.
ताज्या घडामोडी Current Affairs, History इतिहास

जैन मंदिरातील मूर्तींची रहस्यमय चोरी


भारतातील कर्नाटक राज्यामध्ये असलेल्या मंगलोर शहराच्या ईशान्येस सुमारे 37 किमी अंतरावर मुडबिद्री हे छोटेसे गाव वसलेले आहे. प्राचीन काळामध्ये येथे मोठ्या प्रमाणात बांबू शेती करण्यात येत होती व त्यामुळे हे नाव गावाला पडलेले असावे असे समजले जाते.. 14 ते 16व्या शतकांच्या दरम्यान कधीतरी हे गाव, जैन धर्म, संस्कृती, कला आणि स्थापत्य या सर्व गोष्टींचे एक केंद्रस्थान म्हणून मानले जाऊ लागले. याच कालात येथे असलेली व बसदी या नावाने ओळखली जाणारी, 18 जैन मंदिरे या गावात बांधली गेली होती. या मंदिरांपैकी गुरूबसदी, त्रिभुवन तिलक चुडामणी बसदी आणि अमनवर बसदी ही मंदिरे विशेष करून प्रसिद्ध आहेत. मुडबिद्री मधे असलेल्या जैन मंदिरांपैकी गुरूबसदी हे मंदिर सर्वात प्रथम निर्मिती झालेले मंदिर समजले जाते व हे मंदीर हले किंवा सिद्धांत बसदी या नावानेही ओळखले जाते. हे मंदीर दगडी बांधकामाचे असून त्यावर तांब्याचा पत्रा बाहेरील बाजूस चढवलेला आहे. 3.5 मीटर उंच पार्श्वनाथांची मूर्ती या मंदिराच्या गाभार्‍यात बसवलेली आहे. धवल ग्रंथ या नावाने ओळखले जाणारे आणि ताल पत्रावर लिहिलेले 12 व्या शतकातील जैन ग्रंथ सुद्धा या मंदिरात सुरक्षितपणे ठेवलेले आहेत. पार्श्वनाथांची येथे असलेली मूर्ती, .714 मध्ये एका जैन मुनींनी ती सवलेली असून काळ्या ग्रॅनाइट दगडामध्ये ती घडवलेली आहे आणि कयोत्सर्ग मुद्रा दर्शवणारी आहे.. या शिवाय नवरत्न, तीर्थंकर आणि धवल यांच्या मिळून 64 मूर्ति या मंदिरात सुरक्षित रित्या ठेवलेल्या आहेत.

जैन मठाच्या आवारात असलेल्या या गुरूबसदी मंदिराच्या सिद्धांत दर्शन कक्षामधून 5 जुलै 2013 या दिवशीच्या पहाटे, छोट्या आकाराच्या 20 मूर्ती चोरील्या गेल्या होत्या. मौल्यवान पाषाण आणि सोने या मधून घडवलेल्या या मूर्ती साधारण 3 ते 4 इंच उंच होत्या. गॅसच्या ज्वालांद्वारे सिद्धांत दर्शन कक्षाच्या एका गवाक्षाचे गज कापून चोरटे आत शिरले होते व नंतर गॅस सिलींडर तेथेच टाकून त्यांनी पळ काढला होता. साधारण महिनाभरात मंगलोर पोलिसांनी 4 संशयितांना अटक करण्यात यश मिळवले. यामध्ये मुख्य संशयित संतोष दास, त्याची पत्नी दिप्तीमयी मोहन्ती व तिचे वडील दिगंबर मोहन्ती आणि ओदिशा मधील एक दागिन्यांचा व्यापारी सुभाष संचेती यांचा समावेश होता. या सर्वांवर चोरीमध्ये भाग घेतला असल्याचा आरोप ठेवण्यात आला. मध्य भारतातील छत्तीसगढ येथील एक रहिवासी संदीप संचेती यालाही अटक करण्यात पोलिसांना यश आले. मुख्य आरोपी संतोष दास याने पोलिसांना दिलेल्या आपल्या जबानी प्रमाणे छत्तीसगढ शहरात दागिन्यांचे दुकान असलेल्या संदीप संचेतीकडे चोरलेल्या मूर्तींपैकी 7 मूर्ती आपण दिल्याचे त्याने कबूल केले असल्याने त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले होते. संतोष दास याने या दुकानाला भेट दिल्याचा पुरावाही पोलिसांना मिळू शकला होता. या सर्व आरोपींची पोलिसांनी कसून चौकशी केल्यावर त्यांच्याकडील सोन्यामध्ये बनवलेल्या 3 मूर्ती व आणखी 5 मूर्ती वितळवून प्राप्त झालेले सोने एवढा मुद्देमाल मिळाला होता. मात्र या शिवाय बाकीच्या चोरी झालेल्या मूर्ती हवेत अदृष्य झाल्या की काय असे वाटावे! या प्रकारे कोणताही मागमूस न ठेवता नाहीशा झाल्या होत्या. त्यांचा ठावठिकाणा लावण्याच्या प्रयत्नात पोलिसांना पूर्णत: अपयश आले होते.

नोव्हेंबर 2013 महिन्याच्या पहिल्या आठवड्यात मंगलोरचे पोलीस कमिशनर मनिश खरबीकर यांच्या नावाने एक पोस्ट पार्सल आले. हे पोस्ट पार्सल स्पीड पोस्ट सेवेमार्फत 2 नोव्हेंबर या दिवशी पाठवलेले होते. हे पार्सल उघडल्यावर त्यामध्ये उत्तम रितीने पॅक केलेल्या व गुरूबसदी मंदिरामधून चोरीला गेलेल्या 12 मूर्ती असल्याचे पाहून पोलिस अक्षरशः अचंबित झाले. पोलीस कमिशनर म्हणतात की माझ्या आयुष्यात मी प्रथम चोरीस गेलेला माल पोस्ट पार्सलमधून परत आल्याचे बघितले आहे.” पोलिसांनी त्वरेने गुरूबसदी मंदिराच्या प्रतिनिधींना पोलीस स्टेशनवर चोरीस गेलेल्या मालाची ओळख पटवण्यासाठी पाचारण केले. या प्रतिनिधींनी पोलीस स्टेशनला भेट देऊन त्या पार्सल मधील मूर्ती खरोखरच चोरीला गेलेल्या मूर्तीच आहेत हे मान्य केले. मात्र त्यापैकी एका मूर्तीला हानी झाल्याचेही त्यांनी सांगितले. हे पार्सल कोणत्या गावाहून पाठवले गेले होते किंवा कोणत्या व्यक्तीने ते पाठवले होते या बाबत काहीही सांगण्यास पोलीस तयार नाहीत. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे ते या प्रकरणाबाबत सर्व माहिती जमा करत आहेत आणि हे पार्सल कोणी पाठवले आहे हे थोड्याच कालात त्यांना समजेल अशी त्यांना आशा आहे. पार्सलवर अर्थातच ते कोठून पाठवले आहे याचा उल्लेख आहे मात्र ते प्रत्यक्षात दुसर्‍याच ठिकाणावरून पाठवले गेलेले आहे.

चोरी झालेले गुरूबसदी मंदिर

मात्र या चोरीमागच्या रहस्याचे, चोरीला गेलेला माल पार्सलने परत आल्यावर आकलन होण्याऐवजी ते रहस्य आणखीनच गडद झाल्यासारखे दिसते आहे. पोलीस कमिशनर खरबिकर म्हणतात की त्यांना परत मिळालेल्या मूर्तींची संख्या 5 जुलै रोजी चोरी झाल्यावर जो प्रथम अहवाल बनवला होता त्यापेक्षा अधिक आहे. याचा अर्थ असा होतो की ज्या कोणी तो प्रथम अहवाल बनवला होता त्याने मुद्दामच चोरीला गेलेल्या मूर्तींची संख्या प्रत्यक्षात चोरी झालेल्या मूर्तींच्या संख्येपेक्षा कमी असल्याचे अहवालात नमूद केलेले होते किंवा चोरांना मंदिराच्या कर्मचार्‍यांपैकीच कोणीतरी मदत करत होते. त्यामुळे चोरीचा माल आणखी संशयित चोर हे दोन्ही सापडले असले तरी पोलिसांचा तपास चालूच राहिला आहे.

20 नोव्हेंबर 2013

Advertisements

About chandrashekhara

I am a retired electronics engineer. I am interested in writing, reading books. Other hobbies include Paper models, wooden fret work and social networking.

चर्चा

अद्याप प्रतिक्रिया नाहीत.

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदला )

Connecting to %s

जुने लेख शोधा

Enter your email address to subscribe to this blog and receive notifications of new posts by email.

Join 387 other followers

MyFreeCopyright.com Registered & Protected

माझे नवीन इ-पुस्तक

एका साम्राज्याच्या शोधात

Advertisements
%d bloggers like this: