.
History इतिहास, People व्यक्ती

अभिजात संगीत आणि स्वरलेखन


 

अभिजात संगीताचा उगम प्राचीन भारतात कधी व कोठे झाला? याची माहिती कोठेच मिळत नसल्याने ते कोणालाही सांगता येणे हे अशक्यप्राय आहे. परंतु ज्याला सध्या स्वरलेखन किंवा नोटेशन या नावाने आपण संबोधतो तशा प्रकारचे संगीताचे काही नियम किंवा साचा फार पूर्वीपासून भारतात अस्तित्वात होता याच्या काही पाऊलखुणा मात्र दिसून येतात. इ,स पूर्व 2000 हा काळ साधारणपणे वैदिक संस्कृतीचा उदय काल म्हणून मानला जातो. या काळात रचल्या गेलेल्या दुसर्‍या वेदाची किंवा सामवेदाची रचना, गेय किंवा गाण्यामध्ये म्हणण्यासारखी केली गेलेली असल्याने नियमबद्ध संगीताची संकल्पना निदान या कालापासून पुढे तरी अस्तित्वात आलेली होती असे म्हणणे फारसे गैर ठरू नये. सामवेदामधील गेय ऋचांना सामगान या नावाने ओळखले जाते. सामगानांमध्ये 3 स्वर वापरले जात असत. हे 3 स्वर ‘अनुदत्त’ (मंद्र स्वर), ‘उदत्य’ (तीव्र स्वर) आणि ‘स्वरित'( मध्य स्वर) या नावाने ओळखले जात. 3 स्वरांवर आधारित असलेली ही साधी सोपी संगीत रचना, पुढच्या काळामध्ये नंतर कधीतरी, प्रत्येकी 7 स्वर असलेल्या 3 सप्तकांमध्ये नियमबद्ध केल्या गेलेल्या संगीत रचनेमध्ये विकसित झाली.

 

 

या पुढच्या किंवा प्राचीन इतिहास कालात, वाद्यांच्या साथीने केले जाणारे गायन विकसित झाले होते याचा सर्वात जुना स्पष्ट पुरावा, पहिल्या शतकात चित्रित केलेल्या अजिंठा येथील 9 क्रमांकाच्या गुंफेतील भित्तीचित्रामध्ये दिसतो. या चित्रात एका तत्कालीन राजाच्या समोर वाद्यांच्या साथीवर नृत्य आणि गायन करणारा एक युवती समूह चित्रित करण्यात आलेला दिसतो. या भित्तीचित्राच्या कालाच्याही आधी रचल्या गेलेल्या कौटिल्य निर्मित प्रसिद्ध ग्रंथ ‘अर्थशास्त्र’ यामध्ये संगीताबद्दल काही संदर्भ सापडतात. वात्सायन ऋषींनी संगीताची व्याख्या, गीत किंवा मौखिक गायन, तालवाद्यांचे वादन आणि नृत्य या तीन कलांचा मिलाफ अशी केली होती.

अजिंठा येथील 9 क्रमांकाच्या गुंफेतील भित्तीचित्रावरून बनवलेले रेखाचित्र

सातव्या शतकापासून निरनिराळ्या राजांच्या दरबारात आपली गायनकला सादर करणार्‍या गायकांचे संदर्भ निश्चितपणे मिळतात. मुघल सम्राट अकबराच्या दरबारात असलेला तानसेन हा गायक तर सुप्रसिद्ध आहेच. मात्र एवढ्या मोठ्या प्रमाणात राजाश्रय लाभलेली ही गायन कला, गुरू कडून त्याच्या शिष्याला मौखिक स्वरूपात शिकवली जाणारी एक विद्या याच स्वरूपात चालू राहिली. सारंगदेव रचित संगीत रत्नाकर, या सारखे काही अपवादात्मक लेखन सोडून, या कलेचे नियम, पद्धती किंवा रागरागिण्यांचे स्वरलेखन केलेली पुस्तके किंवा या कलेचा इतिहास सांगणारे फारसे ग्रंथ दुर्दैवाने कधी रचले गेले नाहीत किंवा रचले गेले असल्यास ते अज्ञातच राहिले. या नंतर भारतात ब्रिटिशांची राजवट आली व राजाश्रय मिळालेल्या गायकांची संख्या कमी कमी होत गेली. यामुळे बहुतेक गायकांची कला व संगीताचे ज्ञान हे त्यांच्या कौटुंबिक वर्तुळापर्यंतच मर्यादित राहू लागले. लागले. संगीत कलेकडे समाज एक करमणुकीचे साधन याच दृष्टीने आणि कमीपणाने पाहू लागला. मात्र याच काळात बडोदा, ग्वाल्हेर आणि लखनौ या सारख्या ठिकाणच्या संस्थानिकांनी मात्र गायक-वादकांना उदार राजाश्रय देण्याचे कार्य चालू ठेवून संगीतकला टिकवण्यास मदत करण्याचे स्पृहणीय कार्य केले.

 

अभिजात संगीताला प्राप्त झालेल्या दुरवस्थेचे हे चित्र विसाव्या शतकाच्या प्रारंभापर्यंत साधारण तसेच राहिले. या नंतर मात्र एक भारतीय संगीततज्ज्ञ पंडित विष्णू नारायण भातखंडे ( 1860-1936) यांनी हिंदुस्थानी अभिजात संगीताच्या पद्धतीचे नियम आणि निरनिराळ्या रागरागिण्यांच्या स्वरलेखनाचे कार्य हातात घेतले व अखेरीस भारतीय संगीताला लिखित स्वरूपातील नियम आणि स्वरलेखन प्राप्त झाले. भातखंडे यांचा जन्म मुंबईमधील एका चित्पावन कुटुंबात झाला होता व त्यांनी आपले शिक्षण मुंबईचे एलफिस्टन कॉलेज आणि पुण्याचे डेक्कन कॉलेज येथे घेतले होते. त्यांनी कायदा या विषयातील पदवी 1885 मध्ये प्राप्त केली होती आणि 1887 पासून ते वकिली करू लागले होते. कॉलेजमध्ये शिकत असतानाचा भातखंडे सतार वाजवण्यास शिकले होते, नंतर त्यांनी गायनाची कलाही शिकून घेतली व संगीताच्या नियमांबद्दलचे ज्ञान आत्मसात केले होते. त्यांची पत्नी व कन्या यांच्या दुर्दैवी निधनानंतर भातखंडे यांनी आपली वकिली सोडून दिली व आपले उर्वरित आयुष्य, संगीतामधील निरनिराळी घराणी, त्यांचे नियम आणि स्वरलेखन यांचा अभ्यास करून एकत्रित अशा हिंदुस्थानी संगीत पद्धतीच्या नियमांचे आलेखन करण्यात घालवण्याचा निश्चय केला.
पंडित विष्णू भातखंडे यांनी सर्व रागरागिण्याचे स्वरलेखन केलेली ‘स्वरमालिका’ या नावाची पुस्तिका प्रसिद्ध केली व त्याच्या पाठोपाठ लक्षसंगीतम हा संस्कृतमधे लिहिलेला ग्रंथ 1909 मध्ये प्रसिद्ध केला. पुढच्या काळात आपल्या या संस्कृत पुस्तकावरील एक टीकाग्रंथ या स्वरूपात असलेला आणि 4 खंडामध्ये विभागलेला, ‘हिंदुस्थानी संगीत पद्धती’ हा ग्रंथ, त्यांनी आपण संशोधन करून संकलित केलेला संगीताचा हा अनमोल वारसा सर्वसामान्यांना समजावा, म्हणून प्रसिद्ध केला. चार खंडात असलेला हा ग्रंथ आज हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताचे सर्वमान्य अभ्यासपुस्तक म्हणून मानला जातो. संगीताच्या कोणाही उपासकासाठी हा ग्रंथ म्हणजे अभ्यासाची पहिली पायरी आहे असे समजले जाते.

हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताच्या इतिहासाचे जरा बारकाईने वर्णन मी वर केले आहे याचे कारण हे आहे की प्राचीन भारतीयांकडे असलेल्या इतर अनेक कला व कौशल्ये या जशा कालौघात नामशेष होऊन गेल्या तसे शास्त्रीय संगीताचे झाले नाही यामागे या एका व्यक्तीचे अथक परिश्रम फक्त कारणीभूत होते या सत्याकडे वाचकांचे लक्ष वेधले जावे. भातखंडे यांनी भारतीय संगीताला कालौघात नष्ट होण्यापासून वाचवले नसते तर आज या संगीताला परत एकदा जी लोकमान्यता व प्रतिष्ठा मिळाली आहे ती मिळणे शक्यच झाले नसते.

परंतु सर्वात महत्त्वाचा मुद्दा हा आहे की हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत नामशेष होण्याच्या वाटेला जे प्रथम लागले होते ते कोणत्या मुलभूत कारणांमुळे असावे? इतर प्राचीन कला व कौशल्ये ज्या कारणांमुळे नष्ट झाली तेच कारण याच्याही मागे होते. दुर्दैवाने प्राचीन भारतीयांना आपले ज्ञान लिखित स्वरूपात मागे ठेवावे अशी आस्था कधीच वाटली नाही. पद्धतशीर आणि शास्त्रीय पद्धतीने आपले कौशल्य किंवा कला यांचे ग्रंथ स्वरूपात आलेखन करून मागे ठेवावे असे कोणत्याच क्षेत्रातील (उदा. स्थापत्य, युद्धकला, औषधोपचार) तज्ञांना, (हाताच्या बोटावर मोजता येतील असे अपवाद सोडल्यास) कधीच वाटले नाही याला एक दैवदुर्विलास असेच म्हटले पाहिजे.

उलट पक्षी, गेल्या शेकडो किंबहुना हजार वर्षांपूर्वीपासून ऐतिहासिक कागद किंवा इतर माध्यमांवर लिहिलेले दस्ताऐवज चिनी लोकांनी मात्र मोठ्या काळजीपूर्वक सांभाळून ठेवलेले आढळून येतात. भारतीय संस्कृतीशी तुलना करता येईल अशीच जुनी चिनी संस्कृतीही असल्याने माझा असा समज होता की चीनमध्ये त्यांच्या संगीताबद्दल जुने ऐतिहासिक ग्रंथ विपुल प्रमाणात नक्की लिहिलेले असावेत व ते काळजीपूर्वक सांभाळले गेले असावेत. परंतु आश्चर्याची गोष्ट म्हणजे असे जुने ग्रंथ अस्तित्वात असल्याची माहिती मला तरी कोठे सापडली नाही. चिनी संगीत परंपरेसंबंधी 200 वर्षांपूर्वी लिहिलेला व अतिशय दुर्मिळ असलेला असा एक ग्रंथ केंब्रिज, इंग्लंड येथे नुकताच सापडला आहे व एकंदरीतच चिनी संगीताबद्दल लिहिलेल्या ग्रंथांची दुर्मिळता लक्षात घेता हा ग्रंथ साहजिकच अतिशय महत्त्वपूर्ण असा मानला जातो आहे.

‘Xian Di Pipa Pu’ हे शीर्षक असलेला हा ग्रंथ कोण्या एका रेव्हरंड जेम्स ईनमान याने चीनमधून इंग्लंडमध्ये आणला होता. हा रेव्हरंड ज्या ब्रिटिश बोटीमधून इंग्लंड्ला येण्यास निघाला होता त्या बोटीची मलेशियाच्या किनार्‍याजवळ फ्रेंच आरमाराशी फेब्रुवारी 1804 मध्ये लढाई झाली झाली व त्यात रेव्हरंड ईनमान यांची बोट बुडाली. मात्र स्वत: रेव्हरंड आणि त्यांचे सामान कसेबसे वाचले. रेव्हरंड नी इंग्लंडला परतल्यावर आपली सर्व चिनी पुस्तके केंब्रिज मधील सेंट जेम्स कॉलेज या संस्थेला देणगी म्हणून देऊन टाकली. चिनी संगीतासंबधी असलेला हा ग्रंथ त्या पुस्तकात असल्याचे नुकतेच आढळून आले आहे. या ग्रंथामध्ये असलेल्या स्वरलेखनामुळे हा ग्रंथ अतिशय दुर्मीळ असा मानला जातो आहे.
या ग्रंथात 3 चिनी पारंपारिक वाद्यांची ओळख करून दिलेली आहे. या शिवाय गोंगशे या नावाने ओळखल्या जाणार्‍या 13 पारंपारिक बंदिशींचे नोटेशन किंवा स्वरलेखन सुद्धा यात दिलेले आहे. गॉन्गझू मधील शिंन्घाई कॉंझरवेटरी येथील प्राध्यापक झिवू वू यांच्या मताप्रमाणे प्राचीन चिनी संगीताचे स्वरलेखन देणारा हा ग्रंथ खरोखरच अत्यंत दुर्मीळ आहे. डॉ. जोयान यॉन्ग या चिनी संगीत तज्ञाच्या म्हणण्याप्रमाणे प्राचीन चिनी संस्कृती आणि संगीत या बद्दल जास्त माहिती करून देण्याच्या दृष्टीने 210 वर्षांपूर्वीचा हा ग्रंथ फारच महत्त्वाचा ठरतो.

या ग्रंथाचा शोध लागल्यामुळे चिनी संगीताबद्दल जशी माहिती नव्याने उपलब्ध झाली आहे तशी माहिती भारतीय संगीताबद्दल होणे कठीण दिसते आहे. याला एकच कारण आहे ते म्हणजे लिखित स्वरूपातील दस्ताऐवज मागे सोडण्याबद्दल प्राचीन भारतीय विद्वानांमध्ये असलेली संपूर्ण अनास्था. यामुळेच आपले अनेक सांस्कृतिक ठेवे कालौघात नामशेष झालेले आहेत.

27 मार्च 2014

 

 

 

Advertisements

About chandrashekhara

I am a retired electronics engineer. I am interested in writing, reading books. Other hobbies include Paper models, wooden fret work and social networking.

चर्चा

One thought on “अभिजात संगीत आणि स्वरलेखन

  1. extimely wonderful very interesting about great vishu bhatkhandeji

    Posted by M.P.Apte | मे 2, 2014, 11:36 pm

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s

जुने लेख शोधा

Enter your email address to subscribe to this blog and receive notifications of new posts by email.

Join 387 other followers

MyFreeCopyright.com Registered & Protected

माझे नवीन इ-पुस्तक

एका साम्राज्याच्या शोधात

Advertisements
%d bloggers like this: