.
History इतिहास, Travel-पर्यटन

दीपगिरी अमरावती- भाग 4


(मागील भागावरून पुढे)

दख्खनच्या पठारावरच्या इतर लेण्यांमधे कोरलेल्या समकालीन पाषाण शिल्पांबरोबर अमरावतीच्या पाषाण शिल्पांची तुलना केली तर अमरावती शिल्पे तौलनिक दृष्ट्या कितीतरी उजवी वाटतात असे मानले जाते. कार्ले लेण्यामधील बास रिलिफ शिल्पे जरी अमरावतीच्या शिल्पांच्या जवळपास येत असली तरी भाजे, नाशिक, अजंठा (गुंफा 9 आणि 10) आणि पितळखोरे या सारख्या इतर लेण्यामधील बास रिलिफ शिल्पे मात्र अमरावतीच्या मानाने खूपच डावी वाटतात याबद्दल काहीच शंका वाटत नाही. या मागे असलेल्या कारणांमध्ये, ज्या पाषाणावर ही शिल्पे कोरलेली आहेत तो पाषाण प्रकार, हे सुद्धा एक महत्त्वाचे कारण आहे. दख्खनमधील इतर सर्व पाषाण शिल्पे ज्या लेण्यांमध्ये कोरली गेली आहेत तेथे ‘बॅसॉल्ट’ या प्रकारच्या पाषाण सापडतो. या प्रकारच्या पाषाणावर कारागिरी करणे हे अवघडच काम म्हणावे लागते. त्या मानाने अमरावतीच्या शिल्पकारांना, आंध्र देशातील नागार्जुंकोंडा गावाच्या जवळपासच्या खाणींमधून उपलब्ध असलेला लाइमस्टोन पाषाण उपलब्ध होता.( संगमरवर आणि लाइमस्टोन हे एकाच कुटुंबातील परंतु थोडेफार अलग गुणधर्म असणारे पाषाण आहेत आहेत असे मी वाचल्याचे स्मरते.) जी काही कारणे असोत ती असो, आपल्याला असे खात्रीपूर्वक म्हणता येते की इ.स.200 च्या आसपास, जेंव्हा अमरावती स्तूपावरील कोरीव काम पूर्णत्वास गेले होते त्या सुमारास दख्खनमधील शिल्पकला यौवनावस्थेस किंबहुना प्रौढत्त्वासच पोचली होती. याच कारणामुळेच चेन्नाई संग्रहालयाचे एक माजी क्युरेटर श्री. शिवराममूर्ती म्हणतात:

“अमरावतीच्या शिल्पांमध्ये एक ताजेपणा जाणवत असल्याने आपण जास्त आनंदाने व उत्साहाने या शिल्पांच्या अभ्यासाकडे वळतो. शिल्पांचे विषय जरी तेच घासपीट केलेले आणि अनेक ठिकाणी वापरलेले गेलेले असले तरी येथील प्रत्येक शिल्पात शिल्पकाराने त्या जुन्या विषयाला एक कलात्मक कलाटणी देण्याचा प्रयत्न करून शिल्पे जास्त सजीव करण्याचा प्रयत्न केलेला आढळतो. शिल्पकाराने शिल्पांचे सादरीकरण करताना स्वत:चा असा एक नवीन मार्ग शोधण्याचा प्रयत्न केलेला दिसतो आहे. शिल्पकाराच्या मनात काय होते आणि त्या विचाराला अभिव्यक्ती देण्यासाठी त्याने काय मार्ग अवलंबिला होता याची प्रेक्षकाला एकदा कल्पना आली की त्याने केलेले सादरीकरण आणि अवलंबिलेला मार्ग हे दोन्ही समजावून घेणे प्रेक्षकाला सुलभ वाटते. अमरावतीच्या शिल्पकारांनी वापरलेल्या या सादरीकरणाच्या पद्धतीची मोहिनी, नंतरच्या कालात केल्या गेलेल्या, भारतातील आणि इतर दूर देशातील शिल्पांवर सुद्धा पडलेली स्पष्टपणे दिसून येते.”

 

यक्षाच्या मुखातून बाहेर ओढली जाणारी पुष्पमाला

अनेक बौद्ध शिल्पाकृतींमध्ये वापरल्या गेलेल्या “पुष्पमाला व वाहक” या संकेतचिन्हाच्या (motif) शिल्पापासून आपण सुरुवात करुया. या शिल्पाकृतीत, वाहकांच्या हातांमध्येही मावू न शकणारी अशी एक भरघोस पुष्पमाला ( ती अनेक ठिकाणी एखाद्या सापासारखी दिसते) दाखवलेली असते व थोड्या थोड्या अंतराने एक बुटका यक्ष ही पुष्पमाला हातांनी वर उचलून धरत असल्याचे दाखवले जाते. यामुळे ही पुष्पमाला एखाद्या लाटेसारखी खाली-वर झालेली दिसते. हे विशिष्ट संकेतचिन्ह (motif), बौद्ध धर्मामधील महायान पंथ जेंव्हा भारतात प्रचलित झाला त्या कालात अत्यंत लोकप्रिय झाले होते असे दिसते. महायान पंथामधे महावैपुल्यबुद्धावतंसकसूत्र हे सूत्र अत्यंत महत्त्वपूर्ण मानले जाते. पूर्व एशिया मधील बौद्ध पंथियांत हे सूत्र आजही पुष्पमाला सूत्र किंवा पुष्पालंकार सूत्र या नावाने परिचित आहे. मूळ ग्रीक-रोमन उगमापासून उचललेले आणि जेथे बौद्ध धर्मातील महायान पंथ प्रसार मोठ्या प्रमाणावर झालेला दिसतो अशा भारतापासून ते चीन पर्यंतच्या एका मोठ्या भूभागावर आढळणार्‍या बौद्ध कलाकृतींमध्ये अत्यंत लोकप्रिय असलेले हे संकेतचिन्ह (motif), महावैपुल्यबुद्धावतंसकसूत्राच्या, पुष्पमाला सूत्र या जास्त परिचित नावामुळे एवढे लोकप्रिय झाले होते किंवा त्याला दुसरे काही कारण होते हे अर्थात कोणालाच सांगता येणार नाही. अमरावती स्तूपावर हे पुष्पमाला संकेतचिन्ह दोन ठिकाणी कोरलेले होते असे दिसते; यापैकी एक जागा म्हणजे स्तूपाच्या लंबगोल भागावरील संपूर्ण परिघाला विळखा घालणारी सलग पानपट्टी (frieze) आणि बाह्य रेलिंगच्या माथ्याचा भाग (coping). बाह्य रेलिंगचा माथा (coping) ज्या पाषाणशिलांपासून घडवलेला होता त्या पाषाणशिला 2 फूट उंच होत्या व माथ्याच्या बाजूने त्यांना वक्राकार आकार देण्यात आलेला होता. आपण या आधी हे बघितलेच आहे की चार प्रमुख दिशांना असलेल्या प्रवेशद्वारांमुळे बाह्य रेलिंगची सलगता चार ठिकाणी भंग पावत होती. यामुळे रेलिंगच्या माथ्यावरच्या पाषाणांवर कोरलेल्या पुष्पमालेची सलगता साहजिकच चार ठिकाणी भंग पावत होती. स्तूपावरच्या पानपट्टीवर असलेली पुष्पमाला जशी संपूर्ण स्तूपाभोवती सलगपणे कोरलेली दिसत होती तसे न दिसता ही बाह्य रेलिंगवर कोरलेली पुष्पमाला चार ठिकाणी कापली गेलेली दिसत होती, हे तत्कालीन बौद्ध मानकांमध्ये बहुधा बसत नसावे आणि यातून मार्ग कसा काढायचा, ही मोठीच समस्या अमरावतीच्या शिल्पकारांच्या पुढे बहुधा उभी राहिलेली असावी. मात्र ज्या कौशल्याने आणि हुशारीने त्यांनी हा प्रश्न सोडवला होता ते बघून या शिल्पकारांचे कौतुक वाटल्याशिवाय रहात नाही. प्रत्येक प्रवेशद्वाराच्या दोन्ही कडांना बसवलेल्या रेलिंगच्या माथ्याच्या पाषाणशिलांवर एक विशेष बास रिलिफ शिल्पकाम त्यांनी केले होते. पुष्पमाला कोरलेले माथ्याचे पाषाण रेलिंगच्या आतल्या किंवा स्तूपाच्या बाजूला बसवलेले होते हे लक्षात घेण्याची येथे गरज आहे. प्रवेशद्वाराच्या ( स्तूपाकडून बाहेर बघताना) उजव्या कडेला बसवलेल्या माथ्याच्या पाषाणाच्या डाव्या कडेला, एक महाकाय यक्ष कोरलेला होता व पुष्पमाला त्याच्या मुखातून वाहक बाहेर ओढत आहेत असे दर्शविण्यात आलेले होते. त्याचप्रमाणे प्रवेशद्वाराच्या डाव्या कडेला असलेल्या रेलिंगच्या माथ्याच्या पाषाणावर, एक भयानक मगर त्या पाषाणाच्या उजव्या कडेला कोरलेली होती आणि वाहक पुष्पमाला या मगरीच्या मुखातून बाहेर ओढत आहेत असे दर्शवले होते. या अत्यंत कौशल्यपूर्ण व्यवस्थेमुळे, प्रवेशद्वाराच्या उजव्या कडेला असलेला यक्ष आणि डाव्या कडेला असलेला मगर यांनी जणू काही ही पुष्पमाला चारी प्रवेशद्वारांमधील रिकाम्या जागेत गिळंकृत केलेली आहे असे सूचित केले जात होते व त्यामुळे ही पुष्पमाला सलग दिसली पाहिजे या बौद्ध मानकाचा मान राखण्यात (प्रत्यक्षात ती प्रवेशद्वारांपाशी कापली जात असूनही) अमरावतीचे शिल्पकार यशस्वी झाले होते असे म्हणता येते.

बंधुम राजा आणि त्याच्या दोन कन्या

यानंतर आपण आता एका अतिशय बारकाव्यासह रेखाटलेल्या बास रिलिफ शिल्पाकडे वळूया. हे शिल्प बाह्य रेलिंगमधे बसवलेल्या आडव्या पाषाणशिलेवर किंवा क्रॉस-बारवर रेखाटलेले आहे. या चित्रात बंधुमती राज्याचा राजा बंधुम व त्याला मिळालेल्या दोन भेटी याची कथा चित्रित केलेली आहे. या राजाला एक मौल्यवान चंदनाचे खोड व एक महाग पुष्पमाला भेट म्हणून मिळालेली आहे. या दोन भेटी तो आपल्या दोन कन्यांना देतो. त्याच्या कन्या या भेटी स्वत:कडे न ठेवता बुद्धांचा आधीचा जन्म मानल्या जाणार्‍या “विपसी” यांना अर्पण करतात. त्यांच्या या सत्कर्मामुळे, पुढील जन्मात थोरल्या राजकन्येला गौतमाची माता असलेल्या मायादेवीचा जन्म प्राप्त होतो तर धाकट्या राजकन्येला संत रूप प्राप्त होते. या शिल्पात बाजूंना चवरी ढाळत असलेल्या चवरी धारकांच्या मध्ये बंधुम राजा सिंहाची शिल्पे बाजूंना कोरलेल्या सिंहासनावर बसलेला दाखवलेला आहे व त्याच्या उजव्या बाजूला त्याच्या दोन्ही राजकन्या आहेत. यापैकी पहिली राजकन्या बसलेली असून तिच्या दासी तिची सेवा करत आहेत तर दुसरी राजकन्या सिंहासनाजवळ उभी असल्याचे दर्शवले आहे. सिंहासनाच्या खालील बाजूस काही दास भेटी घेऊन उभे आहेत तर शिल्पाच्या उजव्या बाजूस चित्रित केलेल्या राजमहालाजवळच्या प्रवेशद्वारावर असलेल्या कमानीतून काही पुरुष आत येताना दाखवले आहेत. एक अश्व आणि हत्ती हे सुद्धा सिल्पात दिसत आहेत. कमानीखालचा रस्ता, सिंहासनावरील सिंहाची शिल्पे, कुरळे केस असलेल्या दासांच्या शरीरावरील वस्त्रे तसेच बसलेल्या राजकन्येच्या पायाशी बसलेल्या दासीने केलेली केशरचना हे सर्व अगदी बारकाईने पाहण्यासारखे आहे.

 

मायादेवीचे स्वप्न आणि त्या स्वप्नाचा राजाला सांगितलेला अर्थ

अत्यंत बारकावे दर्शवणारे अमरावतीचे आणखी एक बास रिलिफ शिल्प ” मायादेवीचे स्वप्न आणि त्या स्वप्नाचा राजाला सांगितलेला अर्थ” या नावाने परिचित आहे. या शिल्पाच्या डाव्या बाजूला मंचकावर आडवी पडलेली मायादेवी दर्शवलेली आहे. मंचकाच्या खालील बाजूस चार दासी अर्धवट निद्रेत असल्याचे दिसते आहे. मंचकाच्या चारी कोपर्‍यांना डोक्याला फेटे बांधलेले चार रक्षक उभे असल्याचे दिसते आहे. शिल्पाच्या उजव्या बाजूस, राजाच्या समोर मायादेवी एका वेताच्या विणलेल्या स्टूलावर आसनस्थ असलेली दिसते आहे तर एक ब्राम्हण राजाच्या डाव्या बाजूस आसनस्थ आहे. ब्राम्हणाने आपली दोन बोटे वर उंचावलेली आहेत व त्यामुळे मायादेवीच्या पोटी जन्माला येणार्‍या बालकाच्या बाबतीतील दोन शक्यता हा ब्राम्हण वर्तवतो आहे असे दिसते. या दोन शक्यता अशा आहेत की हे बालक, एकतर जर त्याने गृहस्थाश्रम स्वीकारला तर सम्राट तरी होईल किंवा ऐहिक सुखांचा व गोष्टींचा संपूर्ण त्याग करून तो बुद्ध बनेल.

 

स्तूपाजवळ तप करणारा बुद्ध

हे बास रिलिफ शिल्प स्तूपाच्या बांधणीच्या अखेरच्या कालखंडातील आहे. या कालापर्यंत, बुद्धाची मानवी स्वरूपातील प्रतिमा दर्शवणे अधिकृत रितीने मान्य झालेले होते. ही फुटलेली शिला प्रत्यक्षात स्तूपावर आवरण म्हणून बसवलेल्या शिलांपैकी एक आहे. या शिल्पात एका लहान आकारातील स्तूपाच्या प्रवेशद्वारासमोर आसनस्थ असलेली बुद्धमूर्ती कोरलेली आहे. त्याच्या खालील बाजूस बुद्धाची आराधना करणार्‍या दोन नाग युवती कोरलेल्या आहेत. प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूंना एक घोळका उभा आहे यात उभा असलेला नगर श्रेष्ठी, आसनस्थ असलेली एक स्त्री आणि हातात एक तबक घेतलेला यक्ष हे स्पष्टपणे दिसतात.

गौतमाचे प्रयाण (महाभिनिशक्रमण)

या शिलाखंडावर, बौद्ध ग्रंथांमध्ये “कपिलवस्तूहून गौतमाचे प्रयाण (महाभिनिशक्रमण)” या नावाने प्रसिद्ध असलेल्या प्रसंगाचे चित्रण आहे. हे शिल्प आधीच्या कालखंडातील असल्याने बुद्धांची प्रतिमा चित्रित करण्याची तेंव्हा अनुज्ञा नव्हती. शिल्पात दर्शवलेला कमानीखालील रस्ता कपिलवस्तू नगर आहे. कंथक या नावाचा अश्व या कमानीखालून बाहेर येत आहे. त्या अश्वावर एका सेवकाने छत्र धरलेले आहे. या छत्रामुळे, अश्वावर राजकुमार आरुढ झाला असल्याचा संकेत शिल्पकार देतो आहे. वरच्या बाजूला, एरवी रात्री बंद असलेला कमानीखालील रस्ता या राजकुमारासाठी ज्यांनी प्रवेशद्वार उघडून खुला केलेला आहे असे काही देव दिसत आहेत. खालच्या बाजूला सांची रेलिंगचे डिझाइन कोरलेले आहे.

रोहिणीवर लुब्ध झालेले व तिच्या प्राप्तीसाठी एकमेकाशी भांडणारे देव

एक बौद्ध ग्रंथ धम्मपदत्थकथा यात दिलेल्या रोहिणी खत्तियखन्न या गोष्टीवरून तयार केलेल्या व अत्यंत बारकावे दाखवणार्‍या एका बास रिलिफ शिल्पाकडे शेवटी वळूया. रोहिणी ही एक स्वर्गीय अप्सरा आहे. या अप्सरेवर चार देव अत्यंत लुब्ध झालेले आहेत. या शिल्पात रोहिणी या चार देवांबरोबर दिसते आहे. ते तिला आग्रह करत आहेत की तिने त्यांच्यापैकी एका कोणाचा तरी स्वीकार करावा आणि या साठी ते आपापसात कलह करीत आहेत. अखेरीस या चार देवांपैकी एक देव तिला उचलून देवांमध्ये महान असलेल्या सक या देवाकडे घेऊन जातो आहे. या शिल्पात हा सक देव त्याच्या वैजयंतीप्रासाद या महालात आसनस्थ असलेला दर्शवलेला आहे व त्याच्या मागे एक सौंदर्यवान युवती उभी आहे.

मी वर वर्णन केलेल्या आणि या व्यतिरिक्त अमरावतीमधील इतर पाषाणशिलांवर कोरलेल्या अमरावती शिल्पांच्याही हुबेहुब प्रती, त्या आणि पुढच्या कालात इतर ठिकाणी अनेक शिल्पकारांनी परत परत केलेल्या आढळून आलेल्या आहेत. त्यामुळेच असे म्हणता येते की पाषाणशिल्पांद्वारे कथा कथनाची एक नवीन कला अमरावती येथे जन्माला आली असावी. अमरावती स्तूपाचे हे खरे सौंदर्य आणि वैभव आहे असे मानले जाते. मी अशी कल्पना करतो आहे की हजारोच्या संख्येने बौद्ध भक्तजन आणि भिख्खू, एका बाजूला स्तूप आणि दुसर्‍या बाजूस बाह्य रेलिंग या मध्ये असलेल्या, 13 फूट रुंदीच्या अणि ग्रे रंगाच्या लाइमस्टोन फरशा बसवलेल्या, एका वर्तुळाकार पदपथावरून स्तूपाला प्रदक्षिणा घालत आहेत आणि त्यांच्या बरोबर चालणारे काही भिख्खू, बाजूला दिसणार्‍या पाषाणशिलांवर कोरलेल्या चित्रांमध्ये वर्णन केलेल्या बौद्ध ग्रंथातील प्रसंग आणि जातक कथा त्यांना खुलवून रंगवून सांगत आहेत. मी या प्रसंगाचे जगातील पहिला दृक-श्राव्य शो असेच वर्णन करीन.

अमरावती स्तूपाच्या बांधकामांमध्ये सातवाहन राजांचा किती सहभाग खरोखर होता याबद्दल स्पष्टपणे सांगणे मात्र खरोखरच कठीण आहे. अमरावतीला दोन ऐतिहासिक शिलालेख सापडलेले आहेत. यापैकी पहिल्या शिलालेखात श्री पुळुमवी ( इ.स. 110-138) या राजाचा उल्लेख आढळतो तर दुसर्‍या शिलालेखात शिवस्कंद सातकर्णी ( इ.स.145-175) या सातवाहन राजाचा उल्लेख सापडतो. या शिलालेखांवरून या दोन्ही राजांनी स्तूपाच्या बांधकामाला हातभार लावला होता असे म्हणता येते.

परंतु महाराष्ट्र गॅझेटियरच्या म्हणण्याप्रमाणे जर आंध्र देश, अपिलक किंवा मेघस्वाती या सातवाहन राजांनी इ,स 50 च्या आसपास आपल्या साम्राज्याला जोडला होता असे आपण मानले तर हे मान्य करावे लागते की आंध्र देशावर सातवाहन सत्ता प्रस्थापित होण्याच्या निदान दोनशे-अडीचशे वर्षे आधीपासून या स्तूपाचे बांधकाम चालू होते. ही परिस्थिती सत्य मानली तर हा प्रश्न अनुत्तरित राहतो की कोणत्या राजांनी आपल्या कारकीर्दीत स्तूपाचे कार्य सुरू केले असावे? ते राजे शुंग घराण्यातील होते का ओदिशाच्या खारवेल राजाने हे काम सुरू केले होते?

अमरावती पाषाणांच्या संगतीत गेले दोन तीन तास घालवल्यानंतर माझे मन आणि पाय हे दोन्ही अगदी थकून गेले आहेत याची जाणीव प्रकर्षाने होऊ लागल्याने, मी माझी भेट आवरती घेऊन मला अगदी आवश्यक असलेली विश्रांती घेण्यासाठी आता हॉटेलकडे परततो आहे. हॉटेलला पोचल्यावर गरम गरम चहा प्यायल्यानंतर लोळत असताना माझ्या डोक्यात फक्त अमरावतीच्या स्तूपाचेच विचार आहेत. आणि मग मी एक निर्णय घेतो. मला अमरावतीचा स्तूप जेथे एके काळी उभा होता त्या स्थळाला भेट देणे आवश्यक वाटते आहे. तेथे आता फारसे काही नसले तरी!. मी आज बघितलेले अमरावतीचे पाषाण त्यांच्या स्वत:च्या गोष्टी सांगताहेत हे खरे! पण एक सर्वांकुश चित्र तेथे गेल्याशिवाय माझ्या मनात उभे राहणार नाहीये. अमरावतीला गेल्याशिवाय माझ्या मनाला स्वस्थपणा येणार नाहीये.

15 सप्टेंबर 2014

 
Advertisements

About chandrashekhara

I am a retired electronics engineer. I am interested in writing, reading books. Other hobbies include Paper models, wooden fret work and social networking.

चर्चा

अद्याप प्रतिक्रिया नाहीत.

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदला )

Connecting to %s

जुने लेख शोधा

Enter your email address to subscribe to this blog and receive notifications of new posts by email.

Join 387 other followers

MyFreeCopyright.com Registered & Protected

माझे नवीन इ-पुस्तक

एका साम्राज्याच्या शोधात

Advertisements
%d bloggers like this: