.
History इतिहास

एक पुरातन व्यापार केंद्र; तगर -भाग 2


 

(मागील भागावरून पुढे)

पेरिप्लस सारख्या ऐतिहासिक दाखल्यांवरून हे स्पष्ट होते की भारताच्या पूर्व किनार्‍यावर उत्पादन झालेला माल, ग्रीक किंवा रोमन व्यापाऱ्यांना विकण्यासाठी “तगर” ही अत्यंत महत्त्वाची अशी एक बाजारपेठ होती. हा माल प्रथम तगर मधले व्यापारी खरेदी करत असत व तो नंतर निर्यातीसाठी विकत असत. सातवाहन कालातील व्यापारी मार्गांवर असलेली इतर शहरेणि बाजारपेठा, सध्या कोणत्या नावांनी अस्तित्वात आहेत हे पुरातत्त्व शास्त्रज्ञांना ओळखणे शक्य झालेले असले तरी तगर बाजारपेठेची ओळख सध्या अस्तित्वात असलेल्या कोणत्या ठिकाणाबरोबर करायची? हे कोडे विसाव्या शतकाच्या सुरूवातीपर्यंत किमान एक शतक तरी न उलगडल्याने, तगर हे पुरातत्त्व शास्त्रज्ञांसाठी एक मोठे आव्हान राहिले होते.
सातवाहन काळामध्ये तगरला बाजारपेठ म्हणून महत्त्व होतेच पण इतकेच नव्हे तर या नंतरची किमान एक सहस्र वर्षे तरी तगर शहराने आपले महत्त्व टिकवून ठेवले होते. या संदर्भात या आधी उल्लेख केलेल्या, जे. एफ. फ्लीट ( इंडियन सिव्हिल सर्व्हिस मधील एक ब्रिटिश अधिकारी) यांच्या 1901 सालच्या जर्नल ऑफ द रॉयल एशियाटिक सोसायटी या वार्षिकात प्रसिद्ध झालेल्या एका लेखामधील खालील मुद्दे मी उद्धृत करू इच्छितो.
  • इसवी सनाच्या दुसर्‍या शतकाच्या मध्य कालात लिहिलेल्या आपल्या ग्रंथात ग्रीक भूगोल तज्ञ टॉलेमी याने तगर शहराचा उल्लेख करून त्याचे अक्षांश-रेखांश देण्याचा प्रयत्न केलेला आहे. यावरून तगर हे शहर, त्याने बैथन (Baithana) असा उल्लेख केलेल्या एका ठिकाणाच्या आग्नेयेकडे सत्याऐंशी मैलावर आणि भडोचच्या(Barygaza) आग्नेयेकडे, दोनशे सत्तर मैलावर असले पाहिजे असे अनुमान काढता येते. बैथन म्हणजे अर्थातच पैठण असले पाहिजे.
  • पश्चिम चालुक्य राज वंश कालामधील, इ.स.612 धे केल्या गेलेल्या एका नोंदीप्रमाणे, त्या नोंदीत उल्लेख केलेल्या व्यक्तीला एक गाव इनाम दिले असल्याचा उल्लेख आहे. ही व्यक्ती तगर या शहराची रहिवासी असल्याचे या नोंदीत म्हटलेले आहे.
  • इ.स.997 मधील एका नोंदीप्रमाणे, उत्तर कोकणचा शिलाहार घराण्यातील राजा अपराजित याचा उल्लेख तेथे तगर-पूर-परमेश्वर (तगर नगरीचा सर्वश्रेष्ठ भूपाल)असा केलेला आहे. ही वंशपरंपरागत चालत आलेली पदवी राजाच्या तगर या मूळ गावाचा आदर राखण्यासाठी त्याला दिलेली होती असे दिसते.
  • इ.स.1058 मधील एका नोंदीप्रमाणे, शिलाहार राजघराण्यातील कर्‍हाड पातीच्या मरसिंह (नरसिंह?) या राजाला तगर-पुरवर- अधिश्वर (सर्वोत्तम असलेल्या तगर नगरीचा सर्वश्रेष्ठ भूपाल) अशा पदवीने संबोधलेले आढळते. या राजाच्या आज्याचा(दुसरा जतिग) उल्लेख याच नोंदीमध्ये अधिक स्पष्टपणे पण कमी अचूकतेने,तगर-नगर- भूपालक (तगर नगरीचा राजा) असा केलेला आहे.
सध्या अस्तित्वात असलेल्या गावांपैकी एखाद्या गावाचा तगर नगरीशी संबंध लावण्याचासर्वप्रथम प्रयत्न, 1787 मधे फ्रान्सिस विल्फोर्ड याने केला होता. तगर म्हणजे देवगिरी किंवा दौलताबाद असले पाहिजे असे प्रतिपादन त्याने केले होते. त्यानंतर एका शतकाने, जे. बर्जेस याने 1880 मध्ये प्रसिद्ध केलेल्या आपल्या ‘केव्ह टेम्पल्स ऑफ इंडिया’ या पुस्तकात सध्याचे जुन्नर शहर हे ग्रीक लेखकांनी उल्लेख केलेले तगर असावे असा विचार मांडला होता. या दाव्याचे समर्थन बर्जेस यांनी जुन्नर जवळ तीन पर्वत आहेत आणि तगर हा शब्द त्रिगिरी या शब्दापासून आला असावा अशा तर्काने केले होते. त्याच सुमारास किंवा 1875 मध्ये, कोल्हापूर संस्थान व दक्षिण मराठी प्रदेशाचे असिस्टंट पोलिटिकल एजंट असलेले जे.एफ.फ्लीट यांनी करवीर म्हणून ओळखले जाणारे कोल्हापूर शहर, हे तगर असले पाहिजे असे अनुमान बांधले होते.
1955 मध्ये प्रसिद्ध केलेल्या आपल्या लेखात, कै. दामोदर धर्मानंद कोसंबी यांनी, जे. बर्जेस यांच्या जुन्नर हेच तगर असले पाहिजे, या तर्काच्या मागे त्यांनी दिलेले कारण पुरेसे समर्थनीय वाटत नाही हे मान्य केलेले होते. पण तरीसुद्धा जुन्नर हेच तगर असावे असे आपल्याला वाटते असेही त्यानी म्हटले होते. यासाठी त्यांनी दिलेली कारण मीमांसा अशी होती की जर जुन्नर हे तगर नसते तर पेरिप्लस किंवा टॉलेमी यांनी ज्या ग्रीक-रोमन व्यापाऱ्यांच्या कथनावरून आपली माहिती मिळवली होती ते व्यापारी दख्खन मधील सर्वात मोठ्या बाजारपेठेचा (जुन्नर) साधा उल्लेख देखील आपल्या कथनात कर नाहीत हे संभवनीय वाटत नाही. मात्र 1981 मधील आपल्या लेखात सॅम्युएल क्लार्क लाउचली हे कै. कोसंबी यांच्या विचाराचे खंडन करताना म्हणतात की पेरिप्लस सारख्या जुन्या लिखाणांत, जुन्नरचा उल्लेख बहुधा  ओमेनगर” किंवा तत्सम नावाने केलेला आहे आणि त्यामुळे जुन्नर असा उल्लेख कोठेही सापडत नाही यात काही नवल नाही.
आधीच्या कालात कोल्हापूर संस्थानाचे पोलिटिकल एजंट असणारे जे.एफ.फ्लीट, यांनी ‘जर्नल ऑफ द रॉयल एशियटिक सोसायटी’ या वार्षिकाच्या जुलै 1901 मधे प्रसिद्ध झालेल्या लेखात,असे प्रथम सुचवले की तेरणा नदीच्या काठावर असलेले आणि सध्या “तेर” या नावाने ओळखले जाणारे एक खेडेगाव, पुरातन कालातील तगर हे शहर असावे. यासाठी त्यांनी अशी कारणे दिली की “तेर” गाव पैठणच्या आग्नेयेकडे 95 मैलावर आहे व हे अंतर, पेरिप्लस मधे दिलेली दिशा आणि अंतर यांच्याशी बरोबर जुळते आहे. नकाशाप्रमाणे भडोच ते पैठण अंतर 240 मैल आहे आणि पैठण ते तेर अंतर 104 मैल आहे. साधारण दिवसाला 12 मैल एवढा प्रवास गृहीत धरला तर पैठणला जाण्यासाठी 20 दिवस आणि पुढे तेरला जाण्यासाठी 9 दिवस दिवस लागतील.सध्याच्या तेर या खेडेगावाच्या स्थानी पुरातन तगर हे शहर असले पाहिजे ही बाब यानंतर सर्वमान्य होत गेली.
हा ले प्रसिद्ध झाल्यानंतर, जे.एफ.फ्लीट यांनी भारतीय पुरातत्त्व विभागामध्ये सुपरिटेंडेंट-आर्टिस्ट आणि पुरातत्त्व छायाचित्रकार म्हणून पद भूषवणारे हेनरी कुझेन्स यांना अशी विनंती केली की त्यांनी शक्य तितक्या लवकर तेर गावाचा दौरा करावा व तेथे पूर्वी अस्तित्वात असणार्‍या एखाद्या प्राचीन शहराच्या खाणाखुणा किंवा काही भग्नावशेष अजून अस्तित्वात आहेत का हे बघावे, ज्या योगे तेर म्हणजेच तगर ही खात्री करून घेता येईल. या विनंतीनुसार नोव्हेंबर 1901मध्ये कुझेन्स यांनी तेर गावाचा एक झटपट दौरा केला. तेर हे खेडेगाव सोलापूर जिल्ह्यामधल्या कापसाची बाजारपेठ म्हणून प्रसिद्ध असलेल्या बार्शी शहराच्या पूर्वेला सुमारे 48किमी वर आणि उस्मानाबाद तालुक्यात वसलेले आहे. कुझेन्स यांची या दौर्‍या एकूण बघतानिराशाच झाली कारण कोणताच थेट पुरावा त्यांच्या हाताला लागला नाही. ते एवढेच सांगू शकले की तेर हे गाव प्राचीन असून तेथे वैदिक, जैन आणि बौद्ध धर्मियांच्या पूजास्थानांचे भग्नावशेष आढळून येतात.

 

Photo courtesy Santosh Dahiwal

 

 

 

Photo courtesy Santosh Dahiwal

 

 

 Photo courtesy Santosh Dahiwal

 

मात्र कुझेन्स यांचा दौरा अगदी असफल ठरला असे म्हणणेही शक्य होणार नाही कारण त्यांना या गावाच्या मध्यभागात अशी एक वास्तू आढळून आली की ज्या वास्तूचे वर्णन, पश्चिम भारतातील सर्वात जुने स्थापत्य या शब्दात खात्रीलायक रितीने करता यावे. ही वास्तू म्हणजेविटांचा वापर करून बांधलेले मुळातील एक बौद्ध चैत्यगृह होते. नंतरच्या काळात वैष्णव पंथियांनी त्याचे रुपांतर पूजाअर्चा करण्यासाठी विष्णूचा एक अवतार मानल्या जाणार्‍या त्रिविक्रमाच्या मंदिरात, केलेले होते.

 

तेर हे गाव प्राचीन कालात एक वैभवशाली शहर होते हे दर्शवणारी आणि आजपर्यंत सुस्थितीत राखली गेलेली एकुलती एक महत्त्वाची पाऊलखूण म्हणून त्रिविक्रम मंदीराकडे आता बघणे आवश्यक वाटते. अर्थात या सुस्थितीत असण्याला, या वास्तूचे एका हिंदू मंदिरात रूपांतर गेले गेले होते ही बाब मुख्यत्वे कारणीभूत ठरली आहे याकडे दुर्लक्ष करता येणार नाही.
कुझेन्स या वास्तूचे वर्णन करताना म्हणतात:

“या वास्तूची बांधणी कमानीवजा छत असलेले एक चैत्य गर्भगृह आणि त्याच्या समोरच्या बाजूस, बांधलेला आणि सपाट छप्पर असलेला एक कक्ष-मंडप या स्वरूपातील आहे. चैत्यगृह 31फूट लांब असून 33 फूट उंच आहे. डोंगरात खोदलेली लेणी जशा आराखड्याची होती त्याचीच हुबेहुब प्रत या बांधणीत दिसते आहे. घोडागाड्या, छकडे यावर उभारतात तसे दिसणारे कमानीवजा छत पर्वतातील लेण्यांमध्ये, खोदलेले आपल्याला नेहमी आढळून येते. लेण्यांमधील या छताचा मध्यभाग लेण्याच्या बाहेरील बाजूस वर दिसणार्‍या डोंगराच्या कपारीच्या आतील बाजूला मिळवलेला असतो व लेण्यामधील चैत्यगृहाची आतल्या बाजूची भिंत (स्तूपाच्या भोवतालची) सरळ न खोदता लंबवर्तुळाकार खोदलेली असते. याच आराखड्याची हुबेहुब प्रत येथेही आहे. समोरील कक्षाच्या छताच्या वरच्या बाजूस असणारा दिसणारा चैत्यगृहाचा कमानीवजा बाह्यभाग हा वेरूळ लेण्यांमधील विश्वकर्मा लेण्यासारखा दिसतो आहे. मात्र चैत्यगृहाच्या अंतर्गत असलेला व ज्यात पूजाअर्चा केल्या जाणार्‍या मूर्तीची प्रतिष्ठापना केलेली आहे तो आतील बाजूस असणारा कोनाडा मात्र या विश्वकर्मा लेण्यामधील बांधणीपेक्षा भिन्न आहे परंतु तो बहुधा नंतर बांधलेला असावा. या कोनाड्याच्या जागी मुळात बहुधा गर्भगृहात प्रकाश यावा म्हणून बांधलेले एक गवाक्ष असावे. बाहेरील भिंतीवर, तळाजवळ कोरलेली मोठ्या आकाराची मोल्डिंग्स (Heavy mouldings), छताजवळ कोरलेल्या पानपट्ट्या (eaves) आणि भिंतीवर मधेमधे नाजूकपणे कोरलेले स्तंभ (slender pilasters) एवढेच नक्षीकाम दिसते आहे,ज्यावर बहुधा प्लास्टर केलेले असावे. चैत्याचा आकार एकूण लहान असल्याने,आधार देणारे स्तंभ कोठेच दिसत नाहीत. सांची स्तूप आणि अमरावती स्तूप या मध्ये वापरलेल्याशिलाखंडावर उमलेल्या कमळाचे चिन्ह जसे कोरलेले दिसते तसे मात्र येथे कोठेच दिसत नाही.”
ही वास्तू मुळात बौद्ध चैत्यगृह होती याचा स्पष्ट पुरावा वास्तूचे गर्भगृह आणि समोरील मंडप यांच्या बाह्य भिंतीवर असलेल्या कोरीव कामावरून मिळतो. सांची येथील स्तूपाच्या भोवती ज्या डिझाइनची मोल्डिंग बसवलेली आहेत ती सांची किंवा बौद्ध मोल्डिंग या नावाने ओळखली जातात. हिनयान कालात खोदल्या गेलेल्या भाजे, कोंडाणे किंवा पितळखोरे येथील लेण्यांत हे डिझाइन, बाह्य भिंतीवर सगळीकडे वापरलेले दिसते. ज्या वाचकांनी या लेण्यांना भेट दिलेली आहे ते या डिझाइनशी परिचित असतीलच.
कुझेन्स यांनी आपल्या अहवालात केलेल्या वर्णनावरून वाचकांच्या हे लक्षात आलेच असेल की त्रिविक्रम मंदिराची वास्तू खूप आधीच्या कालात एक बौद्ध चैत्य म्हणून बांधली गेलेली होती व नंतर तिचे हिंदू मंदिरात रूपांतर केले गेले होते. ही वास्तू मुळात कधी बांधली गेली असावीयाबाबत टिप्पणी करताना कुझेन्स म्हणतो:
“या सर्व बाबी लक्षात घेता माझ्या मनात याबाबत अजिबात शंका नाही की या वास्तूची बांधणी इसवी सनाच्या चौथ्या शतकाच्या नंतर नक्कीच झालेली नाही. ही वास्तू बहुधा त्याच्या बर्‍याच आधी बांधली गेलेली असावी.”

 

त्रिविक्रम मंदिराच्या छतावर जो घुमट बांधला गेला आहे त्याच्या बाह्य समोरील बाजूकडे नुसता एक दृष्टीक्षेप जरी टाकला तरी या घुमटाच्या बाह्य समोरील बाजूचे, भाजे किंवा तत्कालीन लेण्यांमधील चैत्यगृहाच्या बाह्य समोरील बाजूशी दिसणारे साम्य कोणाच्याही लगेच लक्षात येऊ शकते. असा घुमट दख्खनमधे अस्तित्वात असलेल्या दुसर्‍या कोणत्याच मंदिरावर नसल्याने,त्रिविक्रम मंदिर ही एकच पाऊलखूण तेर हे एक प्राचीन तगर असावे या जे.एफ.फ्लीट यांच्यातर्काचे समर्थन करण्यासाठी पुरेशी आहे.

कुझेन्सने तेर मध्ये असलेल्या “उत्तरेश्वर” या मंदिरालाही भेट दिली होती. तेथे त्याला सापडलेला पुरावा, तेर हे गाव निदान इसवी सनाच्या पहिल्या काही शतकांपासून तरी अस्तित्वात असले पाहिजे याचे आणखी समर्थन करत होता. पुढच्या कालात, भारतीय पुरातत्त्व विभागाने येथे मोठ्या प्रमाणात केलेल्या उत्खनन केले व त्यावरून तेर हे गाव म्हणजेच प्राचीन तगर होते हे स्पष्टपणे सिद्ध होऊ शकले.
(पुढे चालू.)
15 मार्च 2015
Advertisements

About chandrashekhara

I am a retired electronics engineer. I am interested in writing, reading books. Other hobbies include Paper models, wooden fret work and social networking.

चर्चा

2 thoughts on “एक पुरातन व्यापार केंद्र; तगर -भाग 2

  1. Lekh chan mahitipurn ahet.Share karyache option dya

    Posted by Gadekar prashant | एप्रिल 11, 2015, 4:16 pm

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदला )

Connecting to %s

जुने लेख शोधा

Enter your email address to subscribe to this blog and receive notifications of new posts by email.

Join 387 other followers

MyFreeCopyright.com Registered & Protected

माझे नवीन इ-पुस्तक

एका साम्राज्याच्या शोधात

Advertisements
%d bloggers like this: