.
History इतिहास

गढवाली वाडी मधला सोन्याचा हंडा


2 जानेवारी 2011 हा दिवस, गुजरात मधील एका प्राचीन जागी उत्खनन करत असलेल्या भारतीय पुरातत्त्व विभागाच्या अधिकार्‍यांसाठी, सुवर्णाक्षरात लिहून ठेवावा असा ठरला. ‘गढवाली वाडीया नावाने ओळखल्या जाणार्‍या या स्थानी एका खड्ड्यात खणत असलेल्या एका मजुराला दोन छोट्या आकाराचे मातीचे कुंभ पुरलेले असल्याचे आढळून आले. त्याने हे कुंभ बाहेर काढले व स्थानीय सुपरवायजर श्री. एस. नंदकुमार यांच्याकडे तो ते घेऊन गेला. ते कुंभ मग ते दोघे या उत्खनन स्थळाची जबाबदारी अंगावर असलेले सुपरिन्टेंडिंग आर्किऑलॉजिस्ट श्री. जितेंद्र नाथ यांच्याकडे घेऊन गेले. त्या कुंभात असलेल्या वस्तू तपासल्यानंतर आश्चर्यचकित झालेले श्री. नाथ यांनी या कुंभात असलेले मणी व इतर वस्तू सोन्याच्या असल्याची घोषणा केली. त्यांच्या या घोषणेप्रमाणे:

या दोनपैकी एका कुंभात सोन्यातून बनवलेले व चकतीसारखे दिसणारे 26 मणी, अगदी बारीक आकाराचे गोल मणी आणि एक अंगठी आणि या शिवाय एका विशिष्ट मृदू अशा पाषाणापासून बनवलेले मणी सापडलेले आहेत. परंतु खरी आशचर्याची बाब ही आहे की या वस्तू सोन्यापासून बनवलेल्या असल्या तरी हे सोने साधेसुधे नसून 4200 वर्षांपूर्वी किंवा सिंधूसरस्वती संस्कृतीच्या हडप्पा कालामधील (..पूर्व 2565 ते 2235) ते सोने आहे.”

ज्या स्थानावर हे उत्खनन केले जात होते ती जागा गढवाली वाडीया नावाने ओळखली जाते. भुज पासून नारायण सरोवरकडे जाणार्‍या राज्य महारस्त्यावर भुजच्या साधारण वायव्येला, 85 किलोमीटरवर, गुजरातच्या कच्छ जिल्ह्यामधील नाखत्राणा तालुक्यात असलेले खिरसारानावाचे एक गाव लागते. या गावाच्या आग्नेय दिशेला खारीया नावाची एक नदी वाहते. या नदी पासून थोड्या अंतरावर ही जागा आहे.

तसे पहायला गेले तर 1970 च्या दशकापासूनच गढवाली वाडीया स्थानावर हडप्पाकालीन संस्कृतीचे अवशेष सापडतात हे भारतीय पुरातत्त्व शास्त्रज्ञांना ज्ञात होते. भारतीय पुरातत्त्व विभाग प्रसिद्ध करत असलेल्या इंडियन आर्किऑलॉजीया वार्षिकाच्या 1976-77 या वर्षाच्या अंकात या स्थानावर मिळालेल्या काही महत्त्वाच्या पुरातन वस्तूंबद्दल खालील उल्लेख आढळतो.

हडप्पा कालीन पुरातन वस्तू, नेत्राखिरसारा गाव, कच्छ जिल्हा : – पुरातत्त्व विभागाच्या पश्चिम मंडळाचे श्री. एन.एम.गणम यांना वरील जागेवर शोध घेत असताना हडप्पाकालीन मोठ्या चौरस आकाराचे एक वजन, भाजलेल्या मातीच्या व पॉलिश केलेल्या भांड्यांचे तुकडे आणि पाण्याचा फवारा उडवता येईल या प्रकारच्या झारीचे मुख व नळ्या मिळाले. गुजरात शासनाच्या पुरातत्त्व संचालकांना लोलक बसवलेल्या आधुनिक होकायंत्राशी तुलना करता येईल या प्रकारचे एक शोध घेणारे उपकरण गढवाली वाडीयेथे सापडले.”

(ही नोंद वाचून मी खरे तर बुचकळ्यातच पडलो आहे. माझ्या माहितीप्रमाणे होकायंत्राचा शोध चीनमध्ये हान घराणे राज्यावर असताना म्हणजे इ..पूर्व 2रे शतक ते इ.. पहिले शतक या कालखंडात लागलेला आहे. 4200 वर्षे पुरातन असलेल्या हडप्पाकालीन स्थानावर ( 2565 ते 2235 ..पूर्व) होकायंत्रासमान उपकरण कसे सापडू शकते ही गोष्ट अनाकलनीय व अशक्य वाटते. परंतु या बाबत जास्त माहिती मिळणे शक्य नसल्याने ही बाब मला तशीच सोडून दिली पाहिजे.)

असे वाटते की 1970 ते 1972 या कालात केलेल्या सुरकोटाडायेथील उत्खननात व व 1990 ते 2005 या कालात केल्या गेलेल्या धोलावीरायेथील उत्खननात जे अभूतपूर्व यश भारतीय पुरातत्त्व शास्त्रज्ञांना प्राप्त झाले त्यामुळे हुरुप येऊन डिसेंबर 2009 मध्ये परत एकदा विस्तृत प्रमाणातील उत्खनन कार्य गढवाली वाडीयेथे भारतीय पुरातत्त्व विभागाने सुरू केले आणि नेटाने ते पुढची 3 वर्षे चालू ठेवले. ही तिन्ही वर्षे, वर्षातील 4 किंवा 5 महिने उत्खनन विभागाच्या 100 लोकांचा एक गट ( ज्यात उत्खनन तज्ञ आणि मजूर यांचा समावेश होता.) या स्थानावर कार्यरत होता आणि या प्रयत्नांना लगेचच यश प्राप्त झाले.

या उत्खनन प्रकल्पाचे संचालक श्री जितेन्द्र नाथ यांना एप्रिल 2010 मधल्या एका सकाळी दिसलेल्या दृष्यांचे संपूर्ण स्मरण आहे. ते म्हणतात:

त्या सकाळी उत्खनन केलेल्या खड्ड्याच्या काठावर उभे राहून वमोरचे दृष्य बघताना माझे डोळे आश्चर्याने अक्षरशः विस्फारून गेले होते. समोरच्या खड्ड्याच्या एका कोपर्‍यात चार छिद्रे असलेले एक उंच आणि निमुळत्या आकाराचे,गंजासारखे भांडे उभे होते. या वरील छिद्रे वरच्या कडेच्या खालील बाजूस आणि समोरासमोरच्या बाजूस प्रत्येकी दोन अशी पडलेली होती. मातीत अर्धवट पुरली गेलेली व उत्कृष्ट कारागिरी दर्शवणारी 3 भांडी तेथे दिसत होती आणि या पैकी एका भांड्याचे उलटे पडलेले झाकण पलीकडच्या बाजूस पडलेले होते. एखाद्या पंख पसरून उड्डाण करत असलेला पक्षी शिकार्‍याची गोळी लागून जखमी होऊन जमिनीवर पडावा तसाच दिसणारा एक मोठ्या आकाराचा शंख खड्ड्याच्या तळावर पडलेला होता.”

उत्खननात सापडलेल्या या वस्तूंमुळे आश्चर्यचकीत झालेल्या श्री. नाथ यांनी बडोद्याच्या महाराजा सयाजीराव विद्यापीठात संशोधन करणार्‍या व त्यांना या प्रकल्पात सहकार्य करणार्‍या तरूण पुरातत्त्व संशोधक श्रीमती कल्याणी वाघेला यांना लगेचच सांगितले होते की

या छोट्याशा खड्ड्या आपल्याला एबढी भांडी मिळाली आहेत आहेत की हा खड्डा मोठा करणे आपल्याला अपहरिहार्य आहे. तो मोठा केला की आपल्याला येथे एवढ्या मोठ्या प्रमाणात भांडी का सापडत आहेत याचे कारण लक्षात येईल.”

श्री. जितेन्द्र नाथ यांचे भाकित थोड्याच दिवसात खरे ठरले. डिसेंबर 6, 2012 पर्यंत 10 मीटर X 10 मीटर आकाराचे 39 खड्डे याच ठिकाणी खणले गेले गेले आणि या ठिकाणी अगणित संख्येची व अनेक आकार व मापांची भांडी व इतर गोष्टी येथे सापडल्या. यामध्ये छिद्रे पाडलेली, गोलसर, रंगवलेली, पसरट, उभट, भांडी त्याचप्रमाणे बशा, बोल्स, डाव, सुगंध निर्मिती साठी वापरण्याची ज्वलनपात्रे हे ही सापडले. (globular pots, sturdy storage jars, painted ware, perforated parts of broken jars, incense burners, dish-on-stand, goblets, beakers, basins, bowls, ladles) या खड्ड्यांत सर्वत्र भाजलेल्या मातीची भांडीच फक्त विखुरलेली दिसत होती. या भांड्यांशिवाय युनिकॉर्न आणि नीलगाय यांची चित्रे असलेली मातीची चौकोनी सील्स, हडप्पा लिपी मधील चित्राक्षरे असलेली चौकोनी सील्स आणि हडप्पा संस्कृतीच्या उत्तर कालात प्रचलित असलेली गोल आकाराची सील्स ही सुद्धा तेथे सापडली. यामुळे हे स्थळ उत्तर हडप्पा संस्कृतीकालीन असल्याचे सिद्ध होत होते.

खिरसारा येथील पुरातन स्थल हे धोलावीरा येथे उत्खननात सापडलेल्या नगराएवढे विस्तृत स्वरुपाचे नसले तरी तरी सापडलेल्या अवशेषांवरून पद्धतशीर नगररचना करून बांधलेली, वस्तीची घरे, गोदाम, कारखान्यातील उत्पादन आणि वस्ती अशा दोन्ही कामांसाठी वापरल्या जाणार्‍या वास्तू व त्याला लागून असलेल्या फक्त वस्तीसाठीच्या खोल्या आणि मातीची भांडी भाजण्यासाठी बांधलेली भट्टी येथे अस्तित्वात होती असे दिसते. या वस्तीवरील अधिकारी वर्ग, तटबंदी असलेल्या किल्यामध्ये चौरस आणि चौकोनी आकाराच्या खोल्या, त्यासमोर बांधून काढलेला व्हरांडा,त्यातून वरील मजल्यावर जाण्यासाठी काढलेला जिना आणि निरनिराळ्या रंगातील टाइल्स बसवलेली जमीन, अशा वैशिष्ट्यांनी परिपूर्ण असलेल्या घरात रहात असे. हा किल्ला अगदी गोदामालगत बांधलेला होता, जेणेकरून अधिकारी वर्गाला गुदामात चालू असलेल्या उत्पादन आणि व्यापार या संबंधीच्या कार्यांवर बारीक नजर ठेवता येत असे. किल्यालगत असलेले गोदाम 28 मीटर लांब व 12 मीटर रूंद होते व याच्या आत एकमेकाला समांतर असलेल्या अनेक 10 मीटर लांब आणि 1.5 मीटर रूंद अशा भिंती बांधलेल्या होत्या. सर्व बांधकाम घडविलेल्या सॅन्डस्टोन पाषाणातील असून, बांधकामातील दगड मातीच्या प्लॅस्टरमधे पक्के रचलेले होते. खिरसरा मधील प्राचीन स्थळाचे एक वैशिष्ट्य असे सांगता येते की या मध्ये असलेल्या प्रत्येक वस्ती भोवती तटबंदी होती व या शिवाय संपूर्ण वसाहती भोवती एक अतिरिक्त तटबंदी बांधलेली होती. होती. किल्ला, गोदाम, कारखाना आणि भट्टी या प्रत्येकाभोवती स्वतंत्र तटबंदी होती. अशा अनेक तटबंदी दुसरीकडे कोठे सापडलेल्या नाहीत.

खिरसारा उत्खननात अतिशय मोठ्या संख्येने, शोभेच्या आणि रोजच्या वापरातील वस्तू प्राप्त झाल्या आहेत. वर निर्देश केलेले चकतीसारखे, सूक्ष्म आकाराचे आणि पुंगळीसारखे असलेले सोन्याचे मणी तर मिळाले आहेतच पण या शिवाय शंख शिंपले, मृदू पाषाण, आणि मौल्यवान खडे यापासून बनवलेले मणी सुद्धा मिळाले आहेत. या मौल्यवान खड्यात lapis lazuli, agate, carnelian, chert, chalcedony and jasper यापासून बनवलेल्या मण्यांचा समावेश आहे. एका खड्ड्यातर मृदू पाषाणापासून बनवलेले 25000 हून अधिक मणी मिळाले. तांब्यापासून आणि शंख शिंपल्यांपासून बनवलेल्या बांगड्या, इनले काम (inlays) आणि अंगठ्या सुद्धा प्राप्त झाल्या आहेत. तांब्यापासून बनवलेल्या व प्राप्त झालेल्या हत्यारात छिन्या, चाकू, सुया, अग्रे, मासे पकडण्याचे हूक, बाणाची अग्रे आणि वजने मिळाली आहेत. या शिवाय हाडांपासून बनवलेली हत्यारे, अग्रे आणि मणी हे पण मिळाले आहेत.

येथे सापडलेल्या प्राचीन वस्तूंवरून एक गोष्ट खचितच लक्षात येते की खिरसारा हे पश्चिम कच्छ मधील एक महत्त्वाचे औद्योगिक केंद्र होते. खिरसारा मधील कारखाना बहुविध उत्पादनांची आश्चर्यजनक व मोठी अशी एक मालिकाच उत्पादन करीत होता. यात painted pottery, sturdy storage jars, globular pots, perforated jars, basins, dishes, bowls, beakers, dish-on-stand and incense burners यासारख्या उत्पादनांचा समावेश होता. रंगवलेल्या मातीच्या भांड्यांवर पट्टे, क्रॉस, स्पायरल्स, झिगझॅग यासारखी भौमितिक डिझाइन्स आणि प्राण्यांच्या चित्रांच्यावर आधारित डिझाइन्स, रंगवलेली असत. या शिवाय विपुल प्रमाणात आढळणारी अगदी छोटी भांडी हे सुद्धा खिरसाराचे वैशिष्ट्य मानता येईल.

सध्याच्या पाकिस्तान मधील सिंध प्रांत हा खिरसारा गावापासून अंदाजे 100 किलोमीटर अंतरावर आहे. गुजराथ मधील इतर भाग आणि सिंध यांच्यामधील व्यापार ज्या मार्गाने पूर्वी चालत असे त्या मार्गावरच खिरसारा हे गाव वसलेले आहे. यामुळे असा निष्कर्ष काढणे सहज शक्य आहे की हडप्पा कालात या स्थळावर जे रहिवासी रहात होते ते मूलत: उत्पादक आणि व्यापारी होते. हडप्पा संस्कृतीतील जवळपास किंवा दूर अंतरावर असलेली इतर गावे, शहरे आणि वसाहती यांना खिरसारा मधे औद्योगिक स्वरूपात उत्पादित केलेला माल हे रहिवासी निर्यात करत असत.

खिरसारा यथील उत्खननामुळे भारतीय पुरातत्त्व विभागाच्या शास्त्रज्ञांना आणि इतर संशोधकांना आणखी एक अतिरिक्त फायदा मिळणार आहे. हडप्पा संस्कृती लिपी मधील अक्षरे कोरलेल्या चौकोनी पट्टीच्या आकाराच्या सील्सचा येथे लागलेला शोध, हा हडप्पा लिपी समजावून घेण्याच्या दृष्टीने पुढे पडलेले एक पाऊल आहे असे आता मानले जाते आहे.

23 ऑगस्ट 2013

Advertisements

About chandrashekhara

I am a retired electronics engineer. I am interested in writing, reading books. Other hobbies include Paper models, wooden fret work and social networking.

चर्चा

टिप्पण्या बंद आहेत.

जुने लेख शोधा

Enter your email address to subscribe to this blog and receive notifications of new posts by email.

Join 386 other followers

MyFreeCopyright.com Registered & Protected

माझे नवीन इ-पुस्तक

एका साम्राज्याच्या शोधात

Advertisements
%d bloggers like this: