.
Musings-विचार, Uncategorized

मनाचे कप्पे


आज सकाळी फिरून परत येत असताना मला माझे एक जुने परिचित सहकर्मचारी अकस्मात रितीने भेटले. 1970 च्या दशकात आम्ही दोघेही पुण्यातील एका नामवंत कंपनीत काम करत होतो. खरे बघता  आमची ओळख ही तशी तोंडओळखच म्हणता येईल कारण हे गृहस्थ व मी निरनिराळ्या विभागात काम करत  असू व आमची भेट कॅन्टीनमध्ये किंवा कंपनीच्या बसमध्ये जाताना किंवा येताना होत असे. असे जरी असले तरी आज सकाळी  मात्र बरोबर चालताना आम्ही अर्धा किंवा पाउण तास तरी  सहजपणे गप्पा मारल्या होत्या. गप्पांचे विषय म्हणजे त्या वेळची कंपनीतील एकूण परिस्थिती आणि आमचे सहकर्मचारी हेच होते.त्या वेळचे सहकर्मचारी आता कोठे आहेत, काय करत आहेत? याचा आढावा घेत असताना माझ्या असे लक्षात आले होते की मला प्रत्यक्षात दोन किंवा तीन लोकांचीच माहिती खरे म्हणजे आहे. आणि याहून विलक्षण गोष्ट म्हणजे मला भूतकाळातील या लोकांबद्दल जास्त माहिती व्हावी असे वाटतच नाहीये.

फिरून घरी परत आल्यानंतर पत्नीने सहजच उशीर का झाला असे विचारले?तेंव्हा तिला या भेटलेल्या सहकर्मचार्‍याबद्दल सांगणे स्वाभाविकच होते. पण तिला हे सांगताना माझ्या लक्षात आले की मला भेटलेल्या व ज्यांच्या बरोबर मी अर्धा-पाउण तास गप्पा मारल्या होत्या त्या गृहस्थांचे आडनाव सोडले तर बाकी काहीच माहिती मला नाही आणि ती करून घेण्यात रसही नाही.

तीन एक वर्षांपूर्वी माझ्या एका उत्साही शाळासोबत्याने आमच्या शाळेमधील बॅचचे एक गॅदरिंग भरवले होते व तितक्याच उत्साहाने पारही पाडले होते. त्यावेळेस सुद्धा मला असाच काहीसा अनुभव आला होता. गेल्या 50 वर्षात कधीही न भेटलेल्या जुन्या वर्गमित्रांना हॅलो म्हणायला छान वाटले होते हे खरे! पण त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात मला काहीच रस नाही हेही जाणवले होते.  हे वर्गमित्र माझ्या  भूतकालाचा एक भाग होते आणि त्या कालाकडे परत वळून बघण्यात मला काही  रुची नाही हे स्पष्टपणे जाणवत होते.

समुद्रात पोहणार्‍या पाणबुडीत प्रवेश करण्याची संधी मला जरी कधी मिळालेली नसली  तरी दुसर्‍या महायुद्धात जर्मनीने बांधलेली एक यू बोट पाणबुडी  एका संग्रहालयात  कापून ठेवलेली मी बघितलेली आहे. या पाणबुडीची रचना एखाद्या सिगारच्या आकाराची होती. मध्यभागी पाणबुडीच्या एका टोकापासून दुसर्‍या टोकापर्यंत जाणारा एक वर्तुळाकार आकाराचा पॅसेज व त्याच्या भोवती पाणबुडीतील कक्ष अशी ती रचना होती. परंतु मला जाणवलेले त्यातले वैशिष्ट्य म्हणजे हा संपूर्ण पॅसेज अनेक कप्प्यांमध्ये विभागलेला होता. होता.आणि प्रत्येक दोन कप्प्यांमध्ये एक पाणी सुद्धा जाऊन शकणारे किंवा वॉटर टाइट दार होते. यातले कोणतेही दार बंद केले की त्या कप्प्याचा, त्याच्या पुढच्या किंवा मागच्या पाणबुडीतील भागाशी असलेला थेट संबंध बंद होत होता. ही रचना अर्थातच आणीबाणीतील परिस्थितीशी सामना करण्यासाठी केलेली होती हे उघड होते.

आपल्या आयुष्यक्रमाकडे मागे वळून बघताना मला ही पाणबुडीची रचना  नेहमी आठवते.  शाळा, कॉलेज,मग व्यावसायिक अभ्यासक्रम आणि शेवटी नोकरी किंवा व्यवसाय  या क्रमाने आयुष्य जात असताना एक स्थित्यंतर झाले की भूत आणि वर्तमान यांच्यामधले असेच एक वॉटर टाइट दार  बंद होते. हे दार बंद झाले की जुन्याशी संबंध संपतो. थोड्याफार आठवणी सोडल्या तर मनाचा तो कप्पा अगदी बंदच होऊन जातो.

1960 च्या दशकात माझ्या वडीलांनी जेंव्हा स्वत:चा व्यवसाय चालू केला होता तेंव्हा आधीच्या कालात त्यांच्याबरोबर अनेक वर्षे काम करणार्‍या दोन सहकार्‍यांना त्यांनी भागीदार म्हणून घेतले होते. हे सहकारी व त्यांच्या पत्नी यांच्याबरोबर माझ्या आई-वडीलांचे अतिशय मित्रत्त्वाचे व जिव्हाळ्याचे संबंध होते. मला चांगलेच स्मरते आहे की आमच्या घरच्या कोणत्याही सण-समारंभात हे  मित्र व त्यांच्या पत्नी अगदी घरच्या सारखा मनापासून भाग घेत असत. पुढे काही मतभेदांमुळे ही भागीदारी तुटली व माझ्या वडिलांनी काढते पाउल घेतले. यानंतर त्यांच्या मनामधले कोणते तरी एक दार बंद झाले आणि  हे मित्र आमच्या घरी  येईनासेच झाले. सण-समारंभात त्यांनी भाग घेण्याचा प्रश्नच उरला नाही.

माझा एक मित्र व त्याची पत्नी यांचा घटस्फोट होऊन त्याने पुन्हा विवाह केलेला आहे. त्याच्या प्रथम पत्नीला मी चांगलाच ओळखतो तसेच त्याच्या आताच्या पत्नीलाही मी ओळखतो. अर्थात माझी तिच्याबरोबरची ओळख नाही म्हटले तरी जरा वरवरची आहे. या माझ्या मित्राला मागच्या दोन तीन वर्षांत त्याच्या जुन्या आयुष्याशी संबंधित अशा काही दुख:द प्रसंगांना सामोरे जावे लागले आहे. माझ्या मनात  असा एक विचार नेहमी येतो की त्याच्या प्रथम पत्नीच्या संबंधित अशा या प्रसंगाना सामोरे जाताना त्याला प्रथम पत्नीचे स्मरण झाले असेल का?  मात्र वरवर बघताना तरी त्याला आपल्या पूर्वायुष्याचे संपूर्ण विस्मरण झाल्यासारखे व पूर्वायुष्य व वर्तमान यांच्यामधले दार पूर्णतया बंद झाल्यासारखेच वाटते.

भूतकाळाशी असलेले आपले नाते हे दार बंद करून तोडून टाकण्याची ही कला किंवा  किमया  निसर्गाने आपल्याला दिलेली एक महत्त्वाची देणगी आहे असे मी मानतो.  ही निसर्गदत्त देणगी जर आपल्याजवळ नसती तर भूतकाल आपल्या सदैव  आणि सतत स्मरणात राहिला असता.  भूतकालातील  प्रत्येक क्षण काही सुखद नसतो.  अनेक क्षण दुख:द, क्लेशदायक किंवा वादळीही असणारच या सर्वांचे वजन सतत मनावर ठेवून आपल्याला वर्तमान जगणे भाग पडले असते तर वर्तमानातील क्षणांतून कोणताही आनंद मिळवणे मोठे कठीण झाले असते.

माझ्या वैयक्तिक आयुष्यामधील एका कालखंडाच्या उदाहरणाने हा मुद्दा आणखी थोडा स्पष्ट होईल.  शाळेत असताना मी जरी एक चांगला विद्यार्थी होतो असे म्हटले तरी माझे शालेय जीवन फारसे सुखकर गेले असे मला वाटत नाही. त्या कालातील माझे शिक्षक, मुख्याध्यापक, काही वर्गमित्र, याशिवाय माझे आई-वडील आणि मी स्वत:सुद्धा,  यांच्याबरोबरचे माझे संबंध अतिशय तणावपूर्ण झाले होते.  विश्लेषण करताना आज मला जाणून घेता येते आहे  की काय बिघडत होते?  पण अर्थातच त्याचा आता काहीच उपयोग नाही. परंतु एवढे मात्र खरे की त्या कालातील कोणी भेटले की त्या जुन्या जखमा परत एकदा उघड्या पडतात.  सध्या  माझे ज्या शाळासोबत्यांशी संबंध आहेत त्यांच्यापैकी  कोणाचाच या जुन्या जखमांशी तसा काही  संबंध नसला तरी त्या कालाशी असलेले माझे नाते तोडणारे ते दार, बंदच राहिलेले बरे असे मला नेहमी वाटते  हे तितकेच खरे आहे.

वर्तमानकाल आपल्याबरोबरच आहे. त्याचा आनंद उपभोगताना हे भूतकालाचे ओझे मनावर कशासाठी घ्यायचे? भूतकालाची सावली  मनावर सतत बाळगण्यापेक्षा हे मधले दार बंद करून मनाचे जुने कप्पे बंद केलेलेच चांगले!

12मे 2015

 

 

 

 

Advertisements

About chandrashekhara

I am a retired electronics engineer. I am interested in writing, reading books. Other hobbies include Paper models, wooden fret work and social networking.

चर्चा

2 thoughts on “मनाचे कप्पे

 1. Kharach ase kappe band karata yetat kay…. mazya ayushyat nakose prasang oline yet gele pan tya velchya athavanini mala kayam adhar dila ahe…. apan jar tya adachanitun baher yeu shakato tar navya konatyahi madhun ka nahi asa…. arthat he athavani baddal ahe manasanbaddal nahi…. bhutkalatil barich manase parat malahi mazya ayushyat nakoch vatatat….

  Posted by Prachi | मे 18, 2015, 3:33 pm
  • प्राची

   मला तरी असे वाटते की मनाला कप्पे असतातच पण ते आपण नाही बंद करू शकत. ते आपोआप बंद होत जातात. मात्र या बंद कप्प्यांतून आपली स्मृती मात्र बिनधास्त प्रवास करू शकते. स्मृतीवर ताबा ठेवण्यात यश मिळाले तर भूतकाल आपल्याला कधीच त्रास देऊ शकत नाही.

   Posted by chandrashekhara | मे 21, 2015, 10:39 सकाळी

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s

जुने लेख शोधा

Enter your email address to subscribe to this blog and receive notifications of new posts by email.

Join 387 other followers

MyFreeCopyright.com Registered & Protected

माझे नवीन इ-पुस्तक

एका साम्राज्याच्या शोधात

Advertisements
%d bloggers like this: