.
ताज्या घडामोडी Current Affairs

टंकयंत्रे झिंदाबाद!


 बहुधा माझ्या आजोबांनी खरेदी केलेले, रेमिंग्टन कंपनीचे एक पोर्टबल टंकयंत्र माझ्याकडे होते. या टंकयंत्रात एका वेळी जास्त प्रती काढता येत नसल्या तरी टाइपच्या बटणांना अगदी हलका आघात सुद्धा पुरत असल्याने या टंकयंत्रावर टाइपिंग करणे अगदी सहज सुलभ असे. आमच्या ओळखीच्या एका मेकॅनिक कडून या टंकयंत्राची देखभाल करून घेतली की हे टंकयंत्र विनात्रास सतत सेवा देत असे. मला आठवते की मी स्वत:चा व्यवसाय सुरू केल्यानंतर पहिले कोटेशन, डिलिव्हरी नोट आणि पहिले बिल सुद्धा याच टंकयंत्रावर टाइप केले होते.

पुढे मग मी सर्वसाधारण ऑफिसमध्ये वापरतात तसा टाइपरायटर खरेदी केला. त्या नंतर 486 पर्सनल कॉम्प्यूटर आणि प्रिंटर घेतला पण हा आमचे हे जुने टंकयंत्र ऑफिसमधल्या एका टेबलावर धूळ खात खूप वर्षे नंतर पडून राहिले होते. शेवटी मी ते भंगारात काढण्याचा निर्णय घेतला व नाममात्र किंमतीला कोणाला तरी विकून टाकले. त्यानंतर त्याचे काय झाले? हे अर्थातच मला माहिती असण्याचे काहीच कारण नाही. परंतु माझी खात्री आहे की बाजारातल्या कोणत्या तरी अंधारलेल्या छोट्याशा दुकानात किंवा कचेरीत हे टंकयंत्र अजून सेवा देत असणार आहे.

मी माझे जुने टंकयंत्र अगदी सहजतेने फेकून देऊ शकलो पण लंडनमध्ये असलेल्या भारतीय दूतावासात जेंव्हा नवे संगणक आणि इलेक्ट्रॉनिक प्रिन्टर्स घेण्यात आले तेंव्हा कोणत्या तरी अज्ञात कारणामुळे का होईना, जुनी टंकयंत्रे फेकून न देता तळघरात सुरक्षितपणे झाकून ठेवण्यात आली. मागे वळून बघताना आता असे दिसते आहे की त्या वेळेस ही यंत्रे सुरक्षितपणे ठेवून देण्याचा निर्णय जो कोणी घेतला तो दूतावासाच्या आजच्या किंवा वर्तमानकालाच्या दृष्टीने फारच उत्तम आणि सुरक्षा प्रदान करणारा ठरला आहे कारण दूतावासामधील सर्व संवेदनाशील आणि गुप्त माहिती असणारे कागदपत्र आता परत एकदा या जुन्या टंकयंत्रांवर टंकलिखित केले जाऊ लागले आहेत.

अमेरिकेच्या National Security Agency (NSA) या संस्थेतील कर्मचारी एडवर्ड स्नोडेन याने मध्यंतरी या संस्थेचे पितळ उघडे पाडणारी बरीच संवेदनाशील माहिती जगभर प्रसिद्ध केली होती. या माहितीत असेही एक वृत्त होते की या संस्थेने भारताचा संयुक्त राष्ट्रांच्या मुख्य कचेरीतील दूतावास आणि वॉशिंग्टन मधील दूतावास या दोन्ही ठिकाणी तेथे काय चालले आहे हे समजावे म्हणून गुप्त संवेदक (bugs) बसवले होते. ही माहिती उजेडात आल्यावर लंडनमधील भारतीय दूतावासाच्या हे लक्षात आले की ब्रिटनच्या GCHQ या गुप्तहेर संघटनेने असे संवेदक, लंडन स्थित भारतीय दूतावासात बसवले असण्याची मोठी शक्यता आहे किंवा ते बसवण्याचा निदान प्रयत्न तरी केला गेला असणार आहे. त्यामुळे दूतावासाकडे येणारी संवेदनाक्षम किंवा गुप्त माहिती बाहेर जाऊ नये यासाठी प्रभावी पाऊले उचलण्याची गरज दूतावासाला वाटू लागली.

लंडनमधील गुप्तहेर संघटना GCHQ आणि अमेरिकेची NSA ही संघटना यांचे इलेक्ट्रॉनिक माध्यमे आणि सोशल मिडिया वर होणार्‍या संदेशांची देवाणघेवाण, यावर विश्वव्यापी पाळत ठेवण्याच्या कार्यात मोठे सहकार्य असते. इंटरनेटवरील संदेशांवर अशी नजर किंवा पाळत ठेवण्यासाठी अमेरिकन सरकारच्या एका गुप्त कार्यक्रमांतर्गत जगभरातील सुमारे 150 स्थानांवर 700 हून अधिक सर्व्हर्स अमेरिकन सरकारने बसवलेले आहेत. हे सर्व्हर्स कोठे बसवलेले आहेत त्याबद्दलची माहिती उजेडात आल्यानंतर असे लक्षात आले की भारतातील इंटरनेट वापरणार्‍यांवर नजर ठेवण्यासाठी असाच एक सर्व्हर दिल्ली जवळ बसवलेला आहे. त्याच प्रमाणे NSA ही संस्था चार प्रकारच्या उपकरणांद्वारे भारतीय परराष्ट्र खात्यातील अधिकारी आणि सैनिकी अधिकारी यावर गुप्तपणे नजर ठेवत असते.

या सर्व बाबी लक्षात घेऊनच लंडन स्थित भारतीय दूतावासाने सर्व संवेदनाशील आणि गुप्त कागदपत्र जेंव्हा टंकलिखित करण्याची गरज भासेल तेंव्हा ते जुन्या आणि विश्वासू टंकयंत्रांवरच करण्याचा निर्णय घेतला कारण या टंकयंत्रावर टाइप केलेला कोणताच कागद आपला कोणताच ठसा मागे ठेवत नसतो. लंडनमधील भारतीय हाय कमिशनर श्री. जामिनी भगवती म्हणतात की त्यांनी दूतावासातील कर्मचार्‍यांना अशा सूचना सुद्धा दिलेल्या आहेत की दूतावासाच्या इमारतीच्या आत कोणत्याही संवेदनाशील आणि गुप्त विषयावर चर्चा सुद्धा करावयाची नाही कारण अमेरिकन आणि ब्रिटिश गुप्तहेर संघटनांनी हाय कमिशनच्या इमारतीच्या अंतर्गत आपले माहिती जमा करू शकणारे संवेदक गुप्तपणे बसवले असण्याची पूर्ण शक्यता त्यांना वाटते. ते म्हणतात: ” दूतावास इमारतीच्या आत कोणत्याही संवेदनाशील विषयावरील चर्चा केली जात नाही. आणि दर वेळेस संवेदनाशील विषयावरील चर्चा करण्यासाठी इमारतीबाहेरील बागेत जाणे कंटाळवाणे होत असले तरी करावे लागते.” ते याला मूक सुरक्षा यंत्रणा या नावाने संबोधतात. त्याचप्रमाणे: ” कोणतीही संवेदनाशील किंवा गुप्त संदेश असलेली तार इंटरनेट किंवा केबल जोडलेल्या संगणकासारख्या यंत्रावरून आम्ही पाठवत नाही. संगणकांना जोडलेल्या व ज्यांची क्षमता अफाट असते अशा अतिरिक्त हार्ड ड्राइव्ह्जवरील डेटा चोरणे सहज शक्य असते. या साठी सर्व गुप्त संदेश आम्ही, ज्यावर टाइप केलेल्या संदेशांचा मागमूस सुद्धा रहात नाही, अशा टंकयंत्रावरच टाइप करत असतो.”

स्नोडेनच्या गौप्यस्फोटानुसार, अमेरिकन सरकारने, ब्रिटिश गुप्त हेर खाते GCHQ यांना गुप्त माहिती जमा करण्याच्या कार्यासाठी, मागच्या 3 वर्षात 100 मिलियन पौंड दिले आहेत. GCHQ ने कमीतकमी 200 तरी ऑप्टिकल फायबर केबल्सना जोड देऊन त्यातील डेटावर पाळत ठेवण्याची क्षमता प्राप्त केली आहे. यापैकी 46 केबल्सवर ते एका वेळी नजर ठेवू शकतात. मागच्या वर्षी GCHQ प्रत्येक दिवशी 600 मिलियन टेलिफोन संभाषणांवर पाळत ठेवत होते. गेले काही वर्षे अशा संभाषणांवरून ते वैयक्तिक माहिती जमा करून NSA ला देत आहेत. ब्रिटिश लायब्ररीमध्ये असलेल्या सर्व पुस्तकांमध्ये जेवढी माहिती दडलेली आहे त्याच्या 192 पटीने असलेली माहिती GCHQ प्रत्येक दिवशी जमा करत असते.

भारताचे हाय कमिशनर या विषयावर जरा विनोदानेच भाष्य करताना म्हणतात: ” आमच्या हाय कमिशनच्या लाइन्स वर पाळत ठेवणारे ब्रिटिश लोक येथे ज्या प्रकारचे संभाषण चालते ते ऐकून नक्की कंटाळून जात असतील व म्हणत असतील की हे भारतीय हे असली संभाषणे हाय कमिशन इमारतीच्या आत काय करतात?”

विनोदाचा भाग आपण सोडून देऊ.पण हा विषय जरा गंभीरतेनेच घेण्यासारखा आहे. पण मला सर्वात कुतहुल वाटते आहे ते एका निराळ्याच गोष्टीचे! ती म्हणजे भारतीय हाय कमिशनरना त्यांच्या कचेरीतील सुरक्षा यंत्रणेसंबंधीची ही माहिती उघड करण्याची गरज आताच का भासली असावी? माझ्या मताने, हाय कमिशनमधील सुरक्षा मजबूत करण्यासाठी अंमलात आणलेल्या या साध्यासुध्या उपायांमुळे, ब्रिटिश GCHQ ने केबल्स आणि इंटरनेटवर पाळत ठेवून त्यांना या पुढे काहीही साध्य होणार नाही आणि आपले हे उद्योग त्यांनी सोडून द्यावे असा धूर्त इशारा त्यांना देण्यासाठी हाय कमिशनर साहेबांनी ही माहिती कदाचित उघड केली असावी.

म्हणूनच मी म्हणतो आहे की टंकयंत्रे व जेवणानंतरची बागेतली शतपावली यांना झिंदाबाद!

3 ऑक्टोबर 2013

0 September 2013

Advertisements

About chandrashekhara

I am a retired electronics engineer. I am interested in writing, reading books. Other hobbies include Paper models, wooden fret work and social networking.

चर्चा

अद्याप प्रतिक्रिया नाहीत.

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s

जुने लेख शोधा

Enter your email address to subscribe to this blog and receive notifications of new posts by email.

Join 386 other followers

MyFreeCopyright.com Registered & Protected

माझे नवीन इ-पुस्तक

एका साम्राज्याच्या शोधात

Advertisements
%d bloggers like this: