.
ताज्या घडामोडी Current Affairs

अनाकलनीय


माझा मुक्काम सिंगापूरमधे कधीही असला तरी एक गोष्ट मी आवडीने करत असतो. ती गोष्ट म्हणजे टीव्हीवर दाखविल्या जाणार्‍या अनेक भाषांतील वाहिन्यांमधून एखादी कोरियन वाहिनी निवडून त्यावर त्यावेळी दाखविल्या जाणार्‍या मालिकांचे शक्य तितके भाग बघून टाकणे. कोरियन मालिकांमधल्या पौराणिक मालिका मला विशेष पसंत असतात. या पौराणिक मालिकांचे बहुतेक भाग एखादा राजा, राणी त्यांचा राजमहाल आणि तेथे सतत वावरणारे मंत्री आणि इतर रहस्यमय माणसे, त्यांची कटकारस्थाने आणि तेथे घडणार्‍या अनाकलनीय घटना यांच्याभोवती गुंफलेले असतात व एकंदरीत चांगला टाइमपास होतो.

आजच्या वर्तमान पत्रांत आलेले, चीनच्या नौदल प्रमुखांनी एका भारतीय युद्धनौकेला दिलेल्या अधिकृत भेटीचे वर्णन,वाचून मला त्या माझ्या आवडत्या कोरियन मालिकांची आठवण होते आहे, कारण या भेटीत घडलेली एक अनाकलनीय घटना तेवढीच रोचक आणि रहस्यमय मला तरी वाटते आहे. भारतीय नौसेनेची एक युद्धनौका आय.एन.एस. शिवालिक ही सध्या चिनी नौसेनेच्या 65व्या वाढदिवसाच्या निमित्ताने आयोजित केलेल्या एका युद्धनौका युद्धसरावामध्ये भाग घेण्यासाठी म्हणून पिपल्स लिबरेशन आर्मीनेव्हीच्या उत्तरसागर ताफ्याचा तळ असलेल्या चिंगडाओ या चीनच्या उत्तरेकडील बंदरामध्ये सदिच्छा भेट देत असून तेथे उभी आहे. मागच्या आठवड्यात चीन आणि इंडोनेशिया या देशांच्या युद्ध्नौकांबरोबर केलेल्या त्रिवर्गी युद्धसरावामध्ये या युद्धनौकेने सागरी चाचांविरूद्ध कारवाई करण्याचा सराव केला होता. शिवालिक वर असलेल्या चेतक हेलिकॉप्टर्सच्या मदतीने या युद्धनौकेने चाचांनी ताब्यात घेतलेले एक जहाज परत मिळवण्यासाठी हल्ला कसा करावयाचा याचा सराव केला होता. हा युद्ध सराव शिवालिक या नौकेने पार पाडलेल्या तीन सरावांपैकी सर्वात कठीण होता असे मानले जाते. आय.एन.एस. शिवालिक ही 5000 टन वजनाची स्टेल्थ प्रकारची युद्धनौका मुंबईमधील माझगाव डॉक्स येथे बांधलेली असून शत्रूला नौकेची ओळख पटू नये यासाठी तिची बांधणी केलेली आहे तसेच अतिशय प्रगत स्वरूपाच्या यासाठीच्या advanced signature suppression and signature management featuresप्रणाली शिवालिकवर कार्यरत असतात. अतिशय आधुनिक आणि प्रगत स्वरूपाची इलेक्ट्रॉनिक उपकरणे ultra modern electronics and sensors. या युद्धनौकेवर तैनात केलेली आहेत.

या युद्धसरावासाठी चीनने 7 देशांना निमंत्रणे दिलेली होती. या देशात, बांगला देश, पाकिस्तान, सिंगापूर, ब्रुनेई आणि इंडोनेशिया या देशांचा समावेश होता. पाकिस्तानी आणि भारतीय युद्धनौका एकाच युद्धसरावात भाग घेत असल्याचे हे दृष्य असामान्यच म्हणावे लागेल. परंतु या नौका निरनिराळ्या सरावात भाग घेत असल्याने एकमेकासमोर कधीच आल्या नाहीत. हा युद्ध सराव संपल्यानंतर नौसेनेच्या औपचारिकतेचा एक भाग म्हणून चीनच्या नौदलाचे प्रमुख प्रमुख अ‍ॅडमिरल वू शेंगली यांनी आय.एन.एस. शिवालिक ला भेट देऊन तिची पाहणी केली. अ‍ॅडमिरल साहेबांची ही भेट उत्तम रितीने व खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. आय.एन.एस. शिवालिक या नौकेचे कप्तान पुरवीर दास यांनी नंतर सांगितले:

या भेटीच्या दरम्यान एकमेकांच्या भाषा समजत नसून सुद्धा कोणतेच प्रश्न उपस्थित झाले नाहीत. चिनी नौदलाच्या सर्वात वरिष्ठ अधिकार्‍याने भारतीय युद्धनौकेला दिलेली ही भेट म्हणजे चिनी नौसेना आणि भारतीय नौसेना यामधील आतापर्यंतचा हा सर्वात वरिष्ठ पातळीवरचा संपर्क होता. आम्ही येथेच थांबणार नसून पुढच्या प्रत्येक वर्षात याच्या पेक्षाही वरच्या पातळीवरील संपर्क साधला जाईल यासाठी आम्ही प्रयत्न करत राहू.”

हे सगळे ठीक असले तरी, कोणत्याही तर्काने ज्याची संगती लावणे मला तरी शक्य वाटत नाही, अशा एका विचित्र प्रसंगाला, भेट संपण्याच्या वेळेस कप्तान पुरवीर दास यांना सामोरे जावे लागले. या प्रसंगाचे वर्णन मला चिनी कूट जाल या एवढ्याच शब्दात शक्य वाटते आहे. आय.एन.एस. शिवालिक ही एक अत्यंत आधुनिक बांधणीची फ्रिगेट वर्गातील युद्धनौका आहे. प्रत्यक्ष युद्धप्रसंगात या नौकेचे नियंत्रण ” कॉम्बाट इन्फरमेशन सेंटर” नावाच्या एका युद्धकक्षामधून केले जाते. आय.एन.एस. शिवालिकच्या युद्धसामर्थ्याचा हा कक्ष म्हणजे मेंदूच समजता येईल. या मेंदूचे कार्य ज्या सॉफ्टवेअर प्रणालीवर अवलंबून आहे ती प्रणाली AISDN (short for ATM-based Integrated Services Digital Network) या नावाने ओळखली जाते व ती संपूर्णपणे भारतीय सॉफ्टवेअर अभियंत्यांनी विकसित केलेली आहे. शिवालिकच्या युद्धसामर्थ्याचे प्रतीक मानता येतील अशा, इंजिने, नॅव्हिगेशन उपकरणे, रडार, तोफा किंवा मिसाइल्स सारखी हत्यारे, रेडियो सेट्स आणि नियंत्रण प्रणाली या सारख्या सर्व गोष्टी, पाठीमागे सतत कार्यरत असलेल्या या सॉफ्ट्वेअर प्रणालीच्या द्वारे नियंत्रित केल्या जातात. वरील पैकी प्रत्येक वैयक्तिक गोष्टीबद्दलची सर्व माहिती सबंध युद्धनौकेवर कोणत्याही ठिकाणी डिजिटल संदेशांचा एक कॉमन डेटा बेस या स्वरूपात या प्रणाली मार्फत उपलब्ध असते. शिवालिकवरील हा अत्यंत आधुनिक स्वरूपाचा “कॉम्बाट इन्फरमेशन सेंटर” म्हणजे भारतीय नौसेनेचा एक मानबिंदू समजला जाऊ लागला आहे आणि भविष्यात नौदलात येणार्‍या प्रत्येक नौकेवर असा ” कॉम्बाट इन्फरमेशन सेंटर” असणार आहे. ही माहिती मी तुम्हाला देऊ शकतो आहे कारण ती पब्लिक डोमेनमधेच आहे. आपल्याला सुद्धा जर ती जाणून घेता येते आहे तर चिनी नौदलाला त्याची माहिती असणारच आहे हे कोणीही सांगू शकेल. आणि जगातील कोणतेही सैन्यदल अशा स्वरूपाच्या गुप्त आणि महत्त्वाच्या केंद्राबद्दलची माहिती दुसर्‍या देशातील कोणाही व्यक्तीला पुरवणे शक्य नाही याचीही चिनी नौदलाला चांगलीच कल्पना असणार आहे.

असे असूनही भेटीच्या अंती अ‍ॅडमिरल वू शेंगली यांनी या ” कॉम्बाट इन्फरमेशन सेंटर” ची पाहणी करता येईल का? अशी विनंती किंवा चाचपणी आयत्या वेळी केली. अ‍ॅडमिरल साहेबांच्या या विनंतीमुळे भारतीय नौदलाचे अधिकारी चाट पडले व त्यांना काय उत्तर द्यावे हे समजेचना. दोन्ही देशांमध्ये एकमेकांविषयी विश्वासार्हता वाढावी म्हणून ही सदिच्छा भेट आयोजित केलेली असल्याने हे अधिकारी मोठ्या अडचणीच्या प्रसंगात सापडले हे मात्र खरे. चीन मधे त्या वेळेस चालू असलेला युद्ध सरावावर आणि आतापर्यंत झालेल्या सर्वात वरिष्ठ पातळीवरील या बड्या अधिकार्‍याच्या भेटीला या एका प्रसंगाचे गालबोट लागता कामा नये याचे प्रचंड दडपण भारतीय नौसेनेच्या अधिकार्‍यांवर आले.

आय.एन.एस. शिवालिकचे कप्तान आणि भारतीय नौसेनेतील एक अनुभवी आणि जाणते अधिकारी कप्तान पुरुविर दास यांनी मोठ्या समर्थपणे या प्रसंगाला तोंड दिले व भारतीय नौदलाला मोठ्या अडचणीतून सोडवले. त्यांनी अतिशय अदबशीर रितीने अ‍ॅडमिरल साहेबांचे लक्ष भारतीय नौदलाच्या कार्यप्रणाली मधील एका महत्त्वाच्या नियमाकडे वेधले. या नियमाप्रमाणे नौसेनेची कोणतीही बोट बंदरात असताना कोणताही अपवाद न करता हा ” कॉम्बाट इन्फरमेशन सेंटर” कडी कुलूप लावून बंद ठेवणे अनिवार्य समजले जाते. यानंतर पुरुवीर दास यांनी अ‍ॅडमिरल साहेबांना विनोदाने सांगितले की भर समुद्रात युद्धप्रसंगी जर ते आय.एन.एस. शिवालिकवर आले तर त्यांना ” कॉम्बाट इन्फरमेशन सेंटर” ला नक्की भेट देता येईल. भारतीय नौदलाच्या नौकेवर चिनी अ‍ॅडमिरलने भर समुद्रात युद्धप्रसंगी भेट देणे अशक्यच असल्याने पुरुवीर दास यांनी बाजी मारून नेली.

आय.एन.एस. शिवालिक वरचा ” कॉम्बाट इन्फरमेशन सेंटर” आपल्याला कधीही बघता येणार नाही हे पूर्णपणे माहीत असताना अ‍ॅडमिरल यांनी अशी विनंती भारतीय अधिकार्‍यांना कोणत्या कारणासाठी केली असावी? यामागे भारतीय नौदलातील अधिकार्‍यांना अडचणीत आणून त्यांच्यावर दबाव आणण्याचा त्यांचा हेतू होता? की आणखी कोणते कारण होते? असे अनेक प्रश्न माझ्या मनात या प्रसंगाचे वृत्त वाचल्यानंतर उपस्थित झाले. या अशा प्रकारच्या घटनांना रहस्यमय किंवा अनाकलनीय म्हणण्याशिवाय दुसरे काय म्हणणार? बरे असेही नाही की एखाद्या वरिष्ठ चिनी अधिकार्‍याने, अशा प्रकारच्या भेटींच्या वेळेस औपचारिकतेची जी औचित्ये पाळणे अपेक्षित असते त्याच्या बाहेर जाऊन वागण्याची हा प्रसंग म्हणजे पहिलीच वेळ होती! या आधी सप्टेंबर 1912 या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात जनरल लिआंग ग्वांग ली या चिनी संरक्षण मंत्र्यांनी दोन देशातील परस्परसंबंधांचा एक सामान्य शिष्टसंमत भाग म्हणून भारताला भेट दिली होती तेंव्हा काहीसा असाच एक अशिष्ट्संमत प्रकार घडला होता.

अधिकृत बोलण्याबरोबर जनरल लिआंग ग्वांग ली आणि त्यांच्याबरोबरचे शिष्टमंडळ यांना त्यांच्या 5 दिवसाच्या भेटीच्या कार्यक्रमात मुंबई आणि दिल्ली मधील प्रेक्षणीय स्थळे दाखवली गेली होती. दिल्लीमध्ये त्यांना कुतुब मिनार आणि नंतर आग्रा येथील ताज महाल दाखवला गेला होता होता तर मुंबईमध्ये त्यांना गेटवे ऑफ इंडिया व एलिफंटा गुंफा दाखवल्या होत्या. 23 सदस्य असलेले हे शिष्टमंडळ बिजिंगहून प्रथम मुंबईला own People’s Liberation Army (PLA) aircraft चिनी सैन्याच्या विमानाने आले होते. मुंबईमधील कार्यक्रम आटोपल्यानंतर परदेशी शिष्टमंडळाला दिल्या जाणार्‍या राजकीय शिष्टाचाराचाच एक भाग म्हणून चिनी शिष्टमंडळाला भारतीय संरक्षण मंत्रालयाने मुंबई ते दिल्लीपर्यंतच्या प्रवासासाठी दोन विमाने दिली होती. यापैकी एक Embraer Legacy EMB 135BJ jet हे व्हीव्हीआयपी च्या प्रवासासाठी विमान होते तर दुसरे Avro या प्रकारचे विमान होते. ही दोन्ही विमाने दिल्लीच्या पालम विमानतळावर तळ असलेल्या VVIP ‘Air HQ Communication Squadron विमान ताफ्यामधील होती.

जनरल लिआंग ग्वांग ली आणि काही इतर वरिष्ठ चिनी अधिकार्‍यांना अतिशय आरामदायी असलेल्या Embraer Legacy विमानातून दिल्लीला नेण्यात आले होते. हे विमान दिल्लीच्या विमानतळावर उतरल्यावर चिनी जनरल साहेबांनी, हे विमान वायुसेनेच्या ज्या दोन कुशल वैमानिकांनी सफाईदार रितीने चालवले होते, त्यांचे कौतुक म्हणून त्यांच्या हातात दोन पांढरी बंद पाकिटे ठेवली होती. चिनी भाषेत या प्रकारच्या सदिच्छा भेटींना ” हांगपाव” असे नाव आहे. जनरल साहेबांच्या या कृतीत असामान्य असे काहीच नव्हते कारण व्हीव्हीआयपी परदेशी पाहुणे जेंव्हा भारतीय विमानांनी असा प्रकारचा प्रवास करतात तेंव्हा नेहमीच टाय किंवा कफ लिंक्स यासारख्या वस्तू वैमानिकांना भेट म्हणून देत असतात. भारतीय व्हीव्हीआयपी मंडळी जेंव्हा या प्रकारचा विमान प्रवास परदेशात करतात तेंव्हा तीही आपली कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी परदेशी वैमानिकांना टाय किंवा एखादी आठवण वस्तू भेट म्हणून देत असतात. जनरल साहेब प्रवास करत असलेल्या विमानाचे वैमानिक या प्रकारच्या औपचारिकतेला सरावलेले असल्याने त्यांनीही या बंद पाकिटांचा विनासंकोच स्वीकार केला आणि जनरल साहेबांचे आभार मानले.

नंतर जेंव्हा या वैमानिकांनी त्यांना मिळालेली पाकिटे उघडली तेंव्हा त्यांना आश्चर्याचा प्रचंड धक्का बसला व ते पूर्णपणे गोंधळून गेले कारण प्रत्येक पाकिटात 50000 रुपये किंमतीच्या कोर्‍या करकरीत नोटा घातलेल्या होत्या. त्यांनी त्वरित आपल्या ग्रूप कॅप्टन या वरिष्ठ अधिकार्‍याला याबद्दल सांगितले. त्याने आपल्या वरिष्ठ अधिकार्‍यांना ही माहिती सांगितल्यावर दिल्लीमधील एअर एच.क्यू. कडे या बद्दल विचारणा केली गेली. यानंतर संरक्षण मंत्रालयाला ही माहिती पोचल्याबरोबर हा प्रश्न लगेच योग्य रितीने सोडवला गेला. चिनी लोकांमध्ये भेटवस्तू कोणी परत केली तर ते चिनी परंपरेच्या विरुद्ध असल्याने हे पैसे परत करणे योग्य दिसले नसते त्यामुळे हे सगळे पैसे सरकारी तिजोरीमध्ये भरणा केले गेले.

या दुसर्‍या घटनेच्या बाबतीत सुद्धा मला तोच मुद्दा परत मांडावासा वाटतो आहे की वरिष्ठ चिनी अधिकारी, दोन देशांतील संबंधात औपचारिकतेची जी पथ्ये पाळली जातात त्याबाबत इतके अनभिज्ञ असतील अशी शक्यता मला वाटत नाही, कारण भेटीच्या आधी त्यांच्या परराष्ट्र खात्याने आवश्यक बाबींबद्दलची माहिती करून दिलेली असणारच आहे. त्यामुळे या प्रकारच्या घटनांचे विश्लेषण तरी कसे करायचे? ही खरी अडचण आहे. अशा भेटींच्या दरम्यान केल्या गेलेल्या चिनी अधिकाऱ्यांच्या या असल्या रहस्यमय वागण्यामुळे भविष्यात या बाबत जास्त सतर्कता भारतीय अधिकाऱ्यांच्या मनात यापुढे सतत राहील याबाबत माझ्या मनात तरी शंका नाही.

16 मे 2014

Advertisements

About chandrashekhara

I am a retired electronics engineer. I am interested in writing, reading books. Other hobbies include Paper models, wooden fret work and social networking.

चर्चा

अद्याप प्रतिक्रिया नाहीत.

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s

जुने लेख शोधा

Enter your email address to subscribe to this blog and receive notifications of new posts by email.

Join 387 other followers

MyFreeCopyright.com Registered & Protected

माझे नवीन इ-पुस्तक

एका साम्राज्याच्या शोधात

Advertisements
%d bloggers like this: