.
History इतिहास, Travel-पर्यटन, Uncategorized

दीपगिरी अमरावती- भाग 3


(मागील भागावरून पुढे)

अमरावती स्तूपाच्या स्थानावर केलेल्या उत्खननांमधून प्राप्त झालेल्या पाषाण शिला चेन्नई संग्रहालयामध्ये एक विशेष कक्ष निर्माण करून मोठ्या सुबक रितीने मांडून ठेवलेल्या आहेत हे आपण वर बघितलेच आहे. ही मांडणी, प्रेक्षकांना या शिलांवरील शिल्पकाम सहज रितीने बघता यावे व ते करणार्‍या कारागिरांचे कौशल्य त्यांना सहजपणे वाखाणता यावे अशीच केलेली आहे हे मला या कक्षात प्रवेश केल्यापासून सतत जाणवते आहे. या सर्व शिलांचे वैशिष्ट्य हे आहे की अगदी लघु आकारातील तुकडे ते अवाढव्य पाषाण या सर्वांवर केलेले बास रिलिफ पद्धतीचे शिल्पकाम, व ते करणार्‍या शिल्पकारांची कारागिरी अत्यंत अजोड आणि अप्रतिम आहे. हा प्रकल्प 2000 वर्षांपूर्वीचा आहे हे लक्षात घेतल्यावर या कालखंडात सुद्धा भारतात शिल्पकला केवढी प्रगल्भ आणि विकसित झालेली होती हे कोणाच्याही सहजपणे लक्षात येईल. या प्रकल्पाची एकूण व्याप्ती बघितली तर हा सर्व प्रकल्प काही थोड्या दशकांत किंवा एखाद्या शतकामध्ये पूर्ण झालेला नाही हे लगेच लक्षात येऊ शकते. या स्तूपावरच्या पाषाणशिलांवरील बास रिलिफ शिल्पकाम हे यापेक्षाही बर्‍याच मोठ्या कालखंडात सतत चालू राहिले असले पाहिजे. या शिल्पांचे डिझाइन, त्यांच्या थीम्स इतक्या विविध प्रकारच्या आहेत की त्यावरून सुद्धा या प्रकल्पाच्या कालखंडाबाबत अंदाज बांधणे शक्य होते. उदाहरणार्थ पुष्पहारवाहकांनी थोड्या थोड्या अंतरावर उचलून धरलेल्या अखंड पुष्पहाराची थीम विचारात घेता येते. ही थीम गांधार कलेचा अमरावती येथील काही ठिकाणच्या कारागिरीवर असलेला जबरदस्त प्रभाव थेटपणे दाखवते. महत्त्वाची गोष्ट म्हणजे या प्रभावावरून हे शिल्पकाम इ.स नंतरच्या काही शतकांमधील असले पाहिजे हा निष्कर्ष काढणे सहजपणे शक्य होते. परंतु या सूक्ष्म बारकाव्यांमध्ये जाण्याआधी या स्तूपाची संपूर्ण वास्तू कशी दिसत असेल या बद्दल या विषयातील तज्ञ-संशोधकांचे काय मत आहे हे बघणे रोचक ठरेल असे मला वाटते.

या वास्तूच्या शोधाचा जो इतिहास आपण वर बघितला आहे त्याप्रमाणे मॅकेंझी याने जेंव्हा या स्थानाला प्रथम भेट दिली होती तेंव्हा हा स्तूप मातीत गाडला गेलेला असल्याने तेथे फक्त एक टेकाड होते. मात्र मॅकेंझीने अतिशय सूक्ष्म दृष्टीने निरिक्षणे करून स्तूपाची अनेक स्केचेस काढली होती व कोणताही आळस न करता जे जे त्याने समोर बघितले होते त्याची बारकाईने टाचणे करून ठेवली होती. मी वर म्हटल्याप्रमाणे पुढच्या कालात या स्तूपाच्या स्थानावर अनेक वेळा उत्खनन केले गेल्याने स्तूपाच्या मूळ वास्तूचा उत्तरोत्तर विध्वंस होत गेला. मात्र हा स्तूप प्रत्यक्षात कसा दिसत असेल याचे चित्रण कागदावर करण्याचे श्रेय कोलकाता येथील व्हिक्टोरिया मेमोरियलचे पूर्व संचालक आणि भारतीय शिक्षण खात्यातील एक ब्रिटिश अधिकारी, मिस्टर पर्सी ब्राऊन यांनाच द्यावे लागते. मॅकेंझी आणि सेवेल या दोना ब्रिटिश अधिकार्‍यांनी मागे ठेवलेली टाचणे, आंध्र देशात केलेल्या उत्खननांमुळे प्रकाशात आलेल्या इतर काही बौद्ध स्तूपांची रचना आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे अमरावती स्तूपावरील काही पाषाणशिलांवरच कोरलेली स्तूप कसा दिसत होता याची पाषाणशिल्पे या तिन्ही आधारांचा वापर करून पर्सी ब्राऊन यांनी कागदावर स्तूपाच्या बांधणीचे चित्र तयार केले होते. पर्सी ब्राऊन यांनी केलेल्या चित्रणाप्रमाणे या स्तूपाची एकूण बांधणी होती तरी कशी?

बाह्य रेलिंगमधील माथ्यावर बसवलेल्या पाषाणशिलेचा खंडित अंश; बौद्ध पुराणांत यावर कोरलेला देखावा “मायादेवीचे स्वप्न” या नावाने परिचित आहे.

पाषाणशिलांपासून बनवलेले आणि 192 फूट व्यासाचे एक वर्तुळाकार रेलिंग ही या वास्तूची बाह्यसीमा होती. चार मुख्य दिशांना असलेल्या प्रवेशद्वारांमुळे हे रेलिंग चार ठिकाणी खंडित झालेले दिसत असे. या चार द्वारांपैकी प्रत्येक द्वाराच्या दोन्ही कडांना 3 फूट रुंद आणि 9 फूट उंच या आकाराचे पाषाण स्तंभ उभारलेले होते. प्रत्येक स्तंभाच्या डोक्यावर 1 फूट जाड आणि 2:1/2 उंच या आकाराची एक पाषाणशिला माथ्याची शिला(coping) म्हणून बसवलेली होती.या बाह्य रेलिंगवर एकूण असे 136 पाषाण स्तंभ उभे होते व त्यांच्या डोक्यावर एकूण 800 फूट लांबी असलेल्या पाषाणशिला बसवलेल्या होत्या. उभ्या पाषाण स्तंभांना आधार म्हणून प्रत्येक स्तंभांच्या जोडीच्या मध्ये 3 फूट व्यासाची गोलाई दिलेले तीन आडवे स्तंभ किंवा क्रॉसबार (crossbars) बसवलेले होते. उभे पाषाण स्तंभ आणि त्यांच्या माथ्यावरच्या शिला आणि स्तंभांची जोडी आणि त्यांच्यामधल्या क्रॉसबार पाषाणाशिला या एकमेकाशी दोषविरहित कसूविंधीच्या सांध्यांनी (perfect Mortis and Tenon joints.) एकत्र जोडलेल्या होत्या. रेलिंगच्या संपूर्ण परिघाच्या लांबीवर बसवलेल्या माथ्यावरच्या पाषाणशिलांच्या (coping) दोन्ही दर्शनी पृष्ठभागांवर(faces), बास रिलिफ पद्धतीचे शिल्पकाम कोरलेले होते. यापैकी बाह्य दर्शनी पृष्ठभागावर एक सलग पुष्पहार कोरलेला होता. रेलिंगच्या संपूर्ण परिघावर थोड्या थोड्या अंतराने पुष्पहारवाहक कोरलेले होते व हे वाहक हा पुष्पहार आपल्या हातांनी उंच धरत असल्याची चित्रे कोरलेली असल्याने संपूर्ण पुषपहाराला एखाद्या लाटेचे किंवा लहरीचे स्वरूप प्राप्त झालेले दिसत होते. रेलिंगच्या माथ्यावरच्या पाषाणशिलांच्या स्तूपाच्या घुमटाच्या बाजूचा किंवा आतील दर्शनी पृष्ठभाग हा बुद्धाच्या या जन्मातील आणि पूर्वजन्माच्या आयुष्यांमधील कथांवर आधारलेले बास रिलिफ शिल्पकाम करण्यासाठी म्हणून खास आरक्षित ठेवलेला होता. त्यामुळे बौद्ध धर्मीय श्रद्धाळू भक्तजन जेंव्हा या रेलिंगच्या आतल्या बाजूने स्तूपाला प्रदक्षिणा घालत असत त्या बेळेस धर्मग्रंथांमधील लिखित स्वरूपातील मजकूर, प्रत्यक्ष चित्रस्वरूपात त्यांच्या नजरेसमोर सतत येत रहावा अशी व्यवस्था केलेली होती. रेलिंगमधील उभ्या स्तंभांवर, फुललेले कमल, बोधी वृक्ष, धर्मचक्र आणि स्तूप या सारखी बौद्ध धर्मातील पवित्र चिन्हे मुख्यत्वे कोरलेली होती. या शिवाय स्तंभांच्या प्रत्येक जोडीच्या मधे बसवलेल्या वर्तुळाकार आकाराच्या तिन्ही आडव्या किंवा क्रॉसबार पाषाणशिलांच्या दोन्ही दर्शनी पृष्ठभागांवर सुद्धा शिल्पकाम केलेले होते. यापैकी बाह्य दर्शनी पृष्ठभागावर मुख्यत्वे कमलपुष्पे कोरलेली होती तर आतील बाजूच्या पृष्ठभागांवर बुद्धाच्या आयुष्यातील अनेक प्रसंग कोरलेले होते. या क्रॉसबार पाषाणशिलांच्या आतील दर्शनी पृष्ठभागांवर केलेले कोरीव काम, संपूर्ण स्तूपामध्ये असलेल्या कोरीव कामामधील सर्वोत्कृष्ट कलाकृती असल्याचे आणि अमरावतीच्या शिल्पकारांनी येथे घड्वलेल्या कलाकृती त्यांच्या प्रतिभेची आणि कलाकौशल्याची सर्वोच्च पोचपावती सतत देत राहतात असे शिल्पकलेतील तज्ञ मंडळी मानतात. प्रत्येक प्रवेशद्वाराच्या बाजूस असलेल्या स्तंभांच्या माथ्यावरील पाषाणशिलांवर, शिरावर मुगुट ठेवावा तसे दिसणारे, चार बैठे पाषाणसिंह बसवलेले दिसत. यापैकी दोन पाषाणसिंह एकमेकाकडे दृष्टी लावून बसलेले असत तर दोन बाहेर बघत असत.

 

स्तूपावरच्या पानपट्टीवर ( frieze) कोरलेला पुष्पहार आणि वाहक

या बाह्य रेलिंगच्या आंत 13 फूट रुंदी असलेला एक वर्तुळाकार प्रदक्षिणा पथ बनवलेला होता. या प्रदक्षिणा पथावर ग्रे रंगाच्या लाइमस्टोन पाषाणाचे तुकडे बसवलेले होते. या प्रदक्षिणा पथाच्या आतल्या बाजूस आणखी एक वर्तुळाकार रेलिंग स्तूपाला अगदी चिकटून असे बांधलेले होते. हे वर्तुळाकार रेलिंग 4 फूट उंच आणि 162 फूट व्यासाचे होते. हे संपूर्ण रेलिंग अत्यंत सुंदर अशा बास रिलिफ शिल्पांनी सजवलेल्या  फरश्यांमधून बांधलेले होते.

  

स्तंभाचा खंडित भाग: असिता सुयोधनाला भेटतात

या आतील रेलिंगमध्ये बसवलेल्या पाषाण फरश्यांमधे स्तंभांचे आकार कोरलेल्या पाषाण फरश्या उभ्या केलेल्या होत्या.( Pillasters) या फरश्यांवर सुद्धा सुद्धा अतिशय बारकाईने केलेले शिल्पकाम होते. या रेलिंगच्या पाषाण फरश्यांच्या थोड्या वर असलेल्या स्तूपाच्या भागावर, पाषाण फरश्यांतूनच बनवलेली एक सलग वर्तुळाकार पानपट्टी (frieze) बसवलेली होती व हा भाग त्या योगे सुशोभित केलेला होता. ही पानपट्टी आणि रेलिंगच्या पाषाण फरश्या या मधील चिंचोळ्या जागेत आणि पानपट्टीच्या वरच्या बाजूस अशा दोन ठिकाणी संपूर्णा स्तूपाच्या परिघावर सलग रित्या कोपिंग पाषाण बसवलेले होते. या दोन ठिकाणी बसवलेल्या या कोपिंग पाषाण वर्तुळांमुळे, रेलिंग, पानपट्टी आणि स्तूपाच्या घुमटाची भिंत या तिन्ही गोष्टींना मोठा उठाव आल्यासारखा दिसत असे. बर्जेस स्तूपाचे वर्णन करताना लिहितो.

 

स्तूपावर बसवलेली  फरशी: एक राजा त्याच्या दोन भार्यांसह

” आतील वर्तुळाकार रेलिंग ज्या पाषाण फरश्यांचे बनवलेले होते त्यावरील शिल्पकाम अत्यंत सौंदर्यपूर्ण होते असे खात्रीलायकपणे म्हणता येते. ही शिल्पे आकाराने लहान होती व अत्यंत सुंदर पद्धतीने कोरलेल्या मानवी आकृत्या, शृंखला आणि इतर सुशोभनाने परिपूर्ण होती. या पाषाणशिलांच्या बाजूंना सिंह, अश्व किंवा स्त्री-पुरुष यांच्या आकृत्यांनी सजवलेले स्तंभ होते आणि स्तंभांच्या माथ्यावर असलेल्या तुळईवर विस्मयाने चकित झालेल्या किंवा भक्तीरसात बुडून गेलेल्या मानवी आकृत्या होत्या. या सर्व पाषाण फरश्या पक्क्या चुन्यामधे बसवून एकसंधपणे एकमेकाला जोडलेल्या होत्या आणि पाठीमागच्या बाजूला असलेल्या 4 फूट उंचीच्या पक्क्या भिंतीच्या आधारावर उभ्या केलेल्या होत्या. या सर्व पाषाण फरश्या साधारणपणे 6 ते 9 इंच जाडीच्या आणि आयताकृती आकाराच्या आहेत. यापैकी बहुतेक फरश्या ब्रिटिश संग्रहालयात आहेत परंतु थोड्या चेन्नई संग्रहालयात सुद्धा बघता येतात.”

“ The slabs composing the inner circle are remarkable for the beauty of the sculptures upon them, which are small and consist of figures, festoons and a variety of ornaments very neatly executed. On the sides are pillars, which are either finished with figures of lions and horses, or of men and women; and over the top is an entablature replete with figures in various acts of devotion or amusement. These inner slabs have been cemented to each other with strong mortar, and supported by a wall of masonry rising to a moderate height (4 feet) in the rear. Slabs are either 6 or 9 inches thick and of rectangular shape. Most of the slabs are at British Museum, yet a few finest in Madras.”

 

यक्षिणीचे चित्र कोरलेल्या खांबाचा एक खंडित भाग

प्रत्यक्ष स्तूपाचा लंबगोल साधारण 6 फूट उंचीचा होता आणि त्याच्या तळाच्या परिघावर वर वर्णन केलेल्या 4 फूट उंचीच्या पाषाण फरश्या बसवलेल्या होत्या. या तळाच्या लंबगोलाच्या वर असलेली घुमटाची भिंत सरळ 20 फूट उंचीपर्यंत किंवा तळाच्या लंबगोलापासून 14 फुटापर्यंत वर सरळ उभी गेलेली होती. ही स्तूपाची भिंत संपूर्णपणे कलात्मक शिल्पकाम केलेल्या मोठ्या पाषाण फरश्यांनी झाकलेली होती. या पाषाणा फरशांच्या माथ्यावर परत दोन पानपट्ट्या बनवलेल्या होत्या. या पैकी खालच्या पानपट्टीवर एकमेकामागे धावणार्‍या पशुंची चित्रे कोरलेली होती तर वरच्या पानपट्टीवर त्रिशूळ चिन्हे कोरलेली होती. या पानपट्ट्यांच्या वरच्या भागापासून स्तूपाचा घुमट वक्राकार आकार घेत होता. या सर्व वक्राकार घुमटाला वाळूचुन्याच्या मिश्रणाचे प्लास्टर किंवा आवरण केलेले होते आणि त्यावर कमल पुष्पे ठेवलेली पुष्पपात्रे आणि थोड्या थोड्या अंतरावर कोरलेल्या यक्ष आकृत्या व त्या आकृत्या उचलून धरत असलेली एक सलग पुष्पमाला यांचे डिझाइन कोरलेले होते. घुमटाच्या माथ्यावर चोरस आकाराचे आनखी एक रेलिंग बांधलेले होते. या चौरसाची प्रत्येक बाजू 26 फूट रुंद होती. या चौरसाच्या मध्यभागी एक उंच अष्टकोनी स्तंभ आणि इतर काही लघु स्तंभ उभे केलेले होते. बहुढा हा संपूर्ण घुमट पांढर्‍या रंगात रंगवलेला होता आणि पानपट्यांवरील डिझाइन सोनेरी रंगात रंगवलेले होते. या सर्व वर्णनावरून हा स्तूप किती विस्मयकारक आणि नेत्रदीपक दिसत असला पाहिजे याची सहजतेने कल्पना येऊ शकते.

धावणार्‍या पशुंची चित्रे कोरलेली पानपट्टी

चारी प्रमुख दिशांना आणि प्रवेशद्वारांच्या बरोबर समोर येईल अशा रितीने, स्तूपाचा तळाचा लंबगोल, 32 फूट लांब आणि 6 फूट रुंद एवढ्या आकाराचे बांधलेले कट्टे लंबगोलाला जोडून विस्तारलेला होता. या कट्ट्यांवर आणि प्रत्येक प्रवेशद्वारासमोर, 10 ते 14 फूट उंचीचे, पायाला चौरस व वर अष्टकोनी आकार असलेले, सुईसारखे दिसणारे 5 स्तंभ उभे केलेले होते. या सर्व भागावर आच्छादन करणार्‍या पाषाण फरश्यांवर कमानी आणि स्तूप या सारखी बौद्ध सांकेतिक चिन्हे कोरलेली होती.

भव्य स्तूपाचे एक मॉडेल

मला खात्री वाटते की या वर्णनावरून वाचकांना ही वास्तू तिच्या वैभव कालात किती भव्य आणि नेत्रदीपक दिसत असली पाहिजे याची थोडीफार तरी कल्पना येऊ शकेल. यानंतर अमरावती येथे असलेल्या या स्तूपाच्या सौंदर्यात भर टाकणार्‍या काही पाषाण शिल्पांकडे आपण वळूया.

(क्रमश:)

1 सप्टेंबर 2014

Advertisements

About chandrashekhara

I am a retired electronics engineer. I am interested in writing, reading books. Other hobbies include Paper models, wooden fret work and social networking.

चर्चा

अद्याप प्रतिक्रिया नाहीत.

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s

जुने लेख शोधा

Enter your email address to subscribe to this blog and receive notifications of new posts by email.

Join 387 other followers

MyFreeCopyright.com Registered & Protected

माझे नवीन इ-पुस्तक

एका साम्राज्याच्या शोधात

Advertisements
%d bloggers like this: