.
History इतिहास

एक अकल्पनीय गुप्त खजिना


 2010 या वर्षामध्ये कधीतरी, अगदी सर्वसाधारण दिसणार्‍या आणि स्वित्झर्लंड पासून ते जर्मनीमधील म्युनिच असा प्रवास करणार्‍या एका व्यक्तीकडे स्वित्झर्लंडजर्मनी सीमेवरील सीमा शुल्क अधिकार्‍यांचे लक्ष वेधले गेले. जर्मनीमधील अनेक धनाढ्य मंडळी, त्या देशात आयकराचा दर अतिशय उच्च असल्यामुळे आपला पैसा स्वित्झर्लंडमध्ये गुंतवत असतात. अशा लोकांचा शोध घेण्यासाठी या सीमेवरील अधिकारी प्रवाशांबद्दलची माहिती अगदी रुटीन असल्यासारखी जमा करत असतात. डोक्यावरचे सर्व केस पांढरे शुभ्र झालेल्या या व्यक्तीकडे सीमा शुल्क अधिकार्‍यांनी त्या व्यक्तीकडचे कागदपत्र मागितले. त्या व्यक्तीने स्वत:चा ऑस्ट्रिया देशाचा पासपोर्ट या अधिकार्‍यांना दाखवला. या पासपोर्ट प्रमाणे या व्यक्तीचे नाव Rolf Nikolaus Cornelius Gurlitt, असे होते व जन्म जर्मनीमधील हॅम्बुर्ग शहरात 28 डिसेंबर 1933 या दिवशी झालेला होता. त्याचे सध्याचे वास्तव्य ऑस्ट्रिया मधील साल्झबुर्ग येथे होते. सीमा शुल्क अधिकार्‍यांना कोण जाणे पण या व्यक्तीचा कदाचित ती नर्व्हस आहे असे वाटल्यामुळे असेल, पण संशय आला. सीमा शुल्क अधिकार्‍यांनी ती व्यक्ती कशासाठी स्वित्झर्लंडला गेली होती याची चौकशी केल्यावर बेर्न शहरातील गॅलरी कॉर्नफेल्ड येथे आपण व्यवसायानिमित्त गेलो होतो असे त्या व्यक्तीने सांगितले व आपल्याजवळ 500 युरोच्या नोटांच्या स्वरूपातील 9000 युरो असलेले पाकीट कोटाच्या खिशातून बाहेर काढून अधिकार्‍यांना दाखवले. 10000 युरो पर्यंत नगद रक्कम युरोपमधील सीमा पार करताना कोणालाही वैध रित्या नेता येत असल्याने आणि ती रक्कम सीमा शुल्क अधिकार्‍यांना डिक्लेअर करता येता असल्याने सीमा शुल्क अधिकार्‍यांनी त्या व्यक्तीला पुढे प्रवास करण्यास अनुमती दिली परंतु त्या व्यक्तीबद्दलचा संशय त्यांच्या मनात कायम राहिला.

या नंतरच्या कालात पोलिसांनी केलेल्या चौकशीमध्ये असे निष्पन्न झाले की या व्यक्तीने सांगितल्याप्रमाणे ही व्यक्ती साल्झबुर्ग येथे रहात नव्हतीच तर या ऐवजी श्वाबिन्ग येथे रहात होती. गमतीची गोष्ट म्हणजे जर्मनीतल्या अनिवार्य पद्धती प्रमाणे आवश्यक असलेले, या व्यक्तीचे कोणतेही रजिस्ट्रेशन, पोलीस रेकॉर्ड मध्ये मिळाले नाही. कोणत्याही सामाजिक सेवा (social services) किंवा कर विभाग यांच्याकडेही या व्यक्तीचे कसलेही रेकॉर्ड नव्हते. या व्यक्तीला कोणतेही पेन्शन मिळत नव्हते किंवा कोणताही आरोग्य विमा त्या व्यक्तीने घेतलेला नव्हता. थोडक्यात म्हणजे या व्यक्तीच्या अस्तित्वाच्या कोणत्याही अधिकृत खाणाखुणा नसल्यामुळे या व्यक्तीला अधिकृत अस्तित्वच नव्हते.

पोलिसांनी आणखी शोध घेतल्यानंतर असे लक्षात आले की प्रत्यक्षात या व्यक्तीचे नाव कॉर्नेलियस गुर्लिट असे होते. कॉर्नेलियस हा हिल्डब्रॅन्ड्ट गुर्लिट नावाच्या आणि अर्धवट ज्यू वंशाच्या असलेल्या एका कला समीक्षकाचा एकुलता एक आणि माणूसघाणा म्हणून समजला जाणारा मुलगा होता. जर्मनी मध्ये जेंव्हा नाझी सत्ता उदयास आली तेव्हाच्या कालखंडामध्ये, हिल्डब्रॅन्ड्ट गुर्लिट हा एक मोठा नावाजलेला चित्रकला समीक्षक आणि कला इतिहासकार समजला जात असे. दुसर्‍या महायुद्धाच्या पूर्व कालात, नाझी सत्ता वृद्धिंगत होत असताना, गुर्लिट एका कला संग्रहालयामध्ये क्यूरेटर म्हणून काम करत असे. पुढे नाझी सत्ताधीशांनी जर्मनी मधील आधुनिक चित्रकला ही सामाजिक अध:पतनाकडे नेणारी असल्याचे ठरवून टाकले व त्यावर बंदी घातली. यामुळे हिल्डब्रॅन्ड्ट गुर्लिट याची क्यूरेटर म्हणून चालू असलेली नोकरी गेली. परंतु हिल्डब्रॅन्ड्ट याने काहीतरी खुंट्या हलवून अ‍ॅडोल्फ हिटलर याचा प्रचार प्रमुख जोसेफ गोबेल्स याला कला समीक्षक म्हणून असलेल्या आपल्या अंगभूत कौशल्याबद्दल पटवले आणि नाझी पोलिसांनी जप्त केलेल्या चित्रांची विक्री करण्याच्या कामावर सल्लागार म्हणून स्वत:ची नेमणूक करून घेतली. या पुढच्या काही वर्षांत, जर्मनीमधील Max Beckmann, Otto Dix, Emil Nolde, Ernst Ludwig Kirchner, Marc Chagall. या सारख्या ख्यातनाम चित्रकारांनी काढलेली कॅनव्हास, लिथोग्राफी आणि या शिवाय छापलेली, शेकडो चित्रे अत्यंत नाममात्र शुल्कामध्ये खरेदी करण्यात त्याने यश मिळवले. मात्र आश्चर्याची गोष्ट म्हणजे हिल्डब्रॅन्ड्ट गुर्लिट याने खरेदी केलेल्या या शेकडो चित्रांचा, ती चित्रे हवेत विरून गेली की काय? असे वाटायला लागावे असा कोणताही ठावठिकाणा पुढे कधीच लागू शकला नाही. त्याने खरेदी केलेली कोणतीही चित्रे त्याने पुढे कोणालाच कधी विकल्याचे आढळून आले नाही

दुसरे महायुद्ध संपल्यानंतर, त्याचा ज्यू वंश आणि नाझी विरोधी मते यामुळे मित्र राष्ट्रांच्या अधिकार्‍यांनी, हिल्डब्रॅन्ड्ट गुर्लिट याच्याकडे गुन्हेगार या नजरेने न बघता नेहमीच नाझी गुन्हेगारीचे एक सावज म्हणून बघितले. ज्यू लोकांना फसवून किंवा धाक दाखवून त्यांना मौल्यवान चित्रे कस्पटासमान किंमतीना विकण्यास भाग पाडल्याचे आरोप त्याच्यावर कधीच ठेवण्यात आले नाहीत. अमेरिकन सैनिकांनी त्याला नाझींनी लुटलेली चित्रे शेवटी कोठे गेली याचा शोध घेण्यासाठी मदत होऊ शकेल या उद्देशाने थोड्या काळाकरता चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. परंतु ड्रेसडेन शहरात आपल्या काइटझर स्ट्रासे (Kaitzer Strasse) वरील घरात ही सर्व चित्रे होती व 1945 साली झालेल्या बॉम्ब वर्षावात हे घर पूर्णपणे जळून नष्ट झाले होते तेंव्हा त्या बरोबर ही सर्व चित्रेही जळून राख झाली होती असेच हिल्डब्रॅन्ड्ट गुर्लिट सतत सांगत राहिला होता. हिल्डब्रॅन्ड्ट गुर्लिट 1956 मध्ये एका कार अ‍ॅक्सिडेंट मध्ये मरण पावला व त्याने ज्यू लोकांना फसवून किंवा धाक दाखवून मौल्यवान चित्रांचा जो खजिना कस्पटासमान किंमतीना विकत घेतला होता तो कोठे आहे? याबद्दलचे फक्त त्यालाच माहीत असलेले रहस्य आता कोणालाच कळणे शक्य राहिले नव्हते.

मात्र प्रत्यक्षात हिल्डब्रॅन्ड्ट गुर्लिट याने मृत्युआधी चित्रांचा हा मौल्यवान गुप्त खजिना आपला चक्रम आणि माणूसघाणा असलेला एकुलता एक मुलगा, कॉर्नेलियस याच्या हातात सुपूर्त केला होता. त्याच्या विचित्र स्वभावामुळे कॉर्नेलियसला स्वत:चे कुटुंब नव्हते व त्याने कधी कोणताही व्यवसाय किंवा नोकरीही केलेली नव्हती. म्युनिच शहरातील अगदी सर्वसाधारण अशा एका अपार्टमेंट बिल्डिंगमध्ये कॉर्नेलियस एका भाड्याच्या अपार्टमेंट मध्ये गेली अनेक दशके रहात होता. सीमा शुल्क अधिकार्‍यांना कॉर्नेलियस आता चांगलाच संशयास्पद वाटत असल्याने त्यांनी या भाड्याच्या अपार्टमेंटची तपासणी करण्यासाठी वॉरन्ट मिळवण्यासाठी अर्ज केला. हे वॉरन्ट त्यांना 2012 मध्ये प्राप्त झाले व लगेचच या अपार्टमेंट मध्ये दडवलेले लाखो किंवा निदान हजारो युरो तरी तेथे सापडतील किंवा कमीतकमी काळे पैसे जमा केलेल्या बॅन्क खात्याची माहिती तरी मिळेल या अपेक्षेने सीमा शुल्क अधिकारी तपासणीसाठी या अपार्टमेंटवर हजर झाले. परंतु या अपार्टमेंटचा दरवाजा उघडल्यावर समोरील दृष्य पाहून सर्वांनाच मोठा धका बसला होता. अपार्टमेंट मधील शयनकक्ष, प्रसाधनकक्ष, हॉल वगैरे सर्व खोल्यांच्या समोरील बाजूस, जमिनीपासून ते छतापर्यंतची इंच आणि इंच जागा, खाण्याचे पदार्थ आणि नूडल्स यांचे कधी काळी बनवलेले हवाबंद डबे आणि पॅकेट्स यांच्या ढिगार्‍यांनी भरून गेलेली होती. यापैकी बहुतेक डबे आणि पालिटे 1980 च्या दशकात बनवलेली होती. परंतु कालबाह्य झालेल्या या अन्नाच्या पॅकबंद डब्यांमागे खरा खजिना लपवलेला सीमा शुल्क अधिकार्‍यांना सापडला होता. प्रत्येक खोलीत, आटोपशीर आणि व्यवस्थित पद्धतीने, काही शेल्फ किंवा मांडणी ठेवलेल्या होत्या व या सर्व शेल्फवर मिळून एकंदर 1400 मौल्यवान चित्रांचा एक खजिना व्यवस्थित रितीने पॅक करून ठेवलेला होता. या चित्रात जगप्रसिद्ध चित्रकारांची चित्रेही होती.

या एवढ्या वर्षांच्यात कॉर्नेलियस गुर्लिट याने या गुप्त खजिन्यातील मौल्यवान चित्रे कोणालाही दाखवलेली नव्हती. त्याला खर्चासाठी पैसे हवे असले की तो त्यातले एखादे चित्र विकत असे. या प्रकरणाची चौकशी करणार्‍यांना, कॉर्नेलियसचे खाते असलेल्या एका बॅन्केच्या बचत खात्याचे पासबूक मिळाले. त्यात बहुधा त्याने खजिन्यातून विकलेल्या चित्रांच्या मूल्याचे लाखो युरोज ठेव म्हणून ठेवलेले होते.

कोर्नेलियसच्या अपार्टमेंट मध्ये मिळालेली मौल्यवान चित्रे आता म्युनिच जवळच्या बॅव्हेरियन सीमा शुल्क विभागाच्या अधिकार्‍यांनी सुरक्षितपणे ठेवली आहेत आणि एक कला इतिहासकाराला या खजिन्याची किंमत काय असावी याचा अंदाज बांधण्याच्या कामावर त्यांनी नियुक्त केले आहे. प्राथमिक अंदाजाप्रमाणे हा खजिना निदान 1 बिलियन युरो एवढ्या मूल्याचा तरी आहे.

या दरम्यान 80 वर्षाचा कॉर्नेलियस गुर्लिट हा परागंदा झालेला आहे. तो कोठे आहे किंवा हयात तरी आहे का? या बद्दल कोणालाही काहीच माहिती असेल असे पोलिसांना वाटत नाही. ही केस Augsburg येथील पब्लिक प्रॉसिक्यूटर यांच्या अख्यत्यारीत मोडते आहे. त्यांच्या मताने आजमिती पर्यंत तरी कॉर्नेलियस गुर्लिट याने कोणत्याही कायद्याचा भंग केला असल्याचे त्यांना वाटत नाही. जास्तीत जास्त म्हणजे करचुकवेगिरी आणि अवैध मार्गाने पैसे परदेशातून आणणे या आरोपांखाली त्याला तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते.

या सर्व भानगडीमध्ये सर्वात उपरोधिक काय असेल तर या चित्रांचे मूळ मालक किंवा त्यांचे वारस यांचा छडा लावण्यात अपयश आले तर या मौल्यवान चित्रांपैकी बहुतेक चित्रे कॉर्नेलियस गुर्लिट याच्या वडीलांनी, कस्पटासमान का होईना, पण स्वत:च्या कुटुंबाच्या पैशांनी विकत घेतलेली असल्याने, ती सर्व चित्रे कोर्नेलियन गुर्लिट याला नाईलाजाने परत करावी लागतील.

30 नोव्हेंबर 2013

Advertisements

About chandrashekhara

I am a retired electronics engineer. I am interested in writing, reading books. Other hobbies include Paper models, wooden fret work and social networking.

चर्चा

अद्याप प्रतिक्रिया नाहीत.

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s

जुने लेख शोधा

Enter your email address to subscribe to this blog and receive notifications of new posts by email.

Join 386 other followers

MyFreeCopyright.com Registered & Protected

माझे नवीन इ-पुस्तक

एका साम्राज्याच्या शोधात

Advertisements
%d bloggers like this: