.
अनुभव Experiences, Musings-विचार

आवाजी छळवादाला सामोरे जाताना !


नुकतेच गेले काही दिवस महाराष्ट्रातील आणि इतर राज्यांतील काही ठिकाणचे जनसामान्य एक धार्मिक उत्सव मोठ्या उत्साहाने सार्वजनिक रितीने साजरा करत होते. मराठी मधला साजरा करणेया शब्दांचा मला माहीत नसलेला एक अर्थ बहुधा, डोके फुटेल एवढा, जास्तीत जास्त आणि मोठ्यात मोठा आवाज करण्याच्या क्रिया करणे, असा होत असावा. आवाजाची डीबी (db) पातळी जेवढी जास्त, तेवढा होणारा आनंद जास्त! असाही समज बहुधा अनेक मंडळींचा असावा. मात्र साजरा करण्याच्या या नवीन अर्थाने, महाराष्ट्रातील अनेकांना आता एका नवीनच प्रकारच्या छळवादाला तोंड द्यावे लागते आहे ही गोष्ट नक्की! या छळवादाचे नाव आहे आवाजी छळवादआणि दरवर्षी माझ्यासारख्या लाखो मंडळींना या छळवादाचे 10 दिवस सहन करण्यासाठी आनंद वाटो वा दुख्ख, सामोरे जावे हे लागतेच आहे कारण दुसरा काही मार्गच नाही. काही वर्षांपूर्वी मी कंबोडिया देशातील अंगकोर वाटमंदीर बघण्यासाठी गेलो होतो, तेथील भित्तीशिल्पांमधील एका शिल्पात मानव नरकात गेला तर त्याला यातना देण्यासाठी अनेक प्रकारच्या छळयंत्रे नरकात कशी सज्ज असतात हे दाखवणारे एक शिल्प मी बघितले होते. त्याच पद्धतीने नरकात नव्हे तर पृथ्वीवरच असलेल्या या आवाजी छळवादाची पण नवीन छळयंत्रे आता तयार केली गेली आहेत.

हजारो किंवा लाखो लोकांचा आवाजी छळवाद करण्याची क्षमता असणारी ही छळयंत्रे आता आधुनिक आणि उच्चतम तंत्रज्ञानाचा वापर करून अधिक अधिक प्रभावी रित्या लोकांचा छळ कसा करू शकतील? याकडे तज्ञ मंडळींनी खास लक्ष दिल्याने ही यंत्रे अतिशय प्रभावी करण्यात त्यांना यश आले आहे. यापैकी दोन छळयंत्रे तर विशेष प्रभावी ठरली आहेत. यापैकी पहिले छळयंत्र आहे महाढोल. एका भल्या मोठ्या बॅरलची दोन्ही तोंडे पूर्णपणे झाकली जातील अशा पद्धतीने कातडे किंवा प्लॅस्टिकचे कापड त्यावर ताणून बसवून हे छळयंत्र तयार केले जाते. हे तोंडावरचे कातडे कमी जास्त प्रमाणात ताणता यावे यासाठी एकमेकात गुंफवलेले दोर किंवा नटबोल्ट यांची व्यवस्था या महाढोलात केलेली असते. हा महाढोल,वाजवणार्‍याच्या छातीवर कातडी किंवा कापडी पट्ट्यांच्या सहाय्याने बांधला जातो त्यामुळे वाजवणार्‍याचे हात,आवाजी छळ करण्यास मोकळे रहातात. महाढोलाच्या तोंडावरील कातडे कमी जास्त ताणून आवाजाची वारंवारिता आणि सूर हे बदलता येतात. एका बाजूच्या कातड्यातून कमी वारंवारितेचा आवाज तर दुसर्‍या बाजूकडून जास्त वारंवारितेचा आवाज या महाढोलामधून निघतो. महाढोल दोन काठ्यांच्या सहाय्याने वाजवला जातो. बांबू, वेत किंवा लाकूड यातून बनवलेल्या काठ्यांची टोके बर्‍याच वेळा ढोलाचे कातडे फाटू नये म्हणून कापडात गुंडाळतात. यामुळे आवाज सुद्धा कमी वारंवारितेचा आणि एखादा स्फोट व्हावा त्या सारखा काढता येतो

पूर्वीच्या काळी ढोल हे खरे म्हणजे रणभूमीवर वाजवण्याचे वाद्य होते. वीरश्री अंगात संचारावी म्हणून वाजवायचे हे वाद्य, ज्या वेळेस लोक आनंदी आणि मजेत असतात अशा धार्मिक प्रसंगात किंवा उत्सवात त्यांचा छळ करण्यासाठी कधीपासून वाजवले जाऊ लागले हे मला तरी माहीत नाही. हा महाढोल जेंव्हा बड्वला जातो तेंव्हा ज्या ज्या वेळी ढोल वाजवण्याची काठी बाजूच्या कातड्याच्या पडद्यावर आघात करते त्या त्या प्रत्येक वेळी जर तुम्ही त्याच्या जवळ उभे असाल तर तुमच्या हृदयाचा ठोका नक्की चुकतो याबाबत माझ्या मनात तरी शंका नाही. लहान मुले, वृद्ध आणि आजारी रुग्ण यांच्यासाठी तर हा महाढोल म्हणजे दुर्घटनेला दिलेले आमंत्रणच असते. असा हा महाढोल बडवणे आणि त्यातून महाकर्कश आवाज निर्माण करणे हे या नुकत्याच संपलेल्या 10 दिवसाच्या धार्मिक उत्सवामधील महत्त्वाचे कर्मकांड आहे. असे 5 किंवा 10 महाढोल जर एकत्रितपणे बडवले जात असतील तर काय प्रकारचा महाकल्लोळ निर्माण होत असेल याची कल्पना करणे ज्ञानेश्वरांना सुद्धा कठीण गेले असते. तरी हा असा महाकल्लोळ या उत्सवात सातत्याने केला जातो असा सर्वसाधारण अनुभव आहे.

मात्र कानाचा पडदा फुटेल की काय? असे वाटायला लावणार्‍या व एखाद्या स्फोटासारखा आवाजाची निर्मिती करणार्‍या या महाढोलाची कितीही ख्याती असली तरी दुसर्‍या एका आवाजी छळयंत्रापुढे तो फिकाच पडेल. त्याचा हा प्रतिस्पर्धी उच्च इलेक्ट्रॉनिक्स तंत्रज्ञान वापरून डोके बधीर करणार्‍या महाध्वनीची निर्मिती करत असतो. या दुसर्‍या छळयंत्रात एक इलेक्ट्रॉनिक ध्वनीवर्धक (अ‍ॅम्प्लिफायर) काही किलोवॅट शक्तीच्या ध्वनीलहरी निर्माण करून एकसाथ चालणार्‍या ध्वनीक्षेपकांच्या (स्पिकर्स) एका भिंतीकडे त्या पाठवत रहातो व हे ध्वनीक्षेपक जवळपास असणार्‍या श्रोत्यांची भीतीने बोबडी वळेल अशा रितीने त्यांचा आवाजी छळ करत रहातात. हे छळयंत्र बहुधा अत्यंत विचित्र, कर्णकर्कश आणि संगीताचे कसलेही सोयरसुतक नसलेली गाणी वाजवणार्‍या एखाद्या सीडी प्लेयरला जोडलेले असते. या सगळ्याचा परिणाम ऐकणार्‍याची तन मन बुद्धी यशस्वीपणे बधीर करून टाकण्यात होतो व आता आपले कान कोणत्याही क्षणी फुटणार असेच ऐकणार्‍याला वाटू लागते. या छळयंत्रातून येणारा आवाज हवेतून येतोच पण या शिवाय आजूबाजूचे सर्व आता कोसळणार असे वाटावे किंवा भूमीमधून भूकंपाचे हादरे बसावे तसाही जाणवतो. मी कधीही अशा ध्वनीक्षेपकांच्या भिंतीजवळून दोन क्षण जरी गेलो तरी माझे ह्र्दय भराभर ठोके देते आहे असे मला वाटू लागते. मात्र काही दुर्दैवी जिवांच्या घराजवळच अशा ध्वनीक्षेपक भिंती बसवलेल्या असल्याने, त्यापासून मिळणार्‍या मरणप्राय यातना पहाटे पासून ते मध्यरात्री पर्यंत ते सोसत रहातात. वास्तविक पाहता या प्रकारची आवाजी छळयंत्रे वाजवण्यास भारताच्या सुप्रीम कोर्टाने रात्री 10 नंतर बंदी घातलेली आहे. तरीसुद्धा आमचे मायबाप सरकार या उत्सवाच्या 10 दिवसांपैकी 5 दिवसांसाठी या छळयंत्राना आपला प्रताप मध्यरात्रीपर्यंत गाजवण्याची अनुमती देत असते.

मागच्या आठवड्यात टीव्हीवर मी एक फोनइन कार्यक्रम बघितला. अशा कार्यक्रमात प्रेक्षक आपल्या मनातील त्यांना भेडसवणारे प्रश्न समोरच्या पडद्यावरील तज्ञ मंडळींना विचारत असतात. एका प्रेक्षकाने ही आवाजी छळयंत्रे आणि त्यांचे बालके, वृद्ध आणि आजारी यांच्यावर होणारे दुष्परिणाम याबद्दल एक प्रश्न विचारला होता. समोरच्या पडद्यावरील एक तज्ञ (बहुधा ते पोलीस खात्यातले होते.) यांनी दिलेले उत्तर मला जरा विचित्रच वाटले होते. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे या छळयंत्रांच्या आवाजाचे परिणाम जरी सुपरिणाम घडवत नसले तरी हा उत्सव वर्षातून एकदाच येतो व अनेक मंडळींना त्यात आनंद वाटतो त्यामुळे ज्यांना याचा त्रास होतो अशा थोड्या लोकांनी (त्यात बालके, वृद्ध आणि आजारी मोडतात.) हा त्रास सहन केला पाहिजे.

प्राचीन कालीन रोम मध्ये कॉलोसियम नावाच्या खुल्या प्रेक्षागृहात ख्रिस्ती मंडळींना रानटी पशूंसमोर फेकत असत आणि हे पशू या ख्रिस्ती लोकांची चिरफाड करून त्यांचे भक्षण कसे करतात हे रोमन लोक आनंदाने आणि मजेने बघत असत. कल्पना करा एखाद्या रोमन अधिकार्‍याने आता ज्याचा रानटी पशूकडून बळी जाणार आहे अशा दुर्दैवी ख्रिस्ती धर्मियाला जर हेच तत्त्वज्ञान ऐकवले असते:

असे उत्सव क्वचितच येतात आणि हजारो लोक त्यात मोठा आनंद मानतात तेंव्हा ख्रिस्ती धर्मियांना जरी त्यात आनंद वाटत नसला तरी त्यांनी थोडे सहन करायला पाहिजे.”

मी बघितलेला टीव्हीवरचा तज्ञ आणि हा कल्पनेतला रोमन अधिकारी यांची तर्कसंगती समानच वाटते नाही का?

19 सप्टेंबर 2013

Advertisements

About chandrashekhara

I am a retired electronics engineer. I am interested in writing, reading books. Other hobbies include Paper models, wooden fret work and social networking.

चर्चा

अद्याप प्रतिक्रिया नाहीत.

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s

जुने लेख शोधा

Enter your email address to subscribe to this blog and receive notifications of new posts by email.

Join 386 other followers

MyFreeCopyright.com Registered & Protected

माझे नवीन इ-पुस्तक

एका साम्राज्याच्या शोधात

Advertisements
%d bloggers like this: