.
अनुभव Experiences

विसरून जाण्याचे वय


माझी इयत्ता तिसरीत असलेली नात रोज स्कूल बसने शाळेत जाते. तिच्याच वर्गात असलेल्या काही मुली सुद्धा या बसच्या फेरीत तिच्या बरोबरच्या रोजच्या सहप्रवासी असतात. ती शाळेतून घरी परत आली की तिच्या त्या वेळच्या मूड वरून त्या दिवशी ती आणि तिच्या बसमधल्या मैत्रिणी यांच्यामध्ये भांडणे झाली असतील? का त्या गळ्यात गळा घालून बसल्या असतील? याचा सहज अंदाज बांधता येतो. ती जर त्रासलेली, वैतागलेली असली तर त्या दिवशी बसमधे तिचे कोणत्या तरी मैत्रिणीबरोबर नक्की भांडण झाले असणार आहे आणि भांडण झालेल्या मैत्रिणीचा त्या दिवशीच्या तिच्या बेस्ट फ्रेन्डसच्या यादीतला क्रम, बराच खाली घसरलेला असणार आहे हे आणखी निराळे सांगण्याची गरज नसते. तिला फक्त चार सहानुभूतीचे शब्द आम्ही ऐकवतो व तेवढे तिला पुरेसे असते. रात्री झोपण्याच्या वेळेपर्यंत मैत्रिणीशी झालेल्या भांडणाच्या दुखा:ची तीव्रता बर्‍यापैकी कमी झाल्याचे आम्हाला दिसून येते तर दुसर्‍या दिवशी सकाळी ती कालचे भांडण पूर्णपणे विसरून गेलेली असते आणि कधी एकदा बस येते आणि काल भांडण झालेल्या मैत्रिणीसह इतर मैत्रिणी कधी एकदा परत भेटतात असे तिला वाटत असते. बसमधे बसल्याबरोबर कालचे भांडण ती पूर्णपणे विसरून गेलेली असते आणि मैत्रिणींबरोबर काल काही घडलेच नाही अशा रितीने सगळ्यांच्या गप्पा सुरू होतात. माझी नात आणि तिचे काल जिच्याशी भांडण झाले होते ती मैत्रिण या दोघी कालचे भांडण पूर्णपणे विसरून गेलेल्या असतात.

हे बघितले की मला नेहमी वाटत राहते की ही बालवयातील मुलेमुली किती नशीबवान असतात नाही? एखादी जादूची कांडी फिरवावी तसे काल झालेले कडाक्याचे भांडण ती आज विसरूनही गेलेली असतात आणि त्याच मित्र मैत्रिणीबरोबर त्यांचे मित्रत्वाचे घनिष्ट नाते परत प्रस्थापित सुद्धा झालेले असते. या उलट आपण मोठी माणसे मित्रांबरोबर झालेले वादविवाद पूर्णत्वाने कधीच विसरू शकत नाही. मित्रांबरोबरच्या वादविवादांचे ओझे उर्वरित आयुष्यभर आपल्या खांद्यावर ठेवून आपल्याला पुढे वाटचाल करणे भाग असते.

माझा एक मित्र आणि मी यांमधील आमची घनिष्ट मैत्री बरीच वर्षे टिकून राहिली होती. रोज आम्ही कॉफीच्या निमित्ताने भेटत असू. ते पतीपत्नी आणि आम्ही दोघे अशा चौघांनी मिळून युरोपची एक सफर सुद्धा एकत्रपणे केली होती. दहा एक वर्षांपूर्वी हा माझा मित्र अचानकपणेच जरा विचित्र रितीने आणि भ्रमिष्टासारखा माझ्याशी वागू लागला. मी त्याच्या वागण्याकडे बरीच वर्षे जुन्या मैत्रीची आठवण ठेवून दुर्लक्ष करत राहिलो. पुढेपुढे त्याने चारचौघात माझा अपमान करण्यास जेंव्हा सुरूवात केली तेंव्हा आता आपली मैत्री संपवण्याची गरज आहे हे माझ्या लक्षात आले व मी तसे केलेही. परंतु माझ्या मनात त्याच्या संबंधी असलेला स्नेह मात्र नंतरही तसाच राहिला होता. आमची मैत्री संपल्यानंतर त्याचे वागणे अधिकच तर्‍हेवाईक आणि विचित्र होत चालले आहे हे नेहमी मला जाणवत राही. दोन तीन वर्षांपूर्वी त्याचे अचानक आणि आकस्मिक निधन झाले. मला खरे सांगायचे तर अतिशय क्लेश आणि दुःख झाले होते. परंतु आमचे संबंध संपल्यासारखे झालेले असल्याने व त्या दुराव्याच्या ओझ्याखाली दबून गेल्याने,मी त्याला शेवटचे पोहचवण्यास जाण्याचे सुद्धा धैर्य दाखवू शकलो नाही. मोठे झाले की असे होते. इतरांबरोबर असलेले आपले वादविवाद, दुरावे आपल्या आयुष्याच्या अंतापर्यंत खांद्यावरून वाहून नेणे आपल्याला भागच असते.

दोन व्यक्तींमधील मैत्री ही खरे पहावयास गेले तर ती हवेत तरंगणार्‍या आणि वार्‍याच्या हलक्या झुळकीने सुद्धा हेलकावे खाऊ लागणार्‍या एखाद्या कोळ्याच्या जाळ्यासारखी नाजूक असते किंवा निदान वाटते तरी! मात्र हेच मैत्र कित्येक वेळा नातेसंबंधांपेक्षाही जास्त मजबूतपणे किंवा दणकटपणे टिकून राहिल्याचे मी पाहिलेले आहे. मात्र कधीकधी मैत्रीचे हे नाजूक संबंध अगदी तद्दन फालतू आणि वरवरच्या कारणांनी सुद्धा सहजपणे फाटतात किंवा तुटतात आणि कालौघात विरून जातात हेही माझ्या पाहण्यात आले आहे. परंतु मैत्री संबंधांमधली मजा ही आहे की मैत्री जरी संपली असली तरी पूर्वी त्याच मित्रांबरोबर एकत्रपणे अनुभवलेल्या प्रसंगांच्या सुखद आठवणी मनात कोणतीही अपराधीपणाची भावना न राहता तितक्याच ताजेपणाने जाग्या राहू शकतात. माझ्या वडिलांचे धंद्यामध्ये एक पार्टनर होते. धंदा चालू करण्याच्या बर्‍याच आधीपासून हे पार्टनर ते दोघे करत असलेल्या नोकरीमध्ये सहकारी सुद्धा होते त्यामुळे या दोघांनी अनेक दशके एकत्र काम केले होते असे म्हटले तरी चालेल. माझ्या वडिलांनी निवृत्त होण्याचा जेंव्हा निर्णय घेतला तेंव्हा झालेल्या आर्थिक वाटाघाटींमध्ये या दोघा मित्रांत काहीतरी वैतुष्ट्य आले. अखेरीस ते दोघे मानत असलेल्या एक तिसर्‍या बड्या कारखानदार व्यक्तीने सर्वाना मान्य होईल असा तोडगा काढला व समझौता घडवून आणला. मात्र या क्षणापासून माझे वडील आणि त्यांचे मित्र यांच्यातील मैत्रीचा धागा जो विरून गेला तो कायम स्वरूपी विरलेलाच ठरला. त्या नंतर जरी त्या दोघांच्या मनात एकमेकाविषयी कोणतीही अढी अशी उरलेली नसली तरी ते दोघेही परत त्यांची मैत्री कधीच पूर्वपदावर आणू शकले नाहीत. बर्‍याच काळानंतर माझ्या वडिलांचे हे धंद्यातील पार्टनर मला एकदा भेटले. अगदी पूर्वीच्याच जिव्हाळ्याने त्यांनी माझ्या वडिलांचे कुशल विचारले व त्यांच्या तब्येतीबद्दल कोणतीही कृत्रिमता न ठेवता विचारपूस केली. त्या दोघांतील मैत्री संपुष्टात आली असली तरी त्यांच्या बोलण्यावरून त्यांच्या मनात माझ्या वडिलांबद्दल अजूनही असलेले प्रेम व जिव्हाळा ते दोघे आता मित्र नसूनही स्पष्टपणे मला दिसत होता. माणसे मोठी झाली की दोन व्यक्तींमधील वादविवादाचे प्रसंग, माझी नात जशी विसरून जाऊ शकते तशी त्या दोन व्यक्ती विसरू का शकत नाहीत? हे मला खरे तर नेहमीच पडणारे एक कोडे आहे.

मात्र जेंव्हा नातेवाईकांच्या बरोबरच्या संबंधांचा प्रश्न येतो तेंव्हा मात्र आपण अगदी उलट रितीने वागत असतो असे प्रत्ययास येते. आईवडील आणि मुले या मधील संबंध आपण बाजूला ठेवू कारण मुले कशीही वागत असली तरी आईवडीलांचे त्यांच्या मुलांबद्दलचे प्रेम कमी झाले आहे असे सहसा तरी दिसत नाही. परंतु इतर नातीगोती त्यात भाऊ, बहिणी, मावसचुलत भावंडे, आत्या, मावशा आणि मुख्य करून व्याही मंडळी, या सगळ्या नात्यागोत्यांतील संबंध निदान औपचारिक पातळीवर तरी टिकवलेले दिसतात. नातेवाईकांनी आपल्याला बाजूला टाकलेले असले, त्यांच्याशी असलेले आपले संबंध कितीही ताणलेले असले, त्यांनी आपल्याला अपमानास्पद वागणूक दिलेली असली आणि आपल्याला त्यांचा मनातून कितीही राग आलेला असला तरी औपचारिक पातळीवर मात्र हे संबंध राखलेले दिसतात. याचे एक सोपे कारण हे आहे की जर एका नात्यातील संबंध काही कारणांनी तुटलेले असले तर त्या तुटण्याचा परिणाम ज्यांच्याशी अगदी प्रेमाचे संबंध असतात अशा इतर सर्व नातेवाईकांबरोबर असलेल्या आपल्या संबंधांवर होत असल्याने औपचारिक पातळीवर का होईना या नातेवाईकांशी संबंध राखणे आपल्याला भाग पडते. एका उदाहरणाने मला काय म्हणायचे आहे ते स्पष्ट होईल. माझ्या परिचितांपैकी एका महिला व त्यांची बहीण यांमधील संबंध पूर्णपणे दुरावलेले आहेत. त्यांच्यात साधे बोलणेही होत नाही. या दोघींमधील या भांडणाचा परिणाम त्यांच्या संपूर्ण नातेपरिवारावर झाला आहे. नात्यातील कोणत्याही समारंभात या बहिणी एकमेकाशी संभाषणही करत नसल्याने असे समारंभ आयोजित करणेही मोठे अवघड होत असते. मैत्री दुरावली तरी त्या जुन्या मैत्रीच्या सुखद आठवणी जशा मनात रेंगाळत राहतात तसे दुरावलेल्या नातेसंबंधात न होता मनात फक्त एक अपराधी भावना का कोण जाणे राहते. बर्‍याच वेळा आपण आयुष्यभर आपल्या कोणा नातेवाईकासाठी स्वत:चा स्वार्थ बाजूला ठेवून त्याला मदत करत राहतो. मात्र तद्नंतर हाच नातेवाईक ज्या वेळेस तुम्ही केलेल्या निःस्वार्थी मदतीची कदर न करता तुमच्याकडे दुर्लक्ष करण्यास सुरूवात करतो तेंव्हा आत्यंतिक निराशेची आणि अविश्वासाची भावना आपल्या मनात सतत काहूर निर्माण करत राहते. तरीसुद्धा आपण दुसर्‍या कोणत्यातरी नातेवाईकांच्या भावना दुखावून जाऊ नयेत म्हणून आपण ज्याला आयुष्यभर मदत केलेली असते अशा त्या कृतघ्न नातेवाईकाशी औपचारिकपणे का होईना पण संबंध राणे आपल्याला भागच पडते व त्याचे मनाला अतिशय क्लेश होणे हेही स्वाभाविक असते. नातेसंबंधांतील नाती याच कारणामुळे टिकून राहतात. सण समारंभ, गेटटुगेदर्स यांना याच कारणामुळे प्रत्यक्षात अगदी अप्रिय असलेल्या नातेवाईकांनाही बोलावणे भाग पडते व प्रत्यक्षात आपल्याला प्रिय असलेल्या मित्रांना मात्र बोलावता येत नाही.

जसजसे वय वाढत जाते तसतसे हे सर्व नातेसंबंध प्रत्यक्षात किती फसवे आणि बेगडी असतात या बद्दलची आपली जाण वाढत जाते. कोणा तरी भावाबहिणीला आपण स्वत:चा स्वार्थ बाजूला ठेवून केलेली आयुष्यभराची मदत, हा आपला एक पूर्ण वाया गेलेला असा प्रयत्न होता हेही चांगलेच लक्षात येऊ लागते. याच्या उलट मित्र हे फक्त मित्रच असल्याने व त्यांच्याकडून आपण कसलीच अपेक्षा ठेवत नसल्याने त्यांचा सहवास आता जास्त हवाहवासा वाटू लागतो. इंग्रजीत एक म्हण आहे “Forgive and forget.” किंवा माफ करा आणि विसरून जा, या अर्थाची! परंतु वय जसजसे वाढत जाते तसतसे दुसर्‍यांना माफ करणे जास्त जास्त अवघड बनू लागते. माझे एक ज्येष्ठ मित्र (वय वर्षे 74) नुकतेच मला म्हणाले की त्यांना आता आपला अपमान झाल्याची भावना सतत होते आणि या अपमानाची टोचणी मनाला असह्य वाटत राहते. माफ करणे अशक्य वाटणार्‍या आणि त्यामुळे अशा परिस्थितीत कुढत राहणार्‍या ज्येष्ठांनी मग करायचे तरी काय?

या अडचणीवर मात करण्याचा एकच मार्ग मला दिसतो आहे. तो म्हणजे आपल्याला अपमानास्पद किंवा अमान्य असणारे सर्व प्रसंग किंवा किंबहुना लोकांचे अप्रिय वागणेच विसरून जाण्याची आपली क्षमता कशी वाढवता येईल हे बघणे व तसा प्रयत्न करत राहणे. काही नातेवाईक किंवा परिचित यांच्याबद्दलची अढी आपण जन्मभर मनात बाळगून ठेवत असतो. मनातील अढीची ही भावना आता विसरून जाण्याची वेळ आता आली आहे हे ज्येष्ठांनी जर लक्षात घेतले तर नातेवाईकांशी, परिचितांशी औपचारिक का होईना पण संबंध टिकवता येण्याची गुरूकिल्लीच आपल्याला गवसली आहे हे त्यांच्या सहज लक्षात येईल.

विसराळूपणा हा एक दोष आहे असे जरी इतरत्र मानले जात असले तरी ज्येष्ठ नागरिकांसाठी मात्र विसराळूपणा हा एक महत्त्वाचा गुण ठरतो असे मला वाटते कारण विसरून जाण्याचेच हे वय असते. बरोबर आहे की नाही?

19 जानेवारी 2014

Advertisements

About chandrashekhara

I am a retired electronics engineer. I am interested in writing, reading books. Other hobbies include Paper models, wooden fret work and social networking.

चर्चा

अद्याप प्रतिक्रिया नाहीत.

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदला )

Connecting to %s

जुने लेख शोधा

Enter your email address to subscribe to this blog and receive notifications of new posts by email.

Join 387 other followers

MyFreeCopyright.com Registered & Protected

माझे नवीन इ-पुस्तक

एका साम्राज्याच्या शोधात

Advertisements
%d bloggers like this: