.
ताज्या घडामोडी Current Affairs

कात्रीमध्ये अडकलेले पाकिस्तान


 पाकिस्तान अफगाणिस्तान सीमेवर असलेला उत्तर वझिरीस्तान एजन्सी हा विभाग या देशाच्या केंद्रशासित आदिवासी विभागांमध्ये मोडणारा एक भाग आहे. या भागातील प्रमुख शहर मिरानशाह यापासून सुमारे 5 किमी अंतरावर उत्तरेला असलेल्या डंडे डरपा खेल या उपनगरामध्ये एक अत्यंत आलिशान असे एक फार्महाऊस आहे. सफरचंदे, संत्री, द्राक्षे आणि पपनस यांच्या बागा आणि आसमंतात पसरलेली नयनमनोहर हिरवळ यांच्या मध्ये 8 कक्ष व संपूर्ण संगमरवरी फ्लोअरिंग असलेल्या या फार्महाऊस लगत एक मिनार बांधलेला आहे. ही मालमत्ता या उपनगरामध्ये रहाणार्‍या एका अत्यंत श्रीमंत अशा जमिनदाराच्या मालकीची 2/ 3 वर्षांपूर्वीपर्यंत होती. नोव्हेंबर 2013 महिन्याच्या सुरुवाती पर्यंत या आलिशान मालमत्तेकडे नुसती नजर टाकली तरी येथे सुबत्ता, आणि नीरव शांतता सतत नांदते आहे हे कोणाच्याही लगेच लक्षात येऊ शकले असते.

मात्र ही नीरव शांतता संपूर्णपणे फसवी असून डंडे डरपा खेल हे गाव आणि हा सर्वच विभाग, अत्यंत धोकादायक भाग म्हणून पाकिस्तानामध्ये कुप्रसिद्ध आहे. अफगाणिस्तान मध्ये गेल्या काही वर्षात मोठे समजले जाणारे जे काही अतिरेकी हल्ले झाले आहेत त्यापैकी बहुतेक हल्ल्यांच्या मागे असलेल्या हकानी चळवळीचे, हे गाव म्हणजे सर्वात महत्त्वाचे केंद्र किंवा प्रमुख अड्डा समजला जातो. अफगाणिस्तान मधील तालिबान राजवटीच्या कालात या भागात वास्तव्य करणारे अनेक पाकिस्तानी नागरिक हा भाग सोडून दूर निघून गेले होते. 9 नोव्हेंबर 2001 मधे अमेरिकेत झालेल्या अतिरेकी हल्ल्यानंतर अमेरिकेच्या मदतीने अफगाणिस्तानमधील तालिबान राजवट उलथून टाकण्यात आल्यानंतर हे नागरिक परत येथे आले. मात्र या सगळ्या अशांततेच्या कालातही वर उल्लेख केलेले फार्महाऊस उत्तर वझिरीस्तान मधील पाकिस्तानी पायदळाच्या तुकड्यांच्या मुख्यालयापासून फक्त 1 किमी अंतरावर असल्याने अत्यंत सुरक्षित असे मानले जात होते. स्थानिक गावकर्‍यांना या फार्महाऊस मधून काळ्या काचा लावलेल्या आलिशान एस.यू.व्हींचा एक ताफा रोज सकाळी या फार्महाउसच्या कांपाउंडच्या गेटमधून बाहेर पडताना दिसत असे व सूर्यास्तानंतर हाच ताफा परत आलेला दृष्टीस येत असे. स्थानिकांची या फार्महाउसमध्ये कोणीतरी बडी किंवा महत्त्वाची व्हीआयपी असामी रहात असावी अशी समजूत स्वाभाविकपणेच झालेली होती. गावात अशीही वदंता होती की नव्या मालकांनी हे फार्महाउस या फार्महाउसच्या मूळ मालकाकडून 1 लाख 20 हजार अमेरिकन डॉलर्सना विकत घेतले होते.

नोव्हेंबर महिन्यातल्या पहिल्या शुक्रवारच्या संध्याकाळी स्थानिक खेडूतांनी एक एस यू व्ही गाडीत्या फार्महाऊसच्या कांपाउंडच्या गेटपाशी उभी राहिलेली बघितली. परंतु काही सेकंदातच अशी एक घटना घडली की तेथे कृत्रिम का होईना पण नांदत असलेली नीरवता व शांतता क्षणार्धात भंग पावली व एकच हलकल्लोळ माजला. आकस्मिक रितीने आकाशात एक अमेरिकन ड्रोन विमान कोठून तरी उगवले व त्या विमानाने दोन रॉकेट्स कोणालाही काही कल्पना येण्याआधी त्या एस यू व्ही कडे सोडली. पुढच्या क्षणाला त्या एस यू व्ही गाडीमध्ये स्फोट झाला व गाडीमध्ये बसलेले सर्वजण मृत्यूमुखी पडले. काही मिनिटातच तालिबान सैनिक त्या ठिकाणी अचानक आले आणि त्यांनी त्या सर्व भागाची नाकेबंदी केली.

बर्‍याच नंतर हे विदित झाले की त्या एस यू व्ही मध्ये मरण पावलेल्या लोकांमध्ये लोकांना ज्याची अत्यंत दहशत वाटत होती तो पाकिस्तानी तालिबानचा मुख्य नेता हकिमुल्ल्हा मेहसुद हाही होता. मेहसुदच्या मरणाची बातमी जेंव्हा प्रसृत झाली तेंव्हा पाकिस्तानमधील राजकीय पुढार्‍यांनी अत्यंत तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या. पाकिस्तानचे गृहमंत्री चौधरी निसार अली खान यांच्या मताने पाकिस्तान सरकार मेहसुद याच्याबरोबर शांततेसाठी वाटाघाटी सुरु करण्याच्या मागे होते व या साठी सरकार त्याच्याशी संधान बांधण्याचा प्रयत्नात होते व त्याचा मृत्यू झाल्याने या वाटाघाटीच्या प्रक्रियेलाच सुरूंग लागला होता. पाकिस्तानी माध्यमांनी या घटनेला अमेरिकन सरकारचे विश्वासघातकी कृत्य असे संबोधून त्यावर बरीच टीका केली होती. पाकिस्तानच्या क्रिकेट संघाचा पूर्वीचा कप्तान इम्रान खान याने तर खैबर खिंडीतून नाटो संघटनेच्या अफगाणिस्थान मधील सैनिकांना रसद पोचवणार्‍या ट्रक्सना आपली संघटना अडवणार असल्याचे जाहीर करून टाकले होते.

पाकिस्तान मधील या जहाल प्रतिक्रियेचे अमेरिकन सरकारला बरेच आश्चर्य वाटल्यासारखे दिसले. वास्तविक पाहता मेहसुद हा दहशतवादी, हजारो पाकिस्तानी नागरिकांच्या हत्येला जबाबदार असलेली अशी व्यक्ती होता. त्यामुळे अमेरिकन सरकारने लगेचच जाहीर करून टाकले की तालिबान बरोबरच्या वाटाघाटी ही पाकिस्तानमधील अंतर्गत बाब असून अमेरिकन सरकारचा त्याच्याशी कोणताही संबंध नसल्यामुळे ड्रोन विमानांचे हल्ले चालूच राहतील.

या मधल्या काळात पाकिस्तानी तालिबान संघटनेने मुल्ल्हा फझलुल्ल्हा याची हकिमुल्ल्हा मेहसुद याचा उत्तराधिकारी म्हणून नेमणूक करून टाकली आहे. तालिबानचा नवीन मुख्य मुल्ल्हा फझलुल्ल्हा हा अनेक अतिरेकी हल्ल्यांसाठी जबाबदार व्यक्ती म्हणून कुप्रसिद्ध आहे. 2012 मध्ये बालिकांना शिक्षणाचा हक्क मिळावा म्हणून झगडणारी प्रसिद्ध शालेय विद्यार्थिनी मलाला युसुफझाई हिच्यावर झालेल्या प्राणघातक हल्ल्यामागे हाच अतिरेकी होता. त्याचप्रमाणे या वर्षाच्या सप्टेंबर महिन्यात पाकिस्तानमधील एक वरिष्ठ सेनाधिकारी सानाउल्ल्हा निआझी याच्या हत्येची जबाबदारी आपली असल्याचे त्याने मान्य केले होते.

पाकिस्तान मधील या नवीन तालिबान नेतृत्वाने, पाकिस्तान सरकार बरोबर कोणत्याही शांतता वाटाघाटी करण्याच्या शक्यतेला पूर्णपणे नकार तर दिला आहेच पण हकिमुल्ल्हा मेहसुद याच्या हत्येचा आपण योग्य तो सूड उगवणार असल्याचेही घोषित करून टाकले आहे. ड्रोन विमांनाकडून होणार्‍या हल्ल्यांना पाकिस्तान सरकार मान्यता देत असल्याने, तालिबान संघटना त्यांना दोषी व जबाबदार मानते व यामुळे मेहसुद्च्या हत्येचा सूड पाकिस्तानवर घेण्याच्या शपथा त्यांनी घेतल्या आहेत असे वृत्त पाकिस्तानमध्ये प्रसिद्ध झाल्याने तालिबान परत हल्ले चालू करण्याची भीती पाकिस्तानला वाटते आहे.

या सर्व घटना क्रमामुळे पाकिस्तान, एका बाजूला दमदाटी करणारे तालिबानी तर दुसर्‍या बाजूला अमेरिकन सरकारचा ड्रोन हल्ले थांबवण्यास नकार, अशा कात्रीमध्ये सापडले आहे. ही घटना घडल्यानंतर पाकिस्तान सरकारने आवाज उठवण्याचा बराच प्रयत्न करून बघितला. पाकिस्तानचे गृह मंत्री चौधरी निसार अली खान यांनी तर राष्ट्र सुरक्षा या विषयाबाबत नेमलेली मंत्रीमंडळाची उपसमिती पाकिस्तानअमेरिका यांमधील संपूर्ण संबंधांचा आढावा आणि पातळी यासंबंधी विचार करेल असे जाहीर करून टाकले. ही समिती पाकिस्तानअमेरिका सहकार्यातील प्रत्येक अंगाचा आढावा घेऊन त्याबद्दल चर्चा करेल असेही त्यांनी सांगितले होते. पाकिस्तान सरकारने अमेरिकन राजदूताकडे ड्रोन हल्ल्यांबाबत तीव्र निषेधही व्यक्त केला होता.

परंतु थोड्याच कालात या सर्व प्रतिक्रिया फक्त पाकिस्तानी जनतेला खुष करण्यासाठी म्हणून सरकारने केल्या होत्या याचे प्रत्यंतर आल्यावाचून राहिले नाही. मंत्रीमंडळाच्या उपसमितीची सभाच घेतली गेली नाही आणि या विषयावर पंतप्रधान नवाज शरीफ यांच्याबरोबर साधी चर्चा सुद्धा कोणी केली नाही. अमेरिकेबरोबरचे आपले संबंध स्नेहपूर्ण आणि नेहमीप्रमाणेच असल्याचे आणि या संबंधांचा कोणताही आढावा घेतला जाण्याची शक्यता नसल्याचे पाकिस्तानी अधिकारी आता परत सांगत आहेत

एका बाजूला आग ओकणारे तालिबानी आणि दुसर्‍या बाजूला अमेरिकेचे अतिरेक्यांवर चालू राहिलेले ड्रोन विमानांचे हल्ले यांच्यामध्ये पाकिस्तान सरकार सापडले आहे. या परिस्थितीतून कोणताही मार्ग निघण्याची आशा मात्र दिसत नाही.

26 नोव्हेंबर 2013

Advertisements

About chandrashekhara

I am a retired electronics engineer. I am interested in writing, reading books. Other hobbies include Paper models, wooden fret work and social networking.

चर्चा

One thought on “कात्रीमध्ये अडकलेले पाकिस्तान

  1. very interesting information.

    Posted by kishor | नोव्हेंबर 26, 2013, 4:43 pm

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s

जुने लेख शोधा

Enter your email address to subscribe to this blog and receive notifications of new posts by email.

Join 386 other followers

MyFreeCopyright.com Registered & Protected

माझे नवीन इ-पुस्तक

एका साम्राज्याच्या शोधात

Advertisements
%d bloggers like this: