.
अनुभव Experiences

जुन्या काळचे खेळातले बांधणी संच


 

सध्या माझी नात (वय वर्षे 8) आमच्याकडे रहायला आली आहे. काल रात्री झोपताना मी तिच्याशी गप्पागोष्टी करत होतो. त्या वेळेस मी तिला सहज विचारले की तुझी आवडती पुस्तके व खेळ कोणते आहेत? मला उत्तर देण्याऐवजी तिने मलाच प्रतिप्रश्न केला की मी लहान होतो तेव्हाची माझी आवडती खेळणी कोणती होती? आणि तिला त्या खेळण्याबद्दल ऐकायला आवडेल. खरे तर तिचा प्रश्न ऐकून मी चक्रावूनच गेलो होतो कारण खरे सांगायचे तर मला माझ्या लहानपणचे एकही खेळणे त्या क्षणाला मला आठवत नव्हते. वेळ मारून नेण्यासाठी मी तिला माझा लहानपणचा आवडता खेळ लेगोसेटच होता म्हणून सांगून टाकले व तिचे समाधान झाले आणि ती पुढच्या दोन किंवा तीन मिनिटात गाढ झोपी सुद्धा गेली.

माझ्या नातीबरोबरच्या या गप्पा काही माझ्या मनातून नंतर जाईनात कारण मी तिला जे काही सांगून वेळ निभावून नेली होती ते सत्य खचितच नव्हते. मी जेंव्हा लहान होतो तेंव्हा लेगोहा खेळ फारसा कोणाला माहिती नव्हता. त्याचे उत्पादन युरोप मधील डेनमार्क या देशात बहुधा नुकतेच चालू झालेले असावे आणि इतर ठिकाणी हा खेळ माहीत असणे अपेक्षितही नव्हते. खरे तर माझ्यासारख्या ज्येष्ठ नागरिकाने आपल्या लहानपणच्या खेळण्यांबद्दल आता लिहिणे कितपत औचित्यपूर्ण ठरेल हे मला माहीत नाही. परंतु मला हा विषय इतका रोचक वाटतो आहे की त्याबद्दल मला लिहिले पाहिजेच असे वाटल्याने मी हे धाडस करतो आहे. मात्र लहानपणी माझ्याकडे कोणते खेळ होते हे आठवण्यासाठी स्मृती कोषात बरीच शोधाशोध करावी लागणार आहे हे नक्की!

माझ्या आठवणीप्रमाणे माझ्याकडे असलेल्या खेळण्यांमधले माझे दोन अत्यंत आवडते खेळ मला माझ्या वडीलांकडून मिळाले होते व ते स्वत: त्यांच्या लहानपणी त्याच खेळांबरोबर खेळलेले होते. त्यावेळी अशी पद्धतच होती आणि माझ्या आजीने, वडीलांचे खेळ अगदी जपून ठेवून मी योग्य वयाचा झाल्यावर माझ्या हवाली केले होते. या दोन खेळांपैकी एका खेळाचे नाव मोबॅकोअसे होते.

मोबॅको हा खेळ 1920 सालामध्ये हॉलंड मधील N.V. Plaatmetaalindustrie ( sheet metal factory) van Mouwerik & Bal in Zeist, या कंपनीने प्रथम बाजारात आणला होता. या खेळातील सुटे भाग वापरून निरनिराळ्या प्रकारच्या इमारती बांधता येत असत. या खेळामध्ये, निरनिराळ्या उंचीचे व चौरस आकाराचे लाकडी खांब हे महत्त्वाचे सुटे भाग होते. या लाकडी खांबांना चारी बाजूस, लांबीला समांतर अशा चिरा मध्यभागी पाडलेल्या होत्या. ठरावीक अंतरावर चौकोनी छिद्रे पाडलेल्या एका फायबरबोर्डावर हे खांब त्या छिद्रांमधे उभे करावयाचे असत. नंतर दोन खांबांमध्ये खिडक्या, दारे किंवा भिंतींची पॅनेल्स अशा स्वरूपात असलेले कार्डबोर्डचे तुकडे, खांबांमधील चिरांच्यात अडकावयाचे असत. ही कार्डबोर्डची पॅनेल्स निरनिराळ्या रंगांची होती व त्यांना खिडक्या, दारे यांचे कट आऊट्स होते. इमारतीच्या बांधणीला स्थैर्य यावे यासाठी कार्डबोर्डच्याच चौकोनी छिद्रे पाडलेल्या पट्ट्या खांबांवर अडकवून खालच्या पॅनेल्सच्यावरच्या बाजूस ठेवावयाच्या असत व शेवटी वर कौलारू छत ठेवून इमारत पूर्ण करावी लागे. या खेळाचे डिझाइन इतके सुंदर होते की अगदी थोडे भाग वापरून निरनिराळ्या आकाराच्या मनमोहक इमारती सहज रितीने बांधणे सहज शक्य होत असे. माझ्या आठवणीप्रमाणे या इमारती बांधायला सोप्या व दिसायला मोठ्या सुंदर असत व 19व्या शतकातील युरोपियन स्थापत्याची त्यांच्यावर स्पष्ट झाक दिसत असे.

या मोबॅको खेळामधली एक अडचण अशी होती की त्याची पॅनेल्स कार्डबोर्ड किंवा पुठ्ठ्याची बनवलेली होती त्यामुळे ती खूपच नाजूक असत व वापरताना बरीच काळजी घ्यावी लागे. मला बहुधा मोबॅको खेळण्याचा लवकरच कंटाळा आला असावा कारण माझ्या आजीने माझ्या वडीलांचा आणखी एक जुना खेळ मला बाहेर काढून दिला होता. हा नवा खेळ मोबॅकोच्या मानाने भलताच ग्रेट ठरला. हा तुटण्याफुटण्याची शक्यताच नव्हती कारण तो पूर्णपणे लोखंडी बनावटीचा होता. अर्थात या नवीन खेळामधे घरे वगैरे बांधता येत नसत पण या खेळामधे गाड्या, क्रेन्स, ट्रक्स, इंजिने आणि मानवी आकार या सारख्या अनेक आणि विविध गोष्टी बनवता येत असत आणि मुख्य म्हणजे बनवलेल्या या गोष्टी चलत फिरत, या खेळाचे नाव होते मेकॅनो.’

मेकॅनो खेळाचा इतिहास 100 वर्षांहून तरी जास्त जुना आहे. विकिपिडिया प्रमाणे मेकॅनो हा निरनिराळ्या मॉडेल्सची बांधणी करू शकणारा खेळ, फ्रॅन्क हॉर्नबी या व्यक्तीने इंग्लंडमध्ये विकसित केला. या खेळात ठरावीक अंतरावर (ग्रिड) छिद्रे पाडलेल्या लोखंडी पट्ट्या, प्लेट्स, कॉर्नरचे गर्डर्स, चाके, आंस आणि दातेरी चाके किंवा गिअर्स असत. हे भाग एकमेकाला जोडण्यासाठी नट आणि बोल्ट्स त्याबरोबर दिलेले असत. हे वापरून निरनिराळी व चालणारी मॉडेल्स आणि मेकॅनिकल गोष्टी बनवणे शक्य होत असे. हॉर्नबी याला मेकॅनो खेळाची कल्पना प्रथ1898 मध्ये सुचली आणि 1901 पर्यंत त्याने “Mechanics Made Easy” या नावाचा एक बांधणी संच विकसित करून त्याचे पेटंट घेतले व तो बाजारात आणला. याचे नाव नंतर मेकॅनो असे करण्यात आले व याचे उत्पादन एक ब्रिटिश कंपनी करू लागली. मेकॅनो मधील मॉडेल्स बनवण्यासाठी फक्त एक स्क्रू ड्रायव्हर व पाने लागत असत. मेकॅनो हा फक्त खेळ नव्हता तर तरफा किंवा गिअर्स या सारख्या मेकॅनिकल इंजिनियरिंगमधील संकल्पनांचे प्रात्यक्षिक शिक्षण देण्यासाठीचे तो एक उत्कृष्ट असे साधन होता.

माझ्या वडीलांचा जो मेकॅनो संच माझ्याकडे आला होता तो मुळात माझ्या पणजीने 1920 साली अमेरिकेतून भारतात परत येताना खरेदी केलेला होता. या संचामधील सर्व भाग एका सरकत्या टॉपच्या लाकडी पेटीत ठेवलेले असत. या लाकडी पेटीला छोटे भाग ठेवण्यासाठी निरनिराळ्या आकाराचे छोटे कप्पे बनवलेले होते. मेकॅनो संच 1 ते 6 अशा निरनिराळ्या प्रकारचे त्यावेळेस बनवले जात. माझ्याकडचा मेकॅनो कोणत्या क्रमांकाचा होता हे सांगणे अवघड आहे. पुढच्या काही वर्षात मी शेकडोंनी मेकॅनोची मॉडेल्स बनवलेली असावीत. सुट्टीमधील मुंबईच्या ट्रिप्स मध्ये क्रॉफर्ड मार्केट जवळच्या खेळण्यांच्या दुकानातून मी मेकॅनोचे आणखी भाग माझा मेकॅनो संच अधिक मोठा करण्यासाठी माझ्या मामांबरोबर जाऊन मी नेहमी आणत असे. एक गोष्ट मात्र खरी की या मेकॅनो संचाने माझ्या बालवयात मला जेवढा आनंद मिळवून दिला होता तेवढा बाकी कशामुळेही मला तेंव्हा मिळालेला नव्हता.

आश्चर्याची गोष्ट म्हणजे मेकॅनो संच आजही मिळतात. मेकॅनो कंपनी मधील काळात बर्‍याच चढउतारामधून गेली असावी. आता मेकॅनो संच फ्रान्स आनि चीन या देशात बनवले जातात. अमेरिकेमध्ये सध्या “Erector Sets” या नावाने विकले जाणारे संच प्रत्यक्षात मेकॅनो संच् हेच आहेत व ते जपान मधील निको कंपनी समूहाचा एक भाग असलेल्या Meccano S.N. या फ्रेन्च कंपनीकडून बनवले जातात.

या नंतर थोड्या मोठ्या वयात मला एक नवा कोरा खेळ मिळाला जो मात्र माझ्या वडीलांचा आधी नव्हता. हा खेळ म्हणजे सुद्धा मोबॅको सारखाच एक घर बांधणी खेळ होता. मात्र या खेळातील पार्टस वापरून बांधलेली घरे अप्रतिम सुंदर दिसत असत. लिव्हरपूल शहरात राहणार्‍या चार्लस प्लिम्प्टन या एका ब्रिटिश प्लास्टिक्स अभियंता व उद्योजकाने हा खेळ शोधून काढला होता. ‘बेकोअसे नाव दिलेला हा खेळ थोड्याच अवधीत प्रथम ब्रिटनमधे, नंतर ब्रिटिश कॉमनवेल्थ व अखेरीस जगभर निर्यात होऊ लागला होता व लोकप्रियही झाला होता. 1934 ते 1967 या कालावधीमध्ये हा खेळ अतिशय लोकप्रिय ठरला होता. प्रथम शोधल्या गेलेल्या आणि व्यापारी उत्पादन सुरू झालेल्या बेकेलाइट या प्लॅस्टिकच्या नावावरून या खेळाला बेकोअसे नाव दिले गेले होते. या खेळातील पार्टस प्रथम बेकेलाइट मधूनच बनवले जात असत. ‘बेकोहा खेळ प्लॅस्टिक मधून बनवल्या जाणार्‍या खेळांमधला आद्य खेळ होता असे म्हटले तरी चालेल.

तसे बघायला गेले तर बेकोखेळाचे डिझाइन पुष्कळसे मोबॅकोच्या धर्तीवरच होते. मोबॅको मधील लाकडी खांबांच्या ऐवजी येथे निरनिराळ्या लांबीच्या लोखंडी पिना दिलेल्या असत. हिरव्या रंगाच्या एका मजबूत बेकेलाइट बेसमधे असलेल्या ब्लाइंड छिद्रांमध्ये या पिना उभ्या कराव्या लागत. यानंतर बेकेलाइटच्या विटा, खिडक्या व दारे या लोखंडी पिनांमध्ये अडकवून बसवावी लागत व घराच्या भिंती तयार होत असत. या खेळातील लाल आणि पांढर्‍या विटा, हिरवी खिडक्या दारे आणि डार्क रेड छप्परे यामुळे बांधलेले घर मोठे मोहक दिसत असे. मोबॅकोच्या तुलनेने बेको मध्ये बनवलेली घरे अगदी प्रत्यक्षात समोर उभी असल्यासारखी वाटत.

या सगळ्या खेळांची वर्णने वाचताना, मला नेहमीची इतर, व्यापार, ल्यूडो, बुद्धीबळे, मॉडेल मोटारी या सारखी खेळणी मिळालीच नाहीत काय? असे वाचकांना कदाचित वाटू शकते. पण तसे काही नव्हते. हे सर्व खेळ व त्या शिवाय बॅट्स, रॅकेट्स, बॉल्स आणि अगणित पुस्तके हे सर्व तर मला मिळतच गेले होते. परंतु माझे खेळ म्हणून आठवणारे जे खेळ होते आणि ज्यांना मी विसरू शकत नाही अशा या तीनच खेळांचे वर्णन मी वर केले आहे इतकेच!

7 जानेवारी 2014

Advertisements

About chandrashekhara

I am a retired electronics engineer. I am interested in writing, reading books. Other hobbies include Paper models, wooden fret work and social networking.

चर्चा

अद्याप प्रतिक्रिया नाहीत.

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s

जुने लेख शोधा

Enter your email address to subscribe to this blog and receive notifications of new posts by email.

Join 386 other followers

MyFreeCopyright.com Registered & Protected

माझे नवीन इ-पुस्तक

एका साम्राज्याच्या शोधात

Advertisements
%d bloggers like this: