नाणे होते. सोनटक्क्यांच्या पारशी साहेबाने मग आपला मोठा प्लेट कॅमेरा बाहेर काढला व त्या रुपयाचे दोन चार फोटो काढले व केतकरांना नंतर निरोप पाठवतो असे सांगून त्यांची बोळवण केली.

महिन्याभराने पारशी साहेबाने सोनटक्क्यांमार्फत केतकरांना भेटायला येण्याचा निरोप दिला. केतकर त्याला भेटल्यावर त्याने लंडनहून आलेली एक केबल केतकरांना दाखवली. त्या केबलप्रमाणे लंडन मधील जुनी नाणी संग्राह्य करणारा एक संग्राहक केतकरांच्या रुपयाला दीडशे पौंड किंवा बावीसशे पन्नास रुपये द्यायला तयार होता. केतकरांनी फारसा विचार न करता ते नाणे पारशी साहेबाच्या हातात ठेवले. पारशी साहेबाने आपली तिजोरी उघडून त्यात तो रुपया सुरक्षित ठेवला व राणीचे चित्र असलेल्या शंभर रुपयाच्या बावीस नोटा व चांदीचे पन्नास रुपये केतकरांच्या हातात ठेवले. आपल्या आयुष्यात एवढी मोठी रक्कम केतकरांनीही बघितली नव्हती किंवा सोनटक्क्यांनीही! दोघे अगदी भारावून गेले. घरी आल्यावर केतकरांनी प्रथम काय केले असले तर सोनटक्क्यांच्या हातात ते नको नको म्हणत असताना शंभर रुपयाची एक नोट ठेवली आणि ते गेल्यावर आपल्या खिशातला रेशमी बटवा त्यांनी काढला व त्यातली नाणी घरात सापडलेल्या एका हिंगाच्या डबीत ठेवून ती डबी देवघरात ठेवून दिली.

त्यानंतर बरेच दिवस केतकरांनी त्या शंभर रुपयांच्या नोटांना हात सुद्धा लावला नाही. बहुधा त्या नोटा खर्च करण्याची त्यांना भीती वाटत असावी. शंभर रुपयाच्या दोन नोटा मात्र त्या दिवसापसून ते आपल्या कोटाच्या खिशात एका रुमालात बांधून ठेवू लागले. त्यांचे आयुष्य पूर्ववत चालू असले तरी काहीतरी सूक्ष्म बदल त्यांच्यात घडत होता हे नक्की. पांडुरंग बाळकृष्णांनी केतकरांच्या आयुष्यात कोठेतरी प्रवेश केला होता. हेडक्लार्क साळवींना तो फरक जाणवत होता पण काय तो नक्की सांगता येत नव्हता. त्यामुळे तेही अस्वस्थ होते.

केतकरांचा बर्‍याच वर्षापासून एक प्रघात होता. दर महिन्याच्या एक तारखेला ते पगार मिळाला की मुंबादेवीच्या देवळात संध्याकाळी जात असत व देवीसमोर एक ढब्बू पैसा व दोन पेढे ठेवून नमस्कार करत असत. या महिन्याला एक तारखेला त्यांना ते जमले नव्हते म्हणून दोन दिवसांनी सकाळी ते दर्शन घ्यायला गेले होते. दर्शन घेऊन बाहेर येत असताना त्यांना अचानक काय झाले हे कोणालाच सांगता येणे शक्य नाही. बोरीबंदरकडे जाणारी ट्रॅम पकडण्याच्या ऐवजी केतकर शेजारच्या एका इमारतीत शिरले व शा. सामळदास रणछोडदास, ब्रोकर- कॉटन एक्सेंज, अशी पाटी डोक्यावर मिरवणार्‍या समोरच्या एका पेढीतच ते शिरले. एक विटका काळा कोट व मळकट धोतर नेसलेला हा घाटी आपल्या पेढीत काय करतो आहे हे न उमगल्याने तो नोकरी मागण्यासाठी आला असावा असा समज करून शेट सामळदास केतकरांवर खेकसलेच की त्यांना कोणी नोकर नको आहे. केतकर त्यांच्या ओरडण्याकडे लक्ष न देता त्यांच्या समोर जाऊन बसले व दोन हजार रुपये किंमतीच्या कापसाच्या गासड्यांचे 30 दिवसाचे फॉरवर्ड कॉन्ट्र्रॅक्ट आजच्या भावाने आपल्याला करायचे आहे असे सांगून आपल्या जवळचे रुमालात बांधलेले दोनशे रुपये त्यांनी सामळदासांसमोर ठेवले. सामळदासांना प्रथम काही कळेचना! पण शेवटी भानावर येऊन त्यांनी कागद पत्रे व पावती तयार केली व केतकरांच्या हातात ठेवली. केतकर मग सरळ जी.पी.ओ. मध्ये आपल्या ऑफिसात निघून आले.

पुढच्या तीस दिवसांत केतकरांच्या आयुष्यात काहीच फरक पडला नसला तरी कॉटन एक्स्चेंजमध्ये मात्र जमीन आकाश एक होऊ घातले होते. युरोपमध्ये युद्धाचे वारे वाहू लागले होते आणि इंग्लंड मधल्या कापडांच्या गिरण्यांना वॉर डिपार्टमेंट कडून गणवेशासाठी लागणार्‍या ट्विल कापडांच्या अभूतपूर्व ऑर्डर्स मिळाल्याने मुंबईच्या कॉटन एक्स्चेंजमध्ये त्यांचे दलाल मिळेल त्या भावात कापूस खरेदी करून इंग्लंडला बोटींनी पाठवत होते. परिणामी कापसाच्या भावात अभूतपूर्व वाढ झाली होती व एक्स्चेंजमधल्या सगळ्यांनाच बरकतीचे दिवस आले होते. तीस दिवसांनी केतकरांनी जेंव्हा कॉटन एक्स्चेंजमध्ये पाऊल ठेवले तेंव्हा सामळदासांनी त्यांचे चक्क स्वागत केले. केतकरांनी साहजिकच आपले कॉन्ट्रॅक्ट चढ्या भावाने विकले व राणीच्या चित्राच्या आणखी बर्‍याच नोटा स्वत:च्या खिशात ठेवल्या. पुढच्या काही महिन्यात केतकरांची कॉटन एक्सचेंजला भेट ही नित्याचीच बाब होऊ लागली. मात्र प्रत्येक व्यवहारात केतकरांना फायदाच कसा होतो? त्यांचा सट्टा बरोबरच कसा लागतो? हे कोडे स्वत: केतकरांनाही ना उलगडत होते, ना सामळदासांनाही.

अशाच एक दिवशी केतकरांची ओळख प्रतापसिंह राठोड या व्यक्तीशी सामळदासांकडे झाली. गप्पांच्या ओघात आपण दर रविवारी मुंबईच्या रेसकोर्सवर जात असल्याचे त्यांनी केतकरांना सांगितले. मग केतकर पुढच्या रविवारी रेसकोर्सवर गेले आणि प्रतापसिंहाच्या सल्ल्यानुसार त्यानी एका रेसच्या घोड्यावर पैसे लावले. पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे केतकर ती रेस हरले. प्रतापसिंहांनी चालायचेच! म्हणून ही बाब सोडून दिली. केतकरांच्या डोक्यात मात्र रेसवर पैसे लावण्याची कल्पना घुटमळत राहिली. नाहीतरी अलीकडे केतकरांना शांत झोप लागेनाशी झालीच होती. काहीतरी विचित्र स्वप्ने त्याना पडत नाहीतर डोळ्याला डोळा लागत नसे. त्यात या रेसच्या घोड्यांची आणखी भर पडली. मग पुढच्या रवीवारी केतकर परत रेसकोर्सवर गेले आणि स्वत:ला हव्या त्या एका घोड्यावर त्यांनी एक भलीथोरली रक्कम लावली आणि अपेक्षेप्रमाणे ते जिंकले. त्या दिवसास केतकरांचा प्रत्येक रविवार हा रेसकोर्सवर जाऊ लागला आणि कॉटन एक्स्चेंजप्रमाणेच दिवसाच्या शेवटी ते भरपूर नफा कमवून घरी येऊ लागले. हा मिळालेला सर्व पैसा, खर्च असा त्यांना काहीच नसल्याने, आपल्या लोखंडी ट्रंकेत ठेवून देत असत. ही ट्रंक त्यांच्या वडीलांनी त्यांच्यासाठी म्हणून घेतली होती आणि मोठ्या हौसेने कोयंड्याजवळ त्यांचे संपूर्ण नाव, गजानन श्रीकृष्ण केतकर हे नाव कोरलेली एक पितळी पट्टी रिव्हेट करून घेतली होती. आपली ट्रंक राणीचे चित्र असलेल्या नोटांनी भरत चालली आहे हे केतकरांना दिसत होते, पण त्या नोटांचे करायचे काय? या प्रश्नाचे उत्तर त्यांच्याजवळ नव्हतेच. रविवार रेसकोर्सवर जाऊ लागल्याने सोनटक्यांबरोबरच्या चौपाटीवरच्या गप्पा गोष्टी पण आता बंदच झाल्या होत्या.

हे सगळे चालू असताना एक दिवस असा प्रसंग घडला की केतकरांचा मूळचा पापभीरू आणि सरळ मार्गी स्वभाव, त्या घटनेने पूर्ण हादरून गेला. ऑफिसातून परत येत असताना केतकर बोरीबंदर जवळ ट्रॅम पकडत असत. त्यांच्या जाण्या-येण्याच्या नेहमीच्या रस्त्यावर ‘अल्बर्ट व्हाइटवॉटर’ अशी पाटी असलेले एक विलायती दारूचे दुकान होते. केतकरांनी त्या दुकानाकडे आजपर्यंत कधी वळून सुद्धा बघितले नव्हते. त्या दिवशी संध्याकाळी त्या दुकानासमोर त्यांच्या चपलेचा अंगठा अचानक तुटल्याने ते तेथे थांबले. साहजिकच दुकानाच्या शो केसमधे मांडून ठेवलेल्या रंगीबेरंगी मद्याच्या बाटल्या त्यांच्या नजरेत आल्या. केतकरांच्या डोक्यात काय आले कोणास ठाऊक, पण ते दुकानाच्या पायर्‍या चढण्यासाठी म्हणून वळू लागले. बरोबर त्याच वेळेस काय केतकर? इथे काय करताय? अशी हाक त्यांना ऐकू आली. त्यांच्याच ऑफिसमधे काम करणारे माहिमकर त्यांना हाक मारत होते. चपलेचा आंगठा तुटल्याने थांबलो असे उत्तर देऊन मग केतकर त्यांच्या बरोबर पुढे चालू लागले. हा प्रसंग वारंवार मग केतकरांना आठवू लागला आणि अल्बर्ट व्हाइटवॉटरच्या दुकानाला आपण एकदा तरी भेट दिलीच पाहिजे असे त्यांच्या सारखे मनात येऊ लागले.

एवढे झाल्यावर मात्र दुसर्‍या दिवशी सकाळी, केतकरांनी ऑफिसला निघताना देव्हार्‍यातला रेशमी बटवा खिशात टाकला व जाता जाता सोनटक्क्यांना आपण त्यांच्या ऑफिसात संध्याकाळी भेटू असे सांगून ते पुढे निघाले. संध्याकाळी ठरल्याप्रमाणे ते सोनटक्क्यांच्या ऑफिसात जाऊन त्यांच्या पारशी साहेबाला भेटले. मागच्या नाणे व्यवहारात चांगली घसघशीत रक्कम पदरात पडलेली असल्याने अर्थातच त्याने मोठे प्रेमाने केतकरांचे स्वागत केले. खिशातून रेशमी बटवा काढून केतकरांनी, त्यातील नाण्यांपैकी ज्या नाण्यावर एका बाजूस धारदार नाक असलेल्या व्यक्तीची छबी आणि दुसर्‍या बाजूस अनाकलनीय मजकूर होता ते नाणे साहेबाच्या हातात ठेवले. मागच्या वेळेप्रमाणेच सोनटक्क्यांच्या साहेबांनी, त्या नाण्याचे फोटो काढून घेतले व माहिती कळली की निरोप पाठवतो असे सांगून केतकरांना रजा दिली.

केतकरांचा पुढचा महिना मोठा बैचैनीत गेला. रात्र रात्र त्यांचा डोळ्याला डोळा लागत नव्हता. पैशाचा सतत ओघ त्यांच्याकडे येत होता आणि त्यांची ट्रंक हळूहळू भरत चालली होती. त्यांचा स्वभाव सुद्धा जास्त जास्त तिरसट, हेकट होऊ लागला होता. चाळीतल्या मुलांमध्ये इतके दिवस सर्वांना आवडणारे केतकर काका इतके तुसडेपणाने आपल्याशी का वागू लागले आहेत हे मुलांना कळत नव्हते. ‘अल्बर्ट व्हाइटवॉटरच्या’ दुकानाला भेट देऊन तिथल्या बाटल्या खरेदी कराव्या अशी इच्छा त्यांना अलीकडे सारखी होऊ लागली होती व त्या इच्छेवर ताबा मिळवणे त्यांना प्रत्येक दिवशी अधिक अधिक कठिण होत होते.

असेच दोन महिने गेल्यावर एका दिवशी सोनटक्के येऊन सांगून गेले की साहेबांनी बोलावले आहे. मोठ्या उत्कंठेने केतकर पारशी साहेबाला भेटायला गेले. पारशी साहेब एकूणच फारसा उत्साही वाटला नाही. त्याच्या म्हणण्याप्रमाणे हे नाणे ‘सुसमिर’ या शक सम्राटाच्या कारकिर्दीत इसवी सनाच्या सुरवातीस पाडलेले होते व मागच्या बाजूला लिहिलेला ‘तोचारी’ भाषेतला मजकूर ब्राम्ही लिपित लिहिलेला होता. हा सम्राट म्हणे फक्त दहा ते बारा वर्षे गादीवर होता आणि अत्यंत क्रूरकर्मा म्हणून प्रसिद्ध होता. या सम्राटाच्या कारकिर्दीमध्ये पाडलेले कोणतेही नाणे अजून कोठेच सापडलेले नसल्याने केतकरांजवळचे नाणे पहिले आणि म्हणून अत्यंत दुर्मिळ होते. या नाण्याची किंमत करण्यास सुद्धा कोणी धजावत नव्हते. एका तज्ञांनी याची किंमत काही लाख पौंड होऊ शकेल असा फक्त अंदाज बांधला होता. त्यामुळे केतकरांचे नाणे सध्या तरी विकले जाणे अशक्यप्रायच वाटत होते. आय अ‍ॅम व्हेरी सॉरी, साहेब शेवटी म्हणला होता.

रात्री घरी आल्यावर सुद्धा केतकरांच्या डोक्यातून सुसमिरचे नाणे जात नव्हते. ती रात्र त्यांनी तळमळत काढली. आपल्या मागचा या सुसमिराचा पिच्छा आता कधी सुटणारच नाही या कल्पनेने केतकरांना फारच अस्वस्थ वाटत होते. मग विचार करता करता, एकदम डोक्यात प्रकाश पडल्यासारखे केतकरांच्या लक्षात आले की ‘पांडूरंग बाळकृष्णांनी’ ही पेटी शेतात का पुरून टाकली असावी. या सुसमिर सम्राटाने आपल्या या पूर्वजाचा आपल्यासारखाच बहुधा छळ केलेला असणार व या ब्यादीपासून स्वत:ची सुटका करून घेण्यासाठी ‘पांडूरंग बाळकृष्णांनी’ हे पाऊल उचललेले असणार हे त्यांच्या आता लक्षात येत होते. केतकरांनी मग थोडा विचार करून एक निर्णय घेतला.

सकाळी उठल्याबरोबर त्यांनी साळवींना आपल्याला दोन दिवस रजा हवी असल्याची चिठ्ठी पाठवली. नंतर दुपारपर्यंत पांडुरंग बाळकृष्णांच्या काशाच्या पेटीत त्यांनी राणीचे रुपये व तो रेशमी बटवा त्यातील नाण्यांसह ठेवून पेटी बंद केली व ती पेटी आणि दोन कपडे आपल्या पिशवीत भरले. राणीचे चित्र असलेल्या नोटा आणि नाणी यांनी खचाखच भरलेली आपली लोखंडी ट्रंक बंद करून त्याला एक मोठे कुलुप त्यांनी लावले. एका हारेवाल्याला बोलावून ती ट्रंक एका बग्गीत ठेवण्यास त्याला सांगितले व ते स्वत: त्या बग्गीतूनच परत एकदा भाऊच्या धक्क्याकडे निघाले. बोट सुटल्यावर कमरेला लावलेली ट्रंकेची किल्ली कोणी बघत नाहीये याची खात्री करत त्यांनी समुद्राच्या पाण्यात सहजपणे फेकून दिली.

त्या रात्री केतकरांनी उरण गावातच मुक्काम केला व सकाळी बैलगाडी करून ते आटपाडीला थेट गेनूच्या झोपडीवर जाऊन धडकले. अचानक मालकांना पाहून गेनू नाही म्हटले तरी जरा चरकलाच. केतकरांनी पांडुरंग बालकृष्णाची पेटी काढून त्याच्यासमोर ठेवल्याबरोबर तर, आता हे कसले अरिष्ट? या भीतीने तो अक्ष्ररश: कापू लागला. केतकर त्याला एवढेच म्हणाले की गेनू ही पेटी तू तिच्या मूळ जागेवरून हलवल्याने मोठे संकट येऊ घातले आहे. याचे निराकरण करणे आता तुझ्याच हातात आहे. ही पेटी आता आपण परत तिच्या मूळ जागेवर ठेवली पाहिजे. केतकरांनी मग गेनूला आंब्याच्या झाडाखालच्या कोपर्‍यात ही पेटी आणि लोखंडी ट्रंक हे दोन्ही मावतील एवढा खड्डा करायला सांगितला आणि रात्र पडल्यावर त्या दोघांनी पांडुरंग बाळकृष्णांची पेटी आणि गजानन श्रीकृष्णांची ट्रंक यांना शेजारी शेजारी ठेवून मूठमाती दिली.

आपले काम झाल्यावर केतकर लगेचच मुंबईला परत जाण्यास निघाले. जाताना खिशातल्या सर्व नोटा आणि खुर्दा त्यांनी गेनूच्या स्वाधीन केला व या पेटीसंबंधी कोणाशी बोललास तर काय होईल याची तुला कल्पना आहेच असा धोक्याचा इशाराही दिला. पहाटे-पहाटे केतकर मुंबईला पोचले. त्यांना आता आपले मन आता अतिशय शांत झाले आहे आणि मनाला एक प्रकारचा हलकेपणा किंवा रितेपणा आल्याचे सतत जाणवत होते. 11 वाजता ते ऑफिसात पोचले आणि त्यांनी आपल्या कामाला सुरूवात केली. त्यांच्या चेहर्‍याकडे एकदाच पाहिल्यावर साळवींच्या हे लक्षात आले की जे काय संकट केतकरांवर आले होते ते निमाले आहे. केतकर आता, परत एकदा, पूर्वीचेच झाले आहेत.

विटलेला काळा कोट घातलेला आणि मळकट धोतर नेसलेला पण खिशातून नोटाची बंडले काढणारा हा घाटी एकदम गायब कोठे झाला? हा प्रश्न मात्र सामळदास आणि प्रतापसिंह राठोड या दोघांना पुढे अनेक वर्षे पडत राहिला.

 

15 डिसेंबर 2015

( डिसक्लेमर- ही कथा, यातील व्यक्ती हे सर्व संपूर्णपणे काल्पनिक आहेत. सुसमिर नावाचा कोणीही शक सम्राट कधीही होऊन गेलेला नाही त्यामुळे त्याचे नाणेही अर्थातच काल्पनिक आहे.)
Advertisements

About chandrashekhara

I am a retired electronics engineer. I am interested in writing, reading books. Other hobbies include Paper models, wooden fret work and social networking.

चर्चा

2 thoughts on “सुसमिरचे नाणे

  1. sunder katha ahe sir…

    Posted by kishor | डिसेंबर 21, 2015, 11:45 सकाळी
  2. खूप छान कथा… आवडली

    Posted by purvatarang | डिसेंबर 24, 2015, 10:48 सकाळी

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s

जुने लेख शोधा

Enter your email address to subscribe to this blog and receive notifications of new posts by email.

Join 387 other followers

MyFreeCopyright.com Registered & Protected

माझे नवीन इ-पुस्तक

एका साम्राज्याच्या शोधात

Advertisements
%d bloggers like this: