.
ताज्या घडामोडी Current Affairs

अमोघ वक्तृत्वशैलीचा बहर


पन्नास किंवा पंचावन्न वर्षांपूर्वीची एक स्पष्ट आठवण मला अजूनही आहे. मी त्या वेळेस एक शाळकरी मुलगा होतो. एका रविवारच्या दुपारी माझे एक मामा टापटिपीचे कपडे करून कोठेतरी बाहेर जाण्याच्या तयारीत मला दिसले होते. हे माझे मामा चाकरमानी असल्याने रविवार म्हणजे आपला हक्काचा सुट्टीचा दिवस असे बहुसंख्य चाकरमान्यांप्रमाणे मानत आणि रविवारची दुपार सर्वसाधारणपणे लोळण्यात आणि वृत्तपत्र वाचनात घालवत असत. साहजिकच मला आश्चर्य वाटले व मी मामाकडे तो आज रविवार दुपारचा कसा काय आणि बाहेर कोठे चालला आहे? अशी पृच्छा केली. त्याने मला आपण एका मीटिंगला चाललो आहोत एवढेच सांगितले. मला फारसे काही कळले नाही व मी गप्प राहिलो. त्यावेळेस मीटिंग हा शब्द आजच्या इतका बोकाळलेला नव्हता. अलीकडे ऑफिसात दोन माणसे एकमेकाशी काय? कसे काय? एवढे जरी बोलली तरी ती मीटिंग करत असतात. त्या वेळेस राजकीय पक्षांच्या मोठ्या सभा, कंपनीच्या डायरेक्टर बोर्डाच्या किंवा एखाद्या संस्थेच्या मॅनेजिंग कमिटीच्या मीटिंग होत असत व त्यात बहुधा बरीच खडाजंगी होत असे. असो!

रात्री बर्‍याच उशिराने मामासाहेब घरी परत आले. आल्यावर त्यांचा चेहरा एकदम खुष दिसत होता व ते गेले होते ती मीटिंग खूप एक्सायटिंग आणि थ्रीलिंग झाली होती हे मला त्यांच्या चेहर्‍यावरून स्पष्ट दिसत होते. मग मी मामाला स्पष्टपणे तो कोठे गेला होता? म्हणून विचारून टाकले. त्याने मला मोठ्या उत्साहाने सांगितले की तो माझ्या घरापासून सुमारे 8 ते 10 किमी अंतरावर असलेल्या रेसकोर्सवर त्याची सायकल ताबडत, तेथे स्वातंत्र्य मिळाल्यानंतरचे भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू, यांचे भाषण ऐकण्यासाठी रेसकोर्सवर भरलेल्या एका विराट किंवा विशाल सभेला गेला होता. लहान वय असल्याने त्या वेळेस एक भाषण ऐकण्यासाठी मामासाहेब 10 किमी लांब असलेल्या रेसकोर्सपर्यंत सायकल दामटत का गेले होते? आणि त्या नंतर ते एवढ्या उत्साही मूडमध्ये का दिसत होते? हे काही मला कळू शकले नव्हते.

1975 साली तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी भारतावर आणीबाणी लादली होती. या आणीबाणीमुळे पंतप्रधानांना फर्मान सोडून राज्यकारभार चालू ठेवण्यास अनुमती दिली गेली होती. निवडणूका पुढे ढकलल्या गेल्या होत्या आणि भारतीय घटनेने नागरिकांना दिलेली सर्व प्रकारची स्वातंत्र्ये निलंबित केली गेली होती. होती. आणीबाणीच्या बहुतांशी कालात श्रीमती गांधींचे सर्व राजकीय विरोधक कारावासात ठेवले गेले होते व वृत्तपत्रांवर कडक सेन्सॉरशिप निर्बंध लादले गेले होते. यानंतर 2 वर्षांनी म्हणजे 1977 मध्ये जेंव्हा घटनेमधील तरतुदीनुसार निवडणूका पुढे ढकलणे शक्य नव्हते तेंव्हा श्रीमती गांधींनी निवडणूका घेत असल्याची घोषणा केली होती. स्वतंत्र भारताच्या इतिहासातील अत्यंत खळबळजनक संक्रमणाचा असा तो काल होता. निवडणूकीच्या आधी सरकारने विरोधकांना तुरुंगातून सोडून दिले होते व सर्व पक्षांना व विचारवंतांना लोकांशी संभाषण साधण्याची तसेच सभा, रॅली, भाषणे आयोजित करण्याची अनुमती दिली होती. पुण्यामधे स.प.कॉलेजच्या पटांगणावर आयोजित केलेल्या एका रॅलीला गेल्याचे मला स्मरते. या रॅलीला त्यावेळचे अनेक राजकीय नेते व विचारवंत यांनी संबोधिले होते. या वक्त्यांमध्ये एक साधेसुधे मराठी विनोदी लेखकही होते. हे विनोदी लेखक म्हणजे दुसरे तिसरे कोणीही नसून साक्षात “पुल” किंवा पु.ल.देशपांडे होते हे वाचकांनी जाणले असेलच. “पुल” राजकीय सभांमध्ये त्या कालापर्यंत कधीही आधी बोललेले नव्हते आणि राजकारणापासून ते चार हात नेहमी दूर रहात. त्या खळबळजनक कालात मात्र त्यांनी अनेक राजकीय सभांत भाग घेतला होता. ते त्या दिवशीच्या सभेत काय बोलले हे जरी आता मला स्मरत नसले तरी हे चांगलेच स्मरते की सुमारे 40 मिनिटाचे आपले भाषण संपवून जेंव्हा ते खाली बसले होते तेंव्हा माझे डोळे पाण्याने भरलेले होते. त्यावेळेपर्यंत हृदयाला स्पर्श करून जाईल असे भाषण मी बहुधा ऐकलेलेच नव्हते असे मला वाटते आहे. त्या दिवशी मला माझा मामा 8 ते 10 किमी सायकल ताबडत रेसकोर्सला नेहरूंचे भाषण ऐकण्यासाठी का गेला होता व परत आल्यावर तो एवढा खुष आणि उत्साहाच्या मूडमधे का होता याचा उलगडा झाला होता असे म्हणता येईल.

वक्तृत्व किंवा लोकांसमोर भाषण देण्याचे कौशल्य ही एक कला आहे असे मानले जाते. विकिपिडिया वक्तृत्वाची व्याख्या या शब्दात करतो.
” वक्तृत्वाची व्याख्या, प्रवचनाच्या कौशल्याची कला या शब्दात करता येईल. या कलेमुळे लेखक किंवा वक्ते यांना काही विशिष्ट परिस्थितींत आपल्या श्रोत्यांना नवीन माहिती पुरवण्याची, आपल्या दृष्टीकोनाकडे त्यांना वळवण्याची आणि काही कार्य करण्यासाठी त्यांना प्रोत्साहन देण्याची आपली शक्ती वर्धित करणे शक्य होते.”

Wikipedia defines it as the art of discourse, an art that aims to improve the capability of writers or speakers to inform, persuade, or motivate particular audiences in specific situations.

भारत स्वतंत्र होण्याआधीच्या काळात भारतात अमोघ वक्तृत्वशैली असलेले अनेक पुढारी होऊन गेले. या वक्त्यांमध्ये असलेल्या वक्तृत्वकलेमुळे ते आपल्या पहिल्या दोन किंवा चार शब्दांत श्रोत्यांची मने जिंकून घेत व नंतर आपल्याला पाहिजे त्या प्रकारे श्रोत्यांना वळवून त्यांच्या मनावर राज्य करत. पंडित नेहरूंच्या व्यतिरिक्त महात्मा गांधी, आचार्य कृपलानी यांची नावे सहज रितीने डोळ्यासमोर येतात. नंतरच्या काळात होऊन गेलेले इंदिरा गांधी किंवा अटलबिहारी बाजपयी यांसारखे नेते सुद्धा वक्तृत्व कौशल्याच्या बाबतीत कोणत्याही प्रकारे कमी नव्हते.

अलीकडच्या कालात झालेला टीव्ही वाहिन्यांचा आणि प्रामुख्याने वृत्त वाहिन्यांचा सुळसुळाट आणि त्यांच्यावर अष्टौप्रहर दिसणार्‍या ब्रेकिंग न्यूज यांच्या गदारोळात वक्तृत्वकौशल्य ही चीज आता नष्टच झाली आहे की काय? असा संशय येऊ लागल्यास त्यात काही नवल वाटावयास नको. दिवसाचे 24 तास या वाहिन्या आपल्यावर बातम्या, इंटरव्ह्यू आणि पॅनेल चर्चा यांचा एवढा भडिमार करत असतात असतात की मला तर या सर्व प्रकाराबाबत एक प्रकारची नावड निर्माण झाली आहे. आणि एकंदरीतच दुसर्‍याचे म्हणणे शांतपणे व कोणत्याही प्रकारचा प्रतिसाद न देता ऐकून घेण्याच्या कलेचा माझ्याकडे अभाव असल्याने, वृत्त वाहिन्यांवरील कार्यक्रम फार वेळ ऐकण्याच्या माझ्या सहनशक्तीवर मर्यादा येऊ लागल्या आहेत. परंतु साधारणपणे 3 महिन्यापूर्वी एकदा मी असाच टीव्ही वाहिन्यांचे ब्राऊझिंग करत असता अचानकपणे एक व्यक्ती एका महाविशाल जनसमुदायासमोर भाषण करत असल्याची चित्रफीत माझ्या नजरेसमोर आली. मी तेथे थबकलो आणि टीव्हीच्या पडद्यावर जे काय चालू होते त्याकडे लक्ष देऊन बघू व ऐकू लागलो. मला हे लक्षात ही आले नाही की मी हातातील टीव्ही रिमोट केंव्हाच बाजूला ठेवलेला आहे आणि माझे सर्व लक्ष त्या भाषणावरच केंद्रित झाले आहे. त्या दिवशीचे भाषण काही आता माझ्या लक्षात राहिलेले नाही. मात्र एवढे चांगलेच स्मरते आहे की त्या व्यक्तीचा प्रत्येक शब्द माझ्या हृदयाला स्पर्श करून जात होता व माझ्या डोळ्यात अश्रू उभे करत होता. टीव्ही वर त्या दिवशी ज्या व्यक्तीच्या भाषणाची चित्रफीत दाखवली जात होती त्या व्यक्तीचे नाव होते नरेंद्रभाई मोदी. अवघ्या 3 महिन्याच्या कालात या आधी गुजराथ राज्याचा मुख्य मंत्री असलेल्या या व्यक्तीने, एप्रिल-मे 1914 मध्ये झालेल्या केंद्र शासनाच्या निवडणूकीत एखाद्या झंझावाताप्रमाणे शिरकाव करून दैदीप्यमान यश तर मिळवलेच आहे पण विरोधी पक्षांचे न भूतो न भविष्यति असे पानिपत केले आहे. या आपल्या यशाबरोबरच त्यांनी भारताच्या पंतप्रधानपदी आरूढ होण्याचा बहुमान सुद्धा प्राप्त करून घेतला आहे. त्या दिवसानंतर नरेंद्रभाईंची बहुतेक सर्व भाषणे निदान टीव्हीवरून तरी ऐकण्याचा मी प्रामाणिक प्रयत्न करत राहिलो होतो.

मागच्या वर्षीच्या (1913) फेब्रुवारी महिन्यात गुजराथ राज्यातील कच्छ आणि काठेवाड भागात प्रवास करण्याचा योग मला आला होता. नरेंद्रभाई याच राज्याच्या मुख्यमंत्री पदावर गेली 13 वर्षे विराजमान होते. मी एक अगदी सर्व साधारण व्यक्ती असलो आणि आपण कोणत्याही प्रकारचे तज्ञ किंवा माहितगार नाही हे पक्के समजत असलो तरी सुद्धा जे काही मी तेथे बघितले होते त्याने मी कमालीचा प्रभावित झालो होतो याबाबत माझा मनात अजिबात शंका नाही. सुंदर रस्ते, 24 तास अखंडित विद्युत पुरवठा, समुद्रकिनार्‍यालगत उभारल्या गेलेल्या हजारो पवनचक्या, नवे औद्योगिक प्रकल्प आणि छोट्या रणासारख्या दलदलीच्या प्रदेशालगत असलेल्या भागात नर्मदा कालव्याच्या पाण्यावर फुलणारी जिरे, धने या सारख्या नगदी पिकांची शेते, हे सगळे माझ्या कल्पनेच्याही बाहेरचे होते हे मात्र खरे!

वक्तृत्वशैलीकडे परत वळूया. कोणताही मानदंड घेतला तरी हे मान्य करावेच लागते की नरेंद्रभाई मोदी हे एक अत्यंत कुशल असे वक्तृत्वपटू आहेत. ते बहुतेक वेळा ज्यामध्ये भाषण करतात त्या हिंदी भाषेवर त्यांचे कमालीच्या बाहेर प्रभुत्व आहे. त्यांच्या भाषणात वापरलेल्या शब्दांची त्यांनी केलेली निवड आणि फेक, अतिशय चपखल आणि श्रोत्यांच्या हृदयाला भिडणारी असते. आवाजात चढ उतार कशी आणि कोणत्या जागांवर करायची? शब्दांमधील कोणत्या ठिकाणी जोर द्यायचा? कोणते शब्द आवाज वाढवून बोलायचे? या सर्वच बाबतीत त्यांच्या वक्तृत्वाला येणारा बहर वाखाणण्यासारखा असतो. ते लोकांना व्याख्यान किंवा आख्यान न देता त्यांच्याबरोबर संभाषण करत करत आपल्या मनातील विचार श्रोत्यांपर्यंत सहजपणे पोचवू शकतात.

Advertisements

About chandrashekhara

I am a retired electronics engineer. I am interested in writing, reading books. Other hobbies include Paper models, wooden fret work and social networking.

चर्चा

One thought on “अमोघ वक्तृत्वशैलीचा बहर

  1. i totally agree with you. one wants to listen to him for the valuable thought content more. Hope he is able to implement his ideas and make India proud.

    Posted by arunaerande | मे 27, 2014, 2:27 pm

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदला )

Connecting to %s

जुने लेख शोधा

Enter your email address to subscribe to this blog and receive notifications of new posts by email.

Join 387 other followers

MyFreeCopyright.com Registered & Protected

माझे नवीन इ-पुस्तक

एका साम्राज्याच्या शोधात

Advertisements
%d bloggers like this: