.
अनुभव Experiences

बॅन्का, ए.टी.एम.यंत्रे आणि रोख रक्कम काढणे


अलीकडे. एका कोणत्या गोष्टीचा मला मनापासून कंटाळा येत असला तर ती म्हणजे बॅन्केत जाऊन किंवा ए.टी,एम. मशीनमधून रोख रक्कम काढून आणणे. ज्या ज्या वेळी माझ्या लक्षात येते की आपल्या जवळची रोख रक्कम संपत आली आहे आणि आपल्याला आता बॅन्केला भेट देण्याची जरूरी आहे, मला उगीचच अस्वस्थ आणि तणावपूर्ण वाटत राहते. खरे तर मला हे पूर्णपणे माहीत असते की बॅन्केत असणारे पैसे हे माझेच आहेत आणि ते काढून आणण्याचा मला पूर्ण अधिकार आहे, तरीसुद्धा, बॅन्केतून पैसे काढून आणण्याचे काम मी वर्षानुवर्षे करत असूनही, मला मनावर उगीचच एक प्रकारचे दडपण आल्यासारखे वाटत राहते.

काही दिवसांपूर्वी बेंगलुरू शहरातील एका ए.टी.एम. मशीनमधून पैसे काढता असणार्‍या एका महिलेवर अगदी सकाळच्या वेळेला हल्ला केला गेला. या प्रकारामुळे बॅन्केतून पैसे काढणे या आपल्या रोजच्या जीवनातील अगदी सर्वसामान्य अशा गोष्टीमागे सुद्धा केवढे धोके लपलेले आहेत याची मला जाणीव झाली. या हल्ल्याच्या प्रकाराबाबत विचार करता मला असे जाणवले की बॅन्केमधून रोख पैसे काढणे या सारख्या शुल्लक विषयावर सांगण्यासारखे सुद्धा काही अनुभव माझ्या गाठीशी आहेत आणि वाचकांना ते रोचक वाटू शकतील.

बॅन्केतून पैसे काढणे या प्रकाराला माझ्या दृष्टीने खरे महत्त्व आले ते 1960च्या दशकात मी एक तरूण अभियंता म्हणून पहिली नोकरी पटकावली तेंव्हा! मुंबईच्या नरिमन पॉइंट भागातील एका ऑफिसमध्ये मी त्या वेळेस काम करत असे. आमच्या कंपनीने त्या वेळी असा फतवा काढला होता की सर्व कर्मचार्‍यांचे पगार आता त्यांच्या बॅन्क खात्यात थेट जमा होतील. या फतव्यामुळे जेवणाच्या सुट्टीत पैसे काढता येतील अशा कोणत्या तरी जवळच्या बॅन्केमध्ये खाते उघडणे मला अनिवार्य बनले. आमच्या शेजारच्या ऑफिसमधील एकाचे खाते असलेल्या जवळच्याच यूको बॅन्केत त्याची ओळख देऊन मी मग माझे खाते उघडले. त्या वेळेस बॅन्कांचे राष्ट्रीयीकरण झालेले नव्हते व ही यूको बॅन्क बिर्ला उद्योगसमूहाच्या मालकीची होती. महिन्याच्या अखेरीस आमच्या कंपनीने जेंव्हा माझ्या खात्यात पगार जमा केला असल्याचे आम्हाला सांगितले तेंव्हा माझ्या दुसर्‍या एका सहकार्‍याबरोबर मी बॅन्केमधून पैसे काढण्यासाठी म्हणून जेवणाच्या सुट्टीच्या वेळेत जाऊन पोहोचलो. या बॅन्केतून पैसे काढण्याची प्रक्रिया एकंदरीतच अत्यंत किचकट होती. बॅन्केमध्ये अनेक पिंजरे बनवलेले होते ज्यात सर्व कर्मचारी बसत असत. आपला चेक एका लिपिकास दिल्यावर तो तुम्हाला आकडा कोरलेले एक पितळी टोकन देत असे. या नंतर साधारण अर्धा तास वाट बघितल्यानंतर चेक कॅशियरकडे पोचत असे. चेक पोचला की कॅशियर लाऊड स्पीकर वरून पितळी टोकन वरील आकड्यांची घोषणा करत असे. या नंतर एका पिंजर्‍यात शिरून कॅशियरकडे पितळी टोकन अदा केल्यानंतर तुम्हाला पैसे मिळत. या सगळ्या प्रक्रियेमध्ये तुम्हाला आपण या बॅन्केमध्ये कोणीतरी एक नको असलेली किंवा अप्रिय व्यक्ती आहोत व केवळ नाईलाजाने बॅन्क आपल्याला पैसे देते आहे असे वाटू लागे. परंतु माझ्या सुदैवाने थोड्याच दिवसात माझे ऑफिस होते त्याच इमारतीच्या तळमजल्यावर, ‘फर्स्ट नॅशनल सिटी बॅन्कची शाखा उघडली गेली. मी तत्काळ तेथे खाते उघडले व यूको बॅन्केला रामराम ठोकला. ही बॅन्क म्हणजे यूको बॅन्केच्या अगदी उलट चित्र असल्यासारखी होती. कॅशियर सकट बॅन्केचे सर्व कर्मचारी येथे एका उघड्या काउंटरमागे बसत असत आणि पैसे काढण्यासाठी टेलर पद्धत असे. ही पद्धत भारतात बहुधा या बॅन्केनेच आणली असावी. नवी शाखा असल्याने व त्या वेळेस संगणक वगैरे सुविधा नसल्याने बर्‍याच वेळा बॅन्केची लेजर्स मुख्य शाखेत ठेवलेली असत व येथील कॅशियर मुख्य शाखेला फोन करून ग्राहकाच्या खात्यात शिल्लक किती आहे हे पडताळून बघत असे व सरळ हातात पैसे देत असे. या बॅन्केत व्यवहार करणे हा माझ्या आतापर्यंतच्या बॅन्क अनुभवामधला सर्वा सुखद असा अनुभव असल्याचे मला नेहमीच वाटत राहिलेले आहे.

काही वर्षांपूर्वी परदेश प्रवासाला जाताना खर्चासाठी लागणारे परदेशी चलन बरोबर नेण्यासाठी प्रवासी चेक्सच्या स्वरूपात ते न्यावे लागे. हे चेक्स परदेशातील बॅन्कांमध्ये वटवले की त्या देशातील चलन आपल्याला मिळत असे. येथे सुद्धा मला आलेले अनुभव काही फारसे सुखद होते असे म्हणता येणार नाही. फ्रान्स मधील एका बॅन्केने माझा पासपोर्ट जुनाट आणि वापरलेला दिसतो आहे म्हणून मला चलन देण्याचे नाकारले होते व त्यांच्या मुख्य कार्यालयात जाण्यास मला सांगितले होते. अमेरिकेतील एका बॅन्केने मला हव्या असलेल्या 10 आणि 20 डॉलरच्या नोटा देण्याचे नाकारून मला फक्त 100 डॉलरच्या नोटा हट्टाने दिल्या होत्या. परदेशातील बॅन्कांच्यात जाऊन आपल्याजवळचे प्रवासी चेक देणे व रोख रक्कम घेणे हे मला नेहमीच मोठे संकट वाटत असे. मी दिलेला प्रवासी चेक कोणत्या तरी परग्रहावरून आलेला कागद असावा या अविर्भावाने नेहमी तपासला जात असे व माझ्यावर कोणता तरी प्रचंड उपकार आपण करतो आहोत आणि स्वत:च्याच खिशातून हे पैसे जाणार आहेत अशा मुद्रेने हे परदेशी बॅन्केतील कर्मचारी मला रोख रक्कम अदा करत असत.

यानंतर बॅन्कांचे संगणकीकरण झाले व पैसे काढण्यासाठी ए.टी.एम. यंत्रे सगळीकडे दिसू लागली. परंतु या आधुनिकीकरणाने पैसे काढताना माझ्या मनावर येणारा तणाव किंवा काळजी कमी झाली असे काही मला म्हणता येणार नाही. या उलट ती वाढलीच असे म्हणावे लागते. .टी.एम. मशीन वापरतानाचे माझे काही अनुभव सांगण्यासाखे आहेत. प्रथम दोन शब्द या मशीन्स बद्दल. या मशीन्स मध्ये इतकी विविधता असते की तुम्हाला गोंधळूनच जायला होते. काही मशीन्स मध्ये तुमचे डेबिट कार्ड सर्व व्यवहार पूर्ण होईपर्यंत मशीनमध्ये ठेवून द्यावे लागते तर काही मशीनमध्ये ते आत सरकवून क्षणार्धात परत बाहेर काढून घ्यावे लागते. काही मशीन्स तुम्ही रोबो नाहीत हे सिद्ध करण्यासाठी एक दोन आकडी क्रमांक तुम्हाला टाइप करायला सांगतात व तो केल्याशिवाय पुढे काहीच करता येत नाही. काही मशीन्स मध्ये तर तुम्हाला कोणती भाषा अवगत आहे हे माहिती करून घेतल्याशिवाय ती पुढे जाण्यास तयारच नसतात. या सर्व विविधता पहाता आतापर्यंत शेकडो वेळा ए.टी.एम. वापरलेले असूनही मला अजूनही हे मशीन वापरायचे म्हटले की मनावर थोडाफार तणाव हा येतोच.

2 वर्षांपूर्वी मी लडाखमधील लेह या गावाला गेलो होतो. या सफरीची तयारी करताना माझा साधारण असा अंदाज होता की मला जेवणखाण आणि खरेदी यासाठी 30000 रुपये लागावेत. मी माझ्याबरोबर 10000 रुपये रोख घेतले होते व लेहमधे स्टेट बॅन्केचे व इतर काही बॅन्कांची ए.टी.एम. असल्याने बाकीचे पैसे तेथेच काढावे असे ठरवले होते. मात्र नंतर हा निर्णय माझ्यासाठी अत्यंत त्रासदायक ठरला आहे असे लक्षात आले. लेह हे सुमारे 1 लाख वस्ती असलेले शहर आहे व तेवढेच पर्यट्क येथे कोणत्याही दिवशी उन्हाळ्यात असतात. दुर्दैवाने या एवढ्या लोकसंख्येसाठी फक्त 4 .टी.एम. मशिन लेहमध्ये आहेत. त्यामुळे दिवसाच्या कोणत्याही वेळी निदान 100 ते 150 लोकांची रांग पैसे काढण्यासाठी ए.टी.एम. मशीन समोर उभी असते. मला दोन प्रयत्नानंतर आणि काही तास रांगेत उभे राहून वाया घालवल्यावर पैसे मिळू शकले होते. त्या शिवाय येथे असलेली ए.टी.एम. मशीन इतक्या अयोग्य रित्या बसवलेली आहेत की जेंव्हा तुम्ही मशीनसमोर उभे राहून पैसे काढत असता तेंव्हा निदान 4 लोक तरी तरी तुम्ही मशीनवर काय टाइप करत आहात हे बघत असतात. या अनुभवानंतर डेबिट किंवा क्रेडिट कार्डस न घेता बरोबर रोख पैसे घेऊनच मी प्रवासाला आता निघतो.

मी बर्‍याच वेळा वापर करत असलेले एक ए.टी,एम. मशीन तर स्वत:च्या मर्जीनुसार आणि खुशीने वागण्यात पटाईत आहे. काही वेळा या मशीनवर मला माझे डेबिट कार्ड अवैध असल्याचे हे मशीन सांगत असते. बॅन्क ऑफ इंडियाच्या दुसर्‍या एका ए.टी.एम. मशीन जवळच या बॅन्केने खाते पुस्तक छापण्यासाठीचे दुसरे मशीन बसवले आहे. त्यामुळे तुम्ही जेंव्हा पैसे काढत असता त्यावेळी दुसरी कोणी व्यक्ती खाते पुस्तक छापण्याच्या निमित्ताने केबिन मध्ये उभी असू शकते व पैसे काढणार्‍या व्यक्तीला पाहिजे तेवढे सुरक्षित वाटत नाही.

पण मग या अडचणींवर इलाज तरी काय? भविष्यात ए.टी.एम. यंत्रे रोख रक्कम काढण्यासाठी अनिवार्य आहेत हे मान्य करावेच लागते. परंतु मी अनुसरण करत असलेल्या काही साध्या पथ्यांचा वापर केला तर मागच्या महिन्यात बेंगळुरू शहरातील महिलेवर जो प्रसंग ओढवला त्याची पुनरावृत्ती टाळता येणे शक्य आहे. माझा पहिला नियम म्हणजे शक्यतो ए.टी.एम. शीन्सच्या केबिन्सना फक्त कार्यालयीन वेळांमध्येच भेट द्यायची. मी संध्याकाळ, सकाळी लवकर किंवा रात्रीच्या वेळी कधीच भेट देत नाही. काही वेळांना हे शक्य होत नाही मग मी साधारण गजबजलेल्या रस्त्यांवर असलेली ए.टी.एम. मशीनची केबिन निवडतो. मला ज्या वेळी मोठी रक्कम बॅन्केतून काढायची असते त्या वेळी मी ए.टी,एम. मशिनचा वापर न करता सरळ बॅन्केत व तो सुद्धा एकटा कधीच न जाता बरोबर कुटुंबातील कोणाला तरी बरोबर घेऊन जातो. ते शक्य नसल्यास कोणा मित्राला माझ्या बरोबर येण्याची विनंती करतो. कोणत्या तरी अनोळखी व एकाकी ठिकाणी असलेल्या ए,टी,एम. मशीन्सचा वापर करणे हे एक प्रकारे गुन्हेगारांना आमंत्रण दिल्यासारखेच आहे असे मला वाटते.

.टी.एम. शीन्सनी आपले आयुष्य जास्त सुखकर बनवले आहे यात काहीच शंका नाही, परंतु आपण या मशीन्सचा वापर सतर्कता बाळगून आदराने करणे जरुरीचे आहे.

14 डिसेंबर 2013

Advertisements

About chandrashekhara

I am a retired electronics engineer. I am interested in writing, reading books. Other hobbies include Paper models, wooden fret work and social networking.

चर्चा

अद्याप प्रतिक्रिया नाहीत.

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदला )

Connecting to %s

जुने लेख शोधा

Enter your email address to subscribe to this blog and receive notifications of new posts by email.

Join 387 other followers

MyFreeCopyright.com Registered & Protected

माझे नवीन इ-पुस्तक

एका साम्राज्याच्या शोधात

Advertisements
%d bloggers like this: