.
History इतिहास

दीपगिरी अमरावती भाग1


 

दख्खनच्या पठारावर विस्तारलेल्या सह्याद्री किंवा सातमाला या सारख्या पर्वतराजी आणि सौराष्ट्रातील गिरनार पर्वत यांच्या कडेकपारींमध्ये, .. पूर्वकालात खोदल्या गेलेल्या बौद्ध गुंफाना भेटी देण्याचा एक उपक्रम मी वर्ष दोन वर्षांपूर्वी राबवला होता. दख्खनच्या पठारावर त्या काळात राज्य करीत असलेल्या सातवाहन साम्राज्याने या बौद्ध गुंफांमध्ये मागे सोडलेल्या खाणाखुणा शोधण्याचा एक यत्न करणे हा त्या उपक्रमामागे असलेला माझा हेतू होता व तो बर्‍यापैकी सफल करण्यात मी यशस्वी झालो होतो असे मी आता समाधानाने म्हणू शकतो. माझ्या या भेटींमुळे व त्यांच्या अनुषंगाने केलेल्या या गुंफातील शिलालेखांच्या अध्ययनांमुळे, एक गोष्ट मला स्पष्टपणे लक्षात आली होती की सातवाहन साम्राज्याच्या कीर्तीचे आणि वैभवाचे दिवस इ.. नंतरचे दुसरे किंवा तिसरे शतक या कालखंडात खात्रीलायकपणे हरपले होते. कार्लें आणि नाशिक येथील गुंफांमध्ये असलेल्या शिलालेखांत प्रख्यात सातवाहन सम्राट गौतमीपुत्र याच्या नंतर त्याचा पुत्र असलेला वशिष्ठिपुत्र पुळुमवी हा सातवाहनांच्या राजसिंहासनावर आरूढ होता असा स्पष्ट संदर्भ मिळतो. परंतु पश्चिम महाराष्ट्रातील बौद्ध गुंफांमधील शिलालेखांतील सातवाहन राजघराण्यासंबंधीचे सर्व उल्लेख पुळुमवी याच्या राज्यकालाबरोबरच संपल्याचे आढळून येते आणि माझ्या (अपुर्‍या असलेल्या) ज्ञानानुसार तरी सातवाहन राजघराण्याच्या याच्या पुढच्या पिढ्यांतील कोणत्याही सम्राटाचे नाव या बौद्ध गुंफांमधील कोणत्याच शिलालेखात दिसत नाही. यामुळे सातवाहन साम्राज्याच्या खाणाखुणा शोधण्याचा माझा यत्न या पुढे पश्चिम महाराष्ट्र किंवा पश्चिम दख्खनमध्ये चालू ठेवण्याने आणखी काहीच प्राप्त होणार नाही हे लक्षात आल्याने येथेच थांबणे मला आवश्यक वाटले.

मात्र एक गोष्ट लक्षात घेणे आवश्यक वाटते की कीर्ती आणि वैभवाच्या शिखरावर असलेल्या सातवाहन साम्राज्याचा त्या कालखंडातील विस्तार, हा पश्चिम महाराष्ट्रापुरताच मर्यादित नव्हता तर या साम्राज्याची सीमा पूर्वेकडच्या आंध्र प्रदेशाला लागून असलेल्या बंगालच्या उपसागराच्या समुद्र तटापर्यंत पसरलेली होती. काही इतिहासकार असे समजतात की वशिष्ठिपुत्र पुळुमवी या सम्राटाने आपल्या राज्यकालात आंध्र प्रदेश पादाक्रांत करून सातवाहन साम्राज्याला प्रथम जोडला. परंतु महाराष्ट्र गॅझेटियर असे सांगतो की याच्या बर्‍याच आधी म्हणजे इ..नंतरच्या पहिल्या शतकाच्या मध्यास, अपिलक किंवा मेघस्वाती या सातवाहन सम्राटांच्या राज्यकालात, बहुधा आंध्र प्रदेश सातवाहन साम्राज्याला जोडला गेलेला असावा. याचा स्पष्ट पुरावा, आंध्र प्रदेशातील अनेक ठिकाणी सातवाहन कालातील नाणी सापडत असल्याने मिळतो असे गॅझेटियरकारांना वाटते. सत्य काय असेल ते असो! माझ्या दृष्टीने एक गोष्ट यामुळे स्पष्ट झाली की सातवाहनांच्या खाणाखुणा शोधण्याचा या पुढचा प्रयत्न पश्चिम महाराष्ट्रामध्ये न करता आंध्र प्रदेशामध्ये करणे योग्य ठरावे. आंध्र प्रदेशामधे असलेल्या आणि प्राचीन काळच्या खाणाखुणा अंगावर बाळगणार्‍या स्थानांबद्दल मग मी वाचन सुरू केले व त्यामधे अमरावती येथे असलेल्या एका प्राचीन बौद्ध स्तूपाबद्दलची माहिती माझ्या नजरेसमोर प्रथम आली.

अमरावती हे छोटेखानी गाव, नुकतेच विभाजन झालेल्या आंध्र प्रदेश राज्यामधील गुंटुर या शहरापासून सुमारे 35 किमी अंतरावर, कृष्णा नदीच्या दक्षिण किनार्‍यावर वसलेले आहे. स्थानिक किंवा तेलगू भाषेमध्ये या गावाला दिपल्दिन्नेकिंवा मराठीमध्ये भाषांतर करायचे तर दीपगिरीया नावाने ओळखले जाते. अमरावती गाव आणि परिसर हे इ.. पहिले शतक किंवा त्याच्याही आधीच्या कालापासून बौद्ध धर्मियांसाठी असलेले एक महत्त्वाचे धार्मिक स्थळ आणि प्रशिक्षण केंद्र होते. सातव्या शतकात भारत भेटीवर आलेला प्रख्यात चिनी भिख्खू शुएन झांग हा आपल्या प्रवासवर्णनात अमरावतीबद्दल लिहितो:

अमरावती मधे असलेले बरेचसे बौद्ध मठ जरी आता उजाड अवस्थेत असले तरी सुमारे एक हजार बौद्ध भिख्खूंचे वास्तव्य असलेले कमीत कमी 20 तरी बौद्ध मठ येथे आजमितीला कार्यरत आहेत.”

वाचकांना हे वाचून कदाचित मोठे आश्चर्य वाटेल की देशाच्या दुर्लक्षित अंतर्भागात असलेल्या या अमरावती सारख्या ठिकाणी व शुएन झांगच्या प्रवासवर्णनात जिचा साधा उल्लेख सुद्धा सापडत नाही अशी एक भव्य वास्तू येथे सातवाहन कालात अस्तित्वात होती. केवळ ताज महाल या वास्तूशी तुलना करता येणे शक्य असलेल्या या वास्तूला प्रत्येक दिवशी हजारोंनी बौद्ध धर्मीय आणि भिख्खू भेट देत असत. एक भव्य बौद्ध स्तूप या स्वरूपात असलेली ही वास्तू पुढे कालौघात काही अनाकलनीय कारणांमुळे लोकांच्या विस्मरणात गेली आणि येथे एक मातीचे टेकाड तेवढे उरले. या टेकाडाला पुढे पुढे स्थानिक लोक दिपल्दिन्नेकिंवा मराठीमध्ये दीपगिरीया नावाने ओळखू लागले आणि अमरावती गावाचेही हेच रूढ नाव बनले.

1796 या वर्षी एका स्थानिक जमीनदाराने अमरावती गावामध्ये आपला वाडा बांधण्याचे ठरवले व त्यासाठी लागणारा दगड, तो जवळपास असलेल्या टेकड्यांवर मिळेल का हे पहाण्यासाठी या टेकड्यांवर खोदकाम करून घेऊ लागला. या प्रयत्नात त्याच्या लोकांनी दीपगिरी टेकडीवरही खोदकाम केले आणि या खोदकामात जेंव्हा अप्रतिम शिल्पकाम केलेल्या संगमरवरी किंवा लाइमस्टोन प्रकारातील पाषाण शिळा खोदणार्‍यांना सापडल्या तेंव्हा सर्वानाच मोठे आश्चर्य वाटल्याशिवाय राहिले नाही. त्या भागातील निवासी ब्रिटिश अधिकारी कर्नल कॉलिन मॅकेंझी याच्या कानावर हे वृत्त थोड्याच दिवसात गेले. हा अधिकारी पुरातन वस्तूंचा संग्राहक व पुरातत्त्व विषयाचा अभ्यासू असल्याने त्याने लगेचच या टेकाडाला भेट दिली व त्याच्या हे लक्षात आले की समोरचे टेकाड म्हणजे सुमारे 90 फूट व्यास आणि 20 फूट उंची असलेला एक स्तूप असला पाहिजे. पुढे 18 वर्षे काहीच घडले नाही. पण 1816 या वर्षी मॅकेंझी आपल्या बरोबर ड्राफ्ट्समेन आणि सर्व्हेयर्स यांचा एक गट घेऊन या स्थानावर अवतीर्ण झाला. हा मधला काळ बहुधा उत्खनन करण्यासाठी आवश्यक त्या सरकारी परवानग्या मिळवण्याच्या प्रयत्नात त्याने घालवला असावा. पुढची 2 वर्षे या गटाने अमरावती स्तूपाचे अत्यंत बारकाईने केलेले आराखडे आणि चित्रे तयार करण्यात व्यतीत केली.

अमरावती स्तूपाच्या शोधाची बातमी जसजशी ब्रिटिश अधिकार्‍यांमध्ये प्रसृत झाली तसतशी या स्तूपाच्या शिल्पे कोरलेल्या शिळा आपल्या ताब्यात घेण्याची एक स्पर्धाच या अधिकार्‍यांमध्ये सुरू झाली. यापैकी बर्‍याचशा शिळा या अधिकार्‍यांनी भारतात असलेल्या निरनिराळ्या ठिकाणच्या संग्रहालयांनाही भेट म्हणून दिल्या. यानंतर 1845 मध्ये आणखी एका ब्रिटिश अधिकार्‍याने स्तूपाच्या नैऋत्य भागात उत्खनन केले व तेथेही त्याला शिल्पकाम केलेल्या शिळांचे असंख्य तुकडे सापडले. या शिळा व तुकडे त्याने चेन्नई यथे पाठवून दिले व तेथे या शिळा व तुकडे बाहेरच्या हवामानाला तोंड देत दुर्लक्षित अवस्थेत पडून राहिले. 1856 मध्ये चेन्नई संग्रहालयाची स्थापना झाली. या संग्रहालयाचा प्रमुख एडवर्ड बेल्फोर याने हे तुकडे एकत्रित करून त्यांचा कॅटॅलॉग बनवण्यास प्रारंभ केला. यापैकी 121 शिळा, 1959 मध्ये इंग्लंडला पाठवून देण्यात आल्या. इंग्लंडमध्ये या शिळा कोणी वाली नसल्यासारख्या एका संग्रहालयाकडून दुसरीकडे जात राहिल्या व अखेरीस 1880 मध्ये ब्रिटिश म्युझियम येथे पोचल्या. या शिळा या संग्रहालयात अखेरीस प्रदर्शनासाठी ठेवल्या गेल्या व आजमितीस त्या तेथेच आहेत. याच वर्षी मद्रासचा गव्हर्नर असलेल्या ड्यूक ऑफ बकिंगहॅम याने या स्तूपाच्या जागेचे संपूर्ण उत्खनन करण्याची ऑर्डर काढली. या उत्खनानंतर स्तूपाच्या जागेवर फक्त एक मोठा खड्डा तेवढा उरला. मात्र या उत्खननात स्तूपाच्या बाहेरील बाजूस उभारण्यात आलेल्या रेलिंगच्या शिळा प्रामुख्याने सापडल्या आणि अशा 400 शिळा चेन्नई यथे पाठवून देण्यात आल्या. या शिळा चेन्नई संग्रहालयात आजमितीसही बघता येतात. उरलेल्या थोड्या शिळा आणि भारतीय पुरातत्त्व खात्याने नंतर केलेल्या उत्खननात सापडलेल्या आणखी काही शिळा या स्तूपाच्या जागेजवळ उभारलेल्या एका संग्रहालयात आजही प्रदर्शित केलेल्या आहेत.

सातवाहन साम्राज्याच्या कालखंडात निर्माण झालेल्या व सातवाहन राजांनी जिच्या निर्मितीस हातभार लावला होती त्या इ.. पहिले किंवा दुसरे शतक या सुमारास निर्माण झालेल्या वास्तूची अखेरीस कशी वाताहात झाली याची ही कहाणी दुर्दैवीच म्हटली पाहिजे. शोध लागल्यानंतर या वास्तूची पुनर्बांधणी न करता तिचे तुकडे इतस्ततः पाठवले गेल्याने, पुढच्या पिढ्यांनी, भारताच्या इतिहासातील एका गौरवशाली कालखंडामधे बांधलेली व ताज महालाशीच जिची तुलना करणे शक्य आहे अशी एक भव्य वास्तू बघण्याची सुवर्णसंधी कायमची गमावली असेच म्हणावे लागते.

अमरावती स्तूपाचे मॉडेल

हे सगळे वाचल्यानंतर वाचकांचे कुतुहूल नक्कीच जागे झाले असणार की ही भव्य वास्तू प्रत्यक्षात कशी दिसत असेल? या वास्तूच्या मध्यभागी 148 फूट व्यासाचा असा एक भव्य घुमट होता. या घुमटाभोवती अप्रतिम शिल्पे कोरलेली आणि पाषाण शिळांमधून तयार केलेली दोन रेलिंग उभारलेली होती. यापैकी आतल्या बाजूचे रेलिंग घुमटाच्या लगत अगदी चिकटून उभे केलेले होते व त्यावर सर्व प्रकारचे नक्षीकाम केलेले होते. बाहेरचे आणि 192 फूट व्यास असलेले रेलिंग लाइमस्टोन प्रकारच्या पाषाणातून निर्माण केलेले होते आणि त्यावर बुद्धाच्या आयुष्यकालातील व जातक कथांमधील अनेक प्रसंग कोरलेले होते.

या भव्य वास्तूचे कालौघात संपूर्ण विस्मरण होऊन ती पूर्णपणे दुर्लक्षित का व कशी झाली? याची काहीच माहिती कोठेही मिळत नाही. हळूहळू या वास्तूचे रुपांतर दगडधोंड्याच्या ढिगार्‍यामध्ये झाले झाले आणि अनेक शतकांनंतर यथे फक्त एक मातीचे टेकाड तेवढे उरले. हा स्तूप विस्मरणात गेल्यावर जवळचे प्रसिद्ध अमरावती गाव सुद्धा आंध्रदेशाच्या अंतर्भागातील एक सर्व सामान्य गाव बनले व बौद्ध धर्मियांच्या स्मरणातून पुसले गेले.

स्तूपाचे स्वयंशिल्प कोरलेली अमरावती स्तूपातील एक शिळा

सातवाहन सम्राट वशिष्ठिपुत्र पुळुमवी याच्या राज्यकालाकडे परत वळूया. महाराष्ट्र गॅझेटियरप्रमाणे आंध्र देशात, या राजाचे नाव असलेली नाणी आणि अमरावती स्तूपावल कोरलेल्या शिलालेखामध्ये सापडलेला या राजाचा उल्लेख या पुराव्यांवरून आंध्र देशावर या राजाचे संपूर्ण वर्चस्व असल्याचे दिसून येते. अमरावती स्तूपाच्या बाहेरच्या रेलिंगवर हा शिलालेख कोरलेला होता व या राजाच्या राज्यकालात स्तूपाच्या वास्तूमध्ये अनेक नवीन बदलांचा समावेश केला गेला असल्याचा उल्लेख त्यात सापडतो.

अमरावती स्तूपाबद्दलची वर्णने वाचल्यानंतर एक गोष्ट माझ्या चांगलीच लक्षात आली की प्रत्यक्षात स्तूपाच्या जागेवर आता एक लहान संग्रहालय सोडले तर बघण्यासारखे असे फारसे काहीच उरलेले नाही. स्तूपाच्या बाहेरील बाजूस जडवलेल्या, संगमरवरी किंवा लाइमस्टोन पाषाणातील शिल्पकाम केलेल्या शिळा एकतर लंडनमधील ब्रिटिश म्युझियम मध्ये आहेत किंवा चेन्नई संग्रहालयात हलवल्या गेल्या असल्याने त्या तेथेच बघणे शक्य आहे. काही थोड्या शिळा मी नवी दिल्ली यथील राष्ट्रीय संग्रहालयात बघितल्या होत्या याचेही स्मरण मला झाले. त्यामुळे सध्या तरी अमरावती गावाला भेट देण्याचा बेत आखण्यात मला काहीच स्वारस्य उरले नाही. लंडन मधील संग्रहालयाला भेट देण्याची सुतराम शक्यता नसल्याने, चेन्नई येथील सरकारी संग्रहालयाला प्रथम भेट देऊन अमरावती शिळा बघाव्या आणि त्यानंतर अमरावतीला जायचे का नाही हे ठरवावे असा निर्णय मी घेतला.

बर्‍याच विचारमंथनानंतर मी अखेरीस चेन्नईला संग्रहालय बघण्यासाठी म्हणून निघालो आहे. माझे विमान चेन्नई विमानतळावर उतरते आहे तोवर सकाळचे 8.30 वाजून गेले आहेत. विमानतळावरच्या आगमन कक्षातून मी सामान घेऊन बाहेर पडतानाच गरम आणि दमट हवेचा एक भपकारा माझ्या अंगावर आदळतो आणि चेन्नईमधील सर्वसाधारण दिवसांप्रमाणेच आजचा दिवस सुद्धा माझ्यासाठी बराच त्रासदायक आणि क्लेशकारक असणार आहे हीही माझ्या लक्षात येते आहे. एक सुस्कारा सोडून मी एक वातानुकूलित टॅक्सी बूक करतो आणि मी रहाण्याचे ठरवले आहे त्या यथून 20 किमी तरी अंतरावर असलेल्या कोडमबक्कम रोडवरील हॉटेल पाम ग्रोव्हकडे जायला निघतो. चेन्नईला ही माझी पुनर्भेट निदान 20 वर्षांच्या कालावधीनंतर होते आहे पण चेन्नई मधे एक डोक्यावरून जाणारी मेट्रो लाइन सोडली तर तसा काही खूप फरक झालेला नाही हे मला जाणवते आहे. हॉटेलमध्ये मी चेक इन करतो, खोलीत जाऊन जरा फ्रेश होतो व परत खाली येऊन एग्मोर संग्रहालयाकडे जाण्यासाठी रिक्षा पकडतो.

(क्रमश🙂

13 ऑगस्ट 2014

Advertisements

About chandrashekhara

I am a retired electronics engineer. I am interested in writing, reading books. Other hobbies include Paper models, wooden fret work and social networking.

चर्चा

अद्याप प्रतिक्रिया नाहीत.

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदला )

Connecting to %s

जुने लेख शोधा

Enter your email address to subscribe to this blog and receive notifications of new posts by email.

Join 387 other followers

MyFreeCopyright.com Registered & Protected

माझे नवीन इ-पुस्तक

एका साम्राज्याच्या शोधात

Advertisements
%d bloggers like this: