.
अनुभव Experiences

भ्रष्टाचार विरुद्ध लढ्यातील एक पान


(श्री. प्रमोद तांबे हे माझे शाळेपासून असलेले मित्र आहेत. आमची मैत्री वयाची सत्तर वर्षे उलटून गेली तरी अजून टिकून आहे. अतिशय मनमोकळा आणि सडेतोड स्वभाव आणि प्रत्येक गोष्टीबद्दलचा प्रचंड उत्साह या त्यांच्या गुणांचे मला नेहमीच अतिशय कौतुक वाटत आलेले आहे. त्यांचा एक अत्यंत कटू अनुभव त्यांच्याच शब्दात! -अक्षरधूळ)

मला आलेला एक अतिशय कटू असा अनुभव मी येथे देत आहे.

१९६३ मध्ये मी शासकीय दुग्ध शाळा विकास योजनेतील कृषी बांधकाम विभागात कनिष्ठ अभियंता ह्या पदावर नाशिक येथे रुजू झालो. १९७० मध्ये माझी ठाणे जिल्ह्यातील तलासरी जवळच्या दापचरी दुग्ध प्रकल्पावर बदली झाली.

दापचरीस आल्यावर माझी नियुक्ती मातीचे धरण सबडिव्हिजन मध्ये झाली होती.हे मातीच्या धरणाचे काम मुंबईच्या ९०% टॅक्सी ज्यांच्या मालकीच्या होत्या आशा एका महाधनाढ्य सरदारजींना (Maha Auto)मिळालेले होते व त्यांचा प्रतिनिधी म्हणून रशीद नांवाचा एक रेसिडेंट इंजिनीअर काम पहात असे.

मी कामावर रुजू झालो त्यावेळी कट-ऑफ ट्रेंचच्या मातीच्या भरावाचे काम जोरात चालू होते.बॉरो एरियातून अनेक डंपर माती आणत व जमिनीवर पसरत असत.तांत्रिक स्पेकिफिकेशन प्रमाणे एका वेळी ९” पेक्षा जास्त जाडीचा थर करू नये.९” जाडीचा भराव करत असताना सुद्धा त्यावर टॅँकरने सतत पाणी मारत राहून  व १० टनाचा रोड रोलर व शिप फुट रोलर  फिरवून भरावाचे मधून मधून टेस्टिंग करून ते  ९५% प्रॉक्टर डेन्सिटी येईपर्यंत भराव कॉम्पॅक्ट करावयाचा असतो,व ते आल्यावरच दुसर्‍या थरास सुरुवात करायची असते.

मला मात्र पाहिल्याच दिवशी तेथे असे आढळून आले की येथे टेक्नीकल स्पेसिफिकेशन्स पुर्णपणे गुंडाळून ठेऊन मनमानी करून सर्रासपणे १.५’ ते २’ जाडीचा भराव कोणतेही रोलिंग न करता टाकण्यात येत होता व नंतर त्या २’ जाडीच्या भरावावर एखादा टॅँकर पाणी टाकून व नावापुरता ५-७ मिनिटे रोलर फिरवून झाला की पुन्हा दुसर्‍या थराचा भराव टाकण्यास सुरुवात करण्यात येत होती.व हे सर्व कामावर देखरेखीसाठी सरकारने पगार देऊन ठेवलेले माझे इतर सहकारी इंजिनीअर उघड्या डोळ्यांनी कोणताही विरोध न करता निमूटपणे पहात होते.

माझ्या स्वभावाला हे कदापि पटणारे नसल्याने मी ताबडतोब अशा प्रकारे भराव करण्यास आक्षेप घेऊन काम थांबवले.

डंपरच्या ड्रायव्हर्सनी ही गोष्ट ठेकेदाराचे कामावर असलेल्या इंजिनियर्सच्या कानावर घातली.त्यांचेतील एक सिनियर इंजिनीअर माझ्याकडे आला व मला बाजूला घेऊन समजुतीच्या स्वरात मला म्हणाला “साहेब कशाला निष्कारण चालत्या गाड्याला खिळ घालायचा प्रयत्न करता आहात,पावसाळ्यास आता फक्त १.५ महिनाच बाकी आहे व त्यापूर्वी हा भराव आत्तापेक्षा ९ मीटर उंच उचलणे भाग आहे व म्हणूनच आम्ही अतिशय जोरात सुरू केलेले हे भरावाचे काम तुम्ही असा अडथळा आणून बंद करू लागलात तर वेळेत कसे पूर्ण होणार ? तुमच्या काही ‘अपेक्षा ’ असतील तर तुम्ही त्यासाठी संध्याकाळी आमचे रेसिडेंट इंजिनीअर श्री.रशीदसाहेबांना भेटा,आम्ही त्यांना सांगू,ते तुमची नाराजी दूर करून तुम्हाला एकदम खुष करून टाकतील.पण मी त्यांना निक्षून सांगितले की मला कुणाला भेटायची काय जरूरी आहे ? मी अजिबात नाराज नाही,पण जर तुम्ही टेक्नीकल स्पेसिफिकेशन्स धाब्यावर बसवून आता चालू आहे त्याचप्रमाणे पुढे काम चालू केलेत तर ते मी कदापि होऊ देणार नाही हे पक्के लक्षात ठेवा.मी त्यांना न बाधल्याने  त्यांचा नाईलाज झाला व त्या दिवसाचे उर्वरित काम त्यांना नियमानुसारच करावे लागले.

माझ्या अंदाजाप्रमाणे त्या दिवशी संध्याकाळीच त्यांनी ही गोष्ट त्यांचे रेसिडेंट इंजिनीअर रशीद ह्याचे कानावर घातली असावी.कारण दुसरे दिवशी माझ्या धाकाने घाबरून भरावाचे काम अगदी  काटेकोरपणे नियमानुसारच चालू होते.दुपारी १२ च्या सुमारास रेसिडेंट इंजिनीअर रशीद जीप घेऊन कामावर आले व त्यांनी मला साइट ऑफीसमध्ये येऊन भेटा असा निरोप पाठवला.त्यावर माझे त्यांच्याकडे काहीच काम नसल्याने व ते माझे वरिष्ठ अहिकारीही नाहीत किंवा मी त्यांचा  नोकरही नाही त्यामुळे त्यांना भेटण्यास मी येत नाही असा उलट निरोप धाडला.त्यामुळे हे साधेसुधे प्रकरण नाही हे रशिदच्या लगेच लक्षात आले व थोड्याच वेळात तोच माझ्याकडे आला व मला दमात घेत एकेरीवर येत म्हणाला “तुझ्या सारखी गुरगुरणारी ५६ कुत्री मी आत्तापर्यंत पाहिली आहेत व त्यांना इतके सुतासारखे सरळ केलय की आता ती मी त्यांचेपुढे टाकत असलेल्या तुकड्यांसाठी आशाळभूत होऊन माझ्यापुढे लाळ घोटत असतात.तू तुझी किंमत बोल मी वाटेल ती देईन पण असे काम थांबवलेस तर तुला ते फारच महागात पडेल हे लक्षात ठेव.”

पण जेंव्हा त्याच्या दमदाटीला किंवा धमक्यांनाही मी दाद देत नाही व मी फक्त नियमानुसारच काम करू देईन अन्यथा नाही हे त्यास समजले तेंव्हा निराश होऊन तो कॅम्पवर परत गेला.

दुसरे दिवशी तो पुन्हा आला व मला धमकावून म्हणाला “इतर इंजिनियर्सना तो दर आठवड्याला फक्त दोनशे रुपये देतो,पण तू जरा जादा शहाणपणा दाखवतो आहे म्हणून तुला मी दर महिन्याला मी तुला एक पाचशे रुपये देत जाईन,बर्‍या बोलाने मी ते घेऊन त्याच्या कामात अडथळे आणू नयेत अन्यथा तो मला चुटकीसारखा त्याच्या साईटवरुन बाजूला करेल,पुढे त्याने फुशारकीने असेही सांगितले की तुझ्या अधिक्षक अभियंत्यांपासून ते खात्याच्या मंत्र्यांपर्यंत सर्व जण त्याच्या खिशात आहेत आणी येथे दापचरीस असणारी एकूण एक इंजिनीअर अधिकारी मंडळी म्हणजेच सर्व डेप्युटी व एक्झिक्युटिव्ह इंजिनियर्स हे तर लाचर असल्यासारखे दीनवाणे होऊन  दर महिन्याचे पहिल्या आठवड्यात त्याच्या कॅंपवर येतात व भिकार्‍यासप्रमाणे रांगेत उभे राहातात आणी कुत्र्याला पावाचा तुकडा टाकावा तसे मी त्यांच्या झोळीत टाकलेली नोटांची पुडकी घेऊन मला मानाचा मुजरा करून निमूटपणे निघून जातात.तू शहाणा असल्याने ह्याचा नक्की विचार करशील व वेळीच भानावर येऊन त्याने दिलेल्या ऑफरचा स्विकार करून स्वत:चे कल्याण करून घेशील.”

त्याचा हा सल्लाही मी ठोकरला व त्याला खडसावूनच सांगितले की मंत्र्यांपर्यंत सर्व जण त्याच्या खिशात असल्याने त्यांच्या मदतीने त्याने माझी डॅमचे साइटवरून उचलबांगाडी करावीच ।“

त्यामुळे हे पाणी काही औरच आहे ह्याची त्याला खात्रीच पटली व तो दुसर्‍या तयारीला लागला.

त्यानंतर वेगाने चक्रे फिरली व लवकरच अधिक्षक अभियंता ह्यांचेकडून एक्झिक्युटिव्ह इंजिनियरना एक अर्जंट असा शिक्का असलेले पत्र आले व त्यात त्यांनी असे आदेश दिले होते की “पावसाळा आता तोंडावर आलेला असून तो प्रत्यक्ष सुरू होण्याचे आत मातीच्या भरावाचे काम पूर्ण होणे हे जवळ जवळ अशक्यप्राय असल्याने,ते वेळेत उरकण्यासाठी हे पत्र मिळताच युद्धपातळीवर प्रयत्न करणे जरुरीचे असल्याने ताबडतोब दोन पाळ्यात कामास सुरुवात करावी.”

ह्या आदेशामागचे (पडद्यामागचे) खरे राज-कारण असे होते की, दोन पाळ्यात काम चालू केल्यावर ठरवून ठेवल्याप्रमाणे मला रात्रपाळीत टाकायचे म्हणजे दिवसा माझी पीडा रहाणार नाही व मी रात्रपाळीत गेल्यावर झोपून जाईन आणी तेंव्हाही रशिदला विनासायास हवे तसे काम करता येईल.

ठरवल्याप्रमाणे दुसरेच दिवसापासून माझी रात्रपाळीत वर्णी लावण्यात आली,हुकूम हातात पडताच मी एक्झिक्युटिव्ह इंजिनियरांकडे गेलो व त्यांना सांगितले की मी रात्रपाळीत जायला तयार आहे,मात्र धरणाची साईट कॉलनीपासून ८ किलोमीटर दूर असल्याने कामावर जाण्यासाठी वाहनाची व्यवस्था करावी,व रात्रपाळीत सुपरव्हिजन करताना नीट दिसावे म्हणून मला एक मोठा टॉर्च देण्यात यावा.माझ्या दोन्ही मागण्या ह्या सनदशीर व रास्त असल्याने त्यांना त्या नाकारता आल्या नाहीत,म्हणून ते मला म्हणाले मी तुम्हाला थोड्या वेळाने कळवतो.

थोड्या वेळाने ते मला म्हणाले की रोज सध्याकाळी डॅमचे साईट वरुन एक डंपर लेबरना घेऊन कॉलनीत येताच असतो,त्यातून मी कामावर जावे.व एक-दोन दिवसात एक नवा मोठा टॉर्च खरेदी करून मला देण्यात येईल.

पण तो डंपर ठेकेदाराचा असल्याने व त्याने देऊ केलेल्या ह्या मेहरबानीमुळे मला ऋणाईताला यावे तसे मिंधेपण येईल व मी त्या दाबाखाली कामात चोखपणा दाखवू शकणार नाही असे सांगून त्यांचा तो प्रस्ताव स्वीकारण्यास नकार दिला.त्यामुळे अखेरीस नाइलाजाने त्यांना मला सरकारी जीप उपलब्ध करून द्यावी लागली.

दुसरे दिवशी सायंकाळी ७.३० वाजता मी व माझे दोन असिस्टंट एक मुकादम व एक कारकून असे आम्ही तिघे रात्रपाळीसाठी जीपने डॅम साइटवर पोहोचलो.

दिवसाप्रमाणेच रात्रीच्या किर्र अंधारातही मी कोणतीही कसूर न करता चोखपणे ड्यूटी करू लागलो व ठेकेदारास मनमानी प्रमाणे काम करू देण्यापासून रोखून धरले.दुसरे दिवशी मला एक मोठ्ठा नवा टॉर्चही इश्यू करण्यात आला.त्याचे उजेडात मी माती योग्य जाडीतच पसरली जात आहे ना ह्याची खात्री करूनच पुढच्या डंपरला माती खाली करण्यास संमति देत होतो.

डंपर ड्रायव्हरकडून हे सर्व नियमितपणे रशिदच्या कानावर जातच होते व त्यांचे मनमानीपणे काम करावयाचे मनसुबे माझ्या चोख व खंबीर वागण्याने धुळीस मिळाल्याने तो मनातून अतिशय खवळला होता.

अखेरीस एका रात्री त्याने सर्व डंपर ड्रायव्हर्सना सूचना दिल्या की तुम्ही त्या इंजिनियरकडे अजिबात लक्ष न देता नेहमीसारखे आणलेली माती खाली करणे चालू करा,जर त्या इंजिनियरने मध्ये येऊन तुम्हाला अडवले तर सरळ त्याच्या अंगावर डंपर खाली करा व त्याला मातीत गाडून टाका,काही झाले तरी मी भक्कमपणे तुमच्या पाठीशी आहे तेंव्हा त्याला बिलकुल घाबरू नका.

आणि दुसर्‍याच रात्री डंपर ड्रायव्हर्सनी पूर्ववत मनमानी करण्यास सुरुवात केल्यावर ड्रायव्हरला डंपर खाली करण्यापासून रोखण्यासाठी मी डंपरच्या मागे जाऊन उभा राहिलो,तेंव्हा ड्रायव्हर खाली उतरून माझेपाशी आला व म्हणाला साहेब कृपा करून तुम्हा बाजूला व्हा अन्यथा मी काहीही विचार न करता सरळ डंपर खाली करेन.पण मी ऐकत नाही असे पाहून त्याने खरोखरच सरळ डंपर माझ्या अंगावरच खाली केला,त्याबरोबर एकदम जी माती माझ्यावर पडली त्याने माझा चष्मा उडून मातीत गेला,टॉर्च हातातून सुटली व तीही मातीत गेली माझ्या नाकातोंडात माती जाऊन खांद्यापर्यंत मी त्या मातीत गाडला गेलो,तिकडे बिलकुल लक्ष न देता ड्रायव्हर डंपर घेऊन निघूनही गेला.माझ्या सहकारी मुकादम व कारकून ह्यांनी मला बखोट्यास धरून मातीतून ओढून बाहेर काढले व सुरक्षित जागी नेऊन बसवले.चष्मा व टॉर्च तर शोधूनही मिळालीच नाही,मी मात्र जिवावरच्या प्रसंगातून केवळ नशीब बलवत्तर होते म्हणूनच बचावलो असे म्हणावयास हवे.

दुसरे दिवशी सकाळीच मी झाल्या प्रकाराचा सविस्तर अहवाल लिहून काढून त्याच्या १०-१५ प्रती काढून त्या डेप्युटी इंजिनीअर, एक्झिक्युटिव्ह इंजिनीअर,सुपरीनटेडिंग इंजिनीअर, डी.एस.पी, कलेक्टर,डेअरी कमिशनर,खात्याचे व मुख्यसेक्रेटरी,राज्यमंत्री व कॅबिनेट मंत्री आशा सर्वांना तर पाठवून दिल्याच पण तेव्हढ्यावर गप्प न बसता मी माझ्यावर गुदरलेल्या प्रसंगाचा सविस्तर वृत्तान्त मुंबईच्या प्रमुख वर्तमानपत्रांच्या संपादकांनाही पाठवला.इतकेच नाही तर आमच्याकडे असलेल्या पॉकेट बुक नांवाच्या अत्यंत महत्वाचा डॉक्युमेंटमध्ये झाल्या प्रकाराची सविस्तर नोंद केली.नियम क्र. २ नुसार ऑडिटचे वेळी नोटबुकातील आशा नोंदी तपासून त्याची दाखल घ्यावी असा कायदा आहे.

माझ पत्र मिळताच नेहमी अजगरासारखी सुस्त असणारी संपूर्ण सरकारी यंत्रणा एकदम शॉक बसल्यासारखी खडबडून जागी झाली.

पण रशीदने मुंबईस जाऊन बरीच धावपळ केली व पाण्यासारखा पैसा खर्च केला आणी प्रकरण दाबून टाकण्यात तो यशस्वी झाला.पैशापुढे अखेर सत्याची गळेचेपी झाली.

मुंबईहून रशीद दापचरीस परतला तो माझ्या बदलीची ऑर्डर घेऊनच॰

कोणतेही सबळ कारण न देता माझी दोन महीने पूर्ण होण्याची आतच तेथल्या तेथेच इरिगेशन डिव्हिजनमधून बिल्डिंग सिव्हिल डिव्हिजनमध्ये बदली करण्यात आली.

एकूण काय तर अखेर भ्रष्टाचाराचाच विजय झाला व सत्याची गळेचेपी झाली हाच कटू अनुभव माला आला.

प्रमोद तांबे

(या माझ्या मित्राचा मला  सार्थ अभिमान आहे यात काय नवल!)

Advertisements

About chandrashekhara

I am a retired electronics engineer. I am interested in writing, reading books. Other hobbies include Paper models, wooden fret work and social networking.

चर्चा

One thought on “भ्रष्टाचार विरुद्ध लढ्यातील एक पान

  1. शाब्बास प्रमोद. अभिमान वाटला.

    Posted by Anand Mhaskar | सप्टेंबर 2, 2013, 6:51 pm

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s

जुने लेख शोधा

Enter your email address to subscribe to this blog and receive notifications of new posts by email.

Join 387 other followers

MyFreeCopyright.com Registered & Protected

माझे नवीन इ-पुस्तक

एका साम्राज्याच्या शोधात

Advertisements
%d bloggers like this: