.
Health- आरोग्य, Science

वेदना पुराण


chronic painआपले वय जसजसे वाढत जाते तसतशा आपल्या शरीराच्या कुरबुरी वाढू लागतात. रोजच्या आयुष्यात त्या शरीराला जे तणाव, आघात सहन करावे लागतात ते त्याला कमी कमी रुचत जातात आणि शरीराच्या निरनिराळ्या अवयवांना जाणवणार्‍या पीडेच्या स्वरूपात शरीर ते आपल्याला त्याच्या तक्रारी सांगावयास सुरूवात करते. पु., देशपांडे यांचे या अर्थाचे एक सुप्रसिद्ध वाक्य वाचकांना परिचित असेलच. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे एखाद्या दिवशी सकाळी तुम्ही झोपेतून जागे झाल्यावर तुमच्या लक्षात आले की आपल्या शरीराच्या कोणत्याच भागातून होणारी पीडा आपल्याला जाणवत नसली तर खचीत समजा की आपण मेलो आहोत. या वाक्यातील विनोदाचा भाग सोडला तरी यात सत्याचा बराच अंश आहे. ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की जगातील बहुतेक सर्व ज्येष्ठांसाठी शारिरिक पीडा ही वर्षातल्या प्रत्येक अ प्रत्येक दिवशी सहन करावी लागणारी अशी एक सत्यता आहे.

परंतु वेदना ही भावना काही फक्त ज्येष्ठ नागरिकांसाठी आरक्षण करून ठेवली आहे असे काही म्हणता येणार नाही. आपल्यापैकी प्रत्येकाला वेदना म्हणजे काय हे अगदी बालवयापासूनच चांगलेच माहीत असते फक्त काही खास प्रकारच्या वेदना मात्र वयानुसार जाणवू लागतात. उदाहरणार्थ सायनस सुजल्यामुळे होणारी डोकेदुखी किंवा वेदना ही वयाची 12 वर्षे उलटून गेल्यावरच जाणवू लागते कारत त्या वयापर्यंत मानवी शरीरात सायनस तयारच झालेल्या नसतात. त्यामुळे लहान मुलांचे डोके बहुधा कधी दुखत नाही. आपल्याला जाणवणार्‍या वेदना या नेहमी दोन प्रकारच्या असतात. पहिला प्रकार म्हणजे बाहेरील काही कारणामुळे (उदा. बोट चेंगरणे ) किंवा कोणत्यातरी शारिरीक संस्थेच्या कार्यात बिघाड झाल्यामुळे (उदा. अपचन) होणारी शारिरीक पीडा. वेदनेचा दुसरा प्रकार म्हणजे आपल्या आयुष्यात किंवा परिसरात घडणार्‍या अप्रिय घटनांमुळे होणारी मानसिक वेदना. ही वेदना बहुतेक वेळा कोणत्या ना कोणत्या मानसिक तणावामुळे येत असते व याबद्दल मानसोपचारतज्ञ आपल्याला जास्त काही सांगू शकतील. माझ्या प्रस्तुत लेखाचा विषय पहिल्या प्रकारातील म्हणजे डोकेदुखी, पोटदुखी किंवा हातपाय यांच्यामधील सांधेदुखी या सारख्या शारिरीक पीडा हा आहे. शारिरीक पीडा इतक्या विस्तृत प्रमाणात आढळून येते की जगाच्या कोणत्याही भागामधील लोकांमध्ये दर 5 लोकांमधील एक व्यक्ती या शारिरीक पीडेने ग्रासलेली असते.

karna and arjuna

महाभारतामधील कर्णाबद्दलची एक गोष्ट बहुतेक वाचकांना माहीत असेलच. या गोष्टीप्रमाणे कर्ण हा सूर्यापासून कुंतीच्या पोटी जन्मलेला होता. विवाहपूर्व संबंधातून त्याचा जन्म झालेला असल्याने त्याच्या जन्मानंतर थोड्याच कालात कुंतीने त्याला एका रत्नखचित मंजुषेमध्ये ठेवून नदीपात्रात सोडून दिले होते. मासेमारी करणार्‍या एका कोळ्याला तो सापडला होता वा त्यानेच त्याला अर्भकावस्थेपासून पुढे वाढवले होते. कुंती ही एका क्षत्रिय राजाची कन्या असल्याने कर्ण सुद्धा जन्माने क्षत्रियच असला तरी लौकिक रूढी प्रमाणे तो हीन कुळातील आहे असे मानले जात होते. मात्र कर्णाला जात्याच युद्धकला व युद्धनीती यांचीच आवड असल्याने तो आपली ही आवड विसरू शकत नव्हता व त्यामुळे त्या कालातील युद्धकला व युद्धनीती यांच्यामध्ये सर्वात श्रेष्ठ मानले जाणारे ऋषी परशूराम यांना आपले गुरू मानून त्यांच्याकडे या कला शिकण्याचे ठरवले होते. दुर्दैवाने परशूराम ऋषींनी सर्व पृथ्वी नि:क्षत्रिय करण्याची प्रतिज्ञा केली होती व ते फक्त ब्राम्हण मुलांना युद्धकला व युद्धनीती शिकवत होते.

कर्णाने परशुरामांना फसवण्याचे ठरवले ब्राम्हण वेश करून तो त्यांच्याकडे गेला व नम्रपणे अभिवादन करून त्याने परशुरामांना आपण ब्राम्हण कुलोत्पन्न असून आपल्याला त्यांच्याकडून शस्त्रास्त्र विद्या शिकण्याची इच्छा आहे असे प्रतिपादन केले. परशुरामांचा त्याच्यावर विश्वास बसला व त्यांनी कर्णाला आपल्या कुटीरात ठेवून घेतले व शस्त्रास्त्र विद्या शिकवण्याचे मान्य केले. कर्ण थोड्याच अवधीत आपल्या गुरूंचा सर्वोत्तम शिष्य बनला आणि त्याने गुरूची अतिशय आदराने आणि मनोभावे सेवा करून त्यांचे मन जिंकून घेतले.

एके दिवशी दुपारी कर्णाच्या मांडीवर डोके ठेवून आराम करत असलेल्या परशुरामांचा डोळा लागला. त्याच वेळी एका भुंग्याने कर्णाच्या मांडीला दंश केला आणि तो भुंगा ती जखम पोखरू लागला. या जखमेतून रक्तस्राव होत असल्याने कर्णाला साहजिकच आत्यंतिक वेदना होऊ लागल्या. परंतु त्या भुंग्याला झटकले तर मांडी हलेल व त्यामुळे कदाचित आपल्या गुरूंची झोपमोड होईल या भीतीने त्या वेदना सहन करत कर्ण तसाच निश्चल बसून राहिला. परंतु कर्णाच्या मांडीला झालेल्या जखमेतून होणार्‍या रक्तस्रावामुळे वाहणारे रक्त परशुरामांच्या गालापर्यंत पोचले आणि त्यांना निद्रेतून जाग आली. डोळे उघडल्यावर त्यांना रक्त दिसले व त्यांनी दचकून कर्णाकडे त्याबद्दल विचारणा केली. कर्णाने झालेला सर्व प्रकार निवेदन केला व त्यांना सांगितले की तुमची झोपमोड होऊ नये म्हणून मी मांडी हलवली नाही आणि निश्चल बसून राहिलो पण मला खेद होतो आहे की मी रक्तस्राव मात्र काही थांबवू शकलो नाही.

हे सगळे ऐकल्यानंतर परशुरामांची खात्रीच पटली की अतिशय शांततेने आपल्याला होणार्‍या वेदना सहन करणारा हा तरूण कोणत्याही ब्राम्हण कुळातील नसून क्षत्रिय कुळातील असला पाहिजे कारण ब्राम्हण कुळातील तरूण एवढ्या वेदना सहन करणे त्यांच्या अनुभवाप्रमाणे शक्यच नव्हते. परशुरामांनी कर्णाला सत्य काय आहे ते सांगण्याची आज्ञा केली. कर्णाने त्यानंतर सर्व सत्य हकिगत सांगितली. ती समजल्यावर, आपल्या सर्वात लाडक्या शिष्यानेच आपली फसगत केली आहे हे ऐकून परशूराम अत्यंत क्रोधित झाले व त्यांनी कर्णाला एक शाप दिला.

या कथेचा उर्वरित भाग प्रस्तुत लेखाच्या विषयाच्या दृष्टीने महत्त्वाचा नसल्याने तो आपण सोडून देऊया. मी ही कथा येथे सांगण्याचे प्रयोजन वाचकांच्या लक्षात आले असेलच. प्रत्येक व्यक्तीसाठी, वेदनेची सीमारेखा (pain threshold) किंवा ज्या पातळीला त्या व्यक्तीला होणार्‍या कोणत्याही प्रकारच्या त्रासाचे रूपांतर असह्य पीडा किंवा वेदनेत होते, ही प्रत्येक व्यक्तीसाठी भिन्न भिन्न असते हेच मला या गोष्टीमधून सूचित करावयाचे आहे. उदाहरणार्थ आपण उन्हाळ्यामुळे होणारा उकाड्याचा त्रास विचारात घेऊ. काही लोकांना उकाडा अजिबात सहन होत नाही. ते लगेचच घामाघूम होतात व त्यांना अजिबात चैन पडत नाही. त्याचप्रमाणे जेंव्हा इतर मंडळींना थंडीतील सुखद गारवा अतिशय आरामदायी वाटत असतो त्याच वेळेस काही लोकांनाच मात्र थंडी किंवा बोचरे वारे हे अजिबात सहन करता येत नाहीत. यावर असा प्रश्न मनात येणे स्वाभाविकच वाटते की असे कोणते कारण असू शकेल ज्या योगे काही लोकांना एक किरकोळ त्रास अशी वाटणारी गोष्ट, इतर लोकांना मात्र अत्यंत क्लेशदायक वाटते. आपल्या शरीराची जडणघडण, त्याची कार्यपद्धती आणि त्याला होणारे विकार हे सर्व आपल्या जनुक साखळीत (जेनोम) असलेला मोलेक्यूल्सचा अनुक्रम ठरवत असल्याने ही वेदना सीमारेखा सुद्धा त्यावरच अवलंबून असावी असे अनुमान सहज काढता येते. मात्र या विषयात संशोधन करणार्‍या तज्ञ डॉक्टर्सच्या मताने, वेदनेची सीमारेखा फक्त जनुकातील मोलेक्यूल्सच्या अनुक्रमावरच अवलंबून नसून ही सीमारेखा अनेक कारणे एकत्रितपणे ठरवत असतात. जनुकातील मोलेक्यूल्सचा असलेला एक विशिष्ट अनुक्रम किंवा जनुके ही सीमारेखा ठरवण्याला साधारणपणे फक्त 50 % कारणीभूत असतात.

TimSpector140x180

डॉ. टिम स्पेक्टर

आपल्या जनुक साखळीतील कोणती जनुके ही या वेदनेची सीमारेखा ठरवण्यासाठी कारणीभूत असावीत हे शोधून काढण्यासाठी लंडन मधील किंग्ज कॉलेज येथे जेनेटिक एपिडेमिऑलॉजी (genetic epidemiology) या विषयाचे प्रोफेसर डॉ. टिम स्पेक्टर यांनी एक साधा प्रयोग करून बघण्याचे ठरवले. हुबेहुब एकमेकांसारख्या दिसणार्‍या जुळ्या भावंडांच्या 25 जोड्या त्यांनी आपल्या प्रयोगासाठी निवडल्या. या जुळ्या भावंडांच्या प्रत्येक जोडीतील एका व्यक्तींच्या उघड्या दंडावर एका हीटर डॉ. टिम यांनी बांधला व त्या हीटरचे तपमान ज्या बिंदूपर्यंत त्या व्यक्तीला सहन करता आले तोपर्यंत वाढवत नेले. किंवा कोणत्या तपमानाला जुळ्या भावंडांच्या जोडी पैकी एका व्यक्तीच्या वेदनेची सीमारेखा उल्लंघली जात होती हे त्यांना जाणून घेता आले. यानंतर हाच प्रयोग त्यांनी या जोड्यांमधील दुसर्‍या व्यक्तीवर केला. या जुळ्या भावंडांच्या जनुक साखळ्या 100% एकमेकांसारख्या असल्याने त्यांच्या वेदना सीमारेखा जर एकाच तपमानाला उल्लंघल्या गेल्या असत्या तर वेदना सीमारेखा या फक्त जनुक साखळीतील मोलेक्यूल्सच्या अनुक्रमावरच अवलंबून असतात असा निष्कर्ष काढता आला असता. मात्र या वेदना सीमारेखा निरनिराळ्या तपमानांना उल्लंघल्या गेल्या असत्या तर वेदना सीमारेखा या फक्त जनुक साखळीतील मोलेक्यूल्सच्या अनुक्रमावरच अवलंबून नसून पर्यावरण किंवा ज्या परिस्थितीत त्या व्यक्ती आपले आयुष्य घालवत आहेत त्याचा जनुक साखळीवर होणारा परिणाम हा सुद्धा वेदना सीमारेखेवर पडत असला पहिजे असे म्हणणे शक्य झाले असते.

या प्रयोगात भाग घेणार्‍या सर्व स्वयंसेवकांना दंडाला बसणारा चटका असह्य होताक्षणी एक बटण दाबण्यास सांगितले होते. त्यांनी बटण दाबल्याच्या क्षणी काय तपमान आहे हे बघून त्या व्यक्तीची वेदना सीमारेखा काय आहे? हे संशोधकांना जाणून घेता आले होते. यानंतर या जुळ्या व्यक्तींच्या संपूर्ण जनुक साखळी मधील सांकेतिक अनुक्रम (whole genetic codes (genomes)) व या जुळ्या व्यक्तींशी संबधित नसलेल्या 50 इतर व्यक्तींच्या जनुक साखळी मधील सांकेतिक अनुक्रम यांचा संशोधकांनी तौलनिक अभ्यास केला. या अभ्यासात प्रथम अशी गोष्ट लक्षात आली की समान जनुक साखळी असलेल्या जुळ्या भावंडांच्या वेदना सीमारेखा समान नसून भिन्न असतात. म्हणजेच दोन्ही स्त्रिया असलेल्या जुळ्या भावंडांच्या जोडीपैकी एका स्त्रीला ज्या तपमानाचा चटका असह्य वाटला होता त्याच तपमानाचा चटका तिच्या जुळ्या बहिणीला मात्र असह्य वाटला नव्हता. संशोधकांना या तौलनिक अभ्यासातून, व्यक्तीला वेदना होऊ लागल्यावर ज्यात काही रासायनिक बदल होत असल्याचे आढळून आले होते आणि त्यामुळे वेदना सीमारेखेशी त्यांचा थेट संबंध जोडता येणे शक्य होते अशा 9 जनुकांना ओळखता आले. वेदना सीमारेखेशी जोडता येणार्‍या या 9 जनुकांत होणारे रासायनिक बदल जुळ्या भावंडांपैकी दोघांच्या किंवा दोघींच्या बाबतीत भिन्न तपमानाला होत असल्याने त्यांच्या वेदना सीमारेखाही भिन्न होत्या असा निष्कर्ष संशोधकांना यावरून काढता आला.

डॉ. टिम स्पेक्टर म्हणतात की गाडीचे हेडलाइट्स कमी जास्त प्रखर करण्यासाठी आपण जसा गाडीचा डिमर स्विच ऑनऑफ करतो त्याच पद्धतीने शरीराला कोणतातरी संदेश देण्यासाठी या 9 जनुकांमधे हे रासायनिक बदल होताना दिसतात. हुबेहुब एकसारखे एक असणार्‍या जुळ्या भावंडांमधील जनुकांकडून प्रक्षेपण केल्या गेलेल्या लाखो संदेशांचे अत्यंत आधुनिक तंत्रज्ञान वापरून केलेल्या पृथ:करणाचा समावेश असलेल्या त्यांच्या या पथदर्शी अभ्यासावरून असे दिसते आहे की या प्रयोगामुळे कोणतीही व्यक्ती या बाबतीत दुसर्‍यासारखी नसते हे सिद्ध झाले आहे. प्रत्येक व्यक्तीची वेदना सीमारेखा ही त्या व्यक्तीप्रमाणेच अद्वितीय असते आणि जनुकांमध्ये होणारे रासायनिक बदल एखादा थर्मोस्टॅट किंवा डिमर स्विच ऑनऑफ करावा तसे घडून आल्यामुळे हे बदल त्या व्यक्तीची वेदना सीमारेखा दर्शवतात.

painkillers

वेदनेसाठी एखादी व्यक्ती किती संवेदनाशील आहे हे जाणून घेण्यासाठी हा अभ्यास निश्चितच महत्त्वपूर्ण आहे. वेदना संवेदनशीलता ही अतिशय विकट आणि प्रत्येक व्यक्तीसाठी भिन्न असलेली भावना आहे. 100% जनुक साखळ्या तशाच असलेल्या जुळ्या भावंडांच्यातही वेदना सीमारेखा ही भिन्न किंवा अलग असल्याचे दिसून आले आहे. ही वेदना सीमारेखा औषधोपचार किंवा जीवनपद्धतीतील बदल यांनी बदलता येते असेही दिसते. दुख्ख: हरण करणारी औषधे किंवा जीवनपद्धतीमध्ये कोणते बदल सुचवता येतील हे सांगण्याच्या दृष्टीने हा अभ्यास महत्त्वाचा ठरतो.

old man in pain

बर्‍याच लोकांची अशी समजूत असते की समोरची एखादी व्यक्ती नाजूक अंगकाठीची असली किंवा अशक्त दिसत असली म्हणजे त्या व्यक्तीची वेदना सीमारेखा कमीच असणार किंवा समोरचा माणूस चांगला धष्टपुष्ट आहे म्हणजे त्याची वेदना सीमारेखा खूप वरच्या पातळीवर असली पाहिजे. परंतु डॉ. टिम स्पेक्टर यांच्या या अभ्यासावरून स्पष्ट दिसून येते आहे की वेदना सीमारेखा ही एकतर आपली जनुक साखळी ठरवत असते आणि त्याचप्रमाणे ती व्यक्तीच्या जीवनशैलीवर ती अवलंबून असते. ती व्यक्ती नाजूक अंगकाठीची आहे का आडदांड शरीरयष्टीची, यावर त्या व्यक्तीची वेदना सीमारेखा अवलंबून नसते. एक मात्र खरे की सर्व व्यक्तींसाठी, त्यांच्या वृद्धत्वामध्ये मात्र, या वेदना सीमारेखेची पातळी निश्चितच खाली येत असते.

9 मार्च 2014

Advertisements

About chandrashekhara

I am a retired electronics engineer. I am interested in writing, reading books. Other hobbies include Paper models, wooden fret work and social networking.

चर्चा

अद्याप प्रतिक्रिया नाहीत.

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s

जुने लेख शोधा

Enter your email address to subscribe to this blog and receive notifications of new posts by email.

Join 387 other followers

MyFreeCopyright.com Registered & Protected

माझे नवीन इ-पुस्तक

एका साम्राज्याच्या शोधात

Advertisements
%d bloggers like this: