.
अनुभव Experiences

निवृत्ती नंतरच्या आयुष्यासाठीचे नियोजन


पुण्यापासून सुमारे 60 किमी अंतरावर असलेल्या लोणावळे या हिलस्टेशनात माझी एक बहीण व तिचे पती यांनी एक छोटेखानी घर वीकएन्ड घालवण्यासाठी म्हणून नवीनच बांधून घेतले आहे. मध्यम वयातील या जोडप्याच्या या नवीन घराला मी मागच्या आठवड्यात भेट दिली होती व दुपारचे जेवण त्यांच्या सोबतीने घेण्याचा योगही मला आला होता. त्यांच्याशी गप्पा गोष्टी करत, अगदी गरमागरम मराठी जेवणाचा आस्वाद घेत दुपारचे काही तास मोठ्या सुखद आणि आरामदायी वातावरणात मला घालवता आले होते. सह्याद्री पर्वताच्या हिरव्यागार कुशीत दडलेले लोणावळे हे गाव मोठे छान आहे. मी येथे खूप वेळा आलेलो असलो तरी येथे जाणवणारी निसर्गाची जवळीक आणि मस्त हवा यामुळे लोणावळ्याचे आकर्षण मला नेहमीच वाटत आलेले आहे. अर्थात लोणावळ्याचे खरे सौंदर्य अनुभवायचे असले तर येथे पावसाळ्यात यावयास पाहिजे. भणाणणारा थंड वारा अंगावर झेलत आणि आसमंताला एखाद्या रजई सारखे लपेटून घेणार्‍या व दोन पावलांवरचेही काही दिसू न देणार्‍या दाट धुक्यातून मार्ग काढत,जेंव्हा येथे आपण पावसाळ्यात भ्रमंती करतो तेंव्हा दिसणारे लोणावळा अगदी निराळेच भासते असे नेहमीच मला वाटत राहिलेले आहे. मात्र मागच्या आठवड्यातील हवा त्या मानाने बरीच कोरडी व गरम असली तरी सुखद मात्र होती.

माझी बहीण आणि तिचे पती हे आपापल्या नोकरी व्यवसायात अजूनही पूर्णपणे कार्यरत आहेत आणि त्यामुळे आठवडाभर कामात व्यग्र असतात. परंतु त्यांच्या घरातील चित्र मात्र एकदम भिन्न आहे. त्यांची मुले आता मोठी झाल्याने लग्न होऊन बाहेर पडली आहेत व स्वत:च्या संसारात गुंग आहेत. त्यामुळे हे दोघे कामावरून घरी आले की सध्याच्या त्यांच्या वयाच्या अनेक मध्यमवर्गीय जोडप्यांप्रमाणे त्यांनाही समोरचे रिकामे घर अगदी अंगावर आल्यासारखे होते. पारंपारिक भारतीय कुटुंबांमध्ये ही परिस्थिती सहसा येत नसे. मुले, सुना, नातवंडे हे सगळे आजी आजोबांसकट एकाच छताखाली रहात. आजी आजोबांना त्यामुळे निदान नातवंडांचा सहवास तरी सतत लाभत असे. आता निदान शहरी समाजात तरी विभक्तीकरणाच्या प्रक्रियेने चांगलेच मूळ धरलेले असल्याने अशी पारंपारिक कुटुंबे फार कमी प्रमाणात दिसतात व विभक्त कुटुंबांचे प्रमाण जास्त वाढत चालले आहे. समाज व्यवस्थेतील या बदलामुळे ज्येष्ठ नागरिकांसमोर अनेक नवीन समस्या निर्माण होऊ लागल्या आहेत.

बहीण आणि तिचे पती यांच्याबरोबर गप्पागोष्टी करत असताना आमच्या गप्पांचा रोख मुले दुसरीकडे राहण्यास गेल्याने, अंगावर येणारे रिकामे घर आणि त्याला जेष्ठ वयातील आईवडीलांनी कसे तोंड द्यावयाचे? या विषयाकडे साहजिकपणे वळला. आजकाल निवृत्तीच्या उंबरठ्यावर असलेल्या अशा ज्येष्ठ जोडप्यांसमोर त्यामुळे पुढे निवृत्तीनंतर येणार्‍या काळात आपल्या रिकाम्या वेळेचे नियोजन कसे करायचे? हा एक मोठा प्रश्न आ वासून उभा राहतो आहे. पारंपारिक कुटुंब पद्धतीत हा प्रश्न सहसा येत नसे कारण आजीआजोबांनी घरातील मुलांकडे लक्ष द्यावे अशी अपेक्षा असे. परंतु समाज रचनेतील नव्या बदलांमुळे हा प्रश्न एका मोठे स्वरूप घेऊन आपल्यासमोर उभा राहिलेला आहे यात मला तरी शंका वाटत नाही. त्या दिवशी मी बहिणीकडचा माझा मुक्काम आटोपून घराकडे परत निघाल्यावरही माझ्या डोक्यात याच विषयासंबंधीचे विचार घोळत राहिले होते.

माझी बहीण व तिचे पती यांच्यासारखी निवृत्तीच्या उंबरठ्यावर असलेली बहुतेक, निदान मध्यमवर्गीय जोडपी तरी, अलीकडे निवृत्तीनंतरच्या काळाचे आर्थिक नियोजन बर्‍याच आधीपासून करून ठेवताना दिसतात. यामुळे निवृत्तीनंतर त्यांच्यासमोर मोठी आर्थिक अडचण सहसा उभी रहात नाही. आधी केलेल्या गुंतवणूकीमुळे त्यांना स्थिर स्वरूपाचे उत्पन्न मिळत राहते व त्यामुळे निवृत्तीच्या आधी असलेली त्यांच्या आयुष्याची गुणवत्ता त्यांना पुढेही राखता येणे शक्य होते. बहुतेक सर्वांनी आजारपणांसाठी विम्याच्या पॉलिसी घेतलेल्या असल्याने आजारपणाचा अतिरिक्त खर्च ते सहजपणे निभावून नेऊ शकतात. त्यामुळे निवृत्तीनंतर चांगली गुणवत्ता असलेले आयुष्य कसे घालवायचे? हा प्रश्नच मुळी त्यांच्यासमोर नसतो.

मग आजच्या या निवृत्तीच्या उंबरठ्यावर किंवा निवृत्त झालेल्या ज्येष्ठ नागरिकांसमोरचा मुख्य प्रश्न आहे तरी काय? हा प्रश्न थोडक्यात व अगदी सरळ सोप्या शब्दात असा सांगता येईल की या ज्येष्ठ नागरिकांना निवृत्तीनंतर काय करायचे? वेळ कसा घालवायचा? हेच समजत नाही. यापैकी जे ज्येष्ठ नोकरी पेशातील आहेत त्यांना निवृत्त झाल्याक्षणी समाजातील आपले स्थान किंवा श्रेणी अचानक कोणीतरी काढून घेतली आहे व आपण दुय्यम नागरिक म्हणून समजले जाऊ लागलो आहोत असे वाटू लागते. जर या होणार्‍या बदलाची आधीपासून तयारी केलेली नसली तर बहुतेक लोक या बदलाला योग्य रितीने सामोरे जाण्यास अपयशी ठरतात. आयुष्यामध्ये होणार्‍या या बदलासाठी तयारी करायची म्हणजे नक्की काय करायचे असा प्रश्न काहींना पडतो. उदाहरण द्यायचे तर माझ्या एका स्नेह्यांचे देता येईल. बॅन्केत अधिकारी असलेल्या या माझ्या स्नेह्यांनी स्वेच्छानिवृत्ती घेतली होती. त्यांना प्रथमपासूनच ट्रेकिंग किंवा भटकंतीची मनस्वी आवड होती परंतु बॅन्केत कार्यरत असताना त्यांना ही आवड पूर्ण करणे कधीच शक्य झाले नव्हते. आता निवृत्तीनंतर त्यांनी भटकंतीचा छंदच स्वत:ला लावून घेतला आहे आणि हवा चांगली असेल तेंव्हा व शक्य असेल तेवढा वेळ ते हिमालयात घालवत असतात. निवृत्त होणारी व्यक्ती जर स्त्री असेल तर पुढे आलेला प्रश्न जास्तच बिकट वाटतो. घरात माणसे दोनच उरल्याने घरात फारसे कामच नसते आणि वेळ कसा घालवायचा? हा एक मोठाच प्रश्न तिच्या समोर उभा राहतो.

माझ्या परिचयातील 70 ते 80 या वयोगटामधील ज्या व्यक्ती आहेत त्यांच्या जीवनशैलीचे निरीक्षण केले तर एक वैशिष्ट्य नेहमी मला जाणवते. या सर्व व्यक्ती अत्यंत कार्यरत असतात. संपूर्ण दिवस ते कोणत्या ना कोणत्या कामात गुंग असतात. माझ्या मताने, निवृत्तीनंतर सुखी आणि समाधानी आयुष्य घालवण्याची ही गुरूकिल्लीच आहे असे समजले तरी चालण्यासारखे आहे. पण आता मला काय कार्य करता येईल? हा विचार निवृत्त झाल्यावर एखाद्या व्यक्तीने करण्याचे ठरवले तर योग्य असे काम त्या व्यक्तीला सुलभतेने मिळणे शक्य नसते. आपण निवृत्तीनंतर काय करणार? याचा विचार निवृत्तीच्या बर्‍याच आधीपासून, म्हणजे निवृत्तीचे विचार मनात प्रथम घोळू लागल्याच्या दिवसापासून करणे गरजेचे असते.

मी माझे स्वत:चे उदाहरण येथे देऊ शकतो. निवृत्तीचे विचार माझ्या मनात येऊ लागल्यानंतर मला पुढे ज्यावेळी खूप रिकामा वेळ असणार आहे तेंव्हा करता येण्यासारख्या माझ्या आवडीच्या गोष्टी किंवा ज्या करणे आतापर्यंत कधीच जमले नाही परंतु करण्याची प्रचंड इच्छा आहे अशा गोष्टी, यांची एक यादीच मी बनवली होती. यापैकी काही गोष्टी करणे मला शक्य झाले नाही. फ्रेट वर्क किंवा आकाशज्योती निरिक्षण या सारखे काही छंद मला बरीच वर्षे करता आले पण मग पुढे सोडून द्यावे लागले. लेखनाचा छंद मात्र अजूनही टिकला आहे व मला कल्पनेच्या बाहेर आनंद देतो आहे. वाचक वाचत असलेले प्रस्तुतचे हे लेखन माझ्या या छंदातूनच निर्माण झालेले आहे. लेखनाचा हा छंद मला कार्यरत तर ठेवतोच पण माझे मनही अतिशय सतर्क ठेवतो.

निवृत्त झालेल्या व त्यानंतर वर्षानुवर्षे आपले छंद किंवा कार्ये सतत चालू ठेवणार्‍या लोकांची अनेक उदाहरणे मला तुम्हाला देता येतील. माझ्या नात्यातील एका वरिष्ठ नोकरशहांनी निवृत्त झाल्यानंतर लोककल्याणाचे काम करणारा एक ट्रस्ट चालवण्याचे काम अंगावर घेतले तर माझ्या नात्यातीलच एक महिला, आधीच्या आयुष्यात कधीही आपले हात मातीत घातलेले नसतानाही आता बागकामात आपला दिवसाचा बराचसा वेळ घालवत असतात. अनेक महिला गीता, ज्ञानेश्वरी यासारख्या धार्मिक ग्रंथावर चर्चा करण्यासाठी चर्चामंडळे स्थापन करून त्यात चर्चा करताना दिसतात.

निवृत्त झाल्यानंतर केलीच पाहिजे अशी एक गोष्ट म्हणजे हास्य क्लब किंवा मित्रांसमवेत दिवसाचा काही काळ घालवणे यासारख्या ग्रूप अ‍ॅक्टिव्हिटीज. एखाद्या चहा किंवा कॉफीच्या कपासोबत मित्रांशी गप्पा मारणे हेही यातच मोडते. अशा प्रकारच्या अ‍ॅक्टिव्हिटीमधून ज्येष्ठांना जो आनंद मिळतो किंवा जीवन जगण्यासाठी जो उत्साह मिळतो त्याचे वर्णन करणे सुद्धा शक्य नाही. मी अशा प्रकारची ग्रूप अ‍ॅक्टिव्हिटी प्रत्येक जेष्ठाने करणे अत्यावश्यक आहे असे मानतो आणि निवृत्तीच्या उंबरठ्यावर असलेल्या प्रत्येकाने ही अ‍ॅक्टिव्हिटी कशी सुरू करता येईल हे बघितलेच पाहिजे.

माझी खात्री आहे की निवृत्तीच्या पुरेशा आधीपासून योग्य नियोजन केलेली निवृत्तीची वर्षे ही प्रत्येकाच्या आयुष्याचा सुवर्णकाल बनू शकतात.

1 जानेवारी 2014

Advertisements

About chandrashekhara

I am a retired electronics engineer. I am interested in writing, reading books. Other hobbies include Paper models, wooden fret work and social networking.

चर्चा

One thought on “निवृत्ती नंतरच्या आयुष्यासाठीचे नियोजन

  1. मस्त लेख !!! अगदी नेमके प्रश्न आणि योग्य उत्तरे छान

    Posted by paarijatak | जानेवारी 1, 2014, 4:12 pm

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s

जुने लेख शोधा

Enter your email address to subscribe to this blog and receive notifications of new posts by email.

Join 386 other followers

MyFreeCopyright.com Registered & Protected

माझे नवीन इ-पुस्तक

एका साम्राज्याच्या शोधात

Advertisements
%d bloggers like this: