.
ताज्या घडामोडी Current Affairs, Travel-पर्यटन

एअर इंडिया मध्ये काय चालले आहे?


 1960च्या दशकात किंबहुना 1970 च्या दशकात सुद्धा, प्रवाशांना देण्यात येणार्‍या सुखसोयींचा विचार केला असता, भारताची राष्ट्रीय विमान कंपनी असलेल्या एअर इंडियाची गणना, जगातील त्या वेळच्या सर्वोत्कृष्ट विमान कंपन्यांत होत असे. पुढच्या बाजूस पंखे असलेल्या सुपर कॉन्स्टेलेशन विमानांचा ताफा या कंपनीकडे प्रथम असे व नंतर या विमानांची जागा बोइंग कंपनीच्या 707 या जेट विमानांनी घेतली होती. 1975 मध्ये एअर इंडियाच्या विमानाने मुंबई ते रोम असा केलेल्या माझ्या पहिल्या आंतर्राष्ट्रीय प्रवासाच्या सुखद स्मृती अजूनही माझ्या स्मरणात आहेत. ते विमान, त्यातील सुखद इंटिरियर डिझाइन, बसण्याची आरामदायी आसने, दोन रांगांमध्ये पुरेसे अंतर ठेवलेले असल्याने पाय ताणून देण्याची असलेली सुविधा, तसेच रुचकर खाद्यपदार्थ व पेये यांची रेलचेल या सर्व गोष्टींमुळे तो प्रवास बहुधा आजही स्मरणात राहिला आहे. त्या वेळेस सुद्धा एअर इंडियाच्या विमानातील हवाई सुंदरी आजच्या सारख्याच साडी परिधान केलेल्या असत. परंतु त्या वेळेस एअर इंडियाची साडी ही एक फॅशन अभिव्यक्ती मानली जात असे आणि अनेक स्त्रिया बाहेर बाजारात एअर इंडिया डिझाइन समान डिझाईन असलेल्या साड्या आवडीने खरेदी करत असत. भारतातील एका विशाल औद्योगिक गटाची धुरी सांभाळणारे कै. श्री. जे.आर.डी.टाटा हे त्या वेळेस एअरा इंडियाचे चेअरमनपद संभाळत असत असत आणि एअर लाइन्स उद्योगातील जागतिक मानकांप्रमाणे एअर इंडियाचे कार्य चालू आहे की नाही याकडे ते जातीने लक्ष घालत असत.

1975 या वर्षापासून मात्र एअर इंडियाची परिस्थिती उतरणीला लागली. लागली.या वर्षी तेंव्हाच्या पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी यांनी जेआरडी टाटा यांना पदभार सोडण्याची आज्ञा केली आणि चेअरमनचे अधिकार, ज्याला विमान कंपनी चालवण्याच्या धंद्यातील ओ किंवा ठो माहीत नव्हते अशा दिल्लीतील कोणा नोकरशहाला दिले. तेंव्हापासून एअर इंडिया प्रवाशांना देत असलेल्या सेवेचा दर्जा खालावण्यास सुरवात केली. 2007 मध्ये मध्यवर्ती सरकारने, एअर इंडियाचे आणि सदोदित नुकसानीत चालणार्‍या आणि सेवेचा दर्जा अत्यंत नित्कृष्ट असलेल्या इंडियन एअरलाइन्स या विमानसेवेचे, एकत्रीकरण केले आणि एअर इंडियाची मृत्यूघंटाच वाजवली असे म्हटले तरी चालेल. शक्य तेवढ्या अडचणींचा डोंगर अंगावर घेऊन, कशीतरी विमानसेवा पुरवणार्‍या इंडियन एअरलाइन्स बरोबर झालेल्या एकत्रीकरणाने, एअर इंडिया आतापर्यंत देत असलेल्या सेवेचा दर्जा आणखी खालावत गेला.

विमानसेवा पुरवणार्‍या खाजगी विमान कंपन्यांच्या भारतातील आगमनामुळे सरकारी मालकीच्या विमान कंपन्यांची भारतातील मक्तेदारी संपुष्टात आली आणि त्यांच्यापुढची व्यावसायिक संकटे वाढतच जाऊ लागली. एअर इंडियाच्या, इंडियन एअरलाइन्स बरोबर झालेल्या एकत्रीकरणाला आता 6 वर्षी पूर्ण झाली असली तरी प्रत्यक्षात या दोन्ही विमानसेवांचे एकत्रीकरण जेमतेम 70% पूर्ण झाले आहे. एकत्रीकरण झालेल्या कंपनीच्या या दोन्ही विभागांमध्ये असलेल्या कर्मचार्‍यांचे पगार आणि पदोन्नतीची उपलब्धता यांच्यात अजूनही मोठी तफावत असल्याचे दिसते आहे. 1975 सालापासूनच एअर इंडिया ही कंपनी कर्मचार्‍यांबरोबरचे विवाद आणि कर्जबाजारीपणा यांच्या विळख्यात अडकलेली आहे. हे विवाद अजूनही सुरूच आहेत. आज एअर इंडियाच्या डोक्यावर कर्जाचा प्रचंड डोंगर उभा आहे आणि ती केवळ मध्यवर्ती सरकार कडून मिळत असलेल्या पैशांमुळे कशीबशी तग धरून आहे.

एकेकाळी जगभर सुप्रसिद्ध असलेल्या या विमान कंपनीची ख्याती आता इतक्या खालच्या पातळीवर आहे की भारतीय प्रवासी सुद्धा जर दुसरा कोणताच विकल्प उपलब्ध नसला तरच एअर इंडियाने प्रवास करण्याचा विचार करतात. मात्र एअर इंडियाच्या या खालावलेल्या प्रतिमेमागची कारणे त्या कंपनीची खराब आर्थिक परिस्थिती किंवा तिच्या ताफ्यात असलेली विमाने ही नसून अनेक छोट्या मोठ्या विवादास्पद प्रसंगामुळे ती तशी बनली आहे. हे प्रसंग खरे तर चांगले व्यवस्थापन आणि योग्य रित्या सर्व पातळ्यांवर आणि विमानकंपनीची विविध अंगे असलेल्या सर्व सेवांबाबत, केलेल्या दर्जा विषयक चाचण्या आणि तपासण्या यांचे व्यवस्थित पालन केल्यास सहज रित्या टाळता येणे शक्य आहे.

2013 च्या मे महिन्यात एअर इंडियाच्या एका उड्डाणाच्या दरम्यान विमानाची ऑटोपायलट यंत्रणा, विमानाचे दोन्ही पायलट एकाच वेळी विश्रांती घेत असल्याने दुसर्‍याच कोणाच्या तरी हातून चुकून बंद केली गेली. वृत्तपत्रांतील बातम्यांनुसार एका हवाई सुंदरीच्या हातून ही घटना घडली होती. या घटनेनंतर याच महिन्यात, एअर इंडियाच्या एका विमानाला, पायलट केबिनच्या बाहेर असलेल्या टॉयलेट मध्ये गेलेला असताना केबिनचे दार लॉक झाल्याने, केबिनच्या बाहेर अडकून पडावे लागले होते. विमानाचा पायलटच केबिनच्या बाहेर अडकल्याने, विमानाला परत खाली जमिनीवर उतरण्याचे आदेश कंट्रोल टॉवरला द्यावे लागले होते.

याच प्रकारच्या आणखी दोन घटना, ज्यांना एअर इंडियाचे कर्मचारी आणि तपासणी यंत्रणांचा आत्यंतिक निष्काळजीपणाच कारणीभूत आहे, घडल्याचे वृत्त नुकतेच परत वाचनात आले. 28 सप्टेंबर 2013 रोजी न्यूयॉर्क येथून नवी दिल्लीला जाणार्‍या एअर इंडियाच्या विमानातील एका प्रवाशाने तक्रार केली की त्याला उड्डाणाच्या दरम्यान दिल्या गेलेल्या सॅन्डविचमध्ये किडे असल्याचे आढळून आले. एअर इंडियाच्या एका प्रवक्त्याने या प्रकरणात न्यूयॉर्कच्या ज्या खानपान सेवा कंपनीने हे खाद्यपदार्थ पुरवले होते त्यांच्यावर जबाबदारी ढ्कलण्याचा प्रयत्न केला. त्याच्या निवेदनाप्रमाणे ही खराब सॅन्डविचेस, भारतातील कोणीही पुरवली नसून अमेरिकेमधल्याच एका प्रसिद्ध खानपान सेवा देणार्‍या कंपनीने पुरवली होती व हीच कंपनी अमेरिकेमधील सर्व बड्या विमानकंपन्यांना ही सेवा पुरवीत असते. सर्वसाधारणपणे खानपानसेवा पुरवणार्‍या कंपन्या खाद्यपदार्थांच्या दर्जाबद्दल अतिशय काळजी घेत असतात. परंतु ही घटना घडल्यामुळे एअर इंडिया या कंपनीविरूद्ध योग्य ती कारवाई म्हणे करणार आहे.

या महिन्यात (ऑक्टोबर 20130) घडलेली आणखी एक घटना म्हणजे बेंगलुरूकडे जाणार्‍या एअर इंडियाच्या नव्या कोर्‍या ड्रीमलायनर किंवा बोइंग 777 विमानाच्या खालच्या बाजूचे एक पॅनेल विमान हवेत असतानाच खाली गळून पडले. विमान उड्डाण सुरक्षा या विषयातील तज्ञ मंडळींच्या मताप्रमाणे, जरी हे विमान सुखरूपपणे विमानतळावर उतरले असले आणि त्यातील 150 प्रवासी काहीही दुखापत होण्यापासून वाचले असले तरी हे सर्व प्रवासी एका महाभयंकर दुर्घटनेचे शिकार होण्यापासून केवळ सुदैवानेच वाचले आहेत. मात्र तरीही एअर इंडियाच्या सुरक्षा अधिकार्‍यांनी या प्रकरणाची चौकशी करणार्‍या Indian Directorate General of Civil Aviation च्या पदाधिकार्‍यांना हे प्रकरण, विमानाच्या फ्युजलाज ला एक मोठे भोक पडलेले दिसत असूनही फारसे गंभीर नव्हते व आपत्कालीन तर अजिबातच नव्हते असा अहवाल दिला आहे.

कोणालाही सहजपणे हे स्पष्ट व्हावे की वर उल्लेख केलेल्या सर्व घटना अतिशय सरळ सोप्या पद्धतीची शिस्तबद्ध व्यवस्थापकीय यंत्रणा आणि कर्मचार्‍यांद्वारे विमानाचे उड्डाण होण्याआधी केल्या जाणार्‍या सेवांच्या दर्जा विषयक तपासण्या, अशा प्रकारच्या उपायांमुळे सहज टाळता येणे शक्य आहे. एअर इंडियाच्या विमानांत, मोडक्या हातांच्या खुर्च्या, खुर्च्यांच्या पाठीवर बसणार्‍याची मान जेथे टेकते त्या भागावर ठेवले जाणारे टॉवेल्स गायब असणे आणि विमानाच्या आतील भागात असलेल्या पॅनेल्सना तडे गेलेले असल्याने त्याला सेलोटेपने चिकटवून ठेवलेले असणे वगैरे सारख्या डोळ्यांना खुपणार्‍या गोष्टी नेहमीच दृष्टोत्पत्तीस येत असतात. परंतु असे म्हणणे गैर ठरणार नाही की एअर इंडिया समोरच्या बहुतेक अडचणी या कर्मचार्‍यांचे औदासिन्य, अकार्यक्षमता आणि निष्काळजीपणा यामुळेच निर्माण होत असतात. व्यवस्थापन कर्मचार्‍यांच्या एकूण वर्तनामध्ये सुधारणा व्हावी म्हणून साम, दाम, दंड आणि भेद यापैकी कोणत्याच प्रकारची उपाययोजना करते आहे असे दिसत तरी नाही. त्यामुळेच भारताच्या हवाई वाहतूक संबंधी विषयाचे मंत्री ज्यावेळी एअर इंडियाच्या खाजगीकरणाबद्दल अनुकूलता दर्शवतात त्यावेळी त्यात नवल वाटण्यासारखे काही आहे असे मला तरी वाटत नाही.

सध्याच्या कालात ज्या हाताच्या बोटावर मोजण्यासारख्या विमान कंपन्या सर्वोत्कृष्ट म्हणून मानल्या जातात त्यापैकी असलेल्या सिंगापूर एअरलाइन्स मधून प्रवास करत असताना मला आलेला एक छोटासा अनुभव येथे देण्याचा मोह आवरत नाही. सिंगापूरसॅन फ्रान्सिस्को प्रवास करत असताना मला असे आढळून आले की माझ्या आसनासमोरचा टीव्ही पडदा हा सतत काळाच दिसतो आहे. विमानात एकही आसन मोकळे नसल्याने मला दुसरे कोणतेही आसन देणे कर्मचार्‍यांना शक्य नव्हते. पुढचे 15 ते 19 तास मला त्या उड्डाणाच्या अंतर्गत कोणत्याही करमणुकीशिवाय काढावे लागल्याने मी सिंगापूर एअरलाइन्सच्या विमान सेवेबद्दल बराच नाखूष झालो होतो. प्रवासाच्या अखेरीस, एक कर्मचारी माझ्या आसनापाशी आला व बिघडलेल्या टीव्ही पडद्याबद्दल माझी त्याने क्षमा मागितली व मला झालेल्या असुविधेची भरपाई म्हणून त्याने माझ्या हातात 150 अमेरिकन डॉलरचे एक कुपन त्याने ठेवले. विमानात विक्रीसाठी उपलब्द्ध असलेल्या वस्तूंपैकी कोणतीही हवी ती वस्तू मला त्या कुपनावर घेता येईल असे त्याचे म्हणणे दिसले. विमान कर्मचार्‍यांच्या अनवधानाने किंवा निष्काळजीपणामुळे विमानातील एका सेवेची योग्य वेळी दुरुस्ती न केली गेल्यामुळे मला जो त्रास सहन करावा लागला होता त्याची भरपाई करण्याची ही पद्धत बघून माझी नाखुशी केंव्हाच निघून गेली. आपल्या ग्राहकांना कशी सेवा दिली पाहिजे याचे हे अत्यंत उत्तम उदाहरण आहे. एअर इंडिया कडून अशा काही प्रकारच्या सेवेची अपेक्षा करणे सुद्धा बहुधा मूर्खपणा ठरेल.

जोपर्यंत एअर इंडिया आपल्या विमानांची देखभाल आंतर्राष्ट्रीय दर्जानुसार करत नाही आणि त्यांच्या ग्राहक सेवेचा दर्जा सुधारत नाही तोपर्यंत एअर इंडियाला पूर्वीचे स्थान प्राप्त करणे जवळपास अशक्यप्राय आहे असे मला वाटते.

3 नोव्हेंबर 2013

Advertisements

About chandrashekhara

I am a retired electronics engineer. I am interested in writing, reading books. Other hobbies include Paper models, wooden fret work and social networking.

चर्चा

अद्याप प्रतिक्रिया नाहीत.

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदला )

Connecting to %s

जुने लेख शोधा

Enter your email address to subscribe to this blog and receive notifications of new posts by email.

Join 387 other followers

MyFreeCopyright.com Registered & Protected

माझे नवीन इ-पुस्तक

एका साम्राज्याच्या शोधात

Advertisements
%d bloggers like this: