.
अनुभव Experiences, Musings-विचार

आशा-निराशा


1950 च्या दशकात गेलेले माझे बालपण त्या कालातील सर्वसाधारण मध्यमवर्गीय कुटुंबातील मुलांसारखेच गेले होते असे म्हणता येईल. देशाला स्वातंत्र्य मिळाल्याला चार पाच वर्षेच होऊन गेलेली असल्याने, फारसे प्रगतीचे, सुधारणांचे वारे कुठेच आणि कुणालाच शिवलेले नव्हते. जीवनावश्यक वस्तूंची उपलब्द्धताही तेंव्हा मुबलक प्रमाणात नव्हती. गहू, तांदूळ यासारखे पदार्थ सुद्धा रॅशनिंगच्या दुकानातूनच घ्यावे लागत असत. त्यामुळे सुखोपभोगी, चैनीच्या वस्तू या तर मध्यमवर्गाच्या इच्छाआकांक्षाच्या वर्तुळात बसतच नसत असे म्हटले तरी चालेल.

अशा या काळात घालवलेल्या माझ्या बालपणात, माझ्या वयाच्या इतर मुलांना ज्या कोणत्या गोष्टी हव्या हव्याशा वाटत तेवढ्याच मला बहुधा हव्या असाव्यात असे मला वाटते कारण मला हवी असलेली कोणतीही गोष्ट मला माझ्या आई-वडीलांनी दिलीच नाही अशी कोणतीच आठवण माझ्या मनात नाही. त्यामुळे शाळेत किंबहुना मॅट्रिकची परिक्षा पास होऊन कॉलेजात जाईपर्यंत निराशेच्या भावनेने मला कधी स्पर्श केला असल्याचे मला आठवत नाही. मी एक चांगला विद्यार्थी होतो त्यामुळे मला नेहमीच उत्तम गुण प्रथमपासूनच, अगदी मॅट्रिकपर्यंत मिळत गेले होते. या गुणांच्या जोरावर मॅट्रिक झाल्यावर हव्या त्या कॉलेजमध्ये मला हव्या त्या कोर्सला सहज प्रवेश मिळाला होता. खेळ या विषयाबद्दल बोलायचे तर या विषयात मला फारसा रस कधीच नव्हता व आपण एका उत्तम खेळाडू व्हावे वगैरे इच्छांनी माझ्या मनात कधीच आल्या नव्हत्या त्यामुळे आपल्याला कोणताच खेळ खेळता येत नाही अशी खंत माझ्या मनाला कधीच शिवली नव्हती.

गतकालातील एक सुप्रसिद्ध साहित्यिक ना.सि.फडके यांनी विनोद अपेक्षाभंगामुळे होतो अशी व्याख्या केली होती असे मला स्मरते. याच धर्तीवर, निराशेची भावना अपेक्षाभंगामुळे निर्माण होते अशी व्याख्या करणे फारसे चूक ठरणार नाही असे वाटते. जर अपेक्षाच माफक असतील तर त्यांचा भंग तरी सहजासहज कसा होणार? व निराशेची भावना तरी कशी मनात निर्माण होणार असे मला नेहमी वाटते.

माझ्या आठवणीप्रमाणे खोल अशी निराशा माझ्या मनात अगदी प्रथम जर कधी दाटून आली असली तर कॉलेजच्या पहिल्या वर्षातल्या एका प्रसंगात. मला शाळेपासून एन.सी.सी मध्ये जाण्याची आवड होती. कॉलेजात गेल्यावर आर्मर्ड कोअर आणि इन्फंट्री अशा दोन एन.सी.सीच्या शाखा उपलब्द्ध होत्या. यापैकी आर्मर्ड कोअर मध्ये जाण्याची मला प्रचंड इच्छा होती. रणगाडे वगैरे जवळून बघता येतील असे मला त्या वेळेस वाटत होते. परंतु त्या शाखेत प्रवेश मिळवण्यासाठी आवश्यक त्या अटी मी पूर्ण न करू शकल्याने मला काही तेथे प्रवेश मिळाला नाही. हे जेंव्हा मला कळले तेंव्हा निराशेची भावना किती तीव्र असते हे मला समजले होते. बाकी सर्व गोष्टी विफल आहेत असे मला काही तास तीव्र्पणे वाटत राहिले होते. आता तो प्रसंग आठवला तरी हसू येते पण त्या वेळची माझी मन:स्थिती ती निराशा सहन करण्याजोगी नव्हती हे मत्र खरे.

पुढे आयुष्यात निराशा येण्याचे प्रसंग घडले, घडत गेले आणि अजूनही घडत आहेत. परंतु त्या आर्मर्ड कोअरला प्रवेश न मिळाल्यावेळच्यासारखी निराशा परत कधी मनाला जाणवली नाही. याचे एक मुख्य कारण म्हणजे वि.दा.सावरकरांचे “माझी जन्मठेप” हे पुस्तक बहुधा असावे. हे पुस्तक कॉलेजच्या पहिल्या एक-दोन वर्षांमध्ये कधीतरी माझ्या वाचनात आले. या पुस्तकाच्या सुरुवातीसच सावरकरांनी एक मोठे समर्पक वाक्य लिहून ठेवलेले होते. ते वाक्य “जे जे प्रतिकूल तेच घडेल अशी मनाची धारणा ठेवणे आणि प्रयत्न करत राहणे म्हणजे अपेक्षाभंग होत नाही” साधारण अशा अर्थाचे होते.

या वाक्याचा माझ्या मनावर अतिशय खोल परिणाम त्या वेळेस झाला होता यात शंकाच नाही कारण त्या पुढच्या काळात माझी मनोधारणाच एकदम बदलून गेली. बरीच मित्रमंडळी आणि नातेवाईक मला मी निराशावादी आहे असे म्हणू लागले. ते अर्थातच खरे नव्हते. मी प्रचंड आशावादी आहे व होतो. परंतु एखादी गोष्ट पक्की हातात पडेपर्यंत ती मिळालीच आहे असे समजून चालल्यानंतर ती जर मनाप्रमाणे घडली नाही तर जी निराशा होण्याची जी शक्यता असते ती सहन करण्यासाठी आवश्यक ती शक्ती हे सावरकरांचे तत्त्वज्ञान मनाला सहजपणे प्राप्त करून देते. स्वत:चा व्यवसाय चालवताना तर हे तत्त्वज्ञान किती खरे आहे हे मला उत्कटपणे जाणवत असे. एखादी ऑर्डर तुम्हाला दिली आहे असे प्रत्यक्ष भेटीअंती कळल्यावर सुद्धा नंतर कोणती तरी चक्रे फिरून हातात न येणे. व्यवसायात पैशांची नेहमीच निकड असते. अशा वेळी उद्या तुम्हाला चेक 100% देतो असे सांगणार्‍या गिर्‍हाईकाचा त्या दिवशी मागमूसही न लागणे या सारख्या घटना व्यवसायात घडतच असत.

अशीच एक घटना 6 महिन्यांपूर्वी माझ्या आयुष्यात घडून गेली. अरुणाचल प्रदेशातील तिबेट-भारत सीमेला भेट देण्याची माझी दुर्दम्य इच्छा गेली अनेक दशके होती. सहा महिन्यांपूर्वी अगदी योग जुळून यावेत अशा पद्धतीने काही जुन्या मित्र मंडळींच्या सोबतीने हा प्रवास करणे मला शक्य झाले. प्रवास कंपन्या सहसा सीमेला भेट देण्याचे कार्यक्रम टळत असतात. परंतु तावांगला पोचल्यावर सर्व व्यवस्था करण्यात आम्ही यशस्वी झालो. उद्या आपली एक खूप वर्षांची इच्छा पूर्णा होणार या आनंदात मी झोपी गेलो.

दुसर्‍या दिवशी पहाटे जाग आल्यावर मला हे लक्षात आले की माझे माझे पोट अचानका रितीने प्रचंड बिघडले आहे. मला खोलीच्या बाहेरही पडता येणार नाही असे वाटू लागले व एकूण परिस्थिती पहाता, देशाची सीमा देही याच डोळा पहाण्याचे माझे स्वप्न अपूर्णच रहाणार असे लक्षात आले. शेवटी तसेच झाले व सीमेला भेट न देता हॉस्पिटलला भेट देऊन सलाईन लावून घेण्याची वेळ आली. संध्याकाळपर्यंत माझी तब्येत ठीक झाली व दुसर्‍या दिवशी मी पुढच्या प्रवासाला लागलो.

तावांगमधे घालवलेला तो दिवस मला अजूनही आठवतो. केवळ सावरकरांच्या तत्त्वज्ञानाने मी त्या प्रसंगातून मनाला फारशा निराशेच्या यातना न होता देता बाहेर पडू शकलो होतो.

अलीकडे अपयशाच्या नुसत्या भीतीने आत्महत्या केल्याच्या घटनांच्या बातम्या वाचल्या की निराशेच्या भावनेवर आपल्या मनाने विजय मिळवणे किती आवश्यक आहे याची जाणीव होते. मला सावरकरांच्या तत्त्वज्ञानाने हे करता आले. तसे दुसर्‍या कोणत्या तरी पद्धतीने करणे शक्य होत असेलच. कोणत्याही पद्धतीने करावे पण प्रत्येकाने हा विजय प्राप्त करून घ्यायलाच पाहिजे असे मला वाटते.

18 मे 2015

 

 

Advertisements

About chandrashekhara

I am a retired electronics engineer. I am interested in writing, reading books. Other hobbies include Paper models, wooden fret work and social networking.

चर्चा

One thought on “आशा-निराशा

  1. Very inspiring.

    Posted by Rupali | मे 26, 2015, 6:45 pm

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s

जुने लेख शोधा

Enter your email address to subscribe to this blog and receive notifications of new posts by email.

Join 387 other followers

MyFreeCopyright.com Registered & Protected

माझे नवीन इ-पुस्तक

एका साम्राज्याच्या शोधात

Advertisements
%d bloggers like this: