.
History इतिहास

शनिवारवाड्याची पुनर्बांधणी – एक भ्रामक संकल्पना


 कृष्णा आणि गोदावरी या नद्यांमधील दुआबाच्या प्रदेशाला दख्खन या नावाने सर्वसाधारणपणे ओळखले जाते. या दख्खनमध्ये इस्लामिक सत्ता प्रथम स्थापन झाली ती 1294 मध्ये, जेंव्हा दिल्लीचा सुलतान अल्लाउद्दिन खिलजी याने देवगिरीच्या यादव राजांचा पराभव केला तेंव्हा! या नंतर 1347 मध्ये बहामनी राज्याची स्थापना झाली आणि अशी स्पष्ट चिन्हे दिसू लागली की दख्खनचे इस्लामीकरण आता पूर्णत्वास जाणार. मात्र याच वेळी सांगमा राजघराण्यातील दोन हिंदू राजे, हरिहर आणि बुक्का यांनी तुंगभद्रा नदीच्या किनार्‍यावर 1336 मध्ये एका हिंदू राष्ट्राची स्थापना केली आणि पुढची 200 वर्षे तरी दख्खनच्या इस्लामीकरणाची प्रक्रिया थोपवून धरली. यानंतर 5 दखखनी सलतनतीच्या सुलतानांनी मिळून विजयनगरच्या सैन्याचा पराभव केला आणि या भव्य आणि नेत्रदीपक अशा नगराची अक्षरशः राखरांगोळी केली. या नगरीतील एकापेक्षा एक सरस अशा स्थापत्यांच्या जागी फक्त भग्नावशेष आणि दगडांच्या राशी एवढेच उरले. तरी सुद्धा जे काही उरले आहे ते इतके प्रेक्षणीय आणि भव्य आहे की जगभरातले हजारोंनी पर्यटक हंपीला भेट देण्यासाठी रोज येथे येत असतात. या भग्नावशेषांमध्ये असलेल्या प्रसिद्ध बालकृष्ण मंदिराच्या निकट, 2 छोटी मंदिरे आहेत. यापैकी एक मंदीर आहे क्रोधित नृसिंहाचे! या मंदिराचा काही वर्षांपूर्वी पुरातत्त्व विभागाने जीर्णोद्धार केला होता. जुन्या दगडी स्थापत्याला सिमेंट कॉन्क्रीटची मलमपट्टी लावली होती. परंतु नंतर पुरातत्त्व विभागाच्याच हे लक्षात आले की हा जीर्णोद्धार आपल्याच 80 किंवा 90 वर्षांपासून अंमलात असलेल्या धोरणाविरुद्ध केला गेलेला आहे. यानंतर पुरातत्त्व विभागाने केलेली मलमपट्टी चक्क तोडून टाकली व मंदिराचे भग्नावशेष परत गेली 500 वर्षे होते त्याच स्थितीत पुन्हा आणले.

हे सगळे जरा जास्तच बारकाईने मी लिहिले आहे याचे कारण मला वाचकांच्या लक्षात एक महत्त्वाची बाब आणून द्यायची आहे. भारतीय पुरातत्त्व खात्याने 1920 साली प्रसिद्ध केलेल्या प्राचीन अवशेषांच्या निगराणी बद्दलची एक कार्यपुस्तिका प्रसिद्ध केली होती. या पुस्तिकेत हे अगदी स्पष्ट केलेले आहे की प्राचीन भग्नावशेषांचा जीर्णोद्धार करणे पुरातत्त्व विभागाला मान्य नाही व या भग्नावशेषांची (मग ते भग्नावशेष असोत किंवा इतस्ततः पडलेले पाषाण असोत) फक्त निगराणी आणि संरक्षण करणे हेच या विभागाचे अधिकृत धोरण आहे. या कार्यपुस्तिकेमध्ये काही बदल नुकतेच करण्यात आले मात्र वर निर्देश केलेले मुलभूत धोरण आहे तसेच ठेवण्यात आलेले आहे.

आता आपण पुण्याकडे वळूया. पुण्यामध्ये ऐतिहासिक कालातील सर्वात महत्त्वाचे आणि अजूनही जमिनीवर उभे असलेले स्थापत्य म्हणजे शनिवारवाड्याची तटबंदी आहे याबाबत कोणाचेही दुमत असण्याचे काहीच कारण नाही. थोरल्या बाजीराव पेशव्यांनी बांधून घेतलेले हे स्थापत्य किती भव्य आणि दिमाखदार असले पाहिजे याची थोडीफार झलक आपल्याला या तटबंदीमुळे अजूनही पहायला मिळते हे आपले भाग्यच म्हणता येईल. आपल्या तलवारीच्या जोरावर मध्य आणि उत्तर हिंदुस्थानचा बहुतांशी भाग आपल्या अंमलाखाली आणणार्‍या या पेशव्याने आपल्या सामर्थ्याला साजेशी अशी आपली राजधानीची जागा असली पाहिजे या विचाराने शनिवार वाड्यात अतिशय सुंदर दिसणारे आणि सागाचे लाकूड वापरून बांधलेले 7 मजली भव्य महाल उभारलेले होते. हे सर्व महाल 1817 मध्ये ब्रिटिशांनी शेवटच्या पेशव्याचा पराभव करून सत्ता काबीज केल्यानंतरची 10 वर्षे पर्यंत तरी शाबूत होते. पण त्या नंतर अचानक आग लागून हे सर्व महाल भस्मसात झाले. त्या नंतर तटबंदीच्या आत उरली आहेत ती फक्त दगडी बांधकाम केलेली इमारतींची जोती. या जोत्यांवरून या महालांच्या आकाराची मात्र कल्पना येऊ शकते.

सर्व मराठी माणसांचे हे दुर्दैव म्हणावे लागेल की या दुर्घटनेनंतर, पेशव्यांच्या या राजधानीची, इंग्रजांचे प्रतिनिधी म्हणून भेट देणार्‍या अधिकार्‍यांनी लिहून ठेवलेली वर्णने सोडली, तर हा वाडा आणि त्यातील महाल कसे होते हे पुढच्या पिढ्यांना कळू शकेल असे कोणतेही चित्र, छायाचित्र किंवा इमारतीचा आराखडा आता कोठेही उपलब्ध नाही. त्यामुळे तटबंदीच्या आतील महाल, त्यांची स्थापत्य वैशिष्ट्ये आणि त्यांचा दिमाख कसा होता हे कळणे आता अशक्यप्राय आहे. हे महाल कसे दिसत असत? त्यांचे बांधकाम कसे केलेले होते? वगैरे सारखे प्रश्न आता अनुत्तरितच राहणार आहेत.

या अडचणीमुळे जरी या महालांची पुनर्बांधणी करू असे कोणी ठरवले तरी कोणतेच आराखडे, तैलचित्रे किंवा छायाचित्रे उपलब्ध नसल्याने पुनर्बांधणी केलेले महाल जुन्या महालांप्रमाणेच आहेत असे खात्रीलायकपणे कोणालाच सांगणे शक्य होणार नाही. त्याच प्रमाणे पुरातत्त्व विभागाची धोरणे आणि मार्गदर्शक तत्त्वे यांनुसार शनिवार वाडा ही महत्त्वाची राष्ट्रीय वारसा वास्तू समजली जात असल्याने हा विभाग अशी काही पुनर्बांधणी शनिवारवाड्याच्या तटबंदीच्या आत करू देईल याची सूतराम शक्यता दिसत नाही.

या सगळ्या पार्श्वभूमीवर, पुण्याच्या महानगरपालिकेच्या स्थायी समितीने शनिवारवाड्याची पुनर्बांधणी करण्याचा ठराव संमत करणे जरा आश्चर्यजनक वाटतेहा ठराव मांडणार्‍या आणि मंजूर करून घेणार्‍या नगरसेवकांना एकतर वस्तुस्थिती काय आहे याची माहिती तरी नसावी किंवा ते एखादी राजकीय खेळी खेळू इच्छित आहेत असे वाटले तर नवल वाटावयास नको. मागे जिजामाता उद्यानातील दादोजी कोंडदेवांचा पुतळा जसा हलवला गेला किंवा आता शनिवारवाड्याजवळील बस थांब्याला लाल महाल बस थांबा असे नाव देण्यात यावे अशी काहीतरी गर्भित अर्थ असणारी एक मागणी करण्यात आली आहे असे माझ्या नुकतेच कानावर आले आहे. त्यातलाच काहीतरी हा प्रकार असावा असा संशय मनात येणे स्वाभाविक आहे.

या ठरावानुसार पुनर्बांधणीचे कार्य बॉलीवूडच्या चित्रपटांसाठी भव्य दिव्य असे कार्डबोर्डचे सेट उभारणार्‍या एका प्रसिद्ध कला दिग्दर्शकाला देण्यात यावे असेही या ठरावात नमूद केलेले आहे. हे कला दिग्दर्शक मोठे नामवंत व प्रतिभाशाली आहेत व त्यांनी उभारलेले काही सेट मनाला थक्क करून सोडणारे आहेत याबाबत काही शंका वाटत नाही. परंतु शनिवारवाड्याचे कोणतेही तैलचित्र, छायाचित्र किंवा आराखडा उपलब्ध नसताना या कला दिग्दर्शकांनी उभारलेली कोणतीही वास्तू, मग ती कितीही भव्य किंवा दिव्य असली तरी ती एखाद्या फिल्मसेट सारखी त्यांच्या कल्पनेतीलच फक्त असणार आहे. या वास्तूला कोणतेच ऐतिहासिक महत्त्व असू शकणार नाही.

मला आशा आहे की महानगरपालिकेची सर्वसाधारण सभा या कारणांसाठी हा ठराव फेटाळून लावील. अर्थात जरी या सभेने असा काही ठराव संमत केला तरी पुरातत्त्व विभाग शनिवारवाड्याच्या तटबंदीच्या आत अशी काही वास्तूबांधणी करण्यास परवानगी देणे अशक्यच वाटते. त्यामुळे हा पुनर्बांधणी केलेला काल्पनिक शनिवारवाडा तटबंदीच्या बाहेरच साकारू शकतो. त्यामुळे इतिहासाशी संबंध नसलेली एक प्रेक्षणीय वास्तू एवढेच फक्त त्याचे महत्त्व असू शकेल.

28 सप्टेंबर 2013

Advertisements

About chandrashekhara

I am a retired electronics engineer. I am interested in writing, reading books. Other hobbies include Paper models, wooden fret work and social networking.

चर्चा

One thought on “शनिवारवाड्याची पुनर्बांधणी – एक भ्रामक संकल्पना

 1. श्री. चंद्रशेखर आठवले सर,

  आपल्या संस्थळाला प्रथमच भेट देत आहे. वेचक व वेधकपणे विषयाची मांडणी आणि माहितीपूर्ण लेखन वाचल्याचा आनंद होत आहे. मी सहज मध्ययुगीन काळातील संस्कृतीत पाणी साठवणे व निःसारणाचे काय प्रबंध होते या विषयी गुगलिंग करता आपल्या धोलावीरा बंदर व किल्ल्यातील फोटो व माहितीचे काही उल्लेख व त्या रोखाने सादर केली गेलेली माहिती नजरेला आली व मी अक्षरधुळीत माखुन गेलो.

  आपण वर म्हणता तसे शनिवारवाड्यातील आतल्या इमारती व अन् वास्तूंचे नुतनीकरण काही कायदेशीर बाबींमुळे शक्य नाही याची कल्पना आली. तथापि, विविध कलाकारांनी या वास्तूला किंवा अन्य प्रेक्षणीय स्थळांना 3डी च्या माध्यमातून आपल्या कल्पनने साकार केले व ते एक कलाविष्कार म्हणून स्थलाला भेट देणाऱ्यांच्या नजरेस पडले तर सध्याची अशी वैभवहीन वास्तू पाहिल्यावर जो हिरमुलेपणा येतो तो काही प्रमाणात कमी होईल. यासाठी सरकारी परवानगी काढावी लागली तर ती सोय करून अशा कलाकृती निदान इंटरनेटवरील त्या त्या स्थळांच्या माहितीनंतर देता येतील काय?
  आपले विचार वाचायला आवडतील . आपले अन्य लेखन सवडीने जरूर वाचेन व प्रतिक्रिया देण्याचा प्रयतेन करेन.
  आपला,
  शशिकांत ओक.
  मी काही आवडीच्या विषयांवर लेखन करतो. ते एकत्रितपणे वाचायसाठी जावे लागेल.

  Posted by shashioak | जुलै 29, 2014, 10:17 सकाळी

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s

जुने लेख शोधा

Enter your email address to subscribe to this blog and receive notifications of new posts by email.

Join 386 other followers

MyFreeCopyright.com Registered & Protected

माझे नवीन इ-पुस्तक

एका साम्राज्याच्या शोधात

Advertisements
%d bloggers like this: