.
Uncategorized

निष्ठार्पित जीवन


parvatibai

एका बाबतीत स्वत:ला मी नेहमीच मोठा भाग्यवान समजत आलेलो आहे. महर्षि अण्णासाहेब कर्वे यांच्या निकटवर्ती समजल्या जाणार्‍या एका कुटुंबात माझा जन्म झालेला असल्याने अण्णासाहेब कर्वे व त्यांचे सहकारी यांना अगदी जवळून पाहण्याचे भाग्य मला आयुष्याची पहिली दहा/बारा वर्षे तरी लाभले होते. टाइम्स ऑफ इंडियाचे वाचन करण्यासाठी स्वत:अण्णा, नियमितपणे अगदी रोज सकाळी आमच्या घरी येत असत.परंतु तेंव्हा त्यांनी नव्वदी ओलांडली होती आणि संभाषणात फारसा भाग घेण्याचा त्यांचा स्वभाव नसल्याने व्यक्तिश: त्यांच्याबद्दल मला त्या काळात तरी फारशी माहिती होती असे वाटत नाही.परंतु बाकीचे नातेवाईक,घरी येणारे लोक आणि मुख्य म्हणजे अण्णांना भेटण्यास येणारी मोठी थोर थोर मंडळी या सगळ्यांमुळे अण्णा कोणीतरी ग्रेट असले पाहिजेत हे मनात पक्के ठसले होते.

परंतु यापेक्षाही मनावर खोल ठसा उमटवून गेलेली गोष्ट कोणती असली तर अण्णांचे पूर्वायुष्यातील सहकारी, आश्रमातील त्यांच्या विद्यार्थिनी आणि इतर अनेक जण यांची अण्णांच्या प्रति असलेली निष्ठा ही होती. आजच्या युगात या निष्ठेची कल्पना सुद्धा बहुतेकांना करता येणार नाही. ही निष्ठा एवढी जाज्वल्य होती की अण्णांनी एखाद्याला विहिरीत उडी मार म्हणून सांगितले असते तर कसलाही विचार न करता त्याने विहिरीत उडी मारण्यास मागे पुढे पाहिले नसते. या निष्ठेचे सर्वोत्कृष्ट उदाहरण म्हणजे अण्णांची मेहुणीआणि आश्रमाची पहिली लेडी सुपरिंटेंडेट असलेल्या कै.पार्वतीबाई आठवले यांचे म्हणून देता येईल. वयाची चाळीस वर्षे उलटून गेलेली असताना (त्या कालात भारतातील सरासरी आयुर्मान पस्तीस /छत्तीस  वर्षे एवढेच होते.) व इंग्रजीचे अत्यंत मोडके तोडके ज्ञान असताना, या बाई  1918 साली इंग्रजी शिकण्यासाठी व आश्रमासाठी पैसे जमा करण्यासाठी म्हणून एकट्या अमेरिकेस जाण्यास तयार तर झाल्या होत्याच. पण पुढची दोन वर्षे,  अमेरिकेतील एक सुप्रसिद्ध स्त्री मुक्ती आंदोलनकर्ती  मिस् ओ’रियली (Miss O’Reilly)  हिच्या सहवासात राहून आणि तिच्या मदतीने,आश्रमासाठी बर्‍यापैकी पैसे आणि एक वाहन भेट म्हणून मिळवण्यातही त्या यशस्वी झाल्या होत्या. कोणत्याही पद्धतीने कल्पना केली तरी अशक्यप्राय वाटणारी  अशी ही कामगिरी पार्वतीबाईंनी कोणाच्या जोरावर पार पाडली होती?

parvatibai at labour conference in new yorkन्यू यॉर्क मधील मजूर परिषदेत पार्वतीबाई सन 1919

हे मिशन इंम्पॉसिबल त्या पार पाडू शकल्या होत्या या मागे फक्त एकच गोष्ट होती, ती म्हणजे अण्णांवर असलेली त्यांची असीम निष्ठा. अण्णा सांगत आहेत ना! मग ते करायचेच! अशी ती निष्ठा होती आणि अण्णांच्या ठायी असलेल्या- हे कार्य कोणी पार पाडू शकेल तर त्या पार्वतीबाईच!- या  आत्मविश्वासाला तडा जाईल असे वागणे म्हणजे अण्णांवर अविश्वास दाखविल्यासारखे होईल ही कल्पना सुद्धा पार्वतीबाईंना सहन होण्यासारखी नसल्याने  हे कार्य करण्यास त्या तयार झाल्या होत्या व स्वत:चा कोणताही वैयक्तिक फायदा न करून  घेता त्यांनी कार्य पार पाडले होते.

अण्णांच्या सांगण्यावरून  अचानकपणे झालेला अमेरिकेतील प्रवास हा पार्वतीबाईंच्या आयुष्यात  बर्‍याच नंतरच्या काळात घडून गेलेली  एक घटना म्हणून जरी मानली तरी अण्णांचा त्यांच्यावर किती प्रचंड विश्वास  प्रथमपासूनच होता याची प्रचिती आपल्याला बर्‍याच आधी  अण्णांनी त्यांच्यावर टाकलेल्या जबाबदार्‍यांच्या स्वरूपावरून जाणून घेता येते.  आश्रमाच्या बाल्याबस्थेत आश्रमाच्या कार्यासाठी लागणारे पैसे,  देणगी स्वरूपात अण्णा स्वत: धनवान लोकांकडून मिळवत असत.

आपल्या पतींचे निधन झाल्यानंतर पार्वतीबाई कोकणातील देवरुख या गावामधे आपल्या माहेरी रहात असताना सन 1895 च्या सुमारास त्यांना त्यांची बहिण म्हणजे कै.आनंदीबाई कर्वे यांनी पुण्याला आणले. त्यावेळी पार्वतीबाईंचे वय 25 वर्षाचे होते. या वयात  त्यांनी शाळेत जाण्यास सुरुवात केली व 1901 साली त्यांनी ट्रेनिंग कॉलेजचा सर्टिफिकेट कोर्स पूर्ण करण्यात यश मिळवले. 1904 सालच्या सुमारास अण्णांना एक छोटासा अपघात होऊन ते थोड्या दिवसांसाठी अंथरुणास खिळले. या परिस्थितीत त्यांना आश्रमासाठी देणग्या मिळवण्यासाठी म्हणून प्रवास करणे शक्यच नव्हते. पार्वतीबाईंनी हे काम स्वत:च्या अंगावर घेण्यासाठी अण्णांची परवानगी मागितली. अण्णांना पार्वतीबाईंबद्दल एवढा प्रचंड आत्मविश्वास होता की त्यांनी ती लगेच दिली व  पुढची 35 वर्षे  प्रथमची काही वर्षे सोवळ्या असलेल्या पार्वतीबाईंनी सतत भारतभर भ्रमण करून संस्थेसाठी दरवर्षी तीन ते चार सहस्त्र रुपये वर्गणी मिळव्ण्यात यश मिळवले व अण्णांचा आपल्यावरचा विश्वास सार्थ करून दाखवला. पार्वतीबाईंना अमेरिकेस पाठवण्याच्या अण्णांच्या निर्णयामागे ही पार्श्वभूमी होती.

विसाव्या शतकातील महाराष्ट्र संपत्तीने कदाचित गरीब असला तरी सामाजिक कार्यकर्ते आणि त्यांची आपल्या कार्यावरची आणि आपल्या नेत्यावरची निष्ठा या बाबतीत केवढा संपन्न होता याची जाणीव पार्वतीबाईंसारख्या व्यक्तींच्या उदाहरणावरून समजून येते. या व्यक्तींचे संपूर्ण जीवनच निष्ठार्पित होते व म्हणून लौकिक अर्थाने जरी या व्यक्ती सधन मानल्या जात नव्हत्या तरी त्यांनी केलेल्या कार्याने त्यांचे जीवन मंगलमय होऊन गेले होते यात काहीच शंका वाटत नाही.

5 मे 2015

 

 

Advertisements

About chandrashekhara

I am a retired electronics engineer. I am interested in writing, reading books. Other hobbies include Paper models, wooden fret work and social networking.

चर्चा

अद्याप प्रतिक्रिया नाहीत.

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s

जुने लेख शोधा

Enter your email address to subscribe to this blog and receive notifications of new posts by email.

Join 386 other followers

MyFreeCopyright.com Registered & Protected

माझे नवीन इ-पुस्तक

एका साम्राज्याच्या शोधात

Advertisements
%d bloggers like this: