.
अनुभव Experiences, ताज्या घडामोडी Current Affairs, Uncategorized

लेगो बाहुल्यांच्या जगात


1975 साली मी युरोपमधल्या माझ्या पहिल्यावहिल्या सफरीनंतर जेंव्हा भारतात परत येत होतो तेंव्हा माझा 6 वर्षाचा मुलगा, त्याला अपेक्षित असलेली चॉकोलेट्स आणि खेळणी हातात कधी पडतील,यासाठी माझी आतुरतेने वाट बघत असणार आहे याची मला पूर्ण कल्पना होती. लंडन मधील माझ्या वास्तव्यात, माझे तुटपुंजे बजेट आणि त्या काळात असलेली आणि मुंबईला पोचल्यावर तोंड द्यावे लागणारी, जाचक कस्टमची बंधने, यांच्या मर्यादेत बसतील अशा शक्य तेवढ्या गोष्टी मी त्याच्यासाठी हॅरॉड्स या सुप्रसिद्ध दुकानातून खरेदी केल्या होत्या. मी घरी पोचल्यानंतर माझ्या बॅगा उघडल्या होत्या व त्याच्या हातात त्याच्यासाठी आणलेल्या भेटवस्तू ठेवल्यानंतर त्याचा विस्फारलेला आनंदी चेहरा पहाताना मी सुद्धा मनोमन आनंदलो होतो.

आजा इतक्या वर्षांनंतर, आता मोठा व्यावसायिक बनलेला हाच माझा मुलगा नेहमी करत असलेल्या त्याच्या परदेशातील व्यावसायिक सफरीनंतर जेंव्हा भारतात परत येतो आणि माझ्या 9 वर्षांच्या नातवाच्या हातात आणलेल्या भेटवस्तू ठेवतो, तेंव्हा माझ्या त्या जुन्या आठवणीचे मला परत स्मरण झाल्याशिवाय रहात नाही. या जुन्या आठवणीला आता इतकी वर्षे झाली आहेत, परदेश प्रवास ही गोष्टही आता काही तितकी नावीन्यपूर्ण राहिलेली नाही. त्या शिवाय परदेशातून वस्तू आयात करण्यावर फारशी बंधने आता राहिलेली नाहीत. असे जरी सगळे असले तरी खरोखर आश्चर्याची गोष्ट म्हणजे मी माझ्या मुलाला आणलेली भेट आणि आज माझा मुलगा माझ्या नातवासाठी आणत असलेली भेट मात्र तीच राहिलेली आहे. बर्‍याच वाचकांना एव्हाना ही भेट काय असेल याची कल्पना आलीच असेल. ही भेट म्हणजे अर्थातच एक नवाकोरा लेगो खेळाचा सेट तेंव्हा होता आणि आताही तोच राहिलेला आहे.

जगभरच्या मुलांचा लेगो हा खेळ आजही तितकाच आवडता राहिलेला असा खेळ आहे. 8 पाय असलेली, एक चौकोनी आकाराची आणि प्लॅस्टिकमध्ये बनवलेली वीट हेच लेगो कंपनीचे आजही असलेले सर्वात महत्त्वाचे उत्पादन आहे. या प्लॅस्टिकच्या विटा एकमेकात अडकवून किंवा एकमेकावर रचून त्या पासून मुले निरनिराळी वाहने, इमारती आणि अगदी यंत्र चलित मानव सुद्धा बनवू शकतात. बनवलेल्या या गोष्टी मुलांच्या मनात आले की कोणत्याही क्षणी सुट्ट्या करून त्या विटांपासून परत दुसरी कोणतीही गोष्ट बनवणे सहज शक्य असते. लेगो खेळताना मुलाची कल्पनाशक्ती हीच फक्त मर्यादा असते. दुसरी कोणतीही अडचण समोर येत नसते. हा खेळ किती लोकप्रिय आहे हे, या वर्षापर्यंत म्हणजे 2013 सालापर्यत, एकूण 560 बिलियन लेगो पार्ट्सचे उत्पादन करण्यात आलेले आहे, या आकड्यावरून सहज स्पष्ट होते.

1978 या वर्षापासून लेगो सेट्समध्ये दिल्या जाणार्‍या घटकांमध्ये प्रथमच छोट्या आकाराच्या बाहुल्यांचा समावेश केला गेला. या बाहुल्या मानवी आणि प्राण्यांच्या आकारांच्या बनवलेल्या होत्या. या वर्षापासून या बाहुल्या प्रत्येक लेगो सेटचे एक अविभाज्य अंग बनल्या.या बाहुल्यांना बर्‍याच वेळा मिनिफिग (minifig) या नावाने संबोधले जाते. या बाहुल्या म्हणजे प्लॅस्टिकच्या 2 किंवा 3 घटक तुकड्यांपासून जुळवलेल्या आणि काहीतरी अविर्भाव किंवा अ‍ॅक्शन करणार्‍या अशा आकृती असतात. लेगोच्या पार्ट्समध्ये आतापर्यंत 3.7 बिलियन एवढ्या संख्येने उत्पादित केल्या गेलेल्या या बाहुल्या अत्यंत बालप्रिय आणि यशस्वी झालेल्या आहेत असे मानले जाते. काही बाहुल्यांना (उदाहरणार्थ स्टार वॉर्स या टीव्ही मालिकेतील पात्रांची) विशिष्ट नावे दिलेली असली तरी बहुतेक बाहुल्या या लेगोच्या स्वत:च्या डिझाइनच्या पण अनामिकच असतात मात्र तो विशिष्ट लेगो सेट कसला आहे? (उदाहरणार्थ हॉस्पिटल, विमानतळ वगैरे) त्याच्या अनुषंगाने या बाहुल्या, पोलीस ऑफिसर, चाचे किंवा अवकाश यात्री या सारख्या दिसतात. मुलांच्या रोजच्या जीवनातील आई,वडील, आजी, आजोबा किंवा बाळे या व्यक्तींसारख्या दिसणार्‍या बाहुल्याही तो विषय असलेल्या लेगो सेटबरोबर दिल्या जातात. या बाहुल्या अशा बनवलेल्या असतात की मुलाला सहजपणे त्याला खेळातील जे पात्र हवे असते त्या पात्रामध्ये सहजपणे बदलता येतात. निरनिराळ्या बाहुल्यांचे घटक पार्ट एकामेकामध्ये बदलता येत असल्याने खूप विविध प्रकारच्या बाहुल्या बनवणे मुलांना सहज शक्य असते.

गेल्या काही वर्षांपासून लेगो बाहुल्या या एक संग्राह्य वस्तू झालेल्या आहेत. की चेन किंवा मॅगनेट्स् सकट या बाहुल्या आता मिळतात. लेगो कंपनीतील अधिकारी तर कित्येक वर्षे या बाहुल्यांचा स्वत:ची वैयक्तिक व्हिजिटिंग कार्ड्स म्हणून वापर करत आहेत. या बाहुलीवर त्यांचा इमेल पत्ता व फोन नंबर कोरलेला असतो आणि या बाहुलीचे केस आणि चेहर्‍याची ठेवण त्या अधिकार्‍याच्या चेहर्‍याशी जुळणारी असते. या बाहुल्या आता व्हिडियो गेम्स आणि लघुपटांतही अवतरल्या आहेत.

या बाहुल्यांची आंतर्राष्ट्रीय लोकप्रियता लक्षात घेता त्यांचा जाहिरातींत वापर झाला नसता तर नवल होते. या बाहुल्या असलेले फोटो आता वाचकांपर्यंत अतिशय खोल राजकीय आशय पोचवण्यात सुद्धा यशस्वी होत आहेत. चीनमधील नेटइझ या संकेतस्थळावर एका स्लाइड शोचा भाग म्हणून, चिनी रणगाड्यांचा ताफा थांबवणार्‍या एका लेगो बाहुलीचा फोटो, 1 जून 2013 रोजी बालदिनाच्या निमित्ताने प्रसिद्ध झाला होता. बिजिंग शहराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या टिआनानमेन चौकात, 3- 4 जून, 1989 मध्ये हा चौक 7 आठवडे अडवून बसलेल्या आणि लष्कराचा रस्ता थोपवण्याचा प्रयत्न करणार्‍या निशस्त्र चिनी तरुणांवर रायफलधारी सैनिक आणि रणगाडे यांनी निर्घृण हल्ला चढवून हजारो चिनी तरुणांची कत्तल केली होती. या प्रसंगाच्या स्मरण दिनानिमित्त, चिनी माध्यमांमध्ये प्रसिद्ध झालेल्या प्रतिक्रियांमधून ही लेगो बाहुलीच्या फोटोची प्रतिक्रिया सर्वात प्रभावी अशी समजली गेली आहे.

याच प्रकारचा एक प्रभावी संदेश देणार्‍या लेगो बाहुल्यांचे चित्रे मलेशिया मधील रस्त्याच्या कडेला असलेल्या भिंतींवर, मागच्या महिन्यात रंगवलेली सापडली. यापैकी पहिले चित्र, मलेशियाच्या दक्षिणेला व सिंगापूरमलेशिया मध्ये असलेली चिंचोळी समुद्राची पट्टी ओलांडून मलेशियाच्या भूमीवर आले की लागणारे पहिले मोठे शहर जोहर बारुमध्ये रस्त्याच्या कडेला असलेल्या भिंतीवर रंगवले गेले. या भित्तिचित्रात लेगो बाहुलीसारखी दिसणारी एक स्त्री हातात पर्स घेऊन एका चौकाकडे चाललेली दाखवली होती, तर चौकापुढे काळे कपडे घातलेला आणि हातात सुरा घेतलेल्या समाजकंटकाच्या अवतारात एक दुसरी लेगो बाहुली रंगवलेली होती. हा समाजकंटक या स्त्रीवर हल्ला करण्याच्या तयारीत आहे हे त्या चित्रावरून स्पष्ट दिसत होते.

मलेशियामधील पेनांग शहरात रहाणारा लिथुनियन कलाकार Ernest Zacharevic याने जोहर बारुशहरात कायदा व सुरक्षितता कशी खालावलेली आहे? आणि या शहराची एक गुन्हेगारी फोफावलेले शहर म्हणून दुष्कीर्ती कशी वाढत चालली आहे? हे या चित्रात मार्मिकपणे दर्शवून चित्ररूपाने टीका केली होती. गमतीची गोष्ट म्हणजे या शहरापासून थोड्याच अंतरावर, मागच्याच वर्षी, लेगो कंपनीने लेगोलॅन्ड या नावाचे आपले सुप्रसिद्ध अम्युझमेंट पार्क सुरू केले आहे. व या अम्युझमेंट पार्कला भेट देण्यासाठी सिंगापूरहून येणारे हजारो पर्यटक या शहरात सतत येत असतात. असतात. त्यामुळे याच शहरात लेगो बाहुल्यांच्या मार्फत हा संदेश देणारे भित्तिचित्र रंगवले जावे ही गोष्ट फारच महत्त्वपूर्ण म्हणावी लागेल.

या भित्तिचित्रामुळे जोहर बारु मधील म्युन्सिपल अधिकार्‍यांचे पित्त खवळले यात नवल वाटण्यासारखे नाही. त्यांनी त्वरेने या भित्तीचित्रावर पांढरा रंग लावून ते झाकून टाकण्याचा प्रयत्न केला. परंतु या भित्तिचित्रामुळे शहरातील गुन्हेगारी संबंधी काळजी करणार्‍या सर्वसामान्यांच्या मनावर नक्कीच परिणाम झाला असावा कारण पुढच्या काही दिवसातच या भित्तीचित्राचे फोटो इंटरनेटवरून सोशल मिडिया मध्ये वार्‍यासारखे पसरले. मलेशियातील अनेक शहरांत या भित्तिचित्रासारखी दिसणारी अनेक भित्तीचित्रे रंगवली गेली. खुद्द जोहर बारु शहरातच या भित्तिचित्राच्या प्रती इतर कलाकारांनी दुसर्‍या जागी रंगवल्या तर काही लोकांनी या बाहुल्यांच्या चित्रांचे कट आऊट्स तयार करून अनेक ठिकाणी उभे केले. असेच कट आउट्स मलेशियाची राजधानी कुआला लंपुर आणि इतर शहरात सुद्धा आढळून आले. सोशल मिडिया साइट्सवर ही चित्रे आणि कट आउट्स यांची अनेक चित्रे लोकांनी प्रसिद्ध केली.

मलेशिया मध्ये चिनी वंशाची मंडळी, अल्पसंख्याक असली तरी मोठ्या प्रमाणात आहेत. त्यामुळे लेगो बाहुल्यांच्या या प्रकारच्या चित्रांना वाहिलेले एक चिनी भाषेतील फेसबूक पृष्ठ सुरू झाले आहे. या पृष्ठाला 16000हून जास्त लाइक्स मिळाले आहेत. त्याच प्रमाणे लेगो बाहुल्यांची चित्रे छापलेल्या आणि 20 रिंगिट किंमत असलेल्या टी शर्ट्सच्या जाहिराती सुद्धा फेसबूकवर दिसू लागल्या आहेत. जोहर बारु मधील भित्तिचित्र रंगवणारा कलाकार Ernest Zacharevic याला, ब्रिटन मधील एक पथनाट्य कलाकार Banksy याच्या नावावरून Malaysia’s Banksy असे संबोधणारे एक चिनी भाषेतील पोस्ट सुद्धा फेसबूकवर कोणीतरी टाकले आहे.

मलेशियातील शहरांच्यात गेल्या काही वर्षांत एकंदरीतच गुन्हेगारी आणि टोळ्या युद्धे ही मोठ्या प्रमाणात वाढत चालली आहेत व सर्वसामान्य मलेशियन नागरिकांना या वाढत्या गुन्हेगारी बद्दल मोठी काळजी निर्माण झाली आहे. त्यामुळेच लेगो बाहुल्यांचा या भित्तिचित्रांमध्ये केला गेलेला प्रभावी उपयोग लेगो बाहुल्यांचे माध्यम किती परिणामी होऊ शकते हे दर्शवतो आहे.

भारतामध्ये अमूल या दुग्ध उत्पादक सहकारी संघटनेने, एक गोंडस व नीटनेटके कपडे घातलेल्या एका छोट्याशा मुलीचा अंतर्भाव असलेल्या व ताज्या घडामोडींवर टीका टिप्पणी करणार्‍या जाहिराती सर्वांनी पाहिलेल्या आहेतच. या जाहिरातीखाली दिलेल्या एका लक्षवेधी वाक्यातून ती जाहिरात ताज्या घडामोडीवर टिप्पणी करताना दिसते. लेगो बाहुल्यांच्या माध्यमातून केलेली भित्तिचित्रे याच प्रकारे परिणामी ठरत आहेत. असे म्हणता येईल की लेगो बाहुल्यांचे जग हे आंतर्राष्ट्रीय प्रचार माध्यमांना सापडलेले एक नवे प्रभावी हत्यार आहे याबद्दल शंका वाटत नाही.

7 डिसेंबर 2013

Advertisements

About chandrashekhara

I am a retired electronics engineer. I am interested in writing, reading books. Other hobbies include Paper models, wooden fret work and social networking.

चर्चा

अद्याप प्रतिक्रिया नाहीत.

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s

जुने लेख शोधा

Enter your email address to subscribe to this blog and receive notifications of new posts by email.

Join 387 other followers

MyFreeCopyright.com Registered & Protected

माझे नवीन इ-पुस्तक

एका साम्राज्याच्या शोधात

Advertisements
%d bloggers like this: