.
अनुभव Experiences, Science

दूरचित्रवाणीवरील नवी क्रांती


अलीकडे रोज आमचा संध्याकाळचा टीव्ही मालिकांचा रोजचा रतीब एकदा टाकून झाला आणि नंतर थोडा वेळ आपल्या पार्टीचे पारडे वर जावे म्हणून एकमेकाशी खोटी खोटी भांडणे करणारे राजकीय पार्ट्यांचे प्रवक्ते आणि स्वत:ची हुशारी दाखवणारे टीव्ही अ‍ॅन्कर यांच्यामधली तथाकथित भांडणे आणि वादविवाद बघून झाले की मी दूरचित्रवाणी वाहिन्या बघणे बंद करतो व इंटरनेट टीव्ही या नावाने ओळखले जाणारे एक नवीन उपकरण चालू करतो. खरे सांगायचे झाले तर या नवीन उपकरणाने माझ्यावर एवढी छाप टाकली आहे की या उपकरणाला मी आता दूरचित्रवाणी मधील एक नवीन क्रांती असेच मानायला सुरूवात केली आहे.

भारतात दूरचित्रवाणीचे आगमन 1970 च्या दशकात झाले आणि दूरचित्रवाणीचा पडदा रंगीत होण्यासाठी 1980 च्या दशकापर्यंत वाट पहावी लागली. सुरवातीच्या काळात सरकारी नियंत्रणाखाली असलेली, दूरदर्शन नावाची फक्त एक वाहिनी, आणि ती सुद्धा फक्त संध्याकाळचे साडेचार तास, बघायला मिळत असे. या वाहिनीवर सरकारी ऑफिसात बसलेले बाबू लोक प्रेक्षकांनी काय बघायचे ते ठरवत असत. लोकांना काय बघायला हवे आहे?त्याच्याशी त्यांना काही सोयरसुतक नसे. त्या वेळेला, लांब अंतरावरची (उदा. मुंबई व दिल्ली) दूरदर्शन केंद्रे एकमेकाशी मायक्रोवेव्ह दुव्यांनी जोडलेली नसल्याने प्रत्येक केंद्र कार्यक्रमाच्या बाबतीत स्वतंत्र आणि स्वयंभू असे. पुढे दूरदर्शनची केंद्रे मायक्रोवेव्ह दुव्यांनी जोडली गेली आणि पडद्यावर दिसणारे कार्यक्रम अधिकच निराशाजनक बनले. आता मुंबईच्या बाबू मंडळी ऐवजी दिल्लीला बसलेले बाबू, संपूर्ण देशातील प्रेक्षकांनी काय बघावे हे ठरवू लागले. या मुळे एक गोष्ट झाली, टीव्ही वरचे कार्यक्रम अधिकच कंटाळवाणे व बोअर बनले.

1990 च्या दशकात प्रथमच, उपग्रहाद्वारा संदेश ग्रहण करून,ते केबल वरून ग्राहकांच्या घरापर्यंत पोचणार्‍या,दूरचित्रवाणी वाहिन्या भारतात अवतरल्या. सरकारी नियंत्रणाखाली असलेल्या टीव्ही माध्यमाला कंटाळलेल्या प्रेक्षकांसाठी या वाहिन्या एखाद्या सुखद वार्‍याच्या झुळुकीसारख्या भारतातील प्रेक्षकांना भासल्या यात नवल असे ते काहीच नव्हते. यानंतर दूरचित्रवाणी झपाट्याने बदलत गेली. प्रथम करमणूकप्रधान वाहिन्या आल्या आल्या आणि त्यांच्या मागोमाग फारसा काळ न दवडता, सिनेमा, बातम्या, खेळ, आणि अखेरीस डॉक्यूमेंटरीज दाखवणार्‍या विशेष वाहिन्या प्रेक्षकांचे लक्ष आपल्याकडे खेचून घेण्याचा प्रयत्न करू लागल्या. या बरोबरच दूरचित्रवाणीवर जाहिरातयुग स्वाभाविकपणेच अवतरले. अखेरीस थेट उपग्रहाद्वारा सेवा देत असलेल्या डीटीएच वाहिन्या ग्राहकाला उपलब्ध झाल्या व शहर, गाव यासारख्या प्रादेशिक आणि भौगोलिक बंधनांमधूनही दूरचित्रवाणी मुक्त झाली. एक साधी उपग्रह थाळी घराच्या गच्चीवर बसवून देशाच्या कोणत्याही कानाकोपऱ्यातला अगदी सामान्य माणूस सुद्धा अगदी नवीन चित्रपट सध्याच्या फॅशन्स, बातम्या आणि मुख्य म्हणजे टीव्ही मालिका बघू लागला.

हे सर्व वर्णन मी जरी भारतामधले केलेले असले तरी मला असे वाटते की ते अमेरिका सोडली तर जगातल्या इतर बहुतेक सर्व राष्ट्रांनाही लागू पडते. अमेरिकेत मात्र सरकारचे कोणतेही नियंत्रण नसलेल्या अनेक वाहिन्या बर्‍याच आधीच्या काळापासूनच प्रक्षेपण होत होत्या. आज जगातल्या, काही अपवाद सोडून, जवळजवळ सर्व राष्ट्रांमधील टीव्ही प्रेक्षक, करमणूक, बातम्या, खेळ यासारख्या विशिष्ट विषयाला वाहिलेल्या अनेक वैशिष्ट्यपूर्ण वाहिन्या पाहू शकतात.

हे सर्व जरी आजमितीला शक्य झालेले असले तरी यात एक मुलभूत कमीपणा आहे असे मला नेहमीच वाटत राहिलेले आहे. अगदी 200 वाहिन्या जरी उपलब्ध असल्या तरी या सर्व वाहिन्यांवर, त्या आपल्याला जे दाखवू इच्छितात तेच फक्त आपण बघू शकतो. एका उदाहरणावरून मला काय म्हणायचे आहे ते स्पष्ट होईल. मागच्या आठवड्यात मी पाकिस्तान मधील मोहेंजोदारो या सुप्रसिद्ध स्थळाबद्दल एक ब्लॉगपोस्ट लिहित होतो व माझ्या मनात मोहेंजोदारो हाच विषय घोळत असल्याने या स्थळाबद्दलची एखादी डॉक्यूमेंटरी बघायला मिळाल्यास मला हवी होती. परंतु हे शक्य नव्हते आणि डॉक्यूमेंटरी दाखवणार्‍या नॅशनल जिओग्राफिक किंवा डिसकव्हरी या सारख्या वाहिन्या जे कार्यक्रम दाखवू इच्छित होते तेच बघणे मला भाग होते. काही सुधारलेल्या देशात आजकाल टीव्ही ऑन डिमान्डया नावाची सेवा सुरू झाली आहे. येथे आपण निवडलेली कोणतीही चित्रफीत आपल्याला शुल्क दिल्यास बघता येते. परंतु आपली निवड बहुधा लोकप्रिय चित्रपटांच्या पर्यायांमधूनच करण्याची शक्यता असते आणि प्रत्येक वेळी शुल्क भरण्याची कल्पना बहुतेक लोकांना पटत नाही. एकदा महिन्याचे केबल किंवा उपग्रह थाळी शुल्क भरले की तो महिनाभर टीव्ही बघण्याची कल्पना आता सर्वसाधारणपणे रूढ झाली आहे. त्यानंतर परत एकदा आपल्याला हवा तो कार्यक्रम बघण्यासाठी म्हणून परत शुल्क भरणे मला तरी रुचत नाही.

5 ते 6 वर्षांपूर्वी,जपानी आणि कोरियन दूरचित्रवाणी संच उत्पादकांनी प्रथमच भारतीय बाजारात इंटरनेट टीव्ही या प्रकारचे संच वितरित केले. या संचांमध्ये अंतर्गत इंटरनेट जोडणी बसवलेली असल्याने लॅन केबल किंवा डॉन्गल या नावाचे एक छोटे उपकरण संचाला जोडून वायफाय पद्धतीने हा दूरचित्रवाणी संच इंटरनेटला जोडणे शक्य होते. मी या प्रकारचा एक दूरचित्रवाणी संच 3 वर्षांपूर्वी खरेदी केला होता. परंतु माझ्या असे लक्षात आले होते की या संचातील अंतर्गत इंटरनेट जोडणी फारशी कार्यकुशल व विश्वासार्ह नसल्याने तितकीशी उपयुक्त ठरत नाही. हाताच्या बोटावर मोजण्यासारखी अ‍ॅप्लिकेशन्स यावरून रडतखडत कशीतरी चालू शकतात व बहुतेक वेळा फक्त एक दातेरी चक्र गरागरा फिरत असलेले संचाच्या पडद्यावर दिसत राहते. हे चक्र बराच वेळ पाहिल्यानंतर साहजिकच प्रेक्षकाचा पेशन्स संपतो व कंटाळून तो हा इंटरनेट संच बंद करून आपले नेहमीचे टीव्ही प्रक्षेपण बघणे पुन्हा सुरू करतो.

3 ते 4 वर्षांपूर्वी अमेरिकन व इतर विकसित देशांमध्ये,अ‍ॅपल कंपनीने अ‍ॅपल टीव्ही असे नाव दिलेले एक उपकरण बाजारात आणले. याचे नाव टीव्ही असले तरी प्रत्यक्षात याचे स्वरूप 5 किंवा 6 चौरस इंच आकाराची व काळ्या रंगाची एक चपटी डबी असेच आहे. ही डबी आपल्या दूरचित्रवाणी संचाला असलेल्या एचडीएमआय सॉकेटला याच प्रकारच्या केबलने जोडली व दुसर्‍या वायरने या अ‍ॅपल टीव्हीला आपला नेहमीचा वापरातला वीज पुरवठा जोडला की याचे कार्य सुरू होते. अ‍ॅपलने बाजारात आणलेली अ‍ॅपल टीव्हीची पहिली दोन मॉडेल्स तशी या क्षेत्रात प्रवीण असलेल्या लोकांना तर्‍हेतर्‍हेचे उपद्व्याप करणे शक्य होईल अशी होती व त्यामुळे लोकांनी ही दोन्ही मॉडेल्स लगेचच जेलब्रेक केली व XBMC सारखे मिडिया सर्व्हर्स या अ‍ॅपल टीव्हीच्या माध्यमाने दूरचित्रवाणी संचाला जोडता येतील अशी व्यवस्था करण्यात ते यशस्वी झाले. अ‍ॅपल कंपनीला हे समजल्याबरोबर त्यांच्या हे लक्षात आले की यामुळे त्यांच्या या व्यवसायात शिरण्याच्या मुख्य उद्देशाला: त्यांच्याकडे कॉपीराइट्स असलेली गाणी किंवा चित्रपट लोकांनी भाड्याने किंवा विकत घ्यावी, यालाच छेद जातो आहे. त्यामुळे त्वरेने त्यांनी तिसरे मॉडेल बाजारात आणले की ज्यावर कोणतीही फेरफार किंवा जेलब्रेक करणे सध्यातरी अशक्यप्राय आहे आणि अ‍ॅपल कंपनीला अपेक्षित आहे त्याच पद्धतीने हे उपकरण वापरणे शक्य आहे. ज्या मंडळींना जास्त स्वतंत्रपणे प्रयोग करून पहाण्याची इच्छा असते त्यांच्यासाठी अ‍ॅपल शिवाय वेस्टर्न डिजिटल सारख्या इतर काही कंपन्यांच्या पण अ‍ॅपल टीव्हीसमान असणार्‍या इतर काळ्या पेट्या उपलब्ध आहेत. या काळ्या पेट्या दुसर्‍या मिडिया सर्व्हर्स बरोबरही उत्तम चालू शकतात.

हे वर लिहिलेले सगळे वर्णन न कंटाळता वाचणार्‍या वाचकांना असा प्रश्न पडण्याची शक्यता आहे की या नवीन उपलब्ध झालेल्या हार्डवेअर संबंधीची माहिती आणि या लेखाचा विषय असलेली दूरचित्रवाणीवरील क्रांती याचा कसा काय संबंध लावायचा? परंतु अ‍ॅपल टीव्ही किंवा तत्सम इतर काळ्या पेट्या पेट्या उपयोगात आणूनच ही क्रांती घडते आहे. दूरचित्रवाणी प्रक्षेपणाच्या क्षेत्रात हा जो नवा बदल घडतो आहे त्याची माहिती करून घेण्यासाठी अ‍ॅपल टीव्हीचे उदाहरण मी घेतले आहे कारण तांत्रिक कुशलता ज्यांना नाही अशा लोकांना सुद्धा अ‍ॅपल टीव्हीची ही काळी पेटी वापरण्यास सर्वात सुलभ आहे असे मला वाटते.

अ‍ॅपल टीव्ही 3 प्रकारे वापरता येतो. यामध्ये सर्वात प्रथम अ‍ॅपल कंपनीची ही काळी पेटी ग्राहकांनी कशी वापरायची याबद्दलची कंपनीची स्वतःची काय अपेक्षा आहे हे बघूया. अ‍ॅपल कंपनीने गाणी, चित्रफिती आणि चित्रपट यांचा एक मोठा खजिना स्वतःच्या वेब साइटवर उपलब्ध करून ठेवला आहे. या खजिन्याला अ‍ॅपल कंपनी अ‍ॅपल स्टोअरम्हणते. अ‍ॅपल कंपनीच्या अपेक्षेप्रमाणे अ‍ॅपल टीव्हीच्या ग्राहकांनी ही गाणी किंवा चित्रपट ऑनलाइन विकत घेऊन ते अ‍ॅपल टीव्हीच्या सहाय्याने बघावे अशी अपेक्षा आहे. अशा विकत घेतलेल्या गोष्टी अगदी विनासायास अ‍ॅपल टीव्ही जोडलेल्या आपल्या दूरचित्रवाणी संचावरून बघता येतात. अमेरिकेतील ग्राहकांना या गोष्टी कदाचित अतिशय स्वस्तात मिळत आहेत असे वाटण्याची शक्यता आहे, परंतु भारतात राहणार्‍या बहुतेकांना या किमती परवडू शकणार नाहीत, निदान मला तरी त्या परवडत नाहीत. त्यामुळे अ‍ॅपल टीव्ही वापरण्याच्या आणि सहज परवडू शकणार्‍या इतर पद्धतीकडे आपण वळूया.

अ‍ॅपल टीव्ही वापरण्याची दुसरी पद्धत म्हणजे याच्या सहाय्याने आपल्या घरातल्या आणि वायफाय पद्धतीने जोडणी केलेल्या कोणत्याही स्मार्ट फोन, संगणक, टॅबलेट किंवा ढगात (क्लाऊड मेमरी) यावर संग्रह केलेली गाणी, चित्रफिती किंवा चित्रपट हे आपल्या हॉल मधील टीव्ही वरून कोणत्याही केबल्स किंवा तारा यांचा वापर न करता (वायरलेस) बघणे. परंतु येथे सुद्धा एकूण उपलब्ध असलेले पर्याय जरा मर्यादितच असतात असे वाटते. अशी किती गाणी किंवा चित्रपट आपण संग्रहात ठेवू शकतो? माझा अनुभव असा आहे की आपल्या संग्रहातील गाणी किंवा चित्रपट बघण्याचा थोड्याच दिवसात कंटाळा येतो.

अ‍ॅपल टीव्ही वापरण्याच्या तिसर्‍या पद्धतीकडे आता आपण वळूया. ही पद्धत माझ्या सर्वात जास्त पसंतीची आहे. यात अ‍ॅपल टीव्हीच्या मुख्य स्क्रीनवर उपलब्ध असलेल्या यू ट्यूब किंवा व्हिमिओ सारख्या अ‍ॅप्सचा समावेश आहे. जगभरातील हौशी लोक या दोन अ‍ॅप्सवर आपल्या आवडीची गाणी किंवा चित्रफिती अपलोड करून ठेवत असतात. अ‍ॅपल टीव्ही प्रमाणेच वेस्टर्न डिजिटल कंपनी किंवा इतर कंपन्यांचे सिरियल मिडिया कन्ट्रोलर्स सुद्धा आपल्या स्क्रीनवर ही अ‍ॅप्स आपल्याला उपलब्ध करून देतातच. त्या साठी अ‍ॅपल टीव्हीच आपल्याकडे असला पाहिजे असे जरूर नाही. मी फक्त उदाहरणार्थ अ‍ॅपल टीव्ही घेतला आहे. आपण फक्त हवा तो हे अ‍ॅप्स निवडून त्यावर क्लिक केले की झाले. आपल्या डोळ्यासमोर मनोरंजनाचा एक खजिनाच उलगडतो आहे याची प्रचिती लगेच येते. मी मोहेंजोदारो चे उदाहरण वर दिले आहे. यू ट्यूब च्या शोध फलकात हे शब्द टंकलिखित केल्याबरोबर अनेक पर्याय आपल्या समोर येतात. यूनेस्को ने या विषयावर केलेली एक फिल्म मला त्या वेळी लगेचच बघायला मिळाली होती.

मराठी मधील अगणित कार्यक्रम यू ट्यूब वर उपलब्ध आहेत. यात नाट्य संगीत, भावगीते, शास्त्रीय संगीत, नाटके या सर्वांचा समावेश आहे. अनेक नवोदित कलाकार आपली कला या माध्यमातून लोकांपुढे सध्या ठेवत आहेत. गेल्या काही काळात बुजुर्ग कलाकारांबरोबर अशा अनेक नवीन कलाकारांनी सादर केलेले कार्यक्रम मी बघितले आहेत व बघतो आहे.

माझ्या सारख्या ज्येष्ठ नागरिकांसाठी तर अ‍ॅपल टीव्ही किंवा तत्सम उपकरणे हे एक वरदानच आहे. यू ट्यूब वर घेतलेला शोध हा एखाद्या गुप्त खजिना शोधण्याच्या मोहिमेसारखा असतो असे मला नेहमी वाटते. गेल्या महिन्याभरात 1940-50 किंवा 1960-70 या दशकातील अनेक लोकप्रिय गाण्यांचा पुनर्शोध मला घेता आला आहे. अक्षरशः: हजारो गानप्रिय लोकांनी आपल्या जवळ असलेला आणि वर्षानुवर्षे सांभाळून ठेवलेला जुन्या जुन्या गाण्यांचा आपला रेकॉर्ड्सचा संग्रह, डिजिटल स्वरूपात बदलून व नंतर तो यू ट्यूब वर अपलोड करून तुमच्या किंवा माझ्या आनंदात भर घालण्यासाठी हा खजिना खुला करून ठेवला आहे. यू ट्यूब वर असलेली गाणी किंवा चित्रफिती ही लोकांसाठी लोकांनी तयार करून ठेवलेले कार्यक्रम आहेत. सर्वात महत्त्वाचे म्हणजे यूट्यूब वर मला जे बघण्याची किंवा ऐकण्याची इच्छा असते ते मी कोणतेही शुल्क न देता बघू किंवा ऐकू शकतो.

रोज रात्री भोजन घेतल्यावर पुढचे कंटाळवाणे तास दोन तास काय करायचे हा माझ्यासारख्यांना पडणारा यक्षप्रश्न, अ‍ॅपल टीव्हीने बर्‍यापैकी सोडवला आहे हे नक्की. जाहिरातींचा बुजबुजाट असलेल्या टीव्ही वाहिन्यांवर कोठेतरी काहीतरी बघत बसण्यापेक्षा यू ट्यूबवर अर्धा किंवा एखादा तास, आवडणार्‍या संगीताचा आस्वाद घेता येणे हे तदनंतर सहज रितीने निद्रादेवीच्या आधीन होता यावे या साठी एक गुरूकिल्लीच मला मिळाली आहे असे मी मानतो. दूरचित्रवाणीने आपल्या आयुष्यात अनेक क्रांत्या घडवून आणल्या. मात्र काय कार्यक्रम बघायचे किंवा ऐकायचे याचे संपूर्ण स्वातंत्र्य आपल्याला बहाल करणारी ही नूतन क्रांती या सर्वांचा कळसच आहे असे म्हटले तरी चालेल.

25 फेब्रुवारी 2014

Advertisements

About chandrashekhara

I am a retired electronics engineer. I am interested in writing, reading books. Other hobbies include Paper models, wooden fret work and social networking.

चर्चा

अद्याप प्रतिक्रिया नाहीत.

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s

जुने लेख शोधा

Enter your email address to subscribe to this blog and receive notifications of new posts by email.

Join 386 other followers

MyFreeCopyright.com Registered & Protected

माझे नवीन इ-पुस्तक

एका साम्राज्याच्या शोधात

Advertisements
%d bloggers like this: