.
ताज्या घडामोडी Current Affairs

‘मिस वर्ल्ड’ला आव्हान


इंडोनेशिया मधल्या बाली बेटावर सध्या मिस वर्ल्ड या नावाची एक विश्वसुंदरी स्पर्धा सुरू आहे. या असल्या सौंदर्यस्पर्धां, त्यात भाग घेणार्‍या सुंदरींचे स्टेजवर अवतरणे किंवा जलतरणासाठी योग्य असलेल्या तोकड्या कपड्यातील त्यांचे देह प्रदर्शन या सर्व गोष्टी दर वर्षी इतक्या नियमितपणे होत असतात की त्याबद्दल लिहिण्यासारखे काही फारसे उरले आहे असे मला वाटत नाही. इंडोनेशिया मधील अनेक कट्टर मुस्लिमांची मात्र ही स्पर्धा म्हणजे एक प्रकारचे लैंगिक प्रदर्शन (soft pornography) आहे व त्यामुळे ते इस्लाम विरोधी आहे अशी प्रामाणिक समजूत आहे. तसे बघायला गेले तर इंडोनेशिया या देशाला तो कट्टर मुस्लिम पंथीय देश आहे असे म्हणणे अयोग्य ठरेल. इंडोनेशिया मधील मुस्लिम हे इतर देशातील मुस्लिम बांधवांपेक्षा बरेच उदारमतवादी आणि मवाळ आहेत हे सत्य आहे. तरीही हजारो इंडोनेशियावासी मुस्लिमांनी या सौंदर्य स्पर्धेचा तीव्र शब्दांत निषेध केला आहे. रस्त्यावर या स्पर्धेविरुद्ध निदर्शने केली आहेत व या स्पर्धेच्या आयोजकांच्या प्रतिमांचे रस्त्यावर दहनही केले आहे.

इंडोनेशियन सरकारने या निषेधकांना शांत करण्यासाठी, कट्टर मुस्लिम ज्याचा कडकडून निषेध करत असतात ती बिकिनी मधील स्पर्धेची फेरी, या मिस वर्ल्ड स्पर्धेच्या संयोजकांना रद्द करण्यास लावून त्या जागी बाली बेटाचे वैशिष्ट्य मानल्या जाणार्‍या सारोंग या वस्त्रप्रावरणात ही फेरी आयोजित करण्यास भाग पाडले. परंतु सरकारच्या जेंव्हा लक्षात आले की या स्पर्धेला होणारा कट्टरवाद्यांचा विरोध कमी न होता त्याचे लोन सगळीकडे पसरतच चालले आहे तेंव्हा त्यांना खुष करण्यासाठी सरकारने ही स्पर्धा हिंदू बहुसंख्य असलेल्या बाली बेटावर आयोजित केली जावी असे फर्मान काढले. व त्या प्रमाणे या स्पर्धेचे उद्घाटन 8 सप्टेंबरला बालीमध्ये झाले. परंतु या स्पर्धेच्या संयोजकांच्या म्हणण्याप्रमाणे या स्पर्धेची अखेरची 28 सप्टेंबर रोजी होणारी फेरी, मुस्लिम कट्टरवाद्यांचे प्राबल्य असलेल्या इंडोनेशियाच्या राजधानीमध्ये किंवा जाकार्ता शहरातच घेतली जाणार आहे. या अखेरच्या फेरीसाठी आवश्यक असे विस्तीर्ण स्थळ आणि सर्व सुंदरीं आणि इतर लोकांसाठी निवासाच्या जागा या बाली बेटावर उपलब्ध होणे अशक्यप्रायच आहे.

या मधल्या कालात, ब्रिटिश संयोजकांनी आयोजित केलेल्या मिस वर्ल्ड स्पर्धेला एक आव्हान म्हणून एक दुसरी सौंदर्य स्पर्धा जाकार्ता मध्ये आयोजित केली गेली. या स्पर्धेचे नाव ठेवले गेले जागतिक मुस्लिम सुंदरी 2013″ आणि अपेक्षेप्रमाणे यात भाग घेणार्‍या सुंदरींचे नख सुद्धा कोणाच्या दृष्टीस पडणार नाही अशी काळजी या स्पर्धेच्या संयोजकांकडून घेतली गेली. या स्पर्धेच्या प्राथमिक फेरीत यशस्वी होण्यासाठी कुराण वाचन करणे ही बाब आवश्यक समजली गेली होती. या शिवाय शैक्षणिक, क्रीडा आणि सांस्कृतिक क्षेत्रांमधील थोडाफार अनुभव गाठीशी असणे आवश्यक मानले गेले होते. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या स्पर्धेत भाग घेऊ इच्छिणार्‍या सुंदरींना डोक्यावर ओढणी सारखे हिजाब हे वस्त्र त्यांच्या रोजच्या आयुष्यात त्या वापरत असणे आवश्यक मानले गेले होते. त्यांच्याकडून माझा हिजाबमधील अनुभवया विषयातील एक निबंधही लिहून घेतला गेला होता.

श्रीमती एका शान्ती यांनी सुमारे 3 वर्षापूर्वी, टीव्हीवरच्या एका वृत्तवाहिनीवरून वृत्त निवेदिका म्हणून काम करत असताना, बातम्या देताना आपल्या डोक्यावरची ओढणी किंवा हिजाब काढून ठेवण्यास नकार दिला होता व यामुळे त्यांना आपली नोकरी गमवावी लागली होती. यानंतर त्यांनी या सौंदर्यस्पर्धेचे आयोजन करण्यास सुरुवात केली होती. त्यांच्या मताने ही स्पर्धा म्हणजे मिस वर्ल्ड स्पर्धेला इस्लामने दिलेले उत्तर आहे. या वर्षीच्या मिस मुस्लिमा स्पर्धेत भाग घेणार्‍या सुंदरी इंडोनेशिया, बांगलादेश, नायजेरिया, मलेशिया, ब्रुनेई आणि इराण या 6 देशातील आलेल्या आणि 18 ते 27 वर्षे वयोगटातल्या तरूणी आहेत. मागचे 10 दिवस या तरुणींनी कुराण पठण, माहिती उद्योगासंबंधी कार्यशाळा आणि प्रसाधने योग्य रित्या कशी वापरावी? या सारख्या विषयावरील शिक्षण घेण्यात घालवले आहेत. श्रीमती शान्ती यांच्या मताप्रमाणे या सर्व तरुणी धार्मिक वृत्तीच्या, स्मार्ट आणि स्टायलिश आहेत.

या स्पर्धेच्या प्राथमिक ऑनलाईन फेर्‍यांमध्ये, ज्यात त्या स्पर्धकांनी आपण डोक्यावर ओढणी घेण्यास का सुरुवात केली याबद्दलचे अनुभव कथन करण्याचीही एक फेरी होती, 500 हून अधिक स्पर्धकांनी भाग घेतला होता व त्यातून अखेरच्या फेरीत भाग घेणार्‍या स्पर्धकांची निवड झाली आहे.

शेवटच्या फेरीत आलेल्या 20 स्पर्धकांनी मुस्लिमा वर्ल्ड स्पर्धेच्या अखेरच्या फेरीत मागच्या आठवड्यात भाग घेतला होता. मुख्यत्वे धार्मिक तत्त्वज्ञ आणि श्रद्धाळू मुस्लिम यांचा भरणा असलेल्या एका मोठ्या जनसमुदायासमोर या स्पर्धकांनी एक मोठा झगमगता आणि चमचमता कार्यक्रम प्रेक्षकांना सादर केला. यात भरतकाम केलेले रेशमी वेश परिधान केलेल्या या युवती प्रेक्षकांसमोर आल्या. त्यांनी जाळीदार, विणलेल्या, रेशमी या सारख्या निरनिराळ्या वस्त्रांपासून बनवलेल्या आणि अनेक रंगांची उधळण करणार्‍या ओढण्या परिधान केलेल्या होत्या. ही स्पर्धा जिंकणार्‍या युवतीला रोख रक्कम आणि मक्का आणि भारतात सहल करता येणार आहे.

या स्पर्धेच्या आयोजनातून बोध काय घ्यायचा? असे जर कोणी विचारले तर मी सांगीन की स्त्री सौंदर्य प्रेक्षकांना वेडे हे करतेच, मग ते कोणत्याही परिधानात असो, ओढणी घेऊन किंवा ओढणीशिवाय, बिकिनी मध्ये किंवा पूर्ण कपड्यात!

23 सप्टेंबर 2013

Advertisements

About chandrashekhara

I am a retired electronics engineer. I am interested in writing, reading books. Other hobbies include Paper models, wooden fret work and social networking.

चर्चा

अद्याप प्रतिक्रिया नाहीत.

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदला )

Connecting to %s

जुने लेख शोधा

Enter your email address to subscribe to this blog and receive notifications of new posts by email.

Join 387 other followers

MyFreeCopyright.com Registered & Protected

माझे नवीन इ-पुस्तक

एका साम्राज्याच्या शोधात

Advertisements
%d bloggers like this: