.
Musings-विचार

स्ट्रॉबेरी पिढी


strawberries

मागच्या काही वर्षांमध्ये माझ्या नातेवाईक मंडळींपैकी निदान 7 किंवा 8 तरी भाचे, पुतणे वगैरे मंडळी आपले आपले शिक्षण संपवून नोकरी करू लागली आहेत. परवा सहज माझ्या लक्षात आले की नवीन नोकरी करू लागलेली ही सर्व मंडळी एकतर माहिती उद्योगात काम करत आहेत किंवा उद्योगधंद्यांसंबंधित कोणत्या तरी पांढरपेशा नोकरीत आहेत. 2 जण अमेरिकेला गेलेले आहेत व ते तेथे असेच काहीतरी करत आहेत. ही सर्व मंडळी नोकरीत जे काम करत आहेत त्या कामाचे स्वरूप साधारणपणे रूटीन किंवा फारसे आव्हान नसलेले असेच आहे. या पैकी एकाही जणाला ज्या कामाच्या ठिकाणी सुखदायक वातावरण नसून सतत आव्हानात्मक परिस्थिती असते अशा सैनिकी किंवा वर्कशॉप मधील कामात आपले करीयर करावे असे वाटलेले नाही.

या तरूण वर्गाला त्यांच्या कामाचे स्वरूप पाहून मी काही वेळा गंमतीने सायबर हमाल असे म्हणत असतो. परंतु त्यांच्या या तरूण वयात एखादे आव्हानात्मक काम न स्वीकारता ही सर्व मंडळी असल्या पांढरपेशी नोकर्‍यांना का प्राधान्य देतात याचे कोडे मला बर्‍याच दिवसापासून पडलेले आहे. या नोकर्‍यांना प्राधान्य देण्याचे एक कारण असे दिले जाते की या नोकर्‍यांत मिळणारे वेतन हे इतर सर्वसाधारण नोकर्‍यांत मिळणार्‍या वेतनांपेक्षा बरेच जास्त (काही वेळा दुप्पट किंवा तिप्पट) असते. परंतु माझ्या माहिती प्रमाणे जेथे 12वी उत्तीर्ण झालेले तरूण नोकरीवर ठेवले जातात त्या कॉल सेंटर्स मधील नोकर्‍या सोडल्या तर बाकी इतर माहिती उद्योगातील नोकर्‍यांत, जेथे पदवीधर कामावर घेतले जातात, असलेला पगार सर्व साधारण नोकर्‍यांत मिळत असलेल्या पगारांपेक्षा एवढ्या प्रमाणात जास्त नक्कीच नसतो. माहिती उद्योगात काही लोकांना आभाळाला टेकणारा पगार मिळतो ही गोष्ट जरी खरी असली तरी अशी मंडळी थोडी व आपल्या कामात तज्ञ अशीच असतात. बाकी इतरांना एवढा पगार मिळत नसतो. त्यामुळे या तरूण वर्गाच्या पांढरपेशी नोकर्‍यांना असलेल्या प्राधान्यामागे या पांढरपेशी जीवनशैलीचे आकर्षण यापेक्षा दुसरे काहीतरी कारण असावे असे मला वाटत आलेले आहे.

आजच्या तरूण वर्गाला असलेले बिना त्रासाच्या व कटकटीच्या पांढरपेशी जीवनशैलीचे आकर्षण हे फक्त भारतापुरते मर्यादित असेल असे मला वाटत होते. परंतु माझी ही समजूत चुकीची असल्याचे मला लक्षात आले आहे. उदाहरणार्थ तैवान या देशात 12 वर्षाच्या शालेय विद्यार्थ्यांपासून ते 22 वर्षे पूर्ण झालेल्या महाविद्यालयीन तरूणांपर्यंत अशा सर्वांना बिना त्रासाच्या व कटकटीच्या पांढरपेशी जीवनशैलीचे आकर्षण इतके आहे की त्यांचे आता स्ट्रॉबेरी पिढीअसे नामाकरण केले गेले आहे. हे नाव दिले जाण्यामागे दोन कारणे दिली जातात. एखाद्या हरितगृहातील संरक्षक वातावरणात स्ट्रॉबेरींची जशी लागवड् केली जाते त्याच पद्धतीने ही पिढी एका संरक्षित आणि सुखदायी वातावरणात वाढते आहे. ते मागतील त्या प्रत्येक गोष्टीची पूर्तता करण्यास त्यांचे पालक तत्पर असतात. या शिवाय जशा स्ट्रॉबेरी त्यांचे सौंदर्य, नाजूकपणा आणि महाग किंमत यासाठी प्रसिद्ध असतात तशीच ही पिढी नाजूक असून ती कामाचा ताण, अडचणी आणि वैताग या गोष्टी सहनच करू शकत नाहीत व म्हणून ही पिढी स्ट्रॉबेरी प्रमाणेच आहे असे तैवान मधील लोकांना वाटते.

generation y 2

साधारणपणे ज्येष्ठ मंडळींना असे वाटत राहते की आजचा तरूण वर्ग हा बेजबाबदार, अकार्यकुशल व सातत्य न बाळगणारा असतो. खर्‍याखुर्‍या जगतातील खर्‍याखुर्‍या जबाबदार्‍या हा तरुणवर्ग समर्थपणे पेलूच शकत नाही. त्यांना मिळत असलेल्या सुखसोयी किंवा उपकरणे यांचे ते गुलाम असतात व या गोष्टींची निर्मिती करण्यासाठी प्रत्यक्षात केवढे कठिण काम करावे लागते याची अजिबात जाणीव तरूण वर्गाला नसते.

हे सगळे विचार लक्षात घेतले तर मग मनाला असा प्रश्न पडल्याशिवाय रहात नाही की या स्ट्रॉबेरी पिढी किंवा ‘Y’ पिढीच्या बिना त्रासाच्या जीवनशैलीच्या या आकर्षणामागचे सत्य तरी काय असावे? आता माझ्या कुटुंबाचे उदाहरण घेतले तर मी कॉलेजात असतानाच माझ्या वडीलांची मोठ्या पगाराची नोकरी गेली व त्यांनी स्वत:चा उद्योग धंदा सुरू केला. परंतु त्यांचा पिंड व्यावसायिकाचा कधीच नसल्याने त्यांचा उद्योग ठीकठाकच चालू राहिला वा त्यांना खोर्‍यांनी वगैरे कधीच द्रव्यप्राप्ती झाली नाही. त्यामुळे कोणत्याही आरामदायी वस्तूची मागणी मला त्यांच्याकडे कधीच करता आली नाही. त्या मानाने, माझी उद्योग बराच बरा चालला. माझ्या मुलांना मी त्यांना आवश्यक अशी प्रत्येक गोष्ट देण्यात जरी यशस्वी झालो असलो तरी मी त्यांना खूप किंमतीच्या भेटवस्तू किंवा परदेश गमन या सारख्या सुविधा देऊ शकलो नाही. आता मी आमच्या कुटुंबातील पुढची पिढी जेंव्हा बघतो तेंव्हा त्यांच्या मनात असलेली प्रत्येक गोष्ट आणि खर्चिक असा परदेशचा प्रवास त्यांना सहजपणे दिला जातो आहे असे माझ्या लक्षात येते.

बर्‍याच ज्येष्ठ मंडळींची अशी समजूत असते की सुखसोयी किंवा सुविधा यांचा अभाव असलेल्या वातावरणात जसे मागील पिढ्यांतील मुलांना वाढवले गेले तीच पद्धत योग्य आहे कारण अशा वातावरणात वाढलेली मुले खर्‍याखुर्‍या जगतातील समस्यांना जास्त चांगले तोंड देऊ शकतात. या समजुतीत तरी कितपत तथ्य आहे असाही प्रश्न मला नेहमीच पडत आलेला आहे.

सिंगापूर मधून प्रसिद्ध होणारे स्ट्रेट टाइम्सम्हणून एक वृत्तपत्र आहे. ‘स्ट्रॉबेरी पिढीची सामाजिक समस्या सिंगापूरमधे सुद्धा आहेच. या प्रश्नांची काही उत्तरे सापडतात का? हे पहाण्यासाठी या वृत्तपत्राने नुकतेच एक सर्वेक्षण केले व त्याचे निष्कर्ष आता प्रसिद्ध केले आहेत. हे निष्कर्ष मला तरी अतिशय रोचक वाटले आहेत. या सर्वेक्षणात 16 वर्षे ते 62 वर्षे या वयोगटातील 501 व्यक्तींना ते करत असलेल्या नोकरीसंबंधात कोणत्या गोष्टीचे त्यांना महत्त्व वाटते व त्यांचे कशाला प्राधान्य आहे? आणि या शिवाय नवीन पिढीच्या भावी आयुष्याबद्दल त्यांचे काय मत आहे? या दोन विषयासंबंधी प्रश्न इतर काही प्रश्नांबरोबरच विचारले होते.

या सर्वेक्षणाचे निष्कर्ष मोठे विलक्षण आले आहेत. या वायपिढीसाठी, पगार आणि नोकरी मध्ये मिळणार्‍या सुविधा या दोन गोष्टींना सर्वोच्च महत्त्व आहे. जास्त पगार व जास्त सुविधा देणारी नोकरी ही सर्वोत्तम असे त्यांना वाटते. कचेरीतील काम व इतर आयुष्य यातील समतोल राखणे याचे त्यांना काहीच महत्त्व वाटत नाही. नोकरीमधे प्रगतीच्या संधी हे त्यांच्यापुढे असलेले सर्वात मोठे आकर्षण आहे व त्यासाठी ते कोणताही वैयक्तिक त्रास सहन करण्यास आनंदाने तयार असतात. ज्येष्ठ वयाच्या लोकांना याच्या बरोबर उलट वाटते. व्यवसायातील स्वत:ची प्रगती कशी करता येईल? आणि त्या साठी आवश्यक ते शिक्षण आपल्याला कसे घेता येईल? ही प्रेरणा त्यांना सता पुढे ढकलत असते व या साठी ते कितीही वेळ अतिरिक्त काम किंवा कष्ट करण्यास तयार आहेत. तरूण आणि अविवाहित असलेल्या कर्मचार्‍यांसाठी त्यांचे काम हेच आयुष्य असल्याने इतर सामाजिक किंवा वैयक्तिक संबंध ते बाजूला टाकून आपल्या कामाला प्राधान्य देत असतात.

ज्येष्ठ कर्मचार्‍यांना नोकरीमधील सुरक्षितता हा सर्वात महत्त्वाचा घटक असतो तर वायपिढी त्याला सर्वात नीचोत्तम महत्त्व देते. या शिवाय आधीच्या पिढीपेक्षा वायपिढी ही जास्त शिकलेली, उच्च तंत्रज्ञानाने बनवलेली उपकरणे वापरण्यात जास्त कुशल आणि आजूबाजूच्या जगाशी जास्त जवळीक असलेली आहे आणि या पिढीला शाळेत असताना किंवा महाविद्यालयीन स्कॉलरशिप्स आणि स्टडी एक्स्चेंज यामुळे परदेश प्रवास घडलेला आहे असेही हा निष्कर्ष सांगतो.

हे सर्व निष्कर्ष अभ्यासल्यानंतर मला तरी सर्वसाधारणपणे असेच चित्र दिसते आहे की मी तरुण असतानाची किंवा 40/50 वर्षांपूर्वीची तरूण पिढी आणि आजची स्ट्रॉबेरी पिढी यांच्यामध्ये तसा खूपच फरक असला तरी मूलभूत आशा आकांक्षामध्ये फारसा काहीच फरक दिसून येत नाहीये. आम्हाला परदेश प्रवासाचा अनुभव प्राप्त झालेला नव्हता तरी आमच्या पिढीच्या डोळ्यासमोर हीच स्वप्ने होती व त्यासाठी असेच कष्ट करण्याची आमचीही तयारी होती. या सर्वेक्षणाने एक गोष्ट नक्कीच स्पष्ट होते आहे की आईवडीलांनी लाड केलेले असले आणि सुखदायी वातावरणात आअजची स्ट्रॉबेरीपिढी जरी वाढलेली असली तरी ती पिढी ज्येष्ठांच्या पिढीसमानच आहे. ज्या सुखदायी वातावरणात ते मोठे झाले त्या सुखदायी वातावरणाचा तसा कोणताच अनिष्ट परिणाम त्यांच्यावर होऊन ते जबाबदार्‍या पेलण्यास असमर्थ वगैरे झालेले दिसून येत नाहीयेत.

मी या वरून असेचा म्हणेन की सिंगापूरमधील वायपिढीबद्दल जे म्हणता येते तेच भारतातील वायपिढीबाबत थोड्याफार फरकाने म्हणता येईल. मुलांना हवी असलेली प्रत्येक गोष्ट नाकारत मोठे केले गेलेली मुले पुढच्या आयुष्यात जबाबदार्‍या पेलण्यास जास्त समर्थ व मजबूत बाहूंची असतात या म्हणण्याला फारसा काही अर्थ मला तरी दिसत नाही. भारतातील स्ट्रॉबेरीपिढी सुखदायी पांढरपेशी नोकर्‍यांना आज प्राधान्य देते आहे त्याचे प्रमुख कारण या नोकर्‍यांत असलेला तुलनात्मक जास्त पगार व प्रगतीच्या संधी हेच आहे. आहे. असेच वेतन व प्रगतीच्या संधी जर त्यांना सैनिकी पेशा किंवा वर्कशॉपमधील काम या सारख्या कष्टप्रद पण आव्हानात्मक कामात उपलब्द्ध झाल्या तर त्यावरही या स्ट्रॉबेरी पेढीच्या उड्या पडल्याशिवाय रहाणार नाहीत असे मला वाटते.

15 ऑगस्ट 2013

 

Advertisements

About chandrashekhara

I am a retired electronics engineer. I am interested in writing, reading books. Other hobbies include Paper models, wooden fret work and social networking.

चर्चा

अद्याप प्रतिक्रिया नाहीत.

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदला )

Connecting to %s

जुने लेख शोधा

Enter your email address to subscribe to this blog and receive notifications of new posts by email.

Join 387 other followers

MyFreeCopyright.com Registered & Protected

माझे नवीन इ-पुस्तक

एका साम्राज्याच्या शोधात

Advertisements
%d bloggers like this: