.
Travel-पर्यटन

इतिहासाच्या सोबतीने कच्छ आणि काठेवाड, भाग 6


(मागील भागावरून पुढे)

रविवार

मोरबी किंवा मोरवी हे काठेवाड मधील साधारण अडीच लाखाच्या आसपास लोकसंख्या असलेले एक छोटेसे शहर आहे. काठेवाड मधील बहुतेक शहरांप्रमाणेच 1947 पर्यंत हे शहर म्हणजे सुद्धा एक संस्थानच होते आणि एकोणिसाव्या शतकात तरी आर्थिक स्थिती फारशी चांगली नसलेले ( ब्रिटिशांच्या वर्गवारी प्रमाणे तृतीय दर्जाचे) आणि उत्पन्नाचे फारसे स्त्रोत नसलेले असे संस्थान होते. सन 1879 मध्ये ब्रिटिश सरकारने वाघजी ठाकोर यांना या संस्थानाच्या राज्यपदावर आरूढ होण्यास मान्यता दिली व त्यांच्या कारकिर्दीत संस्थानाचे चित्र पालटले. राज्यपदावर आरूढ झाल्याबरोबर वाघजींनी मोरवी संस्थानाची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी प्रयत्न चालू केले. सन 1886 मध्ये त्यांनी मोरवी शहरापासून रेल्वे मार्ग सुरू करण्याचे काम सुरू केले. त्या काळात मोरवीच्या परिसरात मिठाचे उत्पादन हा एकच महत्त्वाचा व्यवसाय असल्याने कच्छ्च्या खाडीच्या पूर्वेकडील टोकांवर असलेल्या नवलाखी बंदरातून मिठाची वाहतुक करणे सोपे जाईल या कल्पनेने या बंदराचा विकास करणे त्यांनी सुरू केले. वाहतुकीच्या प्रकल्पांशिवाय त्यांनी मोरवी मध्ये नवीन शाळा, कॉलेजे व हॉस्पिटल्स यांची स्थापना केली. वाघजी यांच्या नंतर संस्थानाच्या राज्यपदी लखदीरजी ठाकोर यांना ब्रिटिश सरकारने बसवले. लखदीरजी यांनी सुद्धा मोरवी संस्थानासाठी बरेच कार्य केले. वीज निर्मितीसाठी पॉवर हाऊस, टेलेफोन एक्सचेन्ज, नवी मंदीरे, टेक्निकल हाया स्कूल आणि इंजिनीयरिंग कॉलेज या सारख्या असंख्य नवीन गोष्टी त्यांच्या कारकिर्दीत संस्थानात सुरु झाल्या.

मोरवीचे राजे आपल्या संस्थानात नवनवीन उद्योग चालू व्हावेत यासाठी प्रयत्नशील असत. चिनी मातीचे उद्योग, त्यासाठी लागणार्‍या कच्च्या मालाची उपलब्धता संस्थानात विपुल असल्याने, सुरू व्हावेत यासाठी अनेक सवलती व सुविधा या उद्योगाला मोरवी संस्थानाने देऊ केल्या. परशुराम पॉटरीज हा 40/50 वर्षांपूर्वी मोठे नाव कमावलेला पॉटरी उद्योग मोरवी संस्थानातच कार्यरत होता. आज मोरवी मध्ये 350 च्या वर सिरॅमिक टाइल्स बनवणारे कारखाने आहेत. याशिवाय भिंतीवर लावण्याची घड्याळे बनवणारे सर्व सुप्रसिद्ध कारखाने मोरवीतच आहेत.

लखधीरजी ठाकोर यांनी 1940च्या दशकात राज परिवारासाठी एक नवा पॅलेस बांधला होता. या पॅलेसला भेट देणे हा माझ्या आजच्या कार्यक्रमातील पहिला भाग आहे. मोरवीमध्ये जी रेल्वे लाईन बांधली गेली होती, त्या लाईनवर असलेल्या नझरबाग स्थानकाच्या बाजूला हा पॅलेस बांधलेला आहे. पॅलेसचा परिसर आणि त्या बाजूने बांधलेले कंपाऊंड हे दोन्ही अतिशय भारदस्त आणि मनावर छाप पाडणारे आहेत. बाहेरच्या कंपाऊंडला असलेल्या अनेक प्रवेशद्वारापैकी एकातून आम्ही आत शिरतो आणि एक वळण घेऊन आतील कंपाउंडच्या प्रवेशद्वारापर्यंत पोहोचतो. आम्ही प्रवास करत असलेली एस.यू.व्ही गाडी आतील कंपाऊंडरला असलेल्या या प्रवेशद्वाराच्या मध्यभागी (आणि बंद) असलेल्या सर्वात मोठ्या प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूंना जी दोन छोटी प्रवेशद्वारे आहेत त्यापैकी एकातून सहजपणे आत जाऊ शकते आहे यावरून रॉट आयर्नमधून बनवलेल्या या संपूर्ण प्रवेशद्वाराच्या आकाराची कल्पना करणे सहज शक्य आहे. या प्रवेशद्वारापासून एक रस्ता सरळ पॅलेसच्या भव्य दर्शनी भागाच्या मध्यावर असलेल्या द्वाराकडे जातो. परंतु आम्ही डावीकडे वळतो आणि या बाजूला असलेल्या पोर्चखालील एका द्वाराजवळ गाडी थांबवतो.

पॅलेसची वास्तू दुमजली आहे व 1940च्या दशकात आधुनिक वास्तुकला म्हणून मानल्या जाणार्‍या आराखड्यानुसार ही वास्तू बांधलेली आहे. ही वास्तू बघताना मला मुंबईच्या मरीन लाइन्स स्टेशन जवळच्या भागातील याच कालात बांधल्या गेलेल्या इमारतींची असलेले या वास्तूचे साधर्म्य लक्षात येते आहे. वास्तूच्या दोन्ही कोपर्‍यात असलेल्या कक्षांना अर्धवर्तुळाकार आकार दिलेला आहे. वास्तूच्या दर्शनी भागावर ऑफसेट दिलेले पट्टे आहेत आणि सर्व खिडक्या अशाच एका पट्ट्यात सरळ रेषेत बसवलेल्या आहेत. खिडक्यांच्या लिंटेल्सच्या जरा वर लिंटेल्सच्या स्लॅब्ज मधूनच छज्जे बाहेर काढलेले असल्याने बाहेरच्या कडक सूर्यप्रकाशाला आत येण्यास मज्जाव केला जातो आहे.

आम्हाला तळमजल्याला भेट देण्याची फक्त परवानगी मिळालेली असल्याने हा मजला आम्हाला दाखवण्यात येतो आहे. या मजल्यावर उत्तरदक्षिण असे बांधलेले 3 स्वीट्स (Suits) आहेत. प्रत्येक स्वीट्मध्ये एक हॉल, डायनिंग रूम आणि शयनगृह हे एकापाठोपाठ एक किंवा रेल्वेच्या डब्यांप्रमाणे बांधलेले आहेत. या 3 स्वीट्सच्या मध्ये 2 खुली प्रशस्त अंगणे आहेत. या स्वीट्सच्या दोन्ही टोकांना पूर्वपश्चिम अशी विस्तारलेली अनेक दालने आहेत. यापैकी उत्तर टोकाला असलेल्या दालनांत एक मोठा दरबार हॉल, भेटीसाठी आलेल्या इच्छूकांना बसण्यासाठी असलेला बैठकीचा हॉल व एक शयन गृह आहे. दक्षिण टोकाच्या दालनांमध्ये एक पोहण्याचा तलाव, जिम्नॅशियम आणि बिलियर्ड्स कक्ष आहे. येथील बिलियर्डस टेबल नेहमीच्या टेबलांच्या दीड ते 2 पट मोठ्या आकाराचे आहे. तसेच जिम्नॅशियममधे असलेली व 1940च्या दशकात बनवलेली निरनिराळी व्यायाम करण्याची उपकरणे बघायला मला मोठी रोचक वाटत आहेत. पॅलेसमधील प्रत्येक कक्ष हा निराळ्या पद्धतीने बांधला गेलेला आणि सजवला गेलेला आहे. आतील सजावट पहाताना तिचा खानदानी व श्रीमंती रुबाब मनाला मोठी भुरळ् घालतो आहे. प्रत्येक कक्षाच्या तळाला असलेल्या इटालियन संगमरवराच्या टाइल्स सुद्धा निरनिराळ्या प्रकारच्या आणि रंगांच्या संगमरवरातून घडवलेल्या आहेत. हा पॅलेस बघताना त्या काळातील संस्थानिकांची जीवनशैली आणि श्रीमंती यांची चांगलीच कल्पना येते आहे. अर्थात ही सर्व संस्थानिक मंडळी शेवटी इंग्रज सरकारच्या इशार्‍यानुसार चालत होती हे सत्य या देखाव्यामागे अबाधित आहेच. लायब्ररी कक्षात असलेला एक 1940 मधील नकाशा मला अतिशय रोचक वाटतो आहे. हा नकाशा निरनिराळ्या प्रकारच्या झाडांच्या लाकडांचे तुकडे एका पॅनेलवर इनलेकरून बनवलेला आहे. प्रत्येक मोठ्या संस्थानासाठी निराळ्या झाडाचे लाकूड वापरलेले आहे. दरबार हॉलमधील ब्रिटिश कलाकारांनी काढलेली तैलचित्रे आणि छायाचित्रे मला खूपच भावतात.

मोरवी रेल्वेची इंजिन शेड

जुन्या पॅलेसचा दर्शनी भाग

मच्छू नदीवरचा झुलता पूल

मणी मंदीर

 

मोरवीची मच्छू नदी

पॅलेसची भेट आटोपून आम्ही बाहेर पडतो. बाजूलाच मोरवी मधील जुन्या रेल्वे इंजिनांसाठी बांधलेली शेड आहे. ती बघून आम्ही मच्छू नदीवरील झुलता पूल, जुना किंवा दरबार गढ पॅलेस आणि मणी मंदीर यांना एक धावती भेट देतो. परतत असताना हिरव्या रंगाच्या व ग्रीन टॉवर असे नाव असलेल्या एक लोखंडी स्ट्रक्चरकडे माझे सहज लक्ष जाते.

भोजन झाल्यावर दुपारी, मोरवीचे प्रमुख आकर्षण ( निदान माझ्या मताने) असलेल्या छोट्या रणाकडे जाण्यास आम्ही निघालो आहोत. हे छोटे रण मोरवीपासून फक्त 40 किमी अंतरावर आहे. मोरवी शहर जरी गुजराथच्या काठेवाड भागामध्ये मोडत असले तरी छोटे रण हे नेहमीच कच्छचा एक भाग म्हणून मानले गेले असल्याने मी परत एकदा कच्छ्कडे चाललो आहे असे म्हणता येईल. मोरवीजेतपूर यांना जोडणारा हायवे 321 आम्ही जेतपूरजवळ सोडतो व गुजराथ सरकारने नवीनच बांधलेल्या हायवे 7 वर वळतो. गुजराथची राजधानी अहमदाबाद व उत्तरेकडील शहरे या नवीन रस्त्याने आता सरळ जोडली गेलेली आहेत. खाखरेची गावाकडे जाणारा दुसरा एक छोटा रस्ता आम्हाला घ्यायचा असल्याने आम्ही हायवे 7 लगेचच सोडतो व या रस्त्यावर वळतो. नर्मदा नदीचे पाणी आता इतपर्यंत कॅनॉलने आणले गेले आहे. या पाण्यावर वाढणारी एरंडी व जिरे यांची जोमदार पिके रस्त्याच्या दोन्ही बाजूला दिसत आहेत. नर्मदा कॅनॉलचे पाणी पोचल्याने हा भाग आता संपन्न झालेला दिसतो आहे.

जंगली गाढवाची कवटी

थोड्याच वेळात आम्ही वेणसर गावाजवळ पोचतो. येथून छोटे रण सुरु होते व उत्तरेला त्याचा विस्तार होत जातो. रणात जाणारा एक कच्चा रस्ता आम्ही पकडतो. आजूबाजूचा आसमंत परत एकदा गेले काही दिवस सतत बघितल्यामुळे ओळखीच्या झालेल्या मोठ्या रणातील आसमंतासारखा दिसू लागला आहे. लालसर ब्राऊन जमीन, त्यावर मधून मधून असलेली बेटे किंवा उंचवटे, गवताळ जमीन व सर्वत्र पसरलेली बाभूळ आणि विलायती बाभूळ यांची झुडपे हेच दृष्य चारी बाजूंना दिसते आहे. थोड्याच वेळात रस्ता संपतो आणि आम्ही सुकलेल्या रणातील सपाट जमिनीवर पोचतो आहोत. येथे हिवाळा आणि उन्हाळा या दोन्ही ऋतूंमध्ये गाडी चालवता येते मात्र दुसर्‍या कोणाच्या गाडीच्या टायरच्या खुणांवरून मार्गक्रमण करणे हे नेहमीच बिनधोक असते. काही अंतरावर मला एक फुटलेला बंधारा दिसतो. या बंधार्‍याला सागर बंधारा असे नाव दिलेले होते परंतु मागच्या वर्षीच्या पुरामध्ये तो वाहून गेलेला आहे. थोड्या उंचीवर असलेल्या एका जागी आम्ही गाडी थांबवतो आणि रानटी गाढवे दिसतात का हे बघण्यासाठी खाली उतरतो. छोटे रण हे रानटी गाढवांसाठी अभयारण्य म्हणून घोषित केलेले आहे व ही रानटी गाढवे पहाण्यासाठीच खरे म्हणजे आम्ही येथे आलो आहोत. खाली मला एका जागी गाढवाची काही हाडे व कवटी पडलेली दिसते. हे गाढव बहुधा काही वर्षांपूर्वी मृत झालेले असावे परंतु गिधाडे आणि नंतर मुंग्या यांनी आपले काम उत्कृष्ट रित्या करून नंतर ही हाडे इतकी चाटून पुसून स्वच्छ केलेली आहेत की ही आता ती धुतल्यासारखी स्वच्छ दिसत आहेत. लांब अंतरावर एक नर गाढव एकटेच फिरताना आम्हाला दिसते ( रानटी नर गाढवे नेहमीच एकटी फिरत असतात.) पण ते बर्‍याच अंतरावर असल्याने त्याचे छायाचित्र काढणे मला शक्य होत नाही.

आम्ही पुढे निघतो. पुढे काही अंतरावर एक तळे दिसते आहे. याला स्थानिक लोक कॅनॉल तळे या नावानेच ओळखतात कारण नर्मदा कॅनॉल मधून गळती झालेल्या पाण्यामुळे हे तळे तयार झालेले आहे. मला तळ्याच्या निळ्याभोर पाण्याच्या पृष्ठभागावर काही पांढरे ठिपके तरंगताना दिसतात. आम्ही थोडे पुढे जातो व पक्षी विचलित होणार नाहीत एवढ्या अंतरावर गाडी थांबवतो. बायनॉक्यूलर्स मधून बघताना लक्षात येते की तेथे 4 पेलिकन आणि त्यांच्या मागे 6 फ्लेमिंगो दिसत आहेत. फ्लेमिंगो कुटुंबात 4 मोठे पक्षी व 2 पिल्ले आहेत. जरा काळजीपूर्वक5 बघितल्यावर5मी त्यांना नीट बघू शकतो आहे. खरे तर कच्छचे रण् हे फ्लेमिंगो पक्षांसाठी सुप्रसिद्ध आहे पण आतापर्यंतच्या या सहलीत, मला फ्लेमिंगो पक्षी कोठेच दिसू शकले नव्हते. फ्लेमिंगो बघता येतील ही माझी अपेक्षा येथे छोट्या रणात थोड्या प्रमाणात का होईना! शेवटी पूर्ण होते आहे. पाण्यामध्ये हे फ्लेमिंगो आपली मान मुरडुन घेऊन खाली पाण्यातील मासे शोधत अगदी स्तब्धपणे उभे आहेत. निळ्याशार पाण्यामध्ये त्यांचे केशरी रंगाचे पाय उठून दिसत आहेत.

आम्ही परत वळतो व जरा उंचावर असलेल्या हांडी बेटाकडे गाडी वळवतो. काही काळापूर्वी या ठिकाणाचा फायरिंग रेंज म्हणून पोलिस वापर करत असत. परंतु पर्यावरणवाद्यांच्या दबावामुळे त्यांनी आपली फायरिंग रेंज येथून आता हलवली आहे व रानटी गाढवांना हे रान परत मोकळे झाल्याने ती परतली आहेत.

हांडी बेटावर गाडी थांबवून आम्ही खाली उतरतो व इकडे तिकडे जरा बघितल्यावर 3 धष्टपुष्ट जनावरे शोधायला आम्हाला फारसा वेळ् लागत नाही. मध्यम आकाराच्या आणि घोड्याच्या उंचीएवढ्या असलेल्या या सर्व माद्या आहेत. त्यांच्या अंगावर ब्राऊन आणि पांढर्‍या रंगाचे पॅचेस दिसत आहेत.

हांडी बेटावर आणखी पुढे गेल्यावर आम्हाला धवल मरुभूमीचा एक पट्टा दिसतो. छोट्या रणाच्या काही भागात ही धवल मरुभूमी मोठ्या रणाप्रमाणेच दिसते. मात्र येथे असलेल्या मिठाचे व्यापारी स्वरूपात उत्पादन केले जाते आहे असे समोर उभे असलेली मिठागरे व ट्रक यावरून कळून येते आहे.

छोट्या रणातून परतताना खाखरेची गावाजवळ मला दोन किंवा तीन् मोर व सात किंवा आठ लांडोर यांचा एक थवा दिसतो. मोरांची निळसरहिरवी पिसे पूर्णपणे झडून गेलेली दिसत आहेत. फक्त त्यांच्या माना व डोक्याजवळचा भाग तेवढा निळसर हिरवा दिसतो आहे. दोन मोरांनी आपला पिसारा खरे तर पूर्णपणे पसरलेला आहे. परंतु निळसर पिसे झडून गेल्याने हा पिसारा सध्या पिवळट ब्राउनिश दिसतो आहे. हा असा पिसारा बघितल्यावर कोणतीही लांडोर साहजिकपणे त्यांच्याकडे ढुंकूनही बघत नाहीये.

उद्या सकाळी आम्ही काठेवाडच्या समुद्र किनार्‍यावर असलेल्या प्रसिद्ध द्वारकाधीश मंदीराकडे जायला निघणार!

3 मे 2013

Advertisements

About chandrashekhara

I am a retired electronics engineer. I am interested in writing, reading books. Other hobbies include Paper models, wooden fret work and social networking.

चर्चा

2 thoughts on “इतिहासाच्या सोबतीने कच्छ आणि काठेवाड, भाग 6

 1. atishay sundar varnan ahe. bhasha oghavati va sahaj ahe. pudhcha bhag pahin

  Posted by maheshnamjoshi | जून 13, 2013, 4:43 pm
  • महेश

   धन्यवाद प्रतिसादासाठी

   सध्या मराठी लेखन काही अडचणींमुळे थोडे मगे पडले आहे. जुलै नंतर परत पूर्वस्थितीवर यावे.

   Posted by chandrashekhara | जून 14, 2013, 6:57 सकाळी

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s

जुने लेख शोधा

Enter your email address to subscribe to this blog and receive notifications of new posts by email.

Join 387 other followers

MyFreeCopyright.com Registered & Protected

माझे नवीन इ-पुस्तक

एका साम्राज्याच्या शोधात

Advertisements
%d bloggers like this: