.
ताज्या घडामोडी Current Affairs

बॉलीवूडची अमोघ शक्ती


भारताचा चीनबरोबर असलेला उत्तर लडाख मधला सीमाप्रदेश, हा देशाच्या अगदी एका कोपर्‍यात असलेला, एकाकी, विराण आणि मानवी अस्तित्वाची कोणतीही गरज पुरवू न शकणारा असा एक भूभाग आहे. या भागाला सन 1889 मध्ये भेट देणारा एक ब्रिटिश अधिकारी फ्रान्सिस यंगहजबंड या प्रदेशाचे अतिशय नैराश्यदर्शक शब्दात वर्णन करताना म्हणतो:

सर्व जगामध्ये कोणत्याही दृष्टीकोनातून बघितले तरी याच्यासारखा भयानक वैराण प्रदेश शोधून सापडणार नाही. 17000 फूट उंचीवर असलेले हे पठार म्हणजे झाडे झुडुपांचा संपूर्ण अभाव असलेल्या अशा वैराण छोटेखानी टेकड्यांनी वेष्टिलेले व वाळू आणि खडी यांनी भरलेले एक सपाट मैदान आहे. अतिशय थंड व बोचरे असणारे झंझावाती वारे येथे सतत वहात असतात. तुमच्या मनाचे नैराश्य वाढवतील असे प्राण्यांच्या हाडांचे ढिगारे येथे इतस्ततः विखुरलेले दिसतात. या उंचीवर, आपल्या पाठीवर खूप वजनाचा माल वाहून नेण्याचा ताण सहन न झाल्याने गेल्या अनेक शतकात किंवा हजारो वर्षांमध्ये मृत्यूमुखी पडलेल्या प्राण्यांची ही हाडे आहेत.”

सन 1947 या सालापर्यंत हा सर्व भूभाग व याच्या उत्तरेला व पूर्वेला असलेला बराच मोठा भूभाग, श्रीनगर येथे राजधानी असलेल्या जम्मू आणि कश्मिर महाराजांच्या संस्थानाचा एक भाग होता. उन्हाळी हवामानात क्वचित वेळांना महाराजाच्या सैन्याची एखाद्या तुकडीची येथे होणारी भेट सोडली तर बाकी सर्व ऋतूंमध्ये हा प्रदेश स्वत:ची काळजी स्वत: वाहण्यासाठी मोकळा सोडलेला असे. या प्रदेशाच्या उत्तरेला असलेला भाग पाकिस्तानी सैन्याने 1947 मध्ये ताब्यात घेतला व 1950च्या दशकात या प्रदेशाच्या पूर्वेकडच्या भागापैकी हजारो किलोमीटर्सचा प्रदेश चीनने गिळंकृत केला. नवीनच स्वातंत्र्य मिळालेल्या त्या वेळच्या भारतीय सरकारच्या जेंव्हा ही गोष्ट लक्षात आली तेंव्हा भारतीय सैन्य प्रथम या भागात पाठवण्यात आले. याचे परिधान शेवटी 1962 मधील चीन भारत यांच्यातील 1962च्या सीमा युद्धात झाले. या युद्धात भारताचा संपूर्ण पराभव झाला व भारताला चीनने गिळंकृत केलेल्या प्रदेशाकडे फक्त हात चोळत बघत बसण्याची पाळी आली. या काळापासून येथील प्रत्यक्ष ताबा रेषा, या भागात युद्ध करण्यास तयार असलेले हजारो सैनिक सतत तैनात केलेले असल्याने अत्यंत संवेदनाक्षम व धोकादायक बनलेली आहे.

1950च्या दशकापर्यंत प्रसिद्ध रेशीम मार्गाची, कश्मिर आणि शिन्जियांग मधील काशगर, यारकुंड व होतान ही शहरे यांना जोडणारी एक उपशाखा, या विराण प्रदेशातून जात होती. या मार्गाने जाणारे व्यापारी काफिले सोडले तर या प्रदेशातून प्रवासाची वेळ येथे कोणतीच मानवी वस्ती नसल्याने कोणावरही येत नसे. आतासुद्धा सैनिकी तळ सोडले तर येथे इतर मानवी वस्ती ही नाहीच.

ही सगळी पार्श्वभूमी लक्षात घेतली तर 12 जून 2013 या दिवशी,या एकाकी आणि विराण प्रदेशात गस्त घालणार्‍या भारतीय सैनिकी टेहळणी पथकाला जेंव्हा जुन्या रेशीम मार्गावर असलेल्या भारतीय सैन्याच्या सुलतान चुस्कू ठाण्याच्या परिसरात 3 असैनिकी परदेशी व्यक्ती फिरताना आढळल्या तेंव्हा त्यांना केवढे आश्चर्य वाटले असेल याची सहज कल्पना करणे शक्य आहे. ‘सलामो,’ ‘अबदुल खालिकआणि अदिल थोरोसॉन्ग,’ या नावांचे हे तीन तरूण 18 ते 23 या वयोगटामधील होते व त्यांना फक्त यारकुंडी व उघिर या दोनच भाषा अवगत होत्या. आपली कौटुंबिक पार्श्वभूमी व कोणत्या मार्गाने आपण येथे आलो या बद्दल ते सांगत असलेली माहिती एकमेकाशी नीटशी जुळत नव्हती. त्यांच्या जवळ या परिसराचा एक मोठा राजकीय नकाशा व अरेबिक आणि यारकंडी लिपीत काहीतरी खरडलेल्या या नकाशाच्याच दोन लहान प्रती, घरगुती बनावटीच्या तलवारी आणि सुरे, डबाबंद अन्न आणि या भागात उपयुक्त ठरणारी अंड्यांची भुकटी, 900 युऑन एवढ्या किमतीच्या चिनी नोटा आणि चिनी बनावटीची कातडी जाकिटे आढळून आली. या सुलतान चुस्कू ठाण्याच्या सर्वात जवळ असलेली मानवी वस्ती काराकोरम पर्वतराजी वरून जाणार्‍या प्रत्यक्ष ताबा रेषेच्या उत्तरेलाच असल्याने भारतीय सैनिकांना हे तीन तरूण तिकडून राकी नाला, जीवन नाला किंवा डेपसांग मधील दौलत बेग ओल्डी ठाण्याच्या उत्तरेकडील मार्ग यापैकी कोणत्या तरी एका मार्गाने भारतीय सीमेमध्ये घुसले असावेत अशा निष्कर्षाला येणे क्रमप्राप्त झाले.

या तिन्ही तरूणांना आपण कोणत्या मार्गाने आलो हे नीटसे सांगता न आल्याने हे तरूण येथून फक्त 30 किमी अंतरावर असलेल्या व पाकिस्तानच्या ताब्यात असलेल्या उत्तर कश्मिरकडे निघालेले असावेत असा अंदाज भारतीय सैनिकांनी बांधला. त्यामुळे या तिन्ही तरूणांना भारततिबेट सीमा पोलिसांच्या मार्गोयेथील तळावर धिक चौकशी करण्यासाठी नेण्यात आले. ही चौकशी करण्यासाठी ते बोलत असलेल्या भाषा जाणणार्‍या खास तज्ञांना दिल्लीहून या तळावर पाचारण करण्यात आले. या तिन्ही तरुणांनी आपण रहात असलेल्या भागात कमालीचे दारिद्र्य असल्याने भारतात जाऊन पैसे कमावण्याच्या आपल्या स्वप्नाबद्दल या तज्ञांना सांगितले.

बॉलीवूडचे सुपर स्टार असे ज्यांना मानले जाते त्या शाहरुख खान व हृतिक रोशन या दोघांनी आपल्यावर मोहिनी घातली असल्याचे आणि बॉलीवूडच्या सिनेमात दाखवतात तशीच भारताची भूमी एक समृद्ध भूमी आहे अशी आपली खात्री पटल्याने आपण भारतात कितीही कष्ट पडले तरी जायचेच असे ठरवले असे त्या तरूणांनी चौकशी करणार्‍यांना सांगितल्यावर तेही आश्चर्यचकीत झाल्याशिवाय राहिले नाहीत. हे तिन्ही तरून शिन्जियांगच्या कार्घालिलिक भागातले असून प्रत्येकाच्या स्वतंत्रपणे केलेल्या चौकशीत हीच माहिती त्यांनी दिली व शिन्जियांग मधे या दोन्ही नटांचे चित्रपट किती लोकप्रिय आहेत या बद्दलही त्यांनी सांगितले.

हे तिन्ही तरूण शिन्जियांग मधून आलेले उघिर मुसलमान असल्यामुळे भारतीय इंटिलिजन्स एजन्सीज जर गडबडूनच गेल्या. उघिर दहशतवादी, पाकिस्तानमधील तळांवर दहशतवादाचे शिक्षण घेता असल्याची माहिती त्यांना होती. शिन्जियांगमधे पाकिस्तानी दहशतवादी आपली पाळेमुळे रोवत असल्याचेही त्यांना ज्ञात होते. त्याचप्रमाणे चीनने पाकिस्तानवर शिन्जियांग मधील दहशतवादाला तो देश खतपाणी घालत असल्याचे आरोप उघडपणे केले होते.

सतत दोन महिने केल्या गेलेल्या चौकशीनंतर भारतीय अधिकार्‍यांनी या त्रिकूटाला सर्व आरोपांतून मुक्त केले आहे. त्यांची भाषा जाणणार्‍या अधिकार्‍यांनी त्यांची संपूर्ण चौकशी केल्यावर कोणत्याही प्रकारच्या अवैध किंवा दहशती कारस्थानात हे तिन्ही तरूण गुंतलेले नाहीत असे स्पष्टपणे सांगितले आहे. त्यांनी फक्त एकच गुन्हा केलेला आहे तो म्हणजे कोणताही वैध पासपोर्ट किंवा व्हिसा जवळ नसताना त्यांनी भारतीय सीमारेषेच्या आत प्रवेश केला आहे. त्यांच्या जवळील राजकीय नकाशांवर जे काही खरडलेले आहे ते अरेबिक लिपी असलेल्या उघिर भाषेतील शब्द आहेत. या प्रकारचे नकाशे शिन्जियांग मधील बाजारात सहजपणे उपलब्ध असल्याने कोणतेही गुप्त कागदपत्र त्यांच्याजवळ मिळालेले नाहीत. त्यांनी दिलेल्या माहितीमधून अशी कोणतीही गोष्ट सूचित होत नाही ज्यामुळे त्यांना अपराधी किंवा दहशतवादी मानता येईल.

आश्चर्याची गोष्ट म्हणजे प्रथम या बाबत संपूर्ण मौन बाळगणार्‍या चिनी अधिकार्‍यांनी आता अचानकपणे या लोकांना परत त्यांच्या ताब्यात देण्याची मागणी केलेली आहे. या मागचा हेतू लगेच स्पष्ट होतो की ज्या मार्गाने ते सहजपणे भारतात आले तो मार्ग माहिती व्हावा. भारतीय सैनिकी अधिकार्‍यांनी आता या त्रिकूटाला पासपोर्ट कायद्याचे उल्लंघन केल्याच्या आरोपाखाली पोलिसांच्या स्वाधीन केले आहे.

या त्रिकूटाला सैनिकांनी जेथे पकडले होते त्या लडाखच्या भागाची थोडीफार माहिती असलेल्या लोकांना सुद्धा जगातील एक अतिशय भयानक आणि विराण प्रदेशातून प्रवास करण्यासाठी कोणतीही मदत किंवा आवश्यक असलेले कपडे किंवा इतर सामान बरोबर नसता या तीन सर्वसामान्य उघिर तरूणांनी दाखवलेले असामान्य धैर्य, निर्धार आणि चिकाटी हे बघून आश्चर्य व त्यांचे कौतुक वाटल्याशिवाय रहाणार नाही.

काही दिवसांपूर्वी मी दोन पाश्चिमात्य लेखकांनी, मध्य एशिया आणि चीनचा शिन्जियांग प्रांत या मधून केलेल्या प्रवासाची वर्णने वाचली होती. या दोन्ही लेखकांनी या भागात बॉलीवूडचे सिनेमे आणि नट यांना मिळत असलेल्या अफाट लोकप्रियतेची वर्णने केली आहेत. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे येथील उघिर लोक हिंदी सिनेमांशिवाय दुसरे कोणतेच चित्रपट बघत नाहीत. बॉलीवूडच्या या असंहारी शक्तीचा (सॉफ्ट पॉवर) भारताने पुरेपूर उपयोग करून घेणे आवश्यक आहे असे मला वाटते.

माझ्या मताने या त्रिकूटाला भारताने राजकीय आश्रय दिला पाहिजे व लडाखच्या प्रत्यक्ष ताबा रेषेच्या उत्तरेकडील भूभाग व परिस्थिती यांची त्यांना चांगलीच माहिती असल्याने त्याचा फायदा करून घेतला पाहिजे. त्यांना परत पाठवण्याचाच निर्णय झाला तर त्यांना कमीत कमी मुंबईला नेऊन शाहरुख खान व ह्र्तिक रोशन यांच्याशी भेट घडवून आणून असामान्य धैर्य, निर्धार आणि चिकाटी हे गुण अंगी असलेल्या या 3 तरूणांचे निदान कौतुक तरी आपण केले पाहिजे.

19 ऑगस्ट 2013

Advertisements

About chandrashekhara

I am a retired electronics engineer. I am interested in writing, reading books. Other hobbies include Paper models, wooden fret work and social networking.

चर्चा

अद्याप प्रतिक्रिया नाहीत.

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदला )

Connecting to %s

जुने लेख शोधा

Enter your email address to subscribe to this blog and receive notifications of new posts by email.

Join 387 other followers

MyFreeCopyright.com Registered & Protected

माझे नवीन इ-पुस्तक

एका साम्राज्याच्या शोधात

Advertisements
%d bloggers like this: