.
अनुभव Experiences, Musings-विचार

रूढी, परंपरा आणि कांदे


मी स्वत:ला रूढीप्रिय किंवा परंपरावादी कधीच समजणार नाही. लहान वयात मी आचरणात काय आणत होतो ते मला आता सांगणे कठीण आहे, परंतु स्वतंत्र विचार करण्याची क्षमता प्राप्त झाल्यानंतर म्हणजे गेली काही दशके तरी मी स्वत:ला पूर्णपणे अपरंपरावादी समजत आलेलो आहे. मी नास्तिक जरी नसलो तरी मूर्तीपूजनाशी माझी तशी जवळीक कधीच होऊ शकली नाही आणि त्याच्याबरोबर येणारे उपचार आणि कर्मकांडे यांचा तर मला मनस्वी तिटकारा आहे. पण माझ्या आवडीनिवडी आणि स्वभाव याबद्दलचे हे भारूड मी आज का लावले आहे, याला आज सकाळी मी आणि माझी पत्नी यांच्यात झालेला एक छोटासा संवाद कारणीभूत आहे.

आज सकाळी वृत्तपत्रांचे वाचन करताना एका बातमीने माझे लक्ष वेधून घेतले होते. कांद्यांचा एका किलोचा किरकोळ विक्रीचा भाव 100 रुपयापर्यंत पोचला असल्याचे ते वृत्त होते. ते वाचल्यावर मी पत्नीला सहज सांगितले:

आपण कांद्यांचा वापर जरा कमीच केला पाहिजे. नाहीतरी चातुर्मासात कांदे लसूण खाऊ नये असेच सांगतात.”

हे सांगितल्यावर माझा मीच जरा चमकलो. स्वत:ला अपरंपरावादी समजणारा मी, खुशाल एका रूढीची भलावण करत होतो. पण मग माझ्या डोक्यामधे, चातुर्मासात कांदा, लसूण न खाण्याचा तोच तो विषय घोळत राहिला.

आपण प्राथमिक शाळेच्या भूगोलात शिकत असतो की जगाच्या इतर भागांत जसे उन्हाळा आणि हिवाळा हे दोनच ऋतू येतात तसे भारतीय उपखंडात येत नाहीत. आपल्याकडे 2 च्या ऐवजी 3 ऋतू येतात. उन्हाळ्याची परमावधी होते त्या जून महिन्यापासून ते थंडीची चाहूल लागण्याच्या काळापर्यंत, पावसाळा हा आणखी एक अंगतुक ऋतू भारतवर्षात उपटतो. आता भारतीय पंचांगाप्रमाणे या पावसाळा ऋतूमधे मोजली जाणारी 9 नक्षत्रे ही भारतीयांच्या पोटात पडणार्‍या अन्नधान्य उत्पादनाच्या साठी सर्वात महत्त्वाची असतात हा भाग वेगळा. पावसाळा ऋतूमध्ये, संपूर्ण भारतीय उपखंडाच्या कानाकोपर्‍यात सारखेच हवामान असते असे काही नाही. थोड्याफार प्रमाणात कमी जास्त होतेच. पण पश्चिम महाराष्ट्रात किंवा निदान सह्याद्रीच्या कुशीत असणार्‍या पुण्यासारख्या शहरात तरी हा पावसाळ्याचा ऋतू म्हणजे, सतत झाकोळलेले आकाश, सूर्यदर्शन नाही, मधून मधून येणार्‍या पावसाच्या सरी आणि एकंदरीतच कुंद व मंद वातावरण, हेच चित्र दिसते. कदाचित याच कारणांमुळे या ऋतूमध्ये अलर्जी व त्याच्या अनुषंगाने येणारे सर्दी खोकला किंवा फ्ल्यू यासारख्या विकारांचा मोठा प्रादुर्भाव झालेला लक्षात येतो.

या पावसाळ्याच्या काळात येणार्‍या चार महिन्यांना चातुर्मास असे म्हणण्याची प्रथा आहे. माझी आजी मला नेहमी सांगत असे की या दिवसात पचनशक्ती कमी होते, तसेच आरोग्य बिघडण्याची जास्त शक्यता असते, आजार बळावतात म्हणून या काळात आहारविहारावर जास्त नियंत्रण हवे, कांदा लसणीसारखे वातूळ पदार्थ खाऊ नयेत. पण मोठे झाल्यावर आणि जरा विचार केल्यावर माझ्या लक्षात हे आले होते की या आजीच्या सांगण्यात काही फारसा दम नाही. या पावसाळ्याच्या दिवसातच एकादशीला बटाटा, साबुदाणा यापासून बनवलेल्या आणि तळलेल्या पदार्थांवर आपण ताव मारत असतो आणि ते काय कमी वातूळ असतात का? या महिन्यात मटार भरपूर येतो आणि त्याची उसळ नेहमी होतेच. या उसळीला वातूळ नाही असे कोण म्हणेल? मग कांदा लसणीवरच राग का? या विचारामुळेच या कांदा लसूण न खाण्याच्या प्रथेला काही शास्त्रीय कारण देता येईल असे मला आतापर्यंत तरी कधी वाटले नाही. पण तरीही ही प्रथा का रूढ झाली असावी असा प्रश्न मला नेहमी पडत असे.

भारतात किंवा निदान महाराष्ट्रात तरी, कांद्याचे पीक घेणारे शेतकरी वर्षात दोन वेळा कांद्याचे पीक घेतात. यापैकी उन्हाळी पीक म्हणजे मार्च एप्रिल मधे तयार होणारे पीक 6 किंवा 8 महिने म्हणजे ऑक्टोबर नोव्हेंबर पर्यंत सहज टिकते. वर्षातले दुसरे किंवा पावसाळी पीक हे या सुमारास बाजारात येते. मात्र हे पीक काही आठ्वडेच टिकू शकते. त्यामुळे ज्या ज्या वर्षी पाऊस दगा देतो त्या त्या वर्षी आधीच्या उन्हाळी पिकात घेतलेले व नंतर बाजारात आलेले कांदे, ऑक्टोबर नोव्हेंबर पर्यंत संपत आले की बाजारात मालाची चणचण भासू लागते व भाव भराभर वाढू लागतात.

मागच्या वर्षी किंवा 2012 मध्ये भारतातील बहुतेक ठिकाणी, पाऊस अतिशय अनियमित आणि कमी प्रमाणात पडला. त्यामुळे अर्थातच पावसाळी कांद्याचे पीक कमी प्रमाणात आले व परिणामी बाजारात आधी आलेले उन्हाळी कांदे संपत आल्यावर आणि त्याजागी येणारे पावसाळी पीक कमी प्रमाणात आल्याने, ऑक्टोबर नोव्हेंबर 2012 मध्ये कांद्याचे भाव वाढू लागले. नाशिक जिल्ह्यामधील लासलगाव येथे असलेल्या, देशामधील सर्वात मोठ्या घाऊक कांदा बाजारात कांद्याचे भाव 10000 रुपये प्रती मेट्रिक टन या भावापासून 23000 रुपये प्रती मेट्रिक टन एवढे पुढच्या 2 किंवा 3 महिन्यात वाढले. विक्रीच्या साखळीतील प्रत्येक पायरीवर असलेल्या व्यापार्‍यांचा नफा यात मिळत गेल्याने, किरकोळ बाजारात ग्राहकाला मिळणारे कांद्याचे भाव शेवटी प्रचंड प्रमाणात कडाडले. उन्हाळी पीक बाजारात आल्यावर 2013च्या सुरवातीला कांद्याचे भाव शेवटी पूर्वस्थितीवर आले. परंतु बाजारात मुळातच कांदा कमी असल्याने मागच्या वर्षीच्या तुटवड्याचा प्रभाव या वर्षी लवकर म्हणजे ऑगस्टमध्येच जाणवू लागला व त्याचे पर्यावसान किरकोळ बाजारात कांद्याला किलोला 80 रुपये एवढा चढा भाव मिळण्यात झाले.

या वर्षी बाजारात असलेला कांद्याचा तुटवडा क्षणभर बाजूला ठेऊन आपण थोड्या मोठ्या कालखंडातील कांद्यांच्या भावाचा विचार केला तरी आपल्याला एक नियमित स्वरूपाचा पॅटर्न दिसू शकेल. महाराष्ट्रातील कांद्याचे पीक बहुधा पावसावर अवलंबून असल्याने अगदी काही शतकांचा कालखंड जरी विचारात घेतला तरी हा पॅटर्न बहुदा बदलणार नाही. ज्या ज्या वर्षी पावसाने ओढ दिलेली असेल त्या त्या वर्षीच्या ऑक्टोबर नोव्हेंबर मध्ये,आणि त्याच्या पुढच्या वर्षीच्या ऑगस्ट सप्टेंबरमध्ये बाजारात येणारा कांदा हा कमी प्रमाणातच आलेला असणार आहे. पूर्वीच्या काळी तर कांद्याची बाजारपेठ आणि घाऊक विक्री केंद्रे यापासून पिकलेला कांदा दूरपर्यंत पोचवण्यासाठी येणार्‍या अडचणी, या व्यापारावर असलेलीअडते आणि घाऊक व्यापार्‍यांची मगरमिठी या गोष्टी लक्षात घेतल्या तर कांद्याची एकूण बाजारपेठ अतिशय मर्यादित आणि स्थानिक स्वरूपाची असल्याने,शेतकरी पीकही मर्यादितच घेत असणार हे लक्षात येऊ शकते. त्यामुळे अशा स्थितीत कांद्याचे येणारे पीकही संपूर्णपणे पावसावरच अवलंबून असणार हे उघड आहे.

आपल्याकडे एक म्हण आहे की गरिबाचे अन्न म्हणजे कांदाभाकर. आता ही अशी म्हण,कांदा वर्षभर स्वस्त दरात उपलब्ध असल्याशिवाय काही समाजात प्रचलित होणार नाही. म्हणजेच या आधीच्या कालात,कांद्याचे पीक आता सारखेच पावसावर सर्वस्वी अवलंबून असूनही, गरिबांना,कांदा त्यांना परवडेल,या दरात उपलब्ध होत असला पाहिजे. सध्या शक्य नसलेली ही गोष्ट पूर्वी कशी शक्य होत होती? थोडा विचार केल्यावर माझ्या हे लक्षात आले की पूर्वी हे शक्य होत होते याच्या मागे चातुर्मासात कांदा लसूण सेवन न करण्याची परंपरा कारणीभूत असली पाहिजे. या चार महिन्यात कांद्याला जर बाजारात उठावच नसला तर माल कमी असूनही भाव वाढणारच नाहीत आणि गोरगरिबांचा हक्काचा कांदा त्यांना परवडेल अशा किमतीत सर्व काळ मिळत असणार. परंपरा झिंदाबाद! नाही का?

परंतु आता या असल्या चातुर्मासासारख्या परंपरा कोण पाळणार? असेच बहुधा सर्वजण म्हणतील. मग काय करायचे? कांद्याच्या महागाईला तोंड कसे द्यायचे? याला माझे उत्तर आहे की पावसाने ओढ दिली आहे हे एखाद्या वर्षी लक्षात आले की त्या वर्षीच्या ऑक्टोबरमध्ये आणि त्याच्या पुढच्या वर्षीच्या जून महिन्यामध्ये 3 ते 4 महिने पुरेल एवढा कांदा खरेदी तरी करायचा किंवा हे शक्य नसेल तर चातुर्मास पाळायचा! बघा तुम्हाला काय जमते ते!

30 ऑगस्ट 2013

Advertisements

About chandrashekhara

I am a retired electronics engineer. I am interested in writing, reading books. Other hobbies include Paper models, wooden fret work and social networking.

चर्चा

One thought on “रूढी, परंपरा आणि कांदे

  1. New point of view on chaturmas. But some how I still think weather is more logical reason. But I got to know reason behind onion prices. Thanks !!!

    -Sagar

    Posted by Sagar Khedkag | सप्टेंबर 1, 2013, 9:24 सकाळी

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s

जुने लेख शोधा

Enter your email address to subscribe to this blog and receive notifications of new posts by email.

Join 387 other followers

MyFreeCopyright.com Registered & Protected

माझे नवीन इ-पुस्तक

एका साम्राज्याच्या शोधात

Advertisements
%d bloggers like this: