.
History इतिहास

भारत-पाकिस्तान सीमा आणि दोन महा-आपत्ती


भारत आणि त्याच्या पश्चिमेला असलेला पाकिस्तान यांच्यामध्ये 700 पेक्षा जास्त किलोमीटर लांबीची व उत्तरदक्षिण पसरलेली सीमा आहे. या पैकी जम्मूकश्मिर मधला प्रत्यक्ष ताबा रेषेचा भाग सोडला तर बाकीची सीमा 1947 मध्ये ब्रिटिशांनी केलेल्या देशाच्या फाळणीमुळे झालेली असल्याने ती नद्या किंवा पर्वतराजी या सारख्या नैसर्गिक वैशिष्ट्यांनुसार धरून आखलेली भौगोलिक सीमा नाही. मात्र याच सीमारेषेच्या नैऋत्येकडचा, पूर्वपश्चिम असा पसरलेला भाग मात्र फाळणीच्या किमान एक शतकापासून अधिक काळाआधी नैसर्गिक रितीने अस्तित्वात आलेला आहे. अर्थात नैसर्गिक रितीने अस्तित्वात आलेला हा भाग,प्रथम दोन सार्वभौम राष्ट्रांच्यातील सीमारेषेचा भाग नव्हता तर ही सीमा प्रथम होती ब्रिटिशांचे मांडलिकत्व पत्करलेले एक संस्थान व एक स्वतंत्र अमिरात यांच्यामधली! नंतर ब्रिटिश हुकुमतीखाली असलेला एक प्रांत व एक संस्थान यांच्यामधली! भारताच्या पश्चिम किनार्‍यावर असलेले कच्छ हे स्वतंत्र राज्य आणि इस्ट इंडिया कंपनी यांच्यामध्ये 13 ऑक्टोबर 1819 रोजी झालेल्या मांडलिकत्व कराराप्रमाणे, कच्छ राज्य हे ब्रिटिश सार्वभौमत्वाखाली असलेले एक मांडलिक राज्य असेल असे ठरवण्यात आले व दिनांक 4 डिसेंबर 1819 मध्ये हा करार अंमलात आला. या राज्याच्या उत्तरेला त्या वेळेस मिर घुलाम अली खान तालपूर या अमिराच्या अधिपत्याखाली असलेली सिंध अमिरात होती. हा अमिर आणि ब्रिटिश यांच्यात वैर असले तरी या वेळेस तरी सिंध अमिरात स्वतंत्र होती.

सिंधचे अमीर

सिंध अमिरात व कच्छ संस्थान यांच्यामधील सीमावर्ती भागाचा भूगोल 2 शतकांपूर्वी, आजच्या पेक्षा खूपच निराळा होता. हा सीमावर्ती प्रदेश त्या काळात सिंधू नदीचा मुखप्रदेश (delta) म्हणून ओळखल्या जाणार्‍या प्रदेशाचाच एक भाग समजला जात असे. आजमितीला सिंधू नदीचा मुखप्रदेश म्हणून जो भूभाग गणला जातो, त्यात नदीच्या मुख्य पात्रापासून अनेक छोट्या नद्या अलग होताना आढळतात व अलग झालेल्या अशा नद्यांचे एक जाळेच या प्रदेशात उत्तर दक्षिण असे पसरलेले आहे. या छोट्यामोठ्या अलग झालेल्या नद्यांच्या मुखांमार्फत ही महाकाय नदी आपले जल समुद्रात पोचवत असते व होती. मात्र दोन शतकांपूर्वीच्या काळात, सर्वात दक्षिणेकडे असलेल्या पण सिंधू नदीच्या मुखप्रदेशाचाच भाग मानल्या जाणार्‍या आणि सिंधूच्या मुख्य पात्रापासून अलग होऊन वहाणार्‍या, दोन नद्या आपल्या या लेखाच्या विषयाच्या दृष्टीने विशेष महत्त्वाच्या आहेत. यापैकी एक नदी सिंधूच्या मुख्य पात्रापासून बान्नाया गावाजवळ अलग होत होती व पुढे पिन्यारी किंवा गूंगरा या नावाने ओळखली जाऊन सिर या नावाने ओळखल्या जाणार्‍या नदी मुखातून अरबी समुद्राला जाऊन मिळत होती. या नदीच्या दक्षिणेला असणारी आणखी एक नदी, कोरी किंवा सिंधूचे पूर्वेकडील मुख या नावाने ओळखल्या जाणार्‍या मुखातून अरबी समुद्राला मिळत होती. ही नदी कोरी किंवा पुरम या नावाने ओळखली जात असे व ती सिंधू नदीच्या मुख्य पात्रापासून हैद्राबाद शहराजवळ अलग होत असे. या कोरी नदीच्या दक्षिण किनार्‍यावर लखपत या नावाचा एक किल्ला होता व या किल्ल्यावर कच्छ संस्थानाचे सैनिक तैनात केलेले असत.

सायरा या नावाने ओळखला जाणारा या दोन नद्यांमधील दुआबाचा प्रदेश कच्छ संस्थानाच्या अधिपत्याखाली होता व तो अत्यंत सुपीक असल्याने येथे भातशेती व शेतकर्‍यांच्या वस्त्या असत. सन 1762 नंतर या भागातील शेतीला उपलब्ध होणारे पाणी हळूहळू कमी होत गेले आणि सायरा भाग ओसाड प्रदेश बनला. अशा परिस्थितीत हा भाग, कच्छ संस्थान किंवा सिंध अमिरात यांच्यापैकी कोणाच्या नियंत्रणाखाली होता? हा प्रश्न महत्त्वाचा ठरतो. जुने नकाशे व कागदपत्र यावरून असे दिसते की कच्छ संस्थानाने या भागात नदीकाठावर काही किल्ले बांधलेले होते. या किल्ल्यात व इतरही ठिकाणी कच्छ संस्थानाचे सैनिक तैनात केलेले असत. या शिवाय येथून जाणार्‍या व्यापारी मालावर कर आकारणी करण्यासाठी येथे कस्टम नाकीही कच्छ संस्थानाने बसवलेली होती.

कोरी नदीच्या काठावर साधारण 24.5 अंश अक्षांशावर सिंदडी या नावाचे एक गाव होते व त्यात एक किल्ला कच्छ संस्थानाने बांधलेला होता. हा सिंदडी किल्ला लखपत गावाच्या नदीप्रवाहाच्या उलट दिशेने 30 मैलावर व पाकिस्तान मधील अली बंदर गावापासून नदीप्रवाच्या दिशेने 20 मैलावर होता. हा किल्ला 150 चौरस यार्ड आकाराच्या चौथर्‍यावर बांधलेला होता व त्या भोवती 20 फूट उंच अशी तटबंदी बांधलेली होती. किल्ल्यात 50 ते 60 फूट उंचीचा एक टेहळणी मनोरा सुद्धा बांधलेला होता. सिंदडी हे नदीवरील एक बंदर, गाव आणि सीमेवरचे नाके असल्याने येथे कच्छ संस्थानाचे सैनिक नेहमीकरता तैनात असत. या सिंदडी गावाच्या उत्तरेला साधारण 5 मैलावर कईरा नाला नावाच्या नाल्याकाठी कईरा नावाचे एक नाके प्रत्यक्ष सीमेवर बसवलेले होते. या नाक्यावरून कच्छ संस्थान सीमा शुल्क वसूल करत असे.

कोरी नदीच्या मुखाजवळच्या भागात पण उत्तर काठावर, कोठाडी आणि बस्ता बंदर या नावाचे दोन किल्ले होते यातही सैनिक व कस्टम नाकी होती. या ठाण्यांच्या उत्तरेला व सिंदडी किल्ल्याच्या पूर्वेला वेयरे आणि लाक या नावाची दोन कच्छ संस्थानाची ठाणी होती. हे सर्व वर्णन एवढ्या बारकाईने मी केले आहे याचे कारण वाचकांना सन 1819 च्या पूर्वी या भागातील परिस्थिती काय होती याची नीट कल्पना यावी हे आहे. भारतीय शाही आरमारातील (Indian Navy) एक अधिकारी लेफ्टनंट टी.जी. कारलेस यांनी 1837 साली लिहिलेल्या आपल्या “Memoir to accompany the Survey of the Delta of the Indus, ” या पुस्तकात या बस्ता बंदर किल्ल्याचा उल्लेख या प्रकारे केलेला आहे. ते लिहितात: नदीच्या पलीकडच्या किनार्‍यावर एक भग्नावस्थेतील बस्ता बंदर या नावाने ओळखला जाणारा किल्ला आहे. हा किल्ला आधी कच्छ संस्थानाच्या राव या संस्थानिकांच्या ताब्यात होता परंतु पुढे तो सिंधी लोकांबरोबरच्या लढायांमध्ये नष्ट झाला.” (हा किल्ला लढाईत नष्ट झाला की इतर काही कारणांनी हे आपण पुढे बघूया.)

या प्रदेशावर पहिली महाआपत्ती कोसळली ती 16 जून 1819 या दिवशी! 7.7 किंवा 8.2 एवढ्या तीव्रतेचा भूकंपाचा झटका येथे बसला व त्या पाठोपाठ एक महाप्रचंड त्सुनामी लाट समुद्रावरून या प्रदेशावर आली व सर्व भाग जलमय झाला. या आपत्तीत 1543 लोकांचा मृत्यू झाला. या भूकंपाने येथे काही दूरगामी परिणामही केले. सिंदडी किल्ला जेथे उभा होता तेथील जमीन खाली जाऊन तेथे एक मोठे डिप्रेशन तयार झाले व ते प्रथम त्सुनामीने आत आलेल्या खार्‍या पाण्याने भरले. नंतर या ठिकाणी मोठे सरोवर निर्माण झाले व त्यात कोरी नदीचे पाणी साठू लागले. येथे पूर्वी सिंदडी हे गाव असल्याने या सरोवराला सिंदडी सरोवर या नावाने ओळखले जाऊ लागले. या शिवाय या भूकंपामुळे भूपृष्ठावर झालेला सर्वात महत्त्वाचा बदल म्हणजे सिंदडी गावाच्या उत्तरेस कच्छचे रण आणि सिंधची भूमी यांच्या सीमेवरचा 80 किमी लांब आणि 6 किमी रूंद एवढ्या जमिनीच्या पट्ट्यात भूतल 6 मीटर एवढ्या उंचीपर्यंत वर उचलला गेला व नैसर्गिक रितीने एक बंधारा किंवा बंड तयार झाला. या बंधार्‍याने अली बंदर गावाकडून येणारा कोरी नदीचा प्रवाहच पूर्णपणे अडवला गेला. या नैसर्गिक बंधार्‍याला अल्ला बंधारा” (Allah Bund) या नावाने ओळखले जाते.

सिंदडी किल्ला आणि कईरा नाके या भूकंपात पूर्णपणे नष्ट झाले व तेथील लोकांना हलवले गेले. पुढे बरीच वर्षे किंवा एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धापर्यंत, जुना कोठ्डी या नावाने परिचित असलेले या किल्ल्याचे भग्नावशेष अस्तित्वात होते परंतु पुढे तेही नष्ट झाले आणि त्या जागी पूर्वी येथे किल्ला होता याची कोणतीच खूण उरली नाही.

वाचकांना भूकंपामुळे झालेल्या या प्रचंड उलथापालथीने या भागात केवढा परिणाम घडवला असेल याची कल्पना आली असेलच. अल्ला बंधार्‍याने कच्छ संस्थान व सिंध अमिरात यांच्यामध्ये एक नैसर्गिक अशी सीमाच निर्माण झाली. यामुळेच 1819 मधील भूकंपाला अल्ला बंधारा भूकंप या नावाने सुद्धा ओळखले जाते.

1819 मधील भूकंपामुळे सिर मुखातून अरबी समुद्राला मिळणार्‍या गुंगरा किंवा पिन्यारी नदीच्या पाण्यावर जरी फारसा परिणाम झाला नाही तरी कोरी नदीचे पाणी मात्र आटण्याच्या पंथास लागले. या पुढच्या वर्षात, ज्या ज्या वेळेस सिंधू नदीला महापूर येऊन अल्ला बंधार्‍याचा भाग जलमय होत असे फक्त त्याच वर्षांना कोरी नदीला पाणी येऊ लागले यामुळे या भागात केली जाणारी मासेमारी व मिठासारख्या गोष्टींची व्यापारी वाहतूक यावरही मोठा परिणाम होऊ लागला.

त्यानंतर 19 जून 1845 रोजी या प्रदेशाला आणखी एक प्रचंड भूकंपाचा धक्का बसला व त्याच्या पाठोपाठ त्सुनामी लाट अरबी समुद्राकडून आली. या घटनेची साक्षीदार असलेल्या एका ब्रिटिश महिलेने, कोणा एका व्यक्तीला लिहिलेल्या पत्रात या भूकंपाने उडवलेल्या हाहाकाराचे प्रत्यक्ष पाहून वर्णन केलेले आहे. Quarterly Journal of Geological Society या नियतकालिकाच्या डिसेंबर 1946च्या अंकात हे वर्णन प्रसिद्ध झाले होते व हे वर्णन खालील प्रकारे आहे.

कॅप्टन मॅकमर्डो यांचा एक वाटाड्या त्यांच्याकडे जाण्यासाठी म्हणून भूज पासून निघाला होता. तो ज्या दिवशी लखपत गावाला पोचला त्याच दिवशी भूकंपाचे धक्के बसले. या धक्क्यांनी लखपत किल्ल्याच्या भिंतीचा काही भाग कोसळून जीवितहानी सुद्धा झाली. या धक्क्यांपाठोपाठ एक महाभयंकर लाट कोरी किंवा सिंधू नदीच्या पूर्वेकडच्या मुखाद्वारे समुद्राकडून आली व या लाटेने या प्रदेशातील जमिनीचा सर्व भाग जलमय झाला. पश्चिमेला, गुंगरा नदीपर्यंत ( साधारणपणे 20 इंग्लिश मैलांचे अंतर), उत्तरेला वेयरे गावाच्या थोड्या उत्तरेपर्यंत (कोरीच्या मुखापासून साधारण 40 मैल अंतर) तर पूर्वेला सिंदडी जलाशयापर्यंतचा सर्व भूभाग पूर्णपणे जलमय झाला. हा वाटाड्या लखपत गावात 6 दिवस ( 19 जून ते 25 जून) अडकून पडला व या काळात भूकंपाचे एकूण 66 धक्के मोजता आले. यानंतर त्याला कोटडी किल्ल्यापर्यंत जाणे शक्य झाले. कोटडीमधे हाताच्या बोटावर मोजता येतील एवढ्याच बैठ्या व लहान इमारती गावामधील एका छोट्याशा हिश्शावर उभ्या आहेत. सिंधमधील गावांच्यात अगदी उत्तम प्रतीची म्हणून गणली जाणारी घरे सुद्धा सूर्यप्रकाशात वाळवलेल्या मातीच्या कच्च्या विटांपासून बनवलेली असतात आणि झोपड्या तर वेड्यावाकड्या लाकडी खांबाच्या आधाराने उभ्या केलेल्या वेळूच्या चटयांनी आच्छादलेल्या असतात. त्यामुळे या जिल्ह्यामध्ये असलेल्या बहुतेक गावे व वस्त्यांना, पाण्यात वाहून गेल्याने बहुधा जलसमाधी मिळालेली आहे. हा वाटाड्या येथून पुढे सुमारे 20 मैल पूर्णपणे पाण्यामधून उंटाच्या पाठीवर बसून गेला. या पाण्याची पातळी उंटाच्या छातीपर्यंत येईल एवढी होती. लाक गावात जलपातळीच्या वर कोणा फकिराच्या पिराजवळ उभी केलेली निशाणाची काठी सोडली तर बाकी काहीही दिसत नव्हते. वेयरे आणि इतर गावे यांच्यामधली अगदी तुरळक संख्येने घरे उभी होती.

लखपत मधे वर्षाला निदान दोन वेळा तरी भूकंपाचे झटके बसतात असे म्हणतात. म्हणतात. सिंदडी जलाशयाचे रूपांतर आता खारवट जमिनीमध्ये झाले आहे.”

वरील वर्णनावरून वाचकांना या भूकंपामुळे काय हाहाकार उडला असेल आणि कोरी नदीचे मुख आणि सिर मुख यामधील प्रदेश कसा संपूर्णपणे नष्ट झाला होता याची चांगलीच कल्पना येऊ शकेल.

या दोन दुर्घटनांमुळे, कच्छ आणि सिंध अमिरात यांच्या मधील सीमाप्रदेशाची, जो नंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यामधील आंतर्राष्ट्रीय सीमेचा एक भाग बनला, एक नैसर्गिक वाटणीच दोन विभागात केली गेली. ही नैसर्गिक सीमा पूर्वेकडे अल्ला बंधारा व पश्चिमेकडे सिर खाडी ज्यामधून एके काळी सिर किंवा गुंगरा नदी वहात होती यांनी रेखित केली गेली. गुंगरा नदी आणि कोरी नदी यांच्या पात्रांमधील दुआब प्रदेशाचे समुद्र पातळी पेक्षा कमी भूपातळी असलेल्या एक वैराण प्रदेशात रुपांतर झाले. या प्रदेशात अनेक जलप्रवाह निर्माण झाले ज्यात कोळी सध्या मासेमारी करतात.

1845च्या भूकंपाच्या आधी प्रसिद्ध झालेले नकाशे किंवा पुस्तके यात उल्लेख झालेले कोठडी किंवा बस्ता बंदर या सारख्या किल्ल्यांचे पुढे काय झाले? त्यांचे भग्नावशेष तरी पुढे सापडले का? यासारख्या प्रश्नांची उत्तरे शोधणार्‍यांना एका अशा प्रयत्नाची माहिती रोचक वाटेल. भारतीय अवकाश संस्थेमधून निवृत्त झालेले एक अधिकारी श्री. पी.एस.ठक्कर यांना गूगल अर्थ वरून दिसणार्‍या उपग्रह नकाशांचे अध्ययन करण्याचा छंद आहे. अशाच एका प्रयत्नात त्यांना कोरी नदीच्या पश्चिम किनार्‍यावर अर्धवट पाण्यात बुडलेल्या एका किल्ल्याचे भग्नावशेष दिसले. हा किल्ला म्हणजे बस्ता बंदर किल्ला असला पाहिजे हे लक्षात आल्याने त्यांनी याचा बराच पाठपुरावा केला व शेवटी सीमा सुरक्षा दलाच्या क्रोकोडाइल कमांडोच्या एका तुकडीला बरोबर घेऊन आपल्या 3 सहकार्‍यांसह या स्थानावर पोचण्यात यश मिळवले. तेथे जाऊन त्यांनी छायाचित्रे घेतली व इतर काही मोजमापे त्यांना घेता आली.

या प्रयत्नात त्यांना का किल्ला तर सापडलाच पण या शिवाय अनपेक्षित रित्या या भूभागाच्या भूगोलाच्या दृष्टीने महत्त्वाचा असलेला एक नवीन शोध लावता आला. श्री ठक्कर यांच्याच शब्दात सांगायचे तर: ” 7.9 तीव्रतेच्या 1819 मधल्या भूकंपामुळे अल्ला बंधारा आणि सिंदडी जलाशय तर निर्माण झालेच पण या भूकंपामुळे अल्ला बंधार्‍याच्या नैऋत्येला असलेल्या भूभागाची पातळीही समुद्र पातळीच्या खाली गेली.”

1845 मधल्या भूकंपात, त्सुनामी लाटेमुळे हा सर्व भाग पाण्याखाली का गेला याचे कारण या निरिक्षणामुळे मिळते असे मला वाटते. या भूस्तरावरील घडामोडीमुळे कोरी व सिर खाड्यांमधील भूभागाचे पुढील भविष्यकालासाठी, कच्छच्या रणाप्रमाणे असणार्‍या एका वैराण प्रदेशात रूपांतर झाले व भौगोलिक सीमारेखा म्हणून उपयोगात आणणे शक्य होईल अशी फक्त सिर खाडी तेथे उरली.

15 सप्टेंबर 2013

Advertisements

About chandrashekhara

I am a retired electronics engineer. I am interested in writing, reading books. Other hobbies include Paper models, wooden fret work and social networking.

चर्चा

अद्याप प्रतिक्रिया नाहीत.

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s

जुने लेख शोधा

Enter your email address to subscribe to this blog and receive notifications of new posts by email.

Join 386 other followers

MyFreeCopyright.com Registered & Protected

माझे नवीन इ-पुस्तक

एका साम्राज्याच्या शोधात

Advertisements
%d bloggers like this: