.
अनुभव Experiences, ताज्या घडामोडी Current Affairs, Musings-विचार

ज्योतिष, पत्रिका आणि संख्याशास्त्र


 पुण्याला प्रथमच भेट देणार्‍या कोणाही परदेशी पर्यटकाला असा प्रश्न विचारला की काय हो? प्रथमदर्शी पुण्यातील कोणती गोष्ट तुमच्या डोळ्यात भरली? तर माझी खात्री आहे की बहुसंख्य पर्यटक पुण्याच्या रस्त्यावर धावणार्‍या काळ्या आणि पिवळ्या रंगांच्या रिक्षांचे नाव घेतील. मात्र हाच पर्यटक जरा जास्त शंकेखोर आणि चिकित्सक असला तर या रिक्षांपैकी बहुसंख्य रिक्षांच्या तळाला बांधलेली आणि रस्त्याला टेकेल की काय असे वाटावे, एवढ्या लांबीची एक सुती दोरी व त्यात ओवलेले एक लिंबू आणि चार/पाच हिरव्या मिरच्या यांकडे आपले लक्ष गेले असे सांगितल्याशिवाय राहणार नाही.

जादूटोणा, दृष्ट, नजर, भानामती या सारख्या अंधश्रद्धांत जखडून पडलेल्या आजच्या भारतीय समाजाच्या अगतिकतेची, दोरीत ओवलेले हे लिंबू आणि मिरच्या, ही पहिली तोंडओळख या परदेशी पर्यटकांसाठी असणार आहे. त्या रिक्षावाल्याच्या शत्रूंची त्याला नजर लागू नये आणि शत्रूंनी त्याच्यावर जादूटोणा किंवा भानामतीचे प्रयोग करू नयेत म्हणून हा रिक्षावाला ही लिंबूमिरच्या ओवलेली दोरी आपल्या रिक्षाला बांधत असतो. या रिक्षावाल्याच्या कृती सारख्या अनंत पूर्वापार चालत आलेल्या रूढी आणि परंपरा यात भारतीय समाज इतका बुडून गेलेला आहे की त्यातून त्याला बाहेर काढण्याचे काही विचारवंतांचे प्रयत्न पूर्णपणे निष्फळ ठरत आहेत. उदाहरणार्थ बहुतेक भारतीय आजही एका पूर्वापार चालत आलेल्या एका जुन्या समजुतीवर अजूनही विश्वास ठेवतात की घराची रचना किंवा आतील सामानाची रचना याचा त्या व्यक्तीच्या किंवा कुटुंबाच्या भविष्यावर परिणाम होत असतो. ही रचना म्हणे हे ठरवते की त्या व्यक्तीला जीवनात आनंद मिळेल की त्याच्यावर संकटे कोसळत राहतील. थोडक्यात म्हणजे त्याचे भविष्य घराच्या रचनेवर अवलंबून असेल.

भारतीय समाजातील पूर्वापार रूढी आणि परंपरा यातून समाजाला बाहेर काढण्याचे प्रयत्न भारतात आणि विशेषकरून महाराष्ट्रात करणारे ज्योतिबा फुले, आगरकर, महर्षी कर्वे यांसारखे अनेक कृतिशील विचारवंत गेल्या शेदोनशे वर्षात होऊन गेले. आपल्या सध्याच्या काळात जादूटोण्यासारख्या अंधश्रद्धांच्या विरुद्ध झगडणार्‍या विचारवंतांत अर्थातच डॉ. नरेंद्र दाभोळकरांचे नाव प्रथम घ्यावे लागेल. या विचारवंताने समाजाला दिलेली सर्वात मोठी देणगी म्हणजे 1989 मध्ये त्यांनी स्थापन केलेली अंधश्रद्धा निर्मुलन समिती आणि त्यातून तयार झालेले आणि त्यांच्या विचारांवर पूर्ण विश्वास असणारे अनेक अनुयायी यांना म्हणता येईल. दुर्दैवाने हा विचारवंत 20 ऑगस्ट 2013 या दिवशी कोणा एका मारेकर्‍याच्या गोळीला बळी पडला. हा मारेकरी शोधून काढण्यात पोलिसांना अजूनही यश आलेले नाही नाही परंतु हे मात्र नक्की की हा मारेकरी किंवा ज्यांनी या मारेकर्‍याला सुपारी दिली होती ते लोक दाभोळकरांच्या विचारधारेमुळे त्यांचा स्वत:चा स्वार्थ साधण्यात अडचणी निर्माण झाल्याने या विचारधारेचा स्त्रोतच बंद करण्याचा एक निष्फळ प्रयत्न करू बघत आहेत. परंतु दाभोळकरांचे अनुयायी त्यांची चळवळ पुढे चालू ठेवून त्यांची विचारधारा लोकांपर्यंत पोचवत राहण्याचा प्रयत्न पुढे चालू ठेवतील या बाबत माझ्या मनात तरी शंका नाही.

2010 मध्ये डॉ.दाभोळकरांनी, जादूटोणा आणि अंधश्रद्धा पसरवणे हे गुन्हे समजले जावेत यासाठी महाराष्ट्र विधानसभेने कायदा पारित करावा म्हणून बरेच प्रयत्न केले. परंतु याला राजकीय विरोध झाला. अशा प्रकारच्या कायद्याच्या विरोधकांनी, या कायद्याचा हिंदू संस्कृती, रूढी आणि परंपरा यावर विपरीत परिणाम होईल अशी फसवी कारणे देत या कायद्याला विरोध केला. खरे तर डॉ. दाभोळकरांनी या बाबतीत खुलासा करताना स्पष्टीकरण दिले होते की या प्रस्तावित कायद्याच्या संपूर्ण मसुद्यात परमेश्वर किंवा धर्म या दोन शब्दांचा कोठेही उल्लेख सुद्धा नाही. भारतीय राज्यघटने प्रमाणे प्रत्येकाला आपल्याला हवा तो धर्म व हवी तशा पद्धतीने आराधना करण्याचे पूर्ण स्वातंत्र्य दिलेले आहे, आणि हा हक्क कोणीही हिरावून घेऊ शकत नाही. हा प्रस्तावित कायदा फसवेगिरी आणि दुसर्‍याच्या भावना किंवा श्रद्धा यांचा दुरुपयोग स्वत:च्या स्वार्थासाठी करू बघणार्‍यांना अटकाव आणि शिक्षा व्हावी या साठी करावयाचा आहे. या कायद्याला होणारा विरोध तरीही मावळला नाही. अखेरीस डॉ. दाभोळकरांच्या मृत्यूनंतर महाराष्ट्र शासनाने एक अध्यादेश काढून हा कायदा अंमलात आणला आहे.अर्थात तो  अध्यादेश विधानसभेकडून पारित करून घ्यावा लागेलच.

2009 मध्ये डॉ. दाभोळकर आणि प्रख्यात अंतराळ भौतिकी (astrophysicist) शास्त्रज्ञ डॉ. जयन्त नारळीकर व इतर सहकारी यांनी मिळून आपल्याला फारसा ज्ञात नसलेला एक संख्याशास्त्रीय प्रयोग केला होता. या प्रयोगाचे निष्कर्ष करन्ट सायन्सया मासिकाच्या मार्च 2009 च्या अंकात प्रसिद्ध केले होते. व्यक्तीची कुंडली बनवण्याच्या भारतीय रूढीशी हा प्रयोग संबंधित होता.

आपल्यापैकी बहुतेकांना कुंडली म्हणजे काय हे बहुधा माहिती असेलच. त्या व्यक्तीच्या जन्मकाली किंवा दुसर्‍या कोणत्याही समयी, आकाशातील प्रत्यक्ष दिसणार्‍या आणि राहू, केतू सारख्या काल्पनिक ग्रहांची, आकाशातील स्थाने काय होती यावरून ही कुंडली तयार केली जाते. ज्योतिषावर विश्वास ठेवणार्‍या मंडळींची अशी समजूत असते की त्या व्यक्तीची स्वभाव आणि शरीर वैशिष्ट्ये वैशिष्ट्ये आणि त्या व्यक्तीचे भविष्य या कुंडलीवरून ठरते आणि सांगता येते. त्याचप्रमाणे त्या व्यक्तीला एखादा दिवस किंवा काल हा शुभ आहे की त्याच्यावर संकट परंपरा कोसळणार आहे हेही या कुंडलीवरून सांगता येते.

समाजातील अनेक राजकारणी, वरिष्ठ नोकरशहा आणि सामाजिक हितसंबंधाचे निर्णय घेण्यास जबाबदार असलेली मंडळी, इतर ठिकाणी विवेक बुद्धीने आणि तर्कसंगत विचार करत असली तरी अजूनही कुंडली आणि त्यावरून सांगितले जाणारे भविष्य याबाबत मात्र अंधश्रद्धा बाळगताना आढळून येतात. ही मंडळी स्वत:च्या मुलामुलींचे विवाह ठरवताना कुंडलीवर अवलंबून असतात असे दृष्टोत्पत्तीस येते.

डॉ. नारळीकर आणि डॉ. दाभोळकर यांनी मिळून केलेल्या संख्याशास्त्रातील प्रयोगाकडे परत वळूया. या प्रयोगाच्या निष्कर्षावर आधारित जो अहवाल वर निर्देश केलेल्या मासिकात प्रसिद्ध केला गेला होता त्याचा सारांश मी खाली उधृत करत आहे.

महाराष्ट्रामध्ये जन्मजात बालकाच्या कुंडलीवरून वर्तवल्या जाणार्‍या त्याच्या भविष्याची सत्यासत्यता पडताळून बघण्यासाठी एक प्रयोग नुकताच करण्यात आला. या प्रयोगासाठी एकूण 200 जन्म कुंडल्या जमवल्या गेल्या होत्या. यापैकी 100 जन्म कुंडल्या (गट अ) या शाळेत हुशार म्हणून गणल्या जाणार्‍या मुलांच्या होत्या तर इतर 100 जन्म कुंडल्या ( गट ब) या मतिमंद मुलांच्या होत्या. कुंडली हुशार मुलाची आहे की मतिमंद मुलाची याचे व्यवस्थित रेकॉर्ड करून घेतल्यानंतर या कुंडल्या संपूर्ण रॅन्डम पद्धतीने एकत्र मिसळल्या गेल्या आणि आणि त्या नंतर अनेक ज्योतिषांना या कुंडल्यांवरून वर्तवलेल्या भविष्याची अचूकता पडताळण्यासाठी म्हणून या प्रयोगात भाग घेण्यासाठी पाचारण केले गेले. यापैकी 51 ज्योतिषांनी या प्रयोगात सहकार्य करण्यास तयारी दर्शवली. प्रत्येक ज्योतिषाकडे रॅन्डम रित्या निवडलेल्या 40 जन्म कुंडल्या पाठवल्या गेल्या आणि त्यांना या कुंडल्यांचे हुशार आणि मतिमंद अशा दोन गटात वर्गीकरण करण्याचे सांगण्यात आले. या प्रयोगात भाग घेण्याची तयारी दर्शवणार्‍या 51 ज्योतिषांपैकी फक्त 27 ज्योतिषांनीच केलेले वर्गीकरण परत पाठवले. या नंतर संख्याशास्त्राच्या आधाराने केलेल्या विश्लेषणातून असे दिसले की कोणतीही एक कुंडली हुशार मुलाची आहे की मतिमंद, हे वर्तवण्याची अचूकता, एखादे नाणे वर फेकल्यानंतर ते छाप किंवा काटा यापैकी कोणत्या बाजूवर पडेल? याची जेवढी अचूकता असते त्यापेक्षा थोडी कमीच आहे. यानंतर या सर्व कुंडल्या एका ज्योतिष्य विषयक संशोधन करणार्‍या संस्थेला दिल्या गेल्या व त्यांना या कुंडल्यांचे दोन गटात वर्गीकरण करण्याचे सांगितले गेले. परंतु त्यांच्या वर्गीकरणाची अचूकता फारशी सुधारली नाही.

या स्पष्ट परंतु विस्तृतता कमी असलेल्या प्रयोगावरून हे सिद्ध होते की जन्म कुंडलीवरून, ज्या मुलाची ती कुंडली आहे त्याची अभ्यासातील हुशारी पडताळणी किंवा ती वर्तवणे हे अशक्य आहे. “

दुर्दैवाने अंधश्रद्धा, भाबड्या समजुती आणि तथाकथित परंपरांवर विश्वास, या गोष्टी भारतीयांच्या मानसिकतेच्या इतका अविभाज्य भाग बनलेल्या आहेत की कोणत्याही बुद्धीनिष्ठ विचाराचे सुद्धा त्यांना वावडे असल्यासारखे आहे. मी नुकतेच एक वृत्त वाचले. या वृत्ताप्रमाणे भारताचे नवीन मंगळयान जेंव्हा बेंगरुळू शहरातील उत्पादन केंद्रावरून पूर्व किनार्‍यावरील रॉकेट उड्डाणाच्या तळाकडे पाठवण्यात आले तेंव्हा त्या यानाची, ज्ञात तंत्रज्ञानाची सीमारेखा म्हणता येईल अशा या प्रकल्पावर कार्य करणार्‍या शास्त्रज्ञांनी, म्हणे पूजा केली व मगच हे यान मार्गस्थ झाले. शास्त्रज्ञ मंडळींची जर ही मानसिकता असेल तर सर्व सामान्यांचा कर्मकांडांवर असलेला विश्वास किती पराकोटीला पोचलेला असणार आहे याची सहज कल्पना येऊ शकते. त्यामुळे डॉ. दाभोळकरांना त्यांच्या अंधश्रद्धा निर्मूलनाच्या कार्यात किती अनंत अडचणी आल्या असतील याची कल्पना सुद्धा करवत नाही.

वर उल्लेख केलेल्या संख्याशास्त्रीय प्रयोगात सहभागी असलेले दुसरे शास्त्रज्ञ डॉ. नारळीकर, यांनी नुकत्याच केलेल्या आपल्या एका भाषणात ज्योतिष्यासंबंधीच्या काही रोचक बाबींचा उल्लेख केला आहे. ते म्हणतात:

वैदिक कालखंडात 7 दिवसाचा आठवडा अशी कोणतीही संकल्पना नव्हती. त्याचप्रमाणे ज्योतिषी म्हणवून घेणार्‍या कोणीही व्यक्ती समाजात नसत. अलेक्झांडर जेंव्हा प्रथम भारतात आला तेंव्हा त्याने आपल्याबरोबर अनेक ज्योतिषी आणले. त्यातले काही तो परत गेल्यावर भारतातच राहिले आणि ज्योतिष हा प्रकार भारतात पुढे चालू राहिला.”

डॉ. नारळीकर पुढे म्हणतात की संख्याशास्त्र आणि शास्त्रीय दृष्टीकोन याच्या निकषांवर ज्योतिषांनी वर्तवलेल्या भविष्यवाणीची अचूकता लोकांनी प्रथपडताळून बघितली पाहिजे. ज्योतिषाच्या आधारावर जुळवलेल्या पत्रिका किंवा ज्योतिषांनी सांगितलेले भविष्य हे अचूक वर्तवले जात असल्याची कोणतीच शक्यता नसल्यामुळे लोकांनी त्यावर अवलंबून राहणे चुकीचेच ठरेल.

दुर्दैवाने डॉ. नारळीकरांच्या सांगण्यावर विश्वास ठेवतील अशी मंडळी भारतीय समाजात एकूण तरी अत्यल्पमतातच आहेत व हीच भारतीय समाजाची खरी शोकांतिका आहे.

21 ऑक्टोबर 2013

Advertisements

About chandrashekhara

I am a retired electronics engineer. I am interested in writing, reading books. Other hobbies include Paper models, wooden fret work and social networking.

चर्चा

अद्याप प्रतिक्रिया नाहीत.

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदला )

Connecting to %s

जुने लेख शोधा

Enter your email address to subscribe to this blog and receive notifications of new posts by email.

Join 387 other followers

MyFreeCopyright.com Registered & Protected

माझे नवीन इ-पुस्तक

एका साम्राज्याच्या शोधात

Advertisements
%d bloggers like this: