.
People व्यक्ती

स्थापत्यशास्त्रावरील एक सहस्त्र वर्षांपूर्वीचा ग्रंथ


भारतीय उपखंडाचा इतिहास अभ्यासणार्‍यांना, गतकालातील एक प्रसिद्ध राजा म्हणून राजा भोज याचे नाव चांगलेच परिचित आहे. या राजाने मध्य भारतातील मालवा भागावर 11व्या शतकाच्या सुरवातीपासून इ.. 1055 पर्यंत राज्य केले. स्वत: एक अतिशय निपुण असा योद्धा असल्याने त्याने आपल्या गौरवशाली कारकिर्दीत अतिशय शक्तिमान आणि श्रेष्ठ अशा शत्रूंबरोबर केलेल्या अनेक लढाया गाजवल्या. यात सोमनाथ येथील देऊळ उध्वस्त करणार्‍या सुलतान महमुद गझनवी याच्या सैन्याबरोबर केलेले यशस्वी युद्धही मोडते. आपल्या राजधानीचे आक्रमकांपासून संरक्षण करत असताना या शूर वीराला रणांगणावरच मरण आले.

राजा भोज हा केवळ एक कुशल सेनापतीच नव्हता तर आपल्या सैन्यसामर्थ्याच्या बळावर त्याने आपल्या कारकिर्दीमध्ये आपल्या समकालीन अनेक बलशाली शत्रू राजांच्या सैन्यलांबरोबर लढून मोठे विजय मिळवले होते असे इतिहास सांगतो. परंतु राजा भोज खरा सुप्रसिद्ध आहे तो त्याची बुद्धीमत्ता आणि आपल्या राज्यात कला व संस्कृती यांना त्याने दिलेला उदार राजाश्रय यासाठी! त्याने अनेक भव्य देवळे बांधली. यापैकी एक म्हणजे मध्य प्रदेशची राजधानी भोपाळ पासून सुमारे 30 किमी अंतरावर असलेल्या भोजपूर गावामधील भोजेश्वर हे शंकराचे सुप्रसिद्ध मंदिर. त्याच्या स्थापत्य कुशलतेचे आणखी एक उदाहरण म्हणून भोपाळ जवळील बेटवा नदीवर बांध घालून त्याने बनवून घेतलेला भोज तलाव हे सांगता येते.

राजा भोज मोठा तत्त्वज्ञानी होता व आपल्या प्रजेने शिक्षण घ्यावे म्हणून या विषयात तो बारकाईने लक्ष घालत असे. असे म्हटले जाते की त्याची प्रजा एवढी सुशिक्षित होती की तळातले विणकर सुद्धा छंदबद्ध संस्कृत काव्यरचना करत असत. राजा भोजने 84 पुस्तके लिहिली होती असे मानले जाते. यापैकी त्याने स्वत: किती लिहिली होती व किती लिहून घेतली होती हे सांगणे अवघड असले तरी विद्वानांच्या मताने त्याच्या सर्व पुस्तकात त्याचा स्वत:चा सहभाग बराच असावा असे दिसते.

राजा भोजने लिहिलेला एक संस्कृत ग्रंथ समरांगण सूत्रधाराहा 80 प्रकरणे असलेला एक ग्रंथ आहे स्थापत्य (civil engineering) विषयावर असलेला हा ग्रंथ म्हणजे त्या काळातील या विषयावर असलेला सर्वोत्तम ग्रंथ असे समजले जाते. वास्तू, किल्ले, मंदिरे, देवांच्या मूर्ती आणि यंत्र सामग्री यांचे बांधकाम किंवा निर्मिती कशी करावी याचे सर्व तत्कालीन ज्ञान हा ग्रंथ वाचकाला देतो. या ग्रंथात असलेल्या विमान निर्मिती या प्रकरणामुळे हा ग्रंथ विशेष गाजलेला आहे. परंतु प्रत्यक्षात विमानाची बांधणी कशी करावी हे हा ग्रंथ सांगत नाही तर ही माहिती गुप्तता राखण्यासाठी राखून ठेवली आहे असे मोघमपणे सांगून वाचकाची निराशा करतो.

परंतु या ग्रंथाची महानता दडलेली आहे ती इतर प्रकरणांमध्ये. ही प्रकरणे अनेक विषयांबद्दल माहिती देतात. या विषयांत भूगर्भ आणि खनिज शास्त्रे, अंतराळभौतिकी, मोजमापे करण्याची कला, गावाचा आराखडा बनवणे, राहत्या घरांची बांधणी, कॉलनी, मंदिरे, सैनिक तळ (geology, astrophysics, measurements, norms of town planning, residential houses, colonising, temples, military camps) यासारख्या अनेक विषयांवर लिहिलेली आहेत. हे पुस्तक अनेक भारतीय आणि परदेशी विद्वानांनी अभ्यासलेले आहे. त्याच प्रमाणे त्याची काही भाषांतरे सुद्धा उपलब्ध आहेत. परंतु या ग्रंथांमधील विषयांच्या विशालतेला आणि महानतेला पूर्ण न्याय देऊ शकेल असे भाषांतर अजून कोणी केलेले नव्हते. वयाची 80 वर्षे उलटून गेलेल्या पुण्यातील एका संस्कृत विद्वानांनी गेली 20 वर्षे केलेल्या अथक परिश्रमांनंतर, मूळ ग्रंथाला संपूर्णपणे न्याय देऊ शकेल असे त्याचे भाषांतर नुकतेच पूर्ण केले आहे. हे 6खंडांतील भाषांतर नवी दिल्ली येथील इंदिरा गांधी नॅशनल सेन्टर ऑफ आर्ट्स (Indira Gandhi National Centre of Arts,(IGNCA, Delhi) या संस्थेच्या विद्यमाने 2013च्या ऑक्टोबर महिन्यात प्रसिद्ध केले जाणार आहे.

या पुस्तकाचे भाषांतर करण्याचे मोठे आव्हानात्मक काम, श्री प्रभाकर आपटे यांनी केले आहे. श्री. आपटे यांनी संस्कृत विषय घेऊन एम.. आणि पीएच. डी मिळवलेली असून निवृत्त होण्याआधी ते डेक्कन कॉलेज या संस्थेच्या पुरातत्त्व विभागात आणि तिरुपती येथील राष्ट्रीय संस्कृत विद्यापीठात कार्य करत होते. डेक्कन कॉलेज प्रसिद्ध करत असलेल्या एनसायक्लोपिडिक डिक्शनरी ऑफ संस्कृत लॅन्गवेज (Encyclopaedic Dictionary of Sanskrit) या ग्रंथाचे संपादक म्हणूनही श्री. आपटे यांनी काम केले आहे. तिरुपती येथील आपल्या कार्यकालात, मंदिर स्थापत्य आणि वास्तूशास्त्र या विषयाशी त्यांचा प्रथम परिचय झाला होता. श्री आपटे म्हणतात: ” हा अनुभव मला समरांगण सूत्रधारा या ग्रंथाचे भाषांतर करताना बराच उपयोगी आला.” “श्री. आपटे यांचे एक स्नेही आणि स्थापत्य अभियंता असलेले श्री अरविंद फडणीस यांच्या या भाषांतर कामाला असलेल्या पाठिंब्यामुळे, हे भाषांतर त्यांना करणे जास्त सुलभ गेले असेही श्री. आपटे यांना वाटते. या बाबत ते म्हणतात: ” या ग्रंथातील मूळ संकेतांचा उलगडा करून त्याचे भाषांतर करणे हे सोपे काम नव्हते. हे कार्य सुलभ होण्यामागे त्यांच्यासारखा तंत्रज्ञानकडे ओढा असलेला संस्कृतज्ञ आणि संस्कृतकडे ओढा असलेला फडणीसांसारखा एक अभियंता या दोघांचे असलेले घनिष्ट सहकार्य हेच कारणीभूत आहे.”

या कालात लेखन झालेल्या इतर ग्रंथांप्रमाणेच या ग्रंथाच्या सुरुवातीस ग्रंथलेखकाला प्राप्त झालेल्या दैवी कृपेचा उल्लेख आढळतो. देवांचा वास्तुविशारद विश्वकर्मा, जय, विजय, सिद्धार्थ आणि अपराजित या आपल्या 4 पुत्रांना चारी दिशांना जाऊन पृथ्वीवर तेथे वसाहती करण्याची आज्ञा देतो. विश्वकर्म्याचे पुत्र मग त्याला अनेक प्रश्न विचारतात. या प्रश्नांना विश्वकर्म्याने दिलेली उत्तरे राजा भोज याला प्राप्त होतात व ती या ग्रंथाद्वारे तो वाचकांना निवेदन करतो असे या ग्रंथातील मूळ कथाबीज आहे.

या ग्रंथात विशद केलेल्या अनेक गोष्टींमध्ये जेथे वास्तू उभारावयाची आहे त्या जागेचा मुख्य आराखडा (master plan) बनवणे, नगर रचना आराखडा बनवणे, मूळ मोजमापांची परिमाणे, जातीधर्मांप्रमाणे व सामाजिक वर्गभेदांप्रमाणे वसाहती कशा आखाव्या, राजप्रासाद आखणी, निवासस्थाने आखणी, मंदिरे, सैनिकी तळ यांचा समावेश आहेच पण या शिवाय यंत्रे म्हणजे काय? हे ही सांगितलेले आहे.

गेली 20 वर्षे अथक परिश्रम आणि संशोधन करून हे काम पूर्णत्वास नेल्याबद्दल श्री. आपटे यांचे करावे तेवढे कौतुक कमीच पडेल. प्राचीन भारतातील स्थापत्य या विषयात रस असणार्‍या अभ्यासक आणि संशोधक यांच्यासाठी हा ग्रंथ म्हणजे एक अमूल्य ठेवा ठरणार आहे याबद्दल शंका वाटत नाही.

27 ऑगस्ट 2013

Advertisements

About chandrashekhara

I am a retired electronics engineer. I am interested in writing, reading books. Other hobbies include Paper models, wooden fret work and social networking.

चर्चा

3 thoughts on “स्थापत्यशास्त्रावरील एक सहस्त्र वर्षांपूर्वीचा ग्रंथ

 1. very good work by Dr. Apte, Congrats!

  Posted by chaitanya kulkarni | ऑगस्ट 27, 2013, 5:28 pm
 2. Samaranganasutradhara – I think it is ‘ sutradhar ‘, not ‘ sutradharaa.’ Of course, Dr. Apte knows better.

  Posted by Mrudula Prabhuram Joshi | ऑगस्ट 29, 2013, 10:29 pm
  • मृदुला
   लेखाच्या सुरवातीला मी जे चित्र दिलेले आहे ते आंतरजालावर सध्या उपलब्द्ध असलेल्या या पुस्तकाच्या मुखपृष्ठावरून घेतलेले आहे. यामध्ये सूत्रधारा असा शब्द असल्याने मी मूळ इंग्रजी लेखाचा मराठी अनुवाद करताना सूत्रधारा असा शब्द घेतला आहे. मी संस्कृतबद्दल पूर्ण अज्ञानी असल्याने काय बरोबर हे सांगणे मला शक्य नाही. तुम्ही म्हणता तसा हा शब्द कदाचित सूत्रधार असाही असू शकतो. डॉ. आपटे यांचे पुस्तक प्रसिद्ध झाल्यावर खरेखोटे काय ते कळेल. प्रतिसादासाठी धन्यवाद.

   Posted by chandrashekhara | ऑगस्ट 30, 2013, 8:47 सकाळी

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदला )

Connecting to %s

जुने लेख शोधा

Enter your email address to subscribe to this blog and receive notifications of new posts by email.

Join 387 other followers

MyFreeCopyright.com Registered & Protected

माझे नवीन इ-पुस्तक

एका साम्राज्याच्या शोधात

Advertisements
%d bloggers like this: